इस्त्रायलमधील कावळे, राघू आणि भारतीय गाढवे
२००९ मध्ये मला पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाचे तंत्र शिकण्यासाठी इस्त्रायलला (त्यांच्या शब्दात - इजराईल) जाण्याचा योग आला. ह्या अभ्यास दौऱ्यादरम्यानच्या तीन रंजक अनुभवांबद्दल येथे मी लिहिणार आहे. माझा मुक्काम इस्त्रायलच्या दक्षिण किनाऱ्यावर समुद्राकाठी वसलेल्या ईलात ह्या सुंदर शहरात होता. माझ्या सोबत माझे पी.एचडी. चे मार्गदर्शक डॉ. प्रवीण चरडे होते. ते नागपूरच्या सेवादल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. खरे तर, त्यांच्याच पुढाकाराने हा अभ्यास दौरा घडून आला होता. या ठिकाणी मूळ भारतीय वंशाच्या प्रो. रुवेन योसेफ (आपल्याकडे ह्याचा उच्चार रुबेन जोसेफ असा करतात) ह्या जगप्रसिद्ध पक्षिशास्त्रज्ञाने इंटरनॅशनल बर्ड रिसर्च सेंटर (IBRC) स्थापन केले असून त्यांची चमू गेल्या अनेक दशकांपासून पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करते. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गाजलेला रॉलेक्स पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. रुवेन सर मुंबईत जन्माला आलेले बेने इजराईली/ ज्यू असून विशेष म्हणजे त्यांना गोड मराठी बोलता येतं!
दररोज सकाळी ठीक सहा वाजता आम्ही इंटरनॅशनल बर्ड रिसर्च सेंटरला जात असू. त्याकरिता आम्हाला घ्यायला सेंटरची गाडी येत असे. तेथे पोहोचल्यानंतर आम्ही पक्ष्यांना पकडून त्यांच्या पायात विशिष्ट क्रमांक असलेले कडे (रिंग) टाकून मोजमापे घेत असू आणि लागलीच त्याला मुक्त करीत असू. पक्षी पकडण्यासाठी ह्या ठिकाणच्या वाळवंटातील झुडूपी जंगलात अनेक कायम स्वरूपी फासे (बर्ड ट्रॅप) लावलेले आहेत. तसेच पक्षी पकडण्याच्या जाळ्या (मिस्टनेट) दररोज सकाळी उभारल्या जातात. ह्या जाळ्या कोळी लोक मासेमारीसाठी उपयोगात आणतात तशा प्रकारच्या, म्हणजे रंगहीन आणि अगदीच पातळ धाग्याच्या बनवलेल्या असतात. त्यामुळे त्या एकदा काठ्यांवर उभारल्या की पक्ष्यांना अगदीच दिसून पडत नाहीत आणि उडताना पक्षी आपसूकच त्यात फसतात. अशा फसलेल्या पक्ष्यांना जाळीतून हळुवारपणे काढणे ही सुद्धा एक कला असल्याचे शिकायला मिळाले. त्यावेळेस आपल्या संशोधनामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि केंद्र बिन्दु ‘पक्षी’ असतो हे लक्षात ठेवणे जरूरी असते. हे पक्षी स्थलांतराच्या विविध अभ्यास तंत्रांचे प्रशिक्षण घ्यायला आम्ही येथे आलो होतो. त्याच वेळेस ह्या ठिकाणी पोलंडचा एक युवक, फ्रांसची एक युवती व मंगोलीयाचा पक्षीतज्ञ प्रा. गोंबोबातर सुद्धा आलेले होते.
घुसखोर कावळ्यांची पिल्लं
दुसऱ्या दिवसी सेंटरवरील दोन तंत्रज्ञ (झादोक आणि इव्हान) गैरहजर असल्याचे आढळून आले. पण ते काहीतरी ‘मिशन’वर गेल्याचे कळले. दुपारी सेंटरची गाडी आणि हे तंत्रज्ञ परतले. सोबत दोन छोट्या डब्यात त्यांनी कावळ्यांची पिल्लं पकडून आणली होती. डबा उघडताच पिल्लांनी खाऊसाठी चोची उघडल्या आणि खाऊ मागण्याचा आर्जवी आवाज करायला लागले. त्यांच्या चोचीमधला भडक लाल नारिंगी रंग सुंदर असतो.
