बोइंग ७३७ मॅक्स - अपघात की मनुष्यवध?

Submitted by स्वीट टॉकर on 24 December, 2019 - 14:20

अडीच वर्षांपूर्वी म्हणजे मे २०१७ मध्ये बोईंग ७३७-मॅक्स वापरात आलं. दीडच वर्षांत म्हणजे ऑक्टोबर २०१८ साली पहिला अपघात झाला आणि पाच महिन्यात म्हणजे मार्च २०१९ मध्ये दुसरा कॉपीकॅट अपघात झाला! साडेतीनशे जीव मृत्युमुखी पडले!
जगातली सर्व ७३७ मॅक्स विमानं स्थानबद्ध केली गेली.

सुदैवानी विमान अपघात क्वचित होतात. यात 'सुदैवानी' हा शब्दप्रयोग तितकासा योग्य नाही. विमान बांधणीत, त्यांचा मेंटेनन्स करण्यात, रनवे बांधण्यात आणि विमानं उडवण्याच्या वगैरे सर्व कामात दैवावर विसंबून राहता येत नाही. सुरक्षिततेला कायमच प्राथमिकता दिली जाते आणि द्यायलाच हवी.

लायन एअरचा अपघात झाल्याबरोबर त्याची चौकशी सुरू झालीच होती आणि प्राथमिक चौकशीत विमानाच्या प्रणालीत काहीतरी दोष असणार असं दिसू लागलं होतं. बोईंग कंपनीने मात्र पायलटवर दोष टाकला होता. शिवाय तो अपघात इंडोनेशियात झाला असल्यामुळे 'या थर्ड वर्ल्ड देशांमध्ये safety culture तितकं भक्कम कुठे असतं?' वगैरे विधानं बोईंग कंपनीकडून केली गेली होती.

मात्र अगदी तशाच पद्धतीने इथियोपियन एअरवेजचं विमान कोसळलं आणि आता बोइंगला जगाच्या डोळ्यात धूळ फेकणं अशक्य झालं.
सॉफ्टवेअरधल्या काही तृटींमुळे हे अपघात झाले असं त्यांनी मान्य केलं. यातलं काही सॉफ्टवेअर भारतात बनलं असल्यामुळे इकडेदेखील संशयाची सुई वळली. बोइंग कंपनी अजूनही असंच दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की ही एक तांत्रिक समस्या आहे.

सत्य मात्र पूर्णपणे वेगळं आहे. लोभामुळे झालेल्या नैतिक अधःपतनाची ही क्लासिक केस आहे.

सुरवात सुरवातीपासून करूया.

बोइंग कंपनीची स्थापना होऊन शंभर वर्ष होऊन गेली. म्हणजे राइट बंधूंनी पहिलं विमान उडवून दाखवलं त्यानंतर काही वर्षांतच कंपनी सुरू झाली. जसजशी विमानं जास्त जास्त प्रगत होत गेली तसं त्यांचं डिझाइनही जास्त किचकट होत गेलं. मात्र बोइंग कंपनीची सुरक्षा संस्कृती (safety culture) इतकी भक्कम होती की त्यांनी कधीही शॉर्टकट घेतले नाहीत. औद्योगिक जगात त्यांच्या कार्यपद्धतीची तुलना एखाद्या दीपस्तंभाशी केली जायची. गुणवत्तेचा मापदंडच!

त्या काळात बोइंगच्या दृष्टीने एक जमेची बाजू म्हणजे त्यांना म्हणावा तसा प्रतिस्पर्धी नव्हता. एक 'मॅक्डॉनेल डग्लस' नावाची कंपनी होती पण बोइंगच्या तुलनेत लहान. त्यामुळे बोइंग भरमसाठ किंमत लावायचे आणि उत्कृष्ठ गुणवत्तेची विमानं निर्माण करायचे. मोठ्या विमानांमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नसे.

नागरी हवाई वाहतुकीत अमेरिका जगाच्या नेहमीच पुढे राहिलेली आहे. साठच्या दशकात प्रचंड प्रमाणात छोटे छोटे विमानतळ अमेरिकाभर बांधले गेले. त्यांवर यंत्रसामुग्री न वापरता पटापट माल चढवता उतरवता येईल अशा बसक्या पद्धतीची आणि साधारण दीडशे लोकांना घेऊन जाऊ शकतील अशा आकाराच्या विमानांची जरूर होती. त्यासाठी बोइंग ७३७ डिझाइन केलं गेलं आणि १९६७ साली वापरात आलं.

ते थोड्याच काळात प्रचंड लोकप्रिय झालं. त्या मॉडेलची खूप variants आली आणि कंपनीला अमाप पैसा मिळवून दिला. आजपर्यंत ७३७ ची दहा हजारांवर विमानं बनवली गेली आहेत!

जसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं तशी जास्त आधुनिकता त्यांत आली आणि सगळीच ७३७ variants लोकप्रिय झाली. सगळ्यांमध्ये थोडाथोडा फरक होता पण एकदा एखाद्या पायलटला ७३७ उडवण्याचा परवाना (याला Rating असं म्हणतात. License आणि Rating वेगवेगळी. License हा एक जनरल परवाना असतो. तो असल्याशिवाय विमान उडवताच येत नाही. Rating म्हणजे एक विशिष्ट मॉडेल उडवायला मिळालेली परवानगी. हा देखील वेळखाऊ आणि खर्चिक प्रकार आहे. माझ्या मुलीला पायलट बनायला म्हणजे License मिळवायला जितका खर्च आला जवळजवळ तितकाच खर्च नुसतं एअरबस ए-३२० विमानाचं Rating घ्यायला आला!) मिळाला की तो ही सर्व variants उडवू शकत असे.

