पुस्तकपरिचय : लीळा पुस्तकांच्या (लेखक : नीतीन रिंढे)

Submitted by ललिता-प्रीति on 16 December, 2019 - 01:26

पुस्तकांच्या दुकानात जायचं, बराच वेळ निवांत पुस्तकं चाळायची, नवनवीन लेखक, पुस्तकं माहित करून घ्यायची, हा माझा एक लाडका विरंगुळा. अशा प्रत्येक वेळी पुस्तकखरेदी होतेच असं नाही; किंवा पुस्तकखरेदी करायची असेल तेव्हाच पुस्तकांच्या दुकानात जावं, अन्यथा नाही, असंही मला वाटत नाही.
नुकतंच ‘लीळा पुस्तकांच्या’ (लेखक नीतीन रिंढे) हे books on books प्रकारातलं पुस्तक वाचलं, तेव्हा असाच पुस्तकांच्या दुकानात रमल्याचा feel आला.
वास्तविक हे पुस्तक म्हणजे a book on books on books असं म्हणायला हवं. पुस्तकं, त्यांची मुखपृष्ठं, पुस्तकवेडे, पुस्तकं जमवणं, त्यासाठीचा आटापिटा, ती नीट सांभाळण्यासाठीची खटपट, मोठाले पुस्तकसंग्रह, पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली पुस्तकं, पुस्तकांची दुकानं, bookshelves, अशा ’पुस्तक’ या संज्ञेला लगडून येणार्‍या सर्व विषयांवरच्या विविध इंग्रजी पुस्तकांविषयी या पुस्तकात वाचायला मिळतं.

‘Books on books’ या पुस्तकप्रकाराला कसं भिडावं हे मला खूप काही सरावाचं नव्हतं. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचं तर या पुस्तकात गुंतायला मला जरा वेळच लागला. मुळात (नेहमीप्रमाणे) ते विकत घेतल्यावर बरेच दिवस घरात तसंच पडून होतं. त्यात पुन्हा पुस्तकात एकेक स्वतंत्र लेख असल्यामुळे उत्साह चार बोटं कमीच झाला होता. (ही वाचक म्हणून माझ्यातली एक जरा अंमळ खोटच आहे, असो.)
तरी आपणच विकत घेतलेलं पुस्तक वाचायचंच नाही, हा देखील एका प्रकारे इगो प्रॉब्लेमच झाला. त्याच्याच टोचणीने एक दिवस सहज पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर फिरवत होते. तर त्यात ’न-वाचनाचं संकीर्तन’ असा एक लेख दिसला. उत्सुकतेने तो लेख उघडला तर त्यात How To Talk About The Books You Haven’t Read याच नावाच्या पुस्तकाची चर्चा असल्याचं दिसलं. That was the ‘Eureka’ moment. पुस्तकवेडे पुस्तकं खरेदी करतात आणि मग ती न वाचण्याची कारणं शोधत राहतात. किंवा आपण आपल्या आवडीची पुस्तकं वाचतो तेव्हा इतर विषयांच्या पुस्तकांना मुकतो. एखादा समजा म्हणत असला की मी भरपूर वाचन करतो, तरी त्याने न वाचलेल्या पुस्तकांची संख्या कायमच त्याने वाचलेल्या पुस्तकांहून जास्त असते. म्हणजेच पुस्तकं न वाचणं हेच या जगात नैसर्गिक आहे... अशा काय काय मुद्द्यांची त्या पुस्तकात चर्चा आहे आणि ते या लेखात छान रंगवून सांगितलेलं आहे. ते वाचायला इतकी मजा येते की त्याबद्दल सांगायचं तर तो आख्खा लेखच इथे उतरवून काढावा लागेल. त्यातली ‘virtual library’ ही संकल्पना तर मला फार आवडली. (आणि ती virtual या शब्दाच्या लौकिक अर्थाहून वेगळी आहे.) पिएरे बायर्ड या फ्रेंच प्राध्यापकाने हे पुस्तक लिहिलं आहे.

'बुकशेल्फचा इतिहास’ हे असंच मला आवडलेलं आणखी एक प्रकरण. त्यात चर्चिलं गेलेलं पुस्तक आहे - The Book On The Bookshelf, लेखक हेन्री पेत्रोस्की. पुस्तक जन्मलं तेव्हापासून आजपर्यंत ते ठेवण्याच्या पद्धती कशा बदलत गेल्या त्या इतिहासाची चर्चा या पुस्तकात आहे. एका लेखात पुस्तकं नाहीशी होण्याची विविध कारणं, मार्ग, उदाहरणं यांची चर्चा करणार्‍या पुस्तकाबद्दलची चर्चा आहे.