पक्ष्यांच्या पिल्लं नेहेमीच अधाशी असल्यासारखी असतात. कारण त्यांची वाढ झटपट होते. मला वाटले पिल्लं घरट्यातून खाली पडली असतील. पण रुवेन सरांनी नंतर आम्हाला सगळी माहिती सांगितली. कावळे इस्त्रायल तसेच मध्यपूर्वेतील इतर देशात भारतातून जहाजांवर प्रवास करून पोहोचले. हळूहळू त्यांचा इथे जम बसला आणि संख्या वाढत गेली. कावळे पक्ष्यांमधील सर्वात चतुर प्रजाती होय. स्वभावतःच ते आक्रमक आणि मिश्राहारी असतात. म्हणजे मिळेल ते खाऊन ते जगू शकतात. कत्तलखाने, कचरा टाकण्याच्या जागा (डंपिंग ग्राउंड), तसेच गलीच्छ वस्त्यात राहायला त्यांना आवडते. ते स्वतःच्या घरट्याचे आक्रमक होऊन रक्षण करतात. तर, इस्त्रायलला घुसखोर (Invasive species) म्हणून आलेले कावळे चांगलेच मुजोर झाले. आता ते स्थानिक पक्ष्यांची अंडी-पिल्लं पळवू लागले. आधीच वाळवंटात फार कमी पक्षी प्रजाती टिकाव धरतात. त्यांच्यावर आलेले हे ‘कावळेरुपी’ विदेशी अस्मानी संकट त्यांची संख्या कमी करायला कारणीभूत ठरले. रुवेन साहेब आणि त्यांच्या चमूच्या हे लक्षात आले.
मग त्यांनी ‘कावळे उच्चाटन मोहीम’ राबविण्याचे ठरविले. सुरुवातीला त्यांनी छऱ्याच्या बंदुकीने (एअरगन) कावळ्यांना टिपणे सुरु केले. काहीच दिवसात कावळ्यांनी सेंटरची गाडी आणि कर्मचारी लक्ष्यात ठेऊन ते दिसताच आरडाओरडा करायला सुरुवात केली. सर्व कावळे बंदुकीच्या मारा करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वर उंचावर उडायला लागले. बंदुकीसारखे शस्त्र कावळ्यांच्या चतुराईसमोर फेल ठरले.
मग शास्त्रज्ञांनी कावळ्यांची घरटी शोधून ती नष्ट करायला सुरुवात केली. त्यासाठी उंच क्रेनच्या सहाय्याने झाडावरचे घरटे नष्ट केले जात असे. हळूहळू कावळ्यांच्या हे लक्ष्यात आले. आता कावळे क्रेनच्या आवाक्यापेक्षा जास्त उंचीवरच्या फांदीवर घरटी करू लागले. घरटे नष्ट करायची कल्पना सुद्धा फेल होते असे वाटत असतानाच शास्त्रज्ञांनी असे ठरवले की ज्या झाडावर कावळ्याने खूप उंचावर घरटे बांधले आहे त्या झाडाचा शेंडाच उडवून टाकायचा आणि कावळ्याची पिल्लं मारून टाकायची. संपूर्ण ईलात शहरात राबविली गेलेली ही मोहीम यशस्वी होणार असे वाटत होते. आता शहरात कावळ्याचे एकही घरटे दिसत नव्हते. मग, मजेदार गोष्ट अशी की इस्त्रायलमध्ये अजूनही भरपूर कावळे आहेत, दिसत होते. त्याचे कारण काय असावे बरे?