यूरोपमध्ये विमानं बनवण्याचं प्रगत तंत्रज्ञान होतंच. दुसर्‍या महायुद्धात इंग्लंड आणि जर्मनीने उत्तमोत्तम विमानं प्रचंड प्रमाणात बनवली होतीच. त्यांनी विचार केला की बोईंगच्या भरमसाठ किमती देण्यापेक्षा आपणच नागरी वाहतुकीची विमानं का बनवू नयेत? इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन या देशांनी मिळून 'एअरबस इन्डस्ट्री' नावाची कंपनी काढली. लवकरच त्यांनी बोइंगच्या तोडीची विमानं बनवायला सुरवात केली आणि कंपनीच्या इतिहासात प्रथमच बोइंगला नुसती गुणवत्ताच नव्हे तर 'रास्त किमतीत गुणवत्ता' हा नवा मंत्र घोकावा लागला.

७३७ची लोकप्रियता पाहून एअरबसने ए३२० हे मॉडेल काढलं. मात्र आतापर्यंत छोट्या विमानतळांवरदेखील सामान चढवायला आणि उतरवायला कन्व्हेयर वापरायला सुरवात झाली होती त्यामुळे विमानाचा ढाचा बुटका करण्याची जरूर नव्हती. ए ३२० चं पोट जमिनीपासून ७३७च्या तुलनेनी बरंच जास्त उंचावर आहे.

त्या काळी जेट इंजिनं लांब आणि निमुळती असंत. त्यामुळे ती पंखांच्या खालच्या जागेत सहज मावू शकत होती. त्यात बदल होत गेले. जास्त fuel efficient इंजिनं बाजारात आली ती पहिल्या इंजिनांपेक्षा लांबीला कमी आणि व्यासाला जास्त होती.

७३७ च्या पंखांखालची जागा नवीन इंजिनांना अपुरी पडू लागली. विमानाचं डिझाइन ही अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. उंची वाढवायला नुसत्या चाकांच्या सपोर्ट्स् ची लांबी वाढवली किंवा पंख थोड्या उंचावर बसवले की झालं - असं करता येत नाही. बोइंगसमोर एकच उपाय होता. त्यांनी इंजिनांचं डिझाइन बदलून मागितलं. कोणत्याही ७३७ कडे समोरून बघितलं की आपल्याला इंजिन चपटं दिसतं. इंजिनाची उंची कमी करून रुंदी वाढवलेली आहे. महत्प्रयासानी इंजिन तिथे बसवलं गेलं.

असं बरीच वर्षं चाललं. इंजिनांच्या डिझाइनमध्ये आणखी बदल झाले. ती पहिल्यापेक्षा जास्त फुगीर आणि लांबीला कमी झाली. आता मात्र ती ७३७च्या पंखांच्या खाली काही केल्या मावेनात. मात्र एअरबस ए ३२० ला अशी काही समस्या नव्हती कारण ती विमानं उंच होतीच.

याच सुमारास 'अमेरिकन एअरलाइन्स' कंपनीने शेकडो विमानं विकत घ्यायचं ठरवलं. त्यांना दोन वर्षांनंतर ही विमानं लागणार होती. कमी इंधन पिणारी नवीन फुगीर इंजिनं वापरणं तर कुठल्याही कंपनीला जरूरच होतं.

बोइंग कंपनीनं त्यांना आश्वासन दिलं की ही purely technical समस्या आम्ही सोडवूच आणि तुम्हाला वेळच्या वेळेला ७३७ विमानं देऊ! तुम्हाला एअरबस ३२० कडे वळावं लागणार नाही. झालं! या आश्वासनाच्या जोरावर त्यांनी ती ऑर्डर मिळवली आणि काम सुरू झालं.

नवीन इंजिनं पंखांखाली लावणं अशक्य होतं. नाइलाजानी बोइंगनी ती पुढे सरकवली आणि वर उचलली. त्यामुळे इंजिनांचा सगळ्यात फुगीर भाग पंखांच्या खूपच पुढे आला. शिवाय एक गोष्ट झाली. विमानाचा सगळ्यात जड भाग म्हणजे इंजिन. दोन्ही इंजिनं पुढे सरकवल्यामुळे विमानाचा गुरुत्वमध्य पुढे सरकला! शिवाय पंखांमुळे विमानाला जो लिफ्ट मिळतो त्यातही फरक पडू लागला. त्याची काळजी घेण्यासाठी विमानाच्या शेपटीच्या भागामध्ये (Empannage मध्ये) बदल करावे लागले.

मी मागे लिहिल्याप्रमाणे विमानाचं डिझाइन अतिशय गुंतागुंतीचं शास्त्र आहे. एक छोटासा बदल पचवण्यासाठी आणखी दहा छोटे बदल करावे लागतात आणि ते पचवण्यासाठी शंभर. मात्र कित्येक वर्षांच्या अफाट अनुभवामुळे हे सगळं करणं म्हणजे बोइंगसाठी रूटीन काम होतं. ते त्यांनी केलं आणि एक उत्तम गुणवत्तेचं विमान तयार झालं त्याला त्यांनी नाव दिलं 'बोइंग ७३७ मॅक्स'.

आत्तापर्यंत सर्वकाही सुरळित चाललं होतं. कुठेही सुरक्षिततेला फाट दिलेली नव्हती. यापुढे मात्र ही हकीकत मार्ग बदलत जाते.

तो मार्ग तीनशे सेहेचाळीस लोकांच्या मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचतो.

यापुढची तकनीकी माहिती देखील गुंतागुंतीची आहे. ती मी शक्यतो सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करतो.

कोठलंही विमान तयार झालं की त्याची पडताळणी त्या त्या देशाच्या सरकारच्या Aviation Authority करून घ्यावी लागते. तरच ती विमानं विकता येतात. मात्र आता विमानांच्या बांधणीला वापरलं जाणारं तंत्रज्ञान, नवनवीन मटेरियल्स, क्लिष्ट सॉफ्टवेअर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानांवर घातले निर्बंध यांची सांगड घालणं कल्पनातीत अवघड काम आहे. आज जर बोइंग (किंवा एअरबस) कंपनीने विमान बनवून पायलटसकट सरकारच्या ताब्यात दिलं आणि त्यांचे सर्व प्लॅन्स, रिपोर्ट्स वगैरे जरी सरकारकडे सुपूर्त केले तरी सरकारी यंत्रणेला त्यातून सत्य काय आहे त्याचा शोध घेता येणार नाही. त्यांना त्यातला कण अन् कण समजावून सांगायला पदोपदी उत्पादकाचे इंजिनिअर लागतातच. प्रत्येक खिळ्या-बटणाचा खोलवर जाऊन अभ्यास करायला सरकारकडे हाय-टेक यंत्रणा नसते. शिवाय पगारामधल्या फरकामुळे त्या त्या विषयांमधले सर्वोत्तम प्रतिभावंत (Best brains) सरकारी नोकरीत नसतात हे सर्वश्रुत आहे. याला अमेरिका देखील अपवाद नाही.