यातली बरीचशी पुस्तकं अशीच फारशी न ऐकलेली आहेत. बरेच लेखक या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत हे अनेकांना माहितीही नसेल. (मी देखील त्यापैकीच एक.) तरी त्या पुस्तकांबद्दल वाचताना रंगून जायला होतं. नीतीन रिंढे यांनीही अगदी गप्पा मारल्याप्रमाणे त्याबद्दल रंगवून लिहिलं आहे. प्रत्येक लेखाच्या पहिल्या पानावर त्या लेखात ज्या पुस्तकाची चर्चा आहे त्याच्या कव्हरचं चित्र दिलेलं आहे. पहिले काही लेख वाचून होईपर्यंत मी त्या चित्रांकडे नीटसं पाहिलंही नव्हतं. मग मात्र आधी ते चित्र पाहून त्या-त्या लेखात काय वाचायला मिळेल याचा अंदाज बांधायला सुरुवात केली; rather ती आपसूक झाली.

कॅसानोव्हा हाडाचा पुस्तकवेडा होता, हिटलरचं पुस्तकवेड, या गोष्टी या पुस्तकातून विस्तृतपणे समजतात. यात प्रदीप सबेस्टियन या भारतीय लेखकाच्या The Groaning Shelf या पुस्तकावरही एक लेख आहे. ’पुस्तक’ या वस्तूबद्दल त्यात चर्चा आहे. एखाद्या व्यक्तीचा पुस्तकसंग्रह पाहून त्याचं चरित्र लिहिण्याचे प्रयत्न झालेले आहेत. अशा दोन प्रातिनिधिक चरित्रपुस्तकांची चर्चा ’पुस्तकांनी रचलेली चरित्रं’ या लेखात केलेली आहे.

सर्वच लेखांबद्दल इथे लिहिण्याचा मोह महत्प्रयासाने आवरून असं म्हणते, की books on books प्रकारात कोणकोणते विषय हाताळले जाऊ शकतात याबद्दलची माझी माहिती, जाण ’लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाने खूप बदलली, सुधारली. पाश्चात्य जगात ’पुस्तक’ या वस्तूकडे पाहण्याचे अनेको आयाम आहेत, तेवढे आपल्याकडे अजून रुजलेले नाहीत, हे जाणवलं.

पुस्तक वाचण्याइतकंच मला पुस्तक परिचय, परिक्षण किंवा पुस्तकाबद्दल वाचायलाही खूप आवडतं. अनेक अशी पुस्तकं असतात की जी आपल्याला वाचायला मिळतीलच याची शाश्वती नसते, खासकरून अमराठी किंवा अभारतीय. पण म्हणून ज्या दिशेला जायचं नाही तो रस्ताही विचारायचा नाही असं काही मला वाटत नाही. ती पुस्तकं वाचायला नाही मिळाली तरी त्या पुस्तकांबद्दल वाचायला मला तितकीच मजा येते. ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक वाचून अशीच मजा आली. पुस्तकाचा शोध मानवाच्या मूलभूत शोधांपैकी एक आहे, काळानुसार त्यात फेरफार होतील, पण वाचन करणे याला मरण नाही, हा त्यात अप्रत्यक्षपणे अधोरेखित होणारा आशावादी मुद्दा मला फार आवडला.

हे पुस्तक वाचून खर्‍या अर्थाने म्हणावंसं वाटतं - ’असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे!’.
----------
लीळा पुस्तकांच्या
लोकवाङ्‍मय गृह
पानं - १८९. किंमत - २५० रुपये

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
एका book on books प्रकारच्या (बहुतेक इंग्रजी) पुस्तकाबद्दल 'मी वाचलेले पुस्तक' या धाग्यावर कुणीतरी लिहिलं होतं असं वाटतंय. की ते story within story होतं? काहीच लक्षात नाही.

पुस्तकांच्या दुकानात जायचं, बराच वेळ निवांत पुस्तकं चाळायची, नवनवीन लेखक, पुस्तकं माहित करून घ्यायची>>> हे मस्त असतं. अलीकडे कुठल्या पुस्तकांंना परत नव्याने 'मागणी' आहे याचापण उगाचच अंदाज येतो. Happy

वाहवा मस्त लेख.....मलाही संध्याकाळी थकल्यावर पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो. खूप इच्छा असते वाचायची पण काय करणार... दिवसभर काम केल्यावर पुस्तक वाचायची पण ताकद नसते.

छान लिहिलंय.
शेवटच्या परिच्चेदात माझ्याच भावना मांडल्यात असं वाटलं.

हा लेख 'वाचू आनंदे' याही किंवा फक्त या ग्रुपमध्ये हवा ना?

किंवा पुस्तकखरेदी करायची असेल तेव्हाच पुस्तकांच्या दुकानात जावं, अन्यथा नाही, असंही मला वाटत नाही. >> क्या बात है! घडतं खर पुस्तकांच्या बाबतीत विंडो शॉपिंग...
पुस्तकांवरचे पुस्तक तसा नॉव्हेल प्रकार आहे. माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.

