इच्छा

Submitted by संशोधक on 21 January, 2020 - 04:07

कधी कधी वाटतं सोडून द्यावं सगळं अन् जावं निघून कुठेतरी दूर ...
जिथे येणार नाहीत कसलीच संकटं,
पडणार नाहीत भयानक प्रश्न, वाटणार नाही जिव्हाळा कुणाशीच ...
जिथे नसेल अशी जीवघेणी स्पर्धा, जी संपवून टाकते जगण्याची इच्छा...
जिथे नाही करावा लागणार समाजाचा विचार, नाहीत द्यावी लागणार इतरांच्या प्रश्नांची उत्तरं...
नसेल कुणाचं नियंत्रण तुमच्या इच्छेवर, जिथे येणार नाहीत कसलीच बंधनं तुमच्या विचारांवर...
जिथे नाही झिजावं लागणार इतरांसाठी,
जिथे फक्त आपण असू, स्वतःसाठी...
मग आठवतात ते चेहरे,
जे बसलेत आस लावून उज्वल भविष्याची,
गर्द अंधाऱ्या रात्रीमागून उगवणाऱ्या पहाटेची...
अन् मी पुन्हा जुंपून घेतो स्वतःला या रहाटगाडग्यात,
स्वइच्छेचा गळा घोटून...
इतरांच्या इच्छापूर्तीसाठी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users