रात्री रुवेन साहेबांच्या घरी जेवायला जात असताना त्यांनी उंचावरून पलीकडे दिसणारी रोषणाई दाखविली. मला वाटले इस्त्रायलमधील दुसरे एखादे शहर असेल. पण, ते जोर्डन मधील अकाबा हे मोठे शहर होते. अगदी काही किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. तर, कावळ्यांनी काय केले की रात्री झोपायला आणि घरटी करायला ते जोर्डनला जातात (म्हणजे आपल्या दृष्टीने दुसर्या देशात) आणि दिवस उजाडला की ईलातमध्ये पोटापाण्याचे बघायला येतात. अधूनमधून एखादे कावळ्याचे जोडपे ईलातमध्ये घरटे करून बघते. जागरूक नागरिक त्याची तक्रार करतात. मग शास्त्रज्ञ घरटे तोडून त्यातील कावळ्याची पिल्लं काढून आणतात आणि एका बंद डब्यात मरण्यासाठी टाकून देतात. तेच आम्ही बघत होतो. मानवाने चतुर कावळ्याचे उच्चाटन करायचा केलेला प्रयत्न कसा अयशस्वी झाला त्याचेच हे उदाहरण. कावळ्यांची संख्या कमी करायची असेल तर आपल्या परिसरातील उपलब्ध खाद्य कमी करावे लागते (त्यांना खाऊ घालणे, कचरा व्यवस्थापन, खरकटे न टाकणे, स्वच्छ कत्तलखाने, मांसाची दुकाने स्वच्छ ठेवणे इ.). घरटी नष्ट करून, झाडे तोडून वा त्यांना बंदुकीने मारून आपण कधीही त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही हेच खरे आहे.
शेती, मधमाशा आणि राघू पक्षी
आम्हाला एका शेतात नेण्यात आले. त्या शेतात तसेच आजूबाजूच्या प्रदेशात मका तसेच सूर्यफुलाची लागवड केलेली होती. शेताच्या एका बाजूस मोठ्या पेट्या ठेवलेल्या होत्या. अर्थात त्यात मधमाशा पाळलेल्या होत्या. ह्या मधमाशा शेतातील सूर्याफुलांचे परागणण घडवून आणतात व त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते. ह्या मधमाशांच्या पेट्या महाग असतात आणि विकत घ्यायला लागतात.
मग आमचे येथे काय काम होते? ह्या शेतातील मधमाशांचा इस्त्रायलवरून स्थलांतर करणार्या राघुंच्या थव्याला सुगावा लागला होता. दक्षिणेकडून (आफ्रिकेतून) उत्तरेकडे (अर्थात युरोपकडे) परतीच्या प्रवासाला निघलेल्या यूरोपियन राघूच्या (यूरोपियन बी-ईटर - मधमाशा खाणारे पक्षी) थव्याने आराम आणि उदरभरणासाठी (Feeding and resting stopover) येथेच मुक्काम ठोकला होता. जसे आपण थकलो की एखाद्या धाब्यावर थांबतो ना तसेच!
(छाया: राघुंना पकडण्यासाठी लावलेली जाळी, शेती, मधमाशांच्या पेट्या आणि मुक्तपणे बागडणारे राघू)
आता ह्या राघुंनी शेतात पाळलेल्या मधमाशांचा फन्ना उडवायला सुरुवात केली. हतबल शेतकर्याने मग राघू पक्ष्यांना पकडण्यासाठी इंटरनॅशनल बर्ड रिसर्च सेंटरला कळवले. म्हणून मग आम्ही पक्षी पकडण्यासाठीच्या मिस्टनेट सोबत घेऊन येथे पोचलो होतो. लोखंडी सळया मधमाशांच्या पेट्यांशेजारी गाडून त्याला मिस्टनेट्स लावल्या. आम्ही मागे होताच मधमाशा पकडायला झेपावणारे राघू मिस्टनेटमध्ये अडकू लागले. दोन तीन पक्षी अडकले की आम्ही ते पक्षी काढून कापडी पिशवीत जमवायला सुरुवात केली. शंभरावर राघू पकडून झाल्यानंतर आम्ही मिस्टनेट्स गुंडाळल्या आणि पक्षी घेऊन सेंटरला परत आलो. परतताना मक्याच्या गोड कणीसाचा आस्वाद घ्यायला आम्ही विसरलो नाही!