तात्पर्य काय, तर उत्पादक आणि सरकारी यंत्रणा यांच्यातल्या सहकारामुळेच objectively चाचण्या करणं शक्य होतं. या सर्व चाचण्यांमध्ये बोइंग ७३७ मॅक्स तांत्रिक रीत्या पात्र ठरेल यात शंकाच नव्हती. मात्र यापुढे जो प्रश्न उभा राहिला तो तांत्रिक नसून commercial होता.

त्या दिवसापर्यंत ७३७ ची कित्येक मॉडेल्स बाजारात उपलब्ध होती. ७३७ उडवायला पात्र असलेल्या पायलटला ती सगळी मॉडेल्स उडवण्याची परवानगी होती. याचा अर्थ सर्व मॉडेल्सचे सर्व कंट्रोल्स तर एकसारखे पाहिजेतच, पण तितकंच महत्वाचं म्हणजे त्यांचा 'feel' देखील एकसारखा पाहिजे. या 'feel' ची व्याख्या करणं तितकसं सोपं नाही, पण उदाहरणार्थ, जर आपण दुसर्‍याची कार चालवायला बसलो की चालवता तर येते, मात्र सफाई यायला जरा वेळ लागतो. हे विमानात घातक ठरू शकतं.

७३७ मॅक्स च्या चाचण्या केल्यावर असं लक्षात आलं की वेग, उंची, विमानाचं वजन आणि त्याचं distribution यांच्या काही combinations मध्ये विमानाचा 'feel' जाणवण्याइतपत बदलत होता.

याचं सरळसोट solution म्हणजे हे विमान उडवायला वैमानिकांना खास प्रशिक्षण द्यायचं. पण हे अतिशय खर्चिक असतं. आधी पुस्तकी शिक्षण, त्यानंतर कित्येक तास simulator ट्रेनिंग, मग प्रत्यक्ष विमानात आणि सरतेशेवटी परीक्षा! हे प्रत्येक वैमानिकाला! या सगळ्यांचा खर्च विमानाच्या किमतीत मिळवल्यावर हे नवीन विमान घेण्यापेक्षा कुठल्याही कंपनीने एअरबस ३२० विकत घेणंच पसंत केलं असतं. आणि बोइंग कंपनी तर कित्येक विमानकंपन्यांना आपला शब्द देऊन बसली होती! करारांवर स्वाक्षर्‍या झालेल्या होत्या, आगाऊ पैसे घेतले होते, वेळापत्रक देखील दिलेलं होतं. त्यानुसार विमान कंपन्यांनी बँकांबरोबर आणि सरकारांबरोबर करार केलेले होते! नवे रूट्स आखले होते. सगळंच ओम् फस् झालं असतं!

यावर उपाय म्हणून बोइंगने Manoeuvering Characteristics Augmentation System (MCAS) ही प्रणाली वापरली. (७५७ किंवा ७६७ ही विमानं अमेरिकन एअरफोर्सला टँकर्स म्हणून Mid Air Refuelling करण्यासाठी वापरायची होती तेव्हां वैमानिकांना मदत व्हावी म्हणून बोइंगनी ही प्रणाली विकसित केलेली होती.) वर उल्लेख केलेलं combination होतंय असं वाटलं की विमानाचा कॉम्प्यूटर ही स्थिती ओळखून स्वत:च थोडीशीच मदत वैमानिकाला करणार, जेणेकरून विमान उडवतानाचा 'feel' बदलणार नाही, तरीही वैमानिकाला आणि विमानाला धोकादायक परिस्थितीपासून दूर ठेवता येईल. यामध्ये कॉम्प्यूटर स्वतःच विमानाचं नाक खाली ढकलेल पण फक्त एक दीड सेकंदापुरतं अशी व्यवस्था होती. यामध्ये नाक साधारण दोन अंशानी खाली ढकललं जाणार होतं जे धोकादायक नव्हतं.

याच सुमारास एक घटना घडली ज्याच्याबाबत बरेच तर्कवितर्क आहेत ज्यांचं समाधान मी करू शकणार नाही मात्र उल्लेख करतो. अमेरिकेच्या Federal Aviation Authority (FAA) चे जे दोन अनुभवी अधिकारी Certification Process मध्ये अग्रस्थानी होते त्यांनी FAA सोडली आणि खाजगी कंपन्यांमध्ये रुजू झाले. त्यांच्या जागी जरा कमी अनुभव असलेल्या दोन इंजिनिअरांची नेमणूक झाली आणि काम पुढे चालू राहिलं.

जसजशा अधिकाधिक चाचण्या होत गेल्या तसतसं बोइंगच्या इंजिनिअर्सच्या लक्षात आलं की जर 'feel' तसाच ठेवायचा असेल तर वैमानिकाला 'थोडीशीच' मदत देऊन पुरणार नाही. कॉम्प्यूटरला जास्तच इनपुट्स द्यायला लागणार आहेत आणि एक दीड सेकंद नव्हे, तर तब्बल दहा बारा सेकंद! यात विमानाचं नाक वीस ते तीस अंशानी खाली जाऊ शकत होतं!

७३७च्या बाकीच्या वैमानिकांना हे विमान खास ट्रेनिंगविना उडवायला परवानगी मिळावी यासाठी बोइंग कंपनी desperate झालेली होती! त्यांनी हा बदल केला देखील!

सगळ्यात धक्कादायक बाब तर यापुढेच आहे. त्यांनी हा बदल केला आहे हे वैमानिकांना सांगायचं नाही असं ठरवलं!!

