अस्तित्व !!! (भाग ४ )
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मधुरा पुण्याला निघून गेली,शुभ्रा ला हि पुढे शिकायच हो तंच पण सध्या तिच्यापुढे नोकरी करून पैसे कमावणं हा गोल होता , तीने online agencies शोधून apply करायला सुरुवात केली असतानाच एके दिवशी मधुराचा फोन आला तिने पुण्याला तिच्या नातेवाईकांच्या एका ओळखीतून एका छोट्या कंपनीत शुभ्राला जॉब बघितला होता , आणि तिच्याच मावशीच्या आऊटहाऊस मध्ये भाड्याने राहण्याची सोयही केली होती ,शुभ्राच्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं , माणसं ओळखीची असली म्हणजे निम्मं टेन्शन जातं तिला वाटलं , skype वर interview ची फॉर्मॅलिटी पार पडली आणि नवीन कंपनीत जॉईन होण्यासाठी काकूला थोडे दिवस तिच्या माहेरी पोहोचवून शुभ्रा पुण्याला आली . मधुरा हि पुण्याला आलीच होती , शुभ्रा ला सगळं काही सुरळीत लावून द्यायला मदत करून दोन दिवस तिच्याबरोबर राहून मधुरा गेली . सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर नोकरीबरोबरच शुभ्रा ने सकाळच्या वेळेत बाजूच्या कॉलनीतील मुलांच्या शिकवण्यादेखील सुरू केल्या , थोडी धावपळ झाली पण हळूहळू ती routine ला लागली . तिचा दिवस आता पूर्ण कामाने व्यापून गेला,सकाळच्या शिकवण्या आणि नोकरी यात तिचा दिवस पूर्ण बुडून गेला . नील चा कधी कधी कधी तिला फोन येत असे पण ती तो घ्यायचा टाळत असे , काय बोलायचं हा ही प्रश्न होताच , हळू हळू त्याचे कॉल्स कमी झाले , कदाचित त्याचा नंबर पण बदलला असावा तिला वाटून गेलेलं , एक जुळू पाहणारा धागा तिने आपणहोऊन तिच्या बाजूने तोडला होता . ऑफिसचं ,सकाळच्या शिकवण्यांचं रूटीन लागलं होतं , दिवस तिचा सगळा जरी कामात, गेला तरी रात्री ती जेव्हा बेडवर पडायची तेव्हा मात्र तिला विलक्षण एकाकी वाटायचं , खूप सारे विचार डोक्यात पिंगा घालायला लागायचे , काकूच्या ट्रीटमेंट वर आताशा जास्त पैसे लागू लागले होते , काकूच्या माहेरची परिस्तिथितीही जेमतेमच होती ,त्यामुळे खर्च तसा शुभ्राताच्याच अंगावर होता ,आणि ट्रीटमेंट चालू ठेवायची हा शुभ्राताचाच हट्ट होता ,हिस्टेरिक पेशन्ट मेडिकेशन शिवायही बरा होऊ शकतो पण त्यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती शुभ्रता कडे नव्हती बाकी काकूच्या परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा होत नव्हती , हिस्टेरियाचे जोरदार झटके तिला कधीही यायचे , आणि हे असं खूप नैसर्गिक आहे , एक दिवस अचानक असा येतो की त्यात आपला नवरा , दोन लहान मुली एकदम गायब होतात , हे पचवणं किती कठीण आहे ? त्याच्या खुणा शरीरावर कुठेतरी उमटणारच , भगवान शंकरांचा कंठ देखील निळा झाला नाही का विष पचवताना? , आपण तर सामान्य माणसं , कधी कधी शुभ्रताला वाटे ,आजोबांच अध्यात्म आपल्या उपयोगी आलं म्हणून आपण सर्वांसमोर हसतो खेळतो आहोत , नाही तर आत्ता आपल्या मनातही एखाद्या विकृतीने जन्म घेतला असता . आऊटहाऊस च भाडं , ऑफिसला जाण्या येण्याचा खर्च ,तिचा स्वतःचा खर्च यांचा जेमतेम मेळ बसत असे ,नोकरीत काही तिला प्रमोशन चे चान्सेस नव्हते, साधी रिसेप्शनिस्ट ची नोकरी , पण पुढे शिक्षण घ्यायचं होतं आई-बाबा असतानाची गोष्ट वेगळी होती तेव्हा करिअर करायचं स्वप्न ती बघू शकत होती , आता ते काही शक्य नसलं , तरी पुढे पगार वाढण्यासाठी म्हणून