काही नवे ग्रह - भाग ३
भाग १: https://www.maayboli.com/node/69308
भाग २:
https://www.maayboli.com/node/69378
भाग ३: ‘राठा’
हल्लीच शोध लागलेला हा एक 'अनाकलनीय' ग्रह. खरं तर हा ग्रह आहे की उपग्रह आहे ते अजून नक्की ठरलं नाहीये. कारण ह्या ग्रहाची कक्षा ठराविक नसते. कधी तो इतर ग्रहांच्या भोवती फिरतो, तर कधी स्वतःच्याच भोवती फिरतो. आपण फिरलो की सगळं जग आपल्याबरोबर फिरतं अशी त्याची (आणि फक्त त्याचीच )समजूत असते. तशा त्याच्या खूप गैरसमजुती असतात. उदाहरणार्थ त्याला असं वाटतं की जे लोक आपल्याला नमस्कार करतात ते आपल्या अंमलाखाली आहेत. त्याला असं वाटतं की जे लोक आपले "लाव रे ते" असे म्हणून लावलेले व्हिडिओ पाहतात, ते काही तिथे मजा करायला येत नाहीत, त्यांची आपल्यावर खरी श्रद्धा असते. त्याला असंही वाटत असतं की आपण एक दिवस पूर्ण सूर्यमालेवर राज्य करु. तर अशा स्वप्नरंजनात मग्न असलेला हा एक भन्नाट ग्रह आहे.
बाकी काही असेना, लोकांचं लक्ष वेधून घेण्याची विलक्षण इच्छा आणि पात्रता ह्या ग्रहात असते. मग त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. व्हालेनटाईन डे आला प्रेमी जोडप्यांना सळो की पळो करुन सोडणे, रस्त्यावर खड्डे पडले की टोलवरच्या कामगारांना ठोकणे, एखादा आपल्याला न आवडणारा सिनेमा येणार असला की त्याच्या निर्मात्याला धमकी देणे, पाणी आले नाही तर नगरपालिकेच्या माणसांना धोपटणे असे कितीतरी उपद्व्याप तो सतत करत असतो. असे उद्योग करण्यात त्याची इतकी ख्याती असते की त्याला लोकांकडून पुढील प्रकारच्या फर्माईशी (किंवा सुपाऱ्या) येतात.
"आमच्या शेजारची बाई नेहमी आरडा ओरडा करत असते हो.. जरा तिचा बंदोबस्त करा ना प्लीज.."
"आमचे मास्तर मला काही केलं तरी पास करत नाहीत हो.. जरा त्यांना दम द्या ना.."
"माझा नवरा मला कधीच 'तू बारीक झालीस' असं म्हणत नाही हो.. जरा त्याला सरळ करा ना.."
"आमच्या गल्लीतली कुत्री रात्रभर भुंकत राहतात हो.. जरासुद्धा डोळा नाही लागत. जरा त्यांच्यविरुध्द एखादं आंदोलन करा ना.."
कधी ह्या ग्रहाचा मातृभाषेविषयीचा अभिमान एकदम जागृत होतो. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला फक्त मातृभाषा दिसते. मग तो सगळे बोर्ड मातृभाषेतून असावेत म्हणून मोर्चा काय काढेल, हिंदी चित्रपट लावणाऱ्या चित्रपटगृहांवर दगडफेक काय करेल, सगळे अर्ज मातृभाषेतून करता यावेत म्हणून घेराव काय घालेल.... (आमच्या ऐकिवात असे आले होते की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना याने "राष्ट्र पती झाल्या बद्दल शुभेच्छा" असा संदेश धाडला होता. तो त्यांनी गूगल ट्रान्सलेट द्वारे भाषांतरीत करून "Best wishes about becoming a husband to the nation" असा वाचला!)
मातृभाषेच्या ह्या अतीव आग्रहामुळे ह्या ग्रहाचे प्रभावक्षेत्र खूप मर्यादित असते. पण त्याला त्याचे काही वाटत नाही.
ह्या ग्रहाचे मुख्य बलस्थान हे लोकांना आकर्षित करणे होय. लोक हजारोंच्या संख्येने याच्याकडे ओढले जातात. त्यातले किती त्याच्याबरोबर राहतात हा एक संशोधनाचा विषय आहे. पण ह्या बलास्थानाचा कसा पूरेपूर उपयोग करता येईल याचा विचार तो नेहमी करत असतो. मग त्यातूनच काही अफलातून कल्पना जन्माला येतात. उदाहरणार्थ एका दुसऱ्या 'पावरफुल' ग्रहाच्या फायद्यासाठी आपण लोकांना प्रभावित करायचे अशी एक नवीन योजना त्याने राबवली होती.. आणि ती काही प्रमाणात यशस्वी देखील झाली!. पण तेव्हापासून हा ग्रह स्वतः ची कक्षा विसरला की काय अशी लोकांना शंका येऊ लागलीय.
तर असा हा एके काळी आक्रमक म्हणून ओळखला जाणारा ग्रह सध्या आपली ओळख गमावून बसला आहे. त्यात मध्यंतरी "ईडी" नावाचा धूमकेतू त्याला अगदी चाटून गेल्यामुळे त्याचं मनोबल आणखीनच कमी झालं आहे. सध्या ग्रहामालिकेत अनेक मोठमठ्या घटना घडत असताना हा ग्रह मात्र शांत आहे. आपली कक्षा कोणती आणि गती किती याबद्दल अवास्तव कल्पना बाळगल्या की काय होते त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
- श्रीराम
(No subject)
तुमच्या ह्या कथित आकाश
तुमच्या ह्या कथित आकाश गंगेतील सर्व ग्रह आणि कथित तारा
ह्या सर्वांना विशिष्ट अशी कक्षा आणि गुणधर्म नाहीत त्या मुळे तुमच्या कथेतील ग्रह फार वेगळा आहे असं वाटतं नाही
लोल :Happy
लोल
या ग्रहाला सध्या शारीरिक
या ग्रहाला सध्या शारीरिक व्याधीनी ग्रासलेले दिसते. त्यांच्या उजाव्या हाताला सध्या काहीतरी प्रॉब्लेम झालाय.
ह्या ग्रहाचे उपग्रह ही आहेत. एक कायमस्वरूपी उपग्रह बा. ना.
(No subject)