कावळा
एका घरात एक आजीबाई एकटाच राहत होत्या. कुणीही नातेवाईक नाही कि कुणी सांगे सोयरे नाहीत.
दिवसभर त्या घरात एकट्याच असायच्या. वेळ घालवण्यासाठी खिडकीपाशी उभं राहायच्या, खिडकीत येणाऱ्या प्रत्येक पक्षांशी बोलायच्या, त्यांच्या आवडीची फळे, खाऊ त्यांना खाऊ घालायच्या. कावळे दादांची आणि आजीची तर खूप छान गट्टी जमली होती. कावळेदादा नेहमीच ठरलेल्या वेळेवर यायचे, काव काव करून आपण आल्याची वर्दी द्यायचे, आजीने ठेवलेला सगळं खाऊ फस्त करायचे आणि भुर्रकन उडून जायचे. आजीलाही या पक्षांचा खूप आधार वाटत होता.
त्या एकट्या राहतायत हे एका चोराच्या नजरेस पडलं, दुपारची कमी वर्दळ पाहून एक दिवस एका भुरट्या चोराने त्यांच्या घरी चोरी करायची ठरवली
दारावरची बेल वाजऊन पोस्टमन अशी हाक दिली. आजीबाईंनी ती हाक ऐकून दार उघडले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तो चोर घरात शिरला, आजी बाईंना धक्का बुक्की करून घाबरवू लागला. सगळे सामान अस्थाव्यस्थ करून काही मौल्यवान सापडते आहे का ते पाहू लागला. तेवढ्यातच आजीचे लाडके कावळेदादा भूक भागवण्यासाठी खिडकीपाशी आले. काव काव करून देखील आजी खाऊ देत नाही म्हणून घरात शिरले तेव्हा पाहताक्षणी त्यांना आजी अडचणीत सापडलीय हे लक्षात आले. कावळे दादांनी जोरात काव काव ओरडून आपल्या सर्व सग्या-सोयऱ्यांना गोळा केले आणि एकाएकी त्या चोरावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या पक्षी हल्ल्याने चोर चांगलाच गांगरुन गेला. त्यात आजीच्या लाडक्या कावळ्याने आपल्या तीक्ष्ण चोचीने त्या चोराचा एक डोळाचं फोडला. वेदनेने विव्हळणाऱ्या चोराने मग त्या फुटलेल्या डोळ्यावर हात झाकून आजीबाईंच्या घरातून धूम ठोकली आणि पळून गेला. असे कावळे दादाच्या प्रसंगावधानाने आजीची चोराच्या तावडीतून सुखरूप सुटका झाली.
म्हणूच मित्रांनो प्राणी मात्रांवर दया करा. त्याची परतफेड ते आपल्यापरीने कशी करतील आपण कल्पनाही करू शकत नाही