पक्ष्यांना रिंगिंग करून तेथेच सोडले असते तर परत त्यांनी मधमाशा संपवल्या असत्या. अशा प्रवासी पक्ष्यांना रिंगिंग करून विशिष्ट अंतरापर्यंत उत्तरेला सोडले तर ते त्याच शेतात लगेच परत येतात. पण जसजसे आपण अंतर वाढवत जाऊ तसतसे त्यांचे परत येण्याचे प्रमाण घटत जाते. पुढे एका विशिष्ट अंतरानंतर मात्र एकही पक्षी परत येत नाही. म्हणजे त्या पक्ष्यांना ‘आपण आपल्या प्रवासात खूप पुढे आलोय त्यामुळे आता त्याच शेतात परत (मागे) जायला परवडणार नाही’ हे निश्चितच कळत असावे. अशाप्रकारचा संशोधन निबंध रुवेन सरांनी प्रकाशित केल्याचे सांगितले.
मला पडलेला प्रश्न म्हणजे ‘पक्षी पकडून शेतकर्याचे नुकसान वाचविण्यात सेंटरचा काय फायदा?’ त्यात दोन फायदे आहेत. एक म्हणजे पक्ष्यांना रिंगिंग केले जाते. पुढील वर्षी परत तेच पक्षी त्याच शेतात येतात का ते कळते, त्यांच्या स्थलांतराबद्दल माहिती मिळविता येते. दुसरे म्हणजे मधमाशांना वाचविल्यामुळे शेताचे नुकसान कमी होते. त्याचा मोबदला म्हणून शेतकरी राघू पक्ष्यांना पकडून दूर सोडण्यासाठी पैसे देतो! अशाप्रकारे सगळ्यांचा फायदा होतो. आपल्या कडे महत्त्वाची गोष्ट अशी की राघू शेतातील किडे खातात म्हणून शेती उपयोगी पक्षी मानला जातो. त्यात तो शेती उपयोगी मधमाशा किती खातो आणि नुकसान करणारे कीटक किती खातो हेही आपण बघायला हवे!
(छाया: जाळीत फसलेले राघू काढताना)
(छाया: राघुंच्या पायात रिंग घालण्यापूर्वी)
इस्त्रायलमधील भारतीय गाढवे
त्या सूर्यफूलाच्या शेतातून यूरोपियन राघू (बी-ईटर) पक्षी पकडून परत निघालो तेव्हा रस्त्याने खजुराची बाग दिसली. तिकडे झादोकनी कार थांबविली. इस्त्रायल खरे म्हणजे वाळवंट. तंत्रज्ञानाचा उपयोग करून तेथील जहाल देशभक्तांनी अथक व कठोर परिश्रम घेऊन त्याचे नंदनवन केले आहे. ह्या बागेत ठिबक सिंचनाचा चतुराईने उपयोग करून केवळ झाडाच्या बुंध्याजवळ पाणी पुरविलेले होते. मलेशियन तसेच बांगलादेशी मुस्लिम मजूर येथे शेतातील कामे करतात असे कळले (हे मजूर स्वस्तात मिळतात).