त्यांनी ते FAA ला सांगितलं की नाही, का सांगताना 'नरो वा कुंजरो वा' स्टाइलमध्ये सांगितलं हे आपल्याला नक्की माहीत नाही. बोइंगने इतका मोठा धोका का पत्करला याचं अधिकृत कारण पुढे आलेलं नाही पण अनधिकृत असं ऐकायला मिळतं की 'कॉम्प्यूटर कधीच चूक करंत नाही, आणि असलेल्या ताकदीचा दुरुपयोगही करीत नाही. त्यामुळे वैमानिकांना अति माहिती देऊन त्यांच्या डोक्यात गोंधळ निर्माण करून त्यांना ओव्हरलोड करू नये.'

नीतिमत्तेच्या घसरणीचं असं नेहमीच दिसतं. एकदा ती सुरू झाली, की मग ती शेवाळी उतरण असते. स्वतःला थांबवणं अशक्य असतं!

कॉम्प्यूटर योग्य निर्णय केव्हां घेऊ शकतो? जेव्हां त्याला मिळणारा data निर्भेळ असतो तेव्हां. या particular बाबतीत विमानाचा उडण्याचा अंश काय आहे (चढतंय, सरळ उडतंय का उतरतंय) हे समजायला Angle of attack indicator नावाचं यंत्र असतं. नॉर्मल पद्धत अशी की अशी दोन यंत्रं असतात. साधारण परिस्थितीत दोन्ही सारखाच अंश दाखवणार. या दोघांवर नजर ठेवायला तिसरा comparator असतो. जर दोघांच्या अंशात फरक पडायला लागला तर एक नीट चालत नाही हे स्पष्टच. पण कुठला नीट चालत नाहिये हे त्या comparator ला समजत नाही. तो एक अलार्म देऊन वैमानिकाला जागरूक करतो. पुढचं काम वैमानिकाचं.

नियम काटेकोरपणे वाचल्यावर बोइंगच्या लक्षात आलं की अशी सिस्टिम जर MCAS ला वापरली तर नियमांप्रमाणे MCAS चे सर्व डीटेल्स आपल्याला विमानाच्या Training manual मध्ये घालावेच लागतील. आणि असं केलं की हे विमान बाकीच्या ७३७ विमानांपासून खूपच वेगळं आहे हे उघड होईल. मग नवं ट्रेनिंग करणं अपरिहार्य होईल!

तेव्हां त्यांनी सगळ्यात horrible निर्णय घेतला! एकाच Angle of attack indicator चा आउटपुट या MCAS ला दिला गेला!
विमानांना सर्टिफिकेट मिळालं, ती प्रवाशांना घेऊन उडू लागली. एकाच इंडिकेटरच्या इन्पुटवर FAA नी हरकत का घेतली नाही याची चौकशी चालू आहेच.

लायन एअरच्या विमानात एका Angle of attack indicator मध्ये बिघाड झाल्याबरोबर कॉम्प्यूटरला वाटलं की विमानाचं नाक फारच वरच्या दिशेला झालेलं आहे. त्यानी नाक खाली दाबलं. वैमानिकांनी कसबसं एकदा नाक सरळ केलं. काही सेकंदातच कॉम्प्यूटरनी पुन्हा खाली दाबलं! आता ते सरळ करणं दोन्ही वैमानिकांच्या एकत्रित ताकदीच्याही पलीकडे होतं!

हल्ली प्रत्येक विमानामध्ये Flight Data Recorder आणि Cockpit Voice Recorder असतात. त्यावर मिळालेली रेकॉर्डिंग्ज काळजाचं पाणी करणारी आहेत! वैमानिकांची काहीही चूक नव्हती. त्यांनी प्रचंड प्रयत्न केले! ही झटापट काही मिनिटे चालली होती! शत्रू कितीही बलवान असला तरी आपण जीव तोडून प्रतिकार तरी करू शकतो. पण एक घरभेदी आपल्याला घरात आहे हे माहीतच नसतं त्याच्याबरोबर दोन हात करणार तरी कसे?

पहिला क्रॅश झाला तेव्हां लगेचच बोइंग कंपनीला काय झालं असणार याची कल्पना आलीच असणार! तरीही ते चूप!! दुसरा identical अपघात काही महिन्यातच झाल्यावर सगळ्या जगालाच सत्य उघड झालं!

दुसर्‍या (Ethiopian Air) विमानाला झाला तो ‘अपघात’ न धरता ‘खून’ धरावा अशी तक्रार कित्येक प्रवाशांच्या आप्तांनी केली आहे. एकदा अमेरिकन सरकारनी नेमलेल्या समितीने त्यांचा अंतिम अहवाल सादर केला की एखादेवेळेस कोर्ट अशी केस दाखल करून घेईल देखील. तसं झालं तर बोइंग कंपनीच्या काही अधिकार्यांना मनुष्यवधासाठी दोषी धरून तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बोइंग कंपनी औद्योगिक जगातली आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावून बसली आहे. ७३७ सोडाच, बाकी विमानांबद्दल यांनी कायकाय लपवलेलं असेल कुणास ठाऊक? असे प्रश्न विचारले जात आहेत.

आज ना उद्या ७३७ मॅक्स आकाशात झेपावेल. झालेल्या नामुष्कीमुळे बहुदा त्याचं नाव बदललेलं असेल. आपल्याला त्यात बसण्याची वेळ येईल.
तेव्हां आपण न घाबरता त्यात बसावं का? नक्कीच!
ते विमान धोकादायक आहे का? अजिबात नाही!

समस्या विमानाच्या डिझाइनमध्ये नाही. मनुष्याच्या लोभात आहे.

Group content visibility: 
Use group defaults

Hemant 33, तुम्ही कदाचित मूळ धागा वाचलेला दिसत नाही. दोन्ही विमानांच्या ब्लॅकबॉक्सवरून आता अपघाताचे कारण कळाले आहे आणि त्यावरूनच बोइंगची काय चूक होती हे उघड झाले आहे. ह्या प्रकरणात बोइंगचे सी ई ओ डेनिस म्युलेन्बर्ग यांना २०२० मध्ये कामावरून काढून टाकण्यात आले आहे (किंवा त्यांनी राजिनामा दिला आहे म्हणा).