सुरेख परिचय करून दिला आहे.
हे पुस्तक वाचायच्या यादीत अनेक दिवस आहे. मागे एकदा मराठीमधली बूक्स ऑन बूक्स प्रकारची पुस्तके कुठली असा प्रश्न विचारला असता इथल्या जाणकार वाचकांनी दिलेल्या यादीत हे होते.
याचबरोबर आडवाटेची पुस्तकं हे निखिलेश चित्रे यांचे पुस्तकही सुचवले होते तसेच मी वाचत सुटलो (निरंजन घाटे), वाचणार्‍याची रोजनिशी (सतिश काळसेकर) ही पुस्तके आठवतात.

https://www.maayboli.com/node/69094

हा लेख 'वाचू आनंदे' याही किंवा फक्त या ग्रुपमध्ये हवा ना? >>> हो, हो, माझा ब्रेन-फेड Proud (अ‍ॅडमिन, कृपया धागा वाचू आनंदे ग्रूपमध्ये हलवावा.)

बुकशेल्फ चॅनलबद्दल माहिती नव्हतं. लिंकबद्दल धन्यवाद.

आडवाटेची पुस्तकं हा धागा नजरेतून निसटला होता. आता वाचून काढला.

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.

आवडला लेख!

> (अॅडमिन, कृपया धागा वाचू आनंदे ग्रूपमध्ये हलवावा.) > तू स्वतःच संपादन करू शकतेकी Happy

कालची बातमी.
अमेरिकेतल्या महाराष्ट्र्र फाउ़ंडेशनचा 'अ-पारंपरिक ग्रंथ पुरस्कार' या पुस्तकांसाठी नितीन रिंढे यांना जाहीर झालाय.

तू स्वतःच संपादन करू शकते की >>> मी संपादनात जाऊन पाहिलं होतं, शब्दखुणा इत्यादी बदलता येतात, पण ग्रूप बदलता आला नाही.

पुस्तकाचा परफेक्ट टीझर आहे आणि तितकीच सुंदर ओळखही!

पुस्तक वाचण्याइतकंच मला पुस्तक परिचय, परिक्षण किंवा पुस्तकाबद्दल वाचायलाही खूप आवडतं. अनेक अशी पुस्तकं असतात की जी आपल्याला वाचायला मिळतीलच याची शाश्वती नसते, खासकरून अमराठी किंवा अभारतीय. पण म्हणून ज्या दिशेला जायचं नाही तो रस्ताही विचारायचा नाही असं काही मला वाटत नाही. ती पुस्तकं वाचायला नाही मिळाली तरी त्या पुस्तकांबद्दल वाचायला मला तितकीच मजा येते. >>> अगदी अगदी! म्हणूनच तू, टण्या अशा लोकांनी मायबोलीवर वरचेवर अशा पुस्तकभेटी घडवून आणाव्यात अशी तुमच्यावर सक्ती केली पाहीजे Happy

फेसबुक चर्चेतून अरुण टीकेकरांचं 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी' हे आणखी एक वाचनविषयक पुस्तक कळलं.

विलास सारंगाचं लिहित्या लेखकाचं वाचन हे आणखी एक.

https://www.weeklysadhana.in/view_article/arun-nerurkar-remembering-85-o...

हा एक अतिशय छान लेख वाचला आज. लेखक अरूण नेरूरकर.
'टाईम' साप्ताहिकाला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. जेव्हा ८५ वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हा त्या ८५ वर्षांमधल्या निवडक लेखांचं संकलन असणारं पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकाबद्दलचा लेख आहे. पण सुरुवातीला जनरल पुस्तकांबद्दल जे लिहिलंय, तेही मला आवडलं. 'टाईम' चा दर्जा कायम ठेवण्यासाठी जे कष्ट वर्षानुवर्षे घेतले जातात ते वाचून प्रचंड आदर वाटला.
नेमकं कुठे हे लिहावं ते समजत नव्हतं. लेखाचा मुख्य विषय एक 'पुस्तक' आहे म्हणून इथे लिहिलं. Happy

पुस्तक वाचण्याइतकंच मला पुस्तक परिचय, परिक्षण किंवा पुस्तकाबद्दल वाचायलाही खूप आवडतं. अनेक अशी पुस्तकं असतात की जी आपल्याला वाचायला मिळतीलच याची शाश्वती नसते, खासकरून अमराठी किंवा अभारतीय. पण म्हणून ज्या दिशेला जायचं नाही तो रस्ताही विचारायचा नाही असं काही मला वाटत नाही. ती पुस्तकं वाचायला नाही मिळाली तरी त्या पुस्तकांबद्दल वाचायला मला तितकीच मजा येते. >>> पर्फेक्ट. फार आवडला परिचय.
पुस्तक अ‍ॅमेझॉनवर नाहीये उपलब्ध, किं डलवरही नाही, लायब्ररीतही नाही. तेव्हा जेव्हा वाचायला मिळेल तेव्हा मिळेल. तोवर ह्यावरच समाधान मानून घेते.
एक जन्म फक्त पुस्तकं वाचणे ह्यासाठीच राखीव असायला हवा.

माझ्याकडेही पडून आहे पुस्तक. पहिले प्रकरण वाचून बाजूस ठेव्ले. आता हा लेख वाचून नव्या दमाने घेतो हातात..
books on books हा प्रकार निरंजन घाटे, सतिश काळसेकर, गोविन्द तळवलकर आणि अगदी नरहर कुरुंदकरांनीही हाताळलेला आहे..