खजुराच्या बागेत दोन-चार गाढवे चरताना दिसली. विचारणा केली असता कळले की ती भारतीय गाढवे आहेत. मला इस्त्रायलमध्ये ‘भारतीय’ शब्द ऐकूण मनस्वी आनंद झाला. इथेही कुणीतरी ‘भारतीय’ आहे असे उगाच वाटले. ती गाढवे निवांतपणे गवत खात होती. ती काही काम करीत नसावीत असेही वाटून गेले. तेव्हा रुवेन सरांनी त्यावर प्रकाश टाकला. ही गाढवे भारतातून आणल्या गेली ती केवळ गवत खाण्यासाठी आणि प्रजोत्पादन करण्यासाठी. म्हणजे असे की ठिबक सिंचनामुळे खजुराच्या बुंध्याजवळ गवत वाढते. ते जर काढले नाही तर संपूर्ण पाणी तेच शोषून घेऊ शकते. वाळवंटात पाण्याचे महत्त्व व मूल्य फार असते हे सांगायची गरज नसावी. गाढवांचे काम म्हणजे ते गवत खाणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. गवत काढायला मजूर ठेवणे फार महाग पडते. त्यापेक्षा गाढवाची एक जोडी विकत घेऊन ठेवायला परवडते. ती एकदाची गुंतवणूक असते. गाढवे बागेतले गवत नियंत्रित तर करतातच, सोबतच त्यांना पिल्लं पण होतात. ही पिल्लं विकून परत बक्कळ पैसे मिळतात. गाढवांची लीद (शेण) त्याच बागेत खत म्हणून वापरतात. हे बोनस. अच्छा एक व्यक्त कराययचेच राहिले. इथली गाढवे भारतातल्या गाढवापेक्षा सुखी वाटली! का ते सुजाण वाचकांना कळले असेलच!
बागेच्या कुंपणाजवळ जाऊन फोटो काढायला गेलो तर सर बोलले
“अरे तुला तुझ्या इंडियन ब्रदर सोबत फोटो काढायचा आहे का?”
भारतीय वंशाच्या गध्यांचा मला एवढा अभिमान यापूर्वी कधीच वाटला नव्हता. त्यामुळे अर्थातच
“इस गधेके साथ एक फोटो तो बनताही है”
असे म्हणत मी स्वतःचा फोटो काढून घेतला (तेव्हा सेल्फीची क्रेझ नव्हती, नाही तर सेल्फीच काढली असती)! फ्रेममध्ये निवांतपणे चरणारी गाढवे दिसतील ह्याची खातरजमा करून घेतली.
(छाया: भारतीय गाढवासोबत एक फोटो)
वाळवंटातून उत्कृष्ट प्रतीचे खजूर भारतात आयात केले जातात हे माहिती होते. पण त्यामागे भारतीय गध्यांचे असलेले असे निवांत ‘योगदान’ मला माहिती नव्हते. आता ते आयात केलेले उत्कृष्ट प्रतीचे खजूर मला आणखी गोड वाटायला लागले आहेत!
डॉ. राजू कसंबे,
सहाय्यक संचालक – शिक्षण,
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई
भ्रमणध्वनि – ९००४९२४७३१
मस्त! सर, तुम्ही खूप छान
मस्त! सर, तुम्ही खूप छान माहिती देता दरवेळेस. प्रवासामुळे माणुस विचार आणी आचाराने पण समृद्ध होतो आणी त्याचा फायदा इतरांना पण होतो. लिहीत रहा. तुमचे अनूभव वाचायला खूप आवडतात.
फारच रोचक माहिती! धन्यवाद!
फारच रोचक माहिती! धन्यवाद!
छान माहितीपूर्ण लेख. आपले लेख
छान माहितीपूर्ण लेख. आपले लेख नेहमी आवर्जून वाचते.
रोचक माहिती.
रोचक माहिती.
खूप छान माहिती मिळाली. लिहित
खूप छान माहिती मिळाली. लिहित रहा.
इंटरेस्टिंग! आवडली माहिती.
इंटरेस्टिंग! आवडली माहिती.
मस्त माहिती . सोबत फोटो देखील
मस्त माहिती . सोबत फोटो देखील असायला हवे होते. शक्य असल्यास जरूर टाका इथे
आणि आपण गाढव शब्द हि शिवी
आणि आपण गाढव शब्द हि शिवी म्हणून वापरतो.
उलट गाढव फार प्रामाणीक आणि कामसू प्राणी आहे. दिले ते काम पुर्ण करतो. शंका कुशंका विचारत नाही.
गाढव कुठला!
खूप छान माहीती
खूप छान माहीती
खूपच छान माहिती
खूपच छान माहिती
रोचक माहिती आहे ही. कावळे
रोचक माहिती आहे ही. कावळे चतुर असतात पण एवढे हे माहीत नव्हते.
