गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान : भाग ३ : गिरनार परिक्रमा

Submitted by निकु on 4 December, 2019 - 02:14

सकाळी ४.३०ला बाहेर प्रांगणात सगळ्यांनी भेटायचे ठरलेले. ३.३०लाच उठलो, आवरून बरोब्बर ४.३०ला बाहेर हजर झालो. समोर गिरनारच्या पायऱ्यांवरील लाईटस् दिसत होते.. त्या दिव्यांच्या ओळीवरून रस्ता कसा जात असेल ते कळत होते. सारी मंडळी अगदी वेळेवर हजर झाली. ग्रुपलीडरने परिक्रमेच्या दृष्टीने काही सूचना दिल्या उदा. टॉर्च घेतल्याची खात्री करणे, काठ्या गरज लागत असेल तरच घ्या.. बऱ्याचदा घेऊन नुसतेच ओझे होते इत्यादी. धर्मशाळेच्या बाहेर पडून आम्ही सगळ्यांनी चहा/ कॉफीपान केले, ज्यांना काठ्या घ्यायच्या होत्या त्यांनी काठ्या निवडल्या आणि चालायला सुरुवात केली. हो आता कुठेही जायचं तर खोलीतून निघायचं व थेट चालू लागायचं Happy

आता परिक्रमेविषयी थोडेसे:
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश खुला करतात.

ही परिक्रमा केवळ कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंत करतात. पहिला दिवस भवनाथमंदीरापासुन सुरु होतो. दुसरा मुक्काम जीना बाबांची मढी, तिसरा मालवेल आणि शेवटचा बोरदेवी मंदीर. अश्याप्रकारे एकादशीपासून सुरु करुन पौर्णिमेला परीक्रमेची समाप्ती करतात. हल्ली एखादा मुक्काम करुन किंवा एका दिवसात सलग चालून १२/१४ तासात पुर्ण करतात. पण एक तरी मुक्काम असावा असे शास्त्र आहे. (मी भाडीपाची फॅन आहे) यादरम्यान सर्व देव, यक्ष, गंधर्व, यती, ऋषी असे सगळेजण परिक्रमा करत असतात व त्यांचा सहवास व आशीर्वाद मुक्काम केल्याने मिळतो अशी भावना आहे.

तर अश्या या परिक्रमेच्या वाटेवर आमची पाऊले पडू लागली.
एवढ्या पहाटेसुद्धा रस्त्यात अनेक ठिकाणी आश्रम उघडे दिसत होते. अखेर ती कमान आली.. गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार... आता खऱ्या अर्थाने चालणे सुरु होणार होते. अंधार मी म्हणत होता.. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा अंधार होता. या रस्तावर चालायला विजेरी अत्यावश्यक आहे. मधे मधे इतरांच्या विजेरीचा उजेड मिळतो पण तुमच्या पायाखाली खड्डा आहे की उंचवटा आहे ते पहाण्यासाठी तुमच्या हातात विजेरी हवीच हवी..
हेच ते प्रवेशद्वार :
Webp.net-resizeimage.jpg

मी परिक्रमेला सुरवात झाल्यावरच आमचा ठरलेला ग्रुप सोडून पुढे चालायला सुरवात केली. काल सोमनाथ मंदीरात झालेल्या चुकामुकीमुळे जरा लीडरनी प्रेमळ दटावणी केली. पण त्यांना मी विनंती केली की त्यांच्या इतक्या हळूहळू वेगाने मला चालता नाही येणार. इथून मी जी पुढे गेले ते शेवट पर्यंत पुढेच राहीले. आपण जर आपल्या सहज वेगाने चाललो नाही तर पाय जास्त दुखू लागतात. परिक्रमेचे अंतर पाहता मला ती रिस्क घ्यायची नव्हती.

जंगल सुरु झाल्यावर, म्हणा कमान ओलांडली की जंगलच सुरु होते; तेही घनदाट. तर इथून लगेचच हळूहळू चढालाच सुरुवात होते. या पहील्या चढाला जवानी की घोडी म्हणतात.. जवानीकी घोडी चढुन गेल्यावर जीनाबाबाकी मढीपाशी जरा रेंगाळलो. त्यांची चिलीम आजही तिथे आहे. बाजूला एक हनुमान आणि कालिकेचे मंदीर आहे. इथे बरेच नागासाधू बसलेले असतात आणि तुमचा रस्ता अडवून पैसे मागतात. ते जे काही चित्र होते ते फारच भयंकर वाटत होते.. काही साधूंची बडबड चालू होती - "१रुपयात काही येतं का आता १०रुपये तरी द्या." माझ्या मागून आलेल्या काहीजणींनी सांगितले की बायकांवरही शेरेबाजी करत होते म्हणे.. कसले हे साधू! मी फार बघू शकत नव्हते.. आपल्याला अश्या दिंगंबर अवस्थेतील माणसांना पहायची एकतर सवय नसते त्यामुळे आधी अवघडायला होतं.. त्यात इथे अनेकजण असे नुसते भस्म फासून बसलेले.. त्यांचाबद्दल अनेक वदंताही आहेत जसे की ही लोकं फार कोपिष्ट असतात, त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर संमोहीत करतात इत्यादी इत्यादी.. आमच्या लीडरलातर पकडून पैसे द्यायला लावले म्हणे..