तरी निदान फक्त बॅचलर्स वर नक्कीच भागणार नव्हतं , या सांसारिक प्रशनांव्यतिरिक्त काही वेगेळ्या पातळीवरचे प्रश्न तिला वारंवार भेडसावत असत, त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे आपल्या आयुष्याचं ध्येय काय ? नोकरी ,पैसे कमावणे, आपला आणि काकूचा चरितार्थ चालवणे एवढाच का ? खाणे, पिणे, झोपणे सकाळी उठून परत पोटापाण्यासाठी बाहेर पडणे, पशू, पक्षी, हेच तर करतात , मग माणूस वेगळं असं काय करतो? जन्माला येतो ,मोठा होतो , संपत्ती , मानमरातब , कुटुंब-कुळ वाढवण्याच्या मागे लागतो , आपल्याच ठराविक वर्तुळात काही शोध लावतो आणि एक दिवस मरून जातो. मग मेल्यानंतर अस्तित्व संपत का ? काहीच उरत नाही का?मुळात मृत्यू म्हणजे काय ? , आणि शरीर संपल्यावर काहीच शिल्लक राहणार नसेल तर मग माणूस जन्मभर कुठल्या गोष्टीसाठी धडपडत असतो ? एखाद्या बादलीला छिद्र असेल तर कुठला शहाणा माणूस त्यात पाणी ओतून ती भरायच्या मागे लागेल? जे आयुष्य कधी रिकामं होईल हे सांगता येत नाही त्याला कुठल्या गोष्टींनी भरायचा प्रयत्न करतो आपण? आणि का ? , कुठे जातो आहोत आपण सगळे नुसते धावतो आहोत , कशासाठी? कुठे पोहोचायचं आहे आपल्याला ? कधी कधी तिच्या मनात विचार येई काकू हीच एकमेव आपली फॅमिली असणार का कायम ? आणि तीही उद्या गेली तर? असे विचित्र विचार पिंगा घालू लागले कि तिला धस्स होई , अशा वेळी तिला ज्याला आपलं म्हणता येईल अशा माणसाचा भक्कम आधार हवा असायचा ,आई-वडिल असते तर असं अधांतरी जीवन आपल्या वाट्याला आलं नसतं ,असं कितीदा तरी वाटून जाई ,मनातल्या वेदना वर दिसत नसल्या तरी आत खोलवर खूप ठसठसत रहात असत , विशेषतः: रात्रीच्या एकाकी क्षणांमध्ये ‘त्या काळ रात्री’ झालेल्या हल्ल्याच्या घटनांची मालिका तिच्या समोरून जाई ,आईचा सदैव हसत असणारा , सात्विक सोज्वळ देखणा चेहेरा मृत पावल्यानंतर किती भेसूर दिसत होता , बाबांच्या तर चेहेऱ्यावर एवढे घाव होते लोखंडाच्या पहारीने मारलेले की तो छिन्न विछिन्न झाला होता , नमी आणि चिमी दोन निरागस जीव तर झोपेत काही कळायच्या आतच गेलेले , आजी -आजोबा सगळे सगळे चेहेरे तिला आठवत आणि मग असहाय्यपणे धाय मोकलून रडणे एवढंच तिच्या हातात असे , रडता रडता त्यातच कधीतरी झोप लागायची ,सकाळी उठून पुन्हा रूटीन चालू व्हायचं . मागचं विसरून पुढे चालायचं , चालत राहायचं हे एवढंच तर करत आली होती आजपर्यँत . मधुरा मास्टर्स करत होती आणि पुण्यातच हॉस्टेल वर रहात होती, अधून मधून ती जेव्हा तिच्या मावशीकडे यायची तेव्हा शुभ्रता कडेच रहायची , पण हळूहळू तिचंही विश्व बदललं , आणि अभ्यास वाढला तस तिचं जाणं येणं कमी झालं तशी शुभ्रता अजूनच एकाकी पडत चालली . बघता बघता चार वर्ष अशीच गेली ,आता काकूला आपल्याजवळ आणावं का ? या विचारात अलीकडे ती होती , ऑफिस मध्ये सुट्टी टाकून दोन -तीन दिवसासाठी काकूच्या माहेरी जायचं ठरवून ती गेली , तिला असं अचानक आलेलं पाहून काकूला खूप आनंद झाला, काकूची भाचे मंडळी साधारण शुभ्राच्याच वयाची होती , त्यांच्यात शुभ्रा चे दोन-तीन दिवस छान गेले, काकूची तब्येत ही आता चांगली वाटत होती, निदान चेहेऱ्यावरचे उजाड भाव थोडे निवळले होते शुभ्राला स्थळं वैगेरे बघणं तिने चालू केलं होतं ,अजून काही दिवसांनी मी तुझ्याकडे येईन काकू तिला म्हणाली आणि शुभ्रा निश्चिन्त मनाने घरी आली ,