मस्त माहीती !
मस्त माहीती !
मस्त आहे लेख. बर्याच नवीन
मस्त आहे लेख. बर्याच नवीन गोष्टी समजल्या.
छान माहिती.
छान माहिती.
तुमचे अनुभव लिहित रहा.
छान लेख . धन्यवाद
छान लेख . धन्यवाद
वाह वा!
वाह वा!
मस्तच लेख. आवडला.
कावळ्याला सिग्नलवर बदाम टाकून फोडताना पाहीलय तिन वर्षांपुर्वी.
खूपच छान माहिती
खूपच छान माहिती
सोबत फोटो देखील असायला हवे
सोबत फोटो देखील असायला हवे होते. +१
शास्त्रज्ञ घरटे तोडून त्यातील
शास्त्रज्ञ घरटे तोडून त्यातील कावळ्याची पिल्लं काढून आणतात आणि एका बंद डब्यात मरण्यासाठी टाकून देतात>> अरेरे. फारच वाईट.
मस्त रोचक !
मस्त रोचक !
मस्त रोचक माहिती.
मस्त रोचक माहिती.
अतिशय रोचक माहिती!
अतिशय रोचक माहिती!
मस्तच आणि आगळेच अनुभव आहेत.
मस्तच आणि आगळेच अनुभव आहेत.
मस्त माहिती. कावळे खूप
मस्त माहिती. कावळे खूप हुशार आहेत ...
छान लिहिलंय. वेगळेच अनुभव
छान लिहिलंय. वेगळेच अनुभव आहेत.
पण लोकल पक्षी वाचवण्यासाठी कावळ्यांना डायरेक्ट नष्ट करण्याचा निर्णय पटला नाही. तो सुद्धा बर्ड रिसर्च करणार्या संस्थेने घ्यावा याचे आश्चर्य वाटले. सर्व कावळे पकडून दूर दुसर्या देशांमध्ये सोडणे (त्या देशाच्या परवानगीने) वगैरे करता आले नसते का? किंवा इतर काही उपाय असतील?
बी इटर पक्ष्यांनाही राघू म्हणतात हे आजच कळले. मला वाटायचे राघू म्हणजे फक्त पोपट.
त्या गाढवांना आनंद झाला असेल
त्या गाढवांना आनंद झाला असेल ना एवढ्या दुरुन मातृभूमीतला ब्रदर भेटल्यावर. नक्कीच त्यांना भावना अनावर झाल्या असतील.
खूप छान माहिती. लेख आवडला.
खूप छान माहिती. लेख आवडला.
पूर्वी मुंबईत खूप चिमण्या आणि कावळे दिसत असत, पण आता त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे, हे प्रकर्षाने जाणवते. हे असे का झाले असावे? की मुंबईत आता घाण खायला मिळत नसल्यामुळे त्यांनी दुसरीकडे प्रस्थान केले असावे?
पण लोकल पक्षी वाचवण्यासाठी
पण लोकल पक्षी वाचवण्यासाठी कावळ्यांना डायरेक्ट नष्ट करण्याचा निर्णय पटला नाही.>>>
कावळे हे सजीव आपल्या डोळ्यासमोर हलता डोलता वावरताना दिसतात म्हणून आपल्याला त्यांच्या हत्येनंतर दुःख होते. पण इतर सजीव जसे झाडे झुडपेही दूरदेशी गेल्यावर तिथे अनर्थ करतात व त्यांनाही नष्ट करावे लागते. भारतातील जंगलखाते दरवर्षी कोट्यावधी रुपये केवळ टणटणी नष्ट करण्यासाठी खर्च करते आणि तरीही ती नष्ट होत नाहीच. तिच्यामुळे इतर गवत वाढत नाही व त्यामुळे हरीण, हत्ती व इतर शाकाहारी प्राण्यांची उपासमार होते.
ऑस्ट्रेलियात उंटाना ठार केले जाते हे हल्लीचेच उदाहरण आहे.
साधना विपू पहा
साधना विपू पहा
छान माहिती
छान माहिती
Pages