मानवी चुका ह्या अनेक अपघात चे कारण असतात.
अति अत्याधुनिक वाहने ,विमाने निर्माण केली जातात .
पण ती चालवण्याची क्षमता सामान्य बुद्धी असणाऱ्या चालक मध्ये नसते.
मी खूप उदाहरणे बघितली आहेत जे ड्रायव्हर आहेत आणि ऑडी,किंवा तस्तम आधुनिक गाड्या चालवतात .
त्यांना त्या गाडी ची तांत्रिक माहिती झीरो असते.विविध सिस्टीम त्यांना कळत पण नाहीत..
तीच अवस्था वैमानिक लोकांची पण आहे अती आधुनिक विमान चालवण्याची त्यांची बौध्दिक कुवत नसते.
आणि अनेक अपघाताला हेच जबाबदार असतात.
ही बाजू विसरून चालणार नाही.

ब्लॅकबॉक्स हे यंत्र म्हणजे एक षडयंत्र आहे. कुठलाही शहाणा माणुस त्यावर विश्वास ठेवणार नाही.

हे लिहायचं राहिलं की.

//सॉफ्टवेअरधल्या काही तृटींमुळे हे अपघात झाले असं त्यांनी मान्य केलं. यातलं काही सॉफ्टवेअर भारतात बनलं असल्यामुळे इकडेदेखील संशयाची सुई वळली. बोइंग कंपनी अजूनही असंच दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की ही एक तांत्रिक समस्या आहे.//

हे एक नवीन.

विमान अपघात झाला कि त्याचं विश्लेषण करून काय चूक झाली व दोषी कोण वगैरे अहवाल बनवायचं काम अमेरिकेत NTSB ही सरकारी एजन्सी करत असते. त्यांनी आजवर कोणत्यही अपघातात विमान बनवणाऱ्या कंपनीकडे बोट वळेल असा कोणताही निष्कर्ष कधीच काढलेला नाही. एखादे अपवादात्मक उदाहरण असल्यास माहित नाही. पण विमान अपघातांचा इतिहास पाहता आजवरच्या बहुतेक अपघातात मानवी चूक (वैमानिकाची/कर्मचाऱ्याची/ट्राफिक कंट्रोलरची/मेंटेनन्स करणाऱ्याची इत्यादी) असेच निष्कर्ष काढले गेले आहे. बोईंग कित्येक दशके या व्यवसायात आहे. एकेकाळी तर ती विमान बनवणारी जगात एकमेव कंपनी होती. अनेक देशांतून त्यांना ऑर्डर्स येत. अजूनही येतात. आजवरच्या सर्वच अमेरिकन सरकारांचा बोईंगवर वरदहस्तच राहिला आहे.

पण नेहमीच मानवी चूक कशी असू शकते? विमानाच्या डिजाईनवर किंवा तांत्रिक बाबींवर कधीच प्रश्नचिन्ह का नाही उभे केले गेले? असे प्रश्न मनात येतात. कोणत्याही विमानात वैमानिकाला एक भलीमोठी चेकलिस्ट दिलेली असते. शेकडो बाबींचा त्यात उल्लेख असतो. विमान उड्डाणापूर्वी हे सर्व वैमानिकाने चेक करायचे. त्यात गफलत झाली तर अपघात! मग वैमानिक जबाबदार. समजा "एसटी मध्ये ड्रायवर ने बसण्याआधी पन्नास एक गोष्टी बघायच्या. एखादी जरी त्याच्याकडून बघायची राहिली चुकून तर अपघात!" असे असते तर किती लोक एसटीत बसले असते? Happy पण नाही. ते विमान आहे. तिथे वैमानिकावरच ही सगळी जबाबदारी असते. त्यामुळे काही अपघात तर अतिशय किरकोळ कारणांमुळे सुद्धा झाले आहेत.

या लेखात उल्लेख केलेल्या विमानांची व त्याच्या अपघातांची जगभरात बरीच चर्चा झाली. यूट्यूबवर बोईंग ७३७-मॅक्स संदर्भातील व्हिडीओज खाली अनेक तिखट प्रतिक्रिया पहावयास मिळतात. एकाच सेन्सर कडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे सोफ्टवेअर कडून निर्णय घेतले जाणार आणि त्यावर चक्क विमानाचे नाक खाली दाबले जाणार, ही कल्पनाच भयंकर आहे. हे अप्रूव्ह झालेच कसे? हा प्रश्न माझ्यासारख्या कित्येक सोफ्टवेअर डिजाईन मध्ये काम करणाऱ्या टेक्निशियनसनी विचारला आहे. त्याची उत्तरे गोडबोले सरांनी लेखत दिली आहेतच.

सॉफ्टवेअर भारतात नामांकित कंपनीत बनलं.पण बहुधा त्या भारतीय नामांकित कंपनीसाठी काम करणारे वेगळ्या कंपनीचे लोक त्यावर काम करत होते.अश्या 3-4 लेयर मधल्या संभाषण घोटाळा आणि हातात असलेला कमी टाईम टू मार्केट यात डॉक्युमेंटेशन बदलायचे राहून गेले किंवा मुद्दा म्हणावा तितक्या ठळकपणे सांगितला गेला नाही.

बोईंग ७३७ मॅक्स हे तांत्रिक बाबतीत दोषी आहे असे गृहीत धरले तर ह्या विमानाने आज पर्यंत किती तरी लाख km उड्डाण केले आहे.किती तरी तास उड्डाण केले आहे.अपघात फक्त दोन वेळेस च झाला आहे.
मग बाकी उड्डाण दरम्यान अपघात झाला नाही त्याचे श्रेय कोणाचे.
नशीब चांगले म्हणून झाला नाही.
की
वैमानिक कुशल होता म्हणून झाला नाही.
हे प्रश्न कोणी पण विचारेल च.

एका ठिकाणी वाचले की क्रूझ लेवलला कुणीतरी/ वैमानिकाने काही विशेष खटपट केल्याशिवाय सरळ खाली विमान इतक्या वेगाने जाणार नाही.
मग वैमानिकाचे कंपनीशी भांडण झाले होते का अगोदर? म्हणजे त्याने खुन्नसमध्ये काही आततायीपणाने धडा शिकवला?पण black boxमिळून वेगळे रेकॉर्डिंग आहे म्हणतात. पण जर का विमानाने अशी जमिनीकडे झेप घेतली तर टेबलावरची चहा कॉफी सांडून आरडाओरडा झाला असेलच प्रवाशाचा. तो कुठे रेकॉर्ड होतो?

Max 737 चे एंजिन मोठे आहे, पंखाखाली मावत नव्हते म्हणजे काय? इंधनाची टाकी?

<< अपघात फक्त दोन वेळेस च झाला आहे. >>
हेमंत सर, तुमच्या मते अजून किती अपघात व्हायला हवे होते, म्हणजे मग चौकशी करायला हवी?

Max 737 चे एंजिन मोठे आहे, पंखाखाली मावत नव्हते म्हणजे काय? इंधनाची टाकी?
>>
इंधनाच्या टाक्या या पंखात असतात.
पूर्वीच्या काळी (जेंव्हा ७३७ डिझाईन केलं तेंव्हा), विमानात चढ-उतार हे शिडीवरून व्हायचे, त्यामुळे विमानाचं दार हे जमीनीच्या बर्‍यापैकी जवळ असायचं. त्यामुळे विमानाचे पंख आणि जमीन यातलं अंतर हे छोटं होतं.

एअरबस ३२० सिरीजच्या विमानांचं डिझाईन त्या काळात झालं जेंव्हा विमानाचा दरवाजा उंच असण्याला हरकत नव्हती. (७४७ सारखं जंबोजेट ऑलरेडी वापरात होतं). त्यामुळे या विमानांचे लँडिंग गिअर्स हे उंच होते. त्यानी पंख आणि जमिनीमधलं अंतर जास्ती होतं.

नेक्स्ट जनरेशन (मॅक्स च्या आधीची जनरेशन) ७३७ च्या इंजिनांना गोल न ठेवता खालच्या बाजूनी सपाट केलं गेलं होतं. त्यामुळे इंजिन अन जमीन यामधे क्लिअरन्स मेन्टेन व्हायला मदत व्हायची.

एअरबसनी नीओ (न्यू इंजिन ऑप्शन) विमानं आणून स्वतःला बोईंगच्या तुलनेत इकॉनॉमिकल लेव्हलला आणलं होतं, पर्यायानी बोईंगला एक तर पूर्णपणे नवीन सिंगल आईल विमान डिझाईन करायला लागणार होतं, किंवा ७३७ ला नवी इंजिन्स लावायला लागणार होती (ज्यात लोचा होता)

मॅक्स च्या इंजिनाचा व्यास हा नेक्स्ट जनरेशन इंजिनांपेक्षा मोठा आहे, त्यामुळे हे इंजिन ७३७चे पंख आणि जमिनीमधल्या गॅपमधे मावतच नाही. यावर उपाय म्हणून बोईंगनी हे इंजिन थोडं वर उचलून आणि पुढे सरकवून पंखावर माऊंट केलं.
पण मुळात अमेरिकन एकरलाईन्सनी आर्मट्विस्ट केल्यानी बोईंगला नवीन सिंगल आईल एअरक्राफ्ट डिझाईन प्रोग्रॅम बंद करून मॅक्स प्रोग्रॅम सुरू करावा लागला. आणि मग एकदा पैसे ओतलेच आहेत तर ते पूर्ण वाया न जाऊ देता त्यातनं होईल तितकी वसूली करूया या न्यायानी मॅक्स प्रोग्रॅम चालू राहिला.

७८७च्या यशानंतर बोईंगनी पॅरलल ट्रॅक वर कार्बन कंपोझिट्स बेस्ड सिंगल आईल, मिड्ल रेंज अन एक्स्ट्रा लाँग रेंज विमानं बनवण्याचा रीसर्च अन डिझाईन चालू ठेवायला हवं होतं. यामुळे भविष्यात त्यांन ७३७, ७५७/७६७ अन ७७७/७४७ विमानांना पर्यायी विमानं बनवण्याचे मार्ग खुले राहिले असते.
आज मॅक्स परत आलंय पण खूप मोठा प्रॉडक्शन बॅकलॉग आहे. ७८७ चं प्रॉडक्शन गेलं वर्षभर बंद आहे, त्यामुळे त्याचाही बॅकलॉग वाढतोय. ७७७ एक्सला तारीख पे तारीख पडतिये. त्यात या टाईपच्या एकशेवीसहून अधिक विमानांची ऑर्डर असलेल्या एमिरात्स एअरलाईन्सनी २०२४ पेक्षा उशीर झाल्यास ऑर्डर कॅन्सल करण्याची धमकी दिली आहे. मिड्ल रेंज विमानाबद्दल काहीही सुतोवाच नाही...
परेश रावल स्टाईलनी म्हणायचं झालं तर, "क्या विमान उडाएगा रे तुम... छ्या!!"

तुलनेत एअरबसला खूपच बरे दिवस आहेत. कतार एअरवेजसोबत झालेल्या ३५० च्या पेंट इश्यूला वगळता त्यांच्या पांचो उंगलियाँ घी मधे आहेत.

उत्तम माहिती.

मला स्वतःला मॅक्स विमानात बसायला भीती वाटेल.अजून तो दोष सुधारला आहे का, aoa disagree सेन्सर्स आणि मॅन्युअल ओव्हरराईड मध्ये बदल केलेत का, पायलटस ना 737 मॅक्स च्या डिझाईन वर जास्त फ्लाईंग अवर्स चं ट्रेनिंग मिळालं आहे का याबद्दल स्पष्ट माहिती मीडियात आली असेल तर माहिती नाही.(खूप इंग्लिश शब्द वापरल्याबद्दल आगाऊ माफी मागतो)

ब्लॅक बॉक्स ची रेकॉर्डिंग क्षमता बहुतेक कॉकपिट पुरती असेल.अर्थात मागे स्पॅनिश पायलट कडून पर्वतरांगावर विमान आदळलं त्यात प्रवासी चेंबर मधली भीती आणि आरडा ओरडा रेकॉर्ड आहे.

अँकी नं.१
उत्तम माहिती.

एक प्रश्न
तिकिट काढताना कसे पहायचे विमान कोणतं आहे ते

विमान कंपन्यांच्या बेव साईटवर तिकीट बूक करताना फ्लाईट डिटेल्स मध्ये कुठले विमान आहे हे दिले असते. भारतीय कंपन्या आणि लुफ्थांन्सा, एमिरेट्स मध्ये स्वतः बूक करताना हे पाहिले आहे. इतर विमान कंपन्या पण हे नमुद करत असतील. मेक माय ट्रिप वर नसते नमुद केलेले.

मॅन्युअल ओव्हरराईड मध्ये बदल केलेत का, पायलटस ना 737 मॅक्स च्या डिझाईन वर जास्त फ्लाईंग अवर्स चं ट्रेनिंग मिळालं आहे का
>> हो, नेटवर सापडेल माहिती

तिकिट काढताना कसे पहायचे विमान कोणतं आहे ते
>> विमान कंपनीच्या वेबसाईटवर मिळेल माहिती (अ‍ॅग्रिगेटर्स जनरली देत नाहीत)

७३७ विमानं ही शॉर्ट हाऊल विमानं आहेत, त्यामुळे मुख्यत्वे डोमेस्टिक अन जवळपासच्या इंटरनॅशनल रूट्सवर असतात (मी एकदा लुफ्थांसाच्या ७३७ नी फ्रँकफर्ट ते पुणे व्हाया बुखारेस्ट हा अनुभव घेतलाय, पण त्यात हाल व्हायचे)
भारतात सध्या फक्त स्पाईसजेटकडे मॅक्स विमानं आहेत (ती ही १३ च) त्यामुळे सध्या खूपच कमी रूट्सवर ही विमानं उडताहेत

पण नजिकच्या भविष्यात स्पाईसच्या अजून १९२ ऑर्डर्स आहेत अन नवीन. येऊ घातलेल्या आकासा एअरचा अख्खा फ्लीट ७३७ मॅक्सचा असणार आहे.
मला तरी या विमानात बसायला काही वाटणार नाही (उलट पहिल्यांदा अनुभवायची उत्सुकताच आहे). गोवा-पुणे रूटवरचं मॅक्स स्पाईसनी लास्ट मिनिट चेंज केलं होतं. त्यामुळे ती संधी हुकली होती.

रच्याकने, मॅक्स विमानांच्या ग्राऊंडिंग मुळे बोईंगला सगळ्या कस्टमर्सना पैसा रूपानी भरपाई द्यायला लागलीच आहे, पण इतर प्रकारेही मोल चुकवावं लागतंय. स्पाईसजेटनी या ग्राऊंडिंग्जमुळे झालेल्या नुकसानाच्या मोबदल्यात २ ७७७-३०० ईआर विमानं पदरात पाडून घेतली आहेत.
आता मुंबई / दिल्ली - अमेरिका विनाथांबा निम-आराम विमानसेवा सुरू होईल बहुतेक

आता मुंबई / दिल्ली - अमेरिका विनाथांबा निम-आराम विमानसेवा सुरू होईल बहुतेक>>>

मला पटकन एस.टी. महामंडळाचा धागा उघडला गेला की काय असे वाटले!!!

737 max tikit बुक करताना माहीत पडत.
पण आपण सामान्य लोक आहोत स्वतचं हेलिकॉप्टर किंवा विमान आपल्या मालकीचे नाही
समजा लंडन मुंबई प्रवास करायचा आहे आणि बोईंग 737 मॅक्स च उपलब्ध आहे तर तुम्ही काही करू शकत नाही.
बोईंग 737 मॅक्स वापरात आहे.
ती विमान सर्व एअर लाईन मध्ये ते वापरात आहेत.
खरेच ते धोकादायक असते तर कोणीच वापरले नसते.
सिंपल लॉजिक

समजा लंडन मुंबई प्रवास करायचा आहे आणि बोईंग 737 मॅक्स च उपलब्ध आहे तर तुम्ही काही करू शकत नाही.

ती विमान सर्व एअर लाईन मध्ये ते वापरात आहेत.

>>
बिझनेस ओन्ली फ्लाईट असेल तर च मॅक्स लंडन-मुंबई उडेल
मॅक्स विमानं सर्व एअरलाईन्समधे नाही आहेत (कुणी किती ऑर्डर केली अन कुणाला किती मिळाली ते इथे बघता येईल)

पुढे जाऊन मॅक्स अवॉईड करता येईल का?
तर मेजर पॉप्युलर रूट्सवर नक्की येईल, कारण अशा रूट्सवर नॉन मॅक्स (एअरबस) ऑपरेटर एअरलाईन्सचा पर्याय असू शकतो.
नॉन पॉप्युलर / नवीन रूट्सवर (उदा: नाशिक-चेन्नै) जिथे एखाद दुसर्‍याच फ्लाईटचा ऑप्शन असेल, तिथे डायरेक्ट फ्लाईट न घेता वेळ / पैसा / दोन्ही खर्चाची तयारी असेल तर मॅक्स अवॉईड करता येईल.

थोडं अवांतर...

एअर इंडियानी अजून ७४७-४०० जंबोजेट्स रिटायर केली नाही आहेत.
ती जनरली हैदराबाद-मुंबई-जेद्दा / दुबई-कोची-दिल्ली रूट्सवर असायची.
आता मनाला येईल तशी उडवतात.

विमानं रिटायर व्हायच्या आधी एकदा उडून यायचंय (जमल्यास अपर डेकच्या बिझनेस क्लास. किंवा नोज मधल्या फर्स्ट क्लास मधून)
कुणी रीसेंटली हे विमान कुठल्या एअरपोर्टवर स्पॉट केलं असल्यास सांगा
(एअर इंडियाची वेबसाईट हा एक विनोद आहे)

इंधनाच्या टाक्या या पंखात असतात.
???
पंखांत कशा असतील? पोटात- फुझिलाझमध्ये दाखवतात चित्रांत. तर ती पुढे नाकाडाकडे किंवा शेपटीकडे सकवल्यास तोल सांभाळण्यासाठी इतर वस्तू विरुद्ध बाजूला सरकाव्या लागतील. एंजिनं म्हणजे मोठे आडवे ड्रमसारखे पंखांना जोडलेले दिसतात त्यात इंधन आणि हवा मिश्रण पेटवून वायू बाहेर पडतो वेगात आणि विमान वेगात पुढे जाते.

नाकाड जमिनीकडे वळून विमान खाली झेपावताना प्रवासी ओरडाओरड करतील ते रेकॅार्डिंग सापडले का?आतमध्ये सीसीटिवी क्याम्रे नसतात??

अहो इंजिन हे पंखांना जोडलेले असते, तुम्हीच म्हणालात ना? इंधन हे तिथूनच इंजिनात घेतले जाते. तुम्ही नक्की कुठले चित्र पाहिले?

पोटात- फुझिलाझमध्ये दाखवतात चित्रांत.
>>
एक्स्टेंडेड रेंज विमानांमधल्या अ‍ॅडिशनल पेट्रोल टँक्स पोटाकडे असतात, मुख्य टँक्स पंखातच असतात.
चित्र नीट बघा

आतमध्ये सीसीटिवी क्याम्रे नसतात??
>>
तुम्ही कधी विमानात बसला नाही आहात का?
जनरली (मॅक्स सारख्या) नॅरो बॉडी एअरक्राफ्टच्या फक्त कॉकपिट डोअर च्या बाहेर एक कॅमेरा असतो (फक्त कॅमेरा, माईक नाही)
कॉकपिट ते कॅबिन कम्युनिकेशन फोनच्या माध्यमातूनच होतं. कॉकपिट आतून बंद केली की फक्त आतूनच उघडता येते.

खरेच विमानाच्या इंधनाच्या टाक्या त्याच्या पंखात असतात?

माहिती हवी म्हणून विचारतोय.
माझ्या मता प्रमाणे ..
विमानाचे पंख , शेपटी हे अतिशय महत्वाचे पार्ट आहेत.
त्या वर च विमानाचा पूर्ण तोल सांभाळ लं जातो.
विमानाच्या पंखात जर इंधनाच्या टाक्या असतील तर इंधन संपेल तसे पंख्याचे वजन कमी होईल .
आणि त्याचा परिणाम नक्कीच विमानाच्या balance वर होईल.
इंधन चे वजन पण किती तरी जास्त असणार च.

An uncorrected fuel imbalance can lead to difficulty in controlling the aircraft.
पंखात fuel tank asel तर खूप काळजी घ्यावी लागेल तिथे चूक झाली तर विमान वर नियंत्रण ठेवणे खूप अवघड होण्याची शक्यता आहे.
एक अंदाज

Black box चे recording मिळते तसेच आतले प्रवासी हॉलमधलेही ओडिओ आणि विडिओ मिळाल्यास ते एकत्र पाहून तपासता येईल की दोन्हीकडे एकाच वेळी काय होत होते. सगळीकडे black, red/white/ blue boxes हवेत.

समजा आत्मघातकी टीम घुसली असेल तर दोघे तिघे प्रवाशांना गप्प करतील आणि एखाद दुसरा कॉकपिटात घुसून ( 9-11 वाले कसे घुसले?) त्याने नाकाड डाऊन करायला लावले असेल.

लेखात विमानाची चित्रे / रेखाचित्रे अत्यावश्यक आहेत. म्हणजे संदर्भ / निर्देश करून विचारता येईल.

माझ्या मता प्रमाणे ..
विमानाचे पंख , शेपटी हे अतिशय महत्वाचे पार्ट आहेत.
>> बरोब्बर

त्या वर च विमानाचा पूर्ण तोल सांभाळ लं जातो.
>> हे पण बरोब्बर

विमानाच्या पंखात जर इंधनाच्या टाक्या असतील तर इंधन संपेल तसे पंख्याचे वजन कमी होईल .
>> पंखांचं वजन कमी होईल / पंख्याचं नाही, पंखा इंजिनच्या टर्बाईनला असतो

आणि त्याचा परिणाम नक्कीच विमानाच्या balance वर होईल.
>> ते मॅनेजेबल आहे (म्हणूनच हजारो विमानं पंखांमधे पेट्रोल घेऊन उडताहेत)

इंधन चे वजन पण किती तरी जास्त असणार च.
>> असलं तरी तितकं क्रिटिकल नसावं (नाहीतर विमानं पंखात पेट्रोल घेऊन उडली नसती)

याहून अधिक उत्साह अन उत्सुकता अस्ल्यास थोडं गूगलून घ्या.
इथे अ‍ॅव्हगीक्स असतील पण एरोस्पेस इंजिनिअर्स असतीलंच असं नाही. तिथे नक्की असतील अन टेक्निकल माहिती मिळेल.
ती तुम्ही घेतल्यावर इथेही येऊन शेअर करा, म्हणजे आम्हा पामरांनाही ज्ञानप्राप्ती होईल.

लेखात विमानाची चित्रे / रेखाचित्रे अत्यावश्यक आहेत. म्हणजे संदर्भ / निर्देश करून विचारता येईल.

>>
कृपया नेटफ्लिक्स वरची डॉक्युमेंट्री / मी पान नं २ वरच्या प्रतिसादात दिलेल्या यूट्यूब लिंक्स बघा, लवकर अंदाज येईल.

पंखात fuel tank asel तर खूप काळजी घ्यावी लागेल तिथे चूक झाली तर विमान वर नियंत्रण ठेवणे खूप अवघड होण्याची शक्यता आहे.
एक अंदाज

>> आपण एकदा खरंच कुणा एरोस्पेस इंजिनिअरशी संवाद करा.

Pages