मी यु ट्युबवर पाहिलं होतं की ही लोकं पैसे मागतात, तेंव्हा हा मुक्काम जवळ आल्यावर मी काही नाणी हातात ठेवली. आणि कुणाकडेही न बघता भराभर चालायला सुरवात केली.. हात पुढे आला की नाणं ठेवायच आणि चालू लागायचं. त्यात मला एक जाणवलं की नामस्मरण चालू असेल तर ही लोकं बाजूला होऊन तुम्हाला रस्ता मोकळा करुन देतात.. नामस्मरण थांबलं की पैसे मागणार.. जीना बाबाच्या मढीच्या आधीपासून, नंतरही बऱ्याच अंतरापर्यंत ही लोकं रस्त्याच्या दुतर्फा बसलेली असल्याने मला माझा अनुभव टेस्ट करता आला.. पुढे पुढे साधूंबरोबर साध्वीपण होत्या (त्या मात्र दिगंबर नव्हत्या). त्याही पैसे मागत असत पुरुषयात्रेकरूंना ते त्रासदायक होई. यातून सुटकेचा मार्ग एकच, नामस्मरण. असे अनुभव यायला लागले की ही परिक्रमा नुसता जंगल ट्रेक न राहता यात्रा बनून जाते व जाणवते त्यांच्या इच्छेनेच केवळ आपण हे करु शकतो.

इथे येईस्तोवर चालणाऱ्यांचे वेगानुसार गट पडले होते. सर्वात आधी सुपरफास्ट बर्वेदादा, श्री. अभ्यंकर आणि अजून दोघे सासरा जावयाची जोडी होती. सासरेबुवाही ७०च्याजवळपास होते पण चालण्याचा वेग अफाट होता. त्यानंतर आमचा ग्रुप मी, राणे आजी, नगरचे चव्हाणदादा, शुभांगी, पुण्याचे पंकजभाऊ, त्यांच्या मातोश्री आणि त्यांची मैत्रिण, तेजस आणि शिरवळकडचा रोशन. तेजस आणि रोशन एकदम उमदे गडी होते आणि अगदी टणाटण उड्या मारत परिक्रमा पार करत होते. मी बऱ्याचदा पंकजभाऊंच्या आई आणि त्यांच्या मैत्रिणी बरोबर चालत होते. मधेमधे एकमेकांसाठी थांबून आमचा हा चमू मार्गक्रमण करत होता. आमच्या मागे माझ्याबरोबर आलेल्या २न्ही काकू आणि अजून २जणी होत्या. सर्वात शेवट सगळे लीडर आणि ज्यांचा वेग कमी आहे अशी माणसे. जंगल घनदाट होते व एकदा आत शिरल्यावर चालूनच बाहेर पडायचे त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. म्हणून ग्रुप लीडर्स या लोकांना चीअर अप करत, मदत करत मागून येत असावेत.

चालताना दिसलेली पवनचक्की व पाण्याची उन्हाळी सोय

Webp.net-resizeimage (1)_1.jpg

एकूण तीन डोंगर चढायचे आणि उतराचे असतात हे माहित होते. पण चढ एवढा होता की २रा डोंगर संपेपर्यंत थकायला झाले होते. मधे थांबत होतोच आम्ही. जवळपास ७०अंशाचे चढ होते.

परिक्रमा ही वर्षातून काही ठराविक दिवसच करता येत असल्याने गर्दीचा नुसता पुर आलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्टॉल्स लागलेले दिसत होते.. भजी, पापड, खारे दाणे, फुटाणे, मसाला आलू, मीठ, मिरची, मसाला, भाज्या असे काय काय न् काय काय.. सर्वात कहर म्हणजे पानाचे ठेलेही होते. ठिकठिकाणी लिंबू सरबत, पाणी मोफत वाटत होते.. अनेक महाराजांचे रस्त्यात लंगर होते, ते चहा नाष्टा, जेवण वाटत होते.. हा सेवाभाव पाहून सद्गतीत व्हायला होत होतं..
असाच एक अमूलचा स्टॉलः
Webp.net-resizeimage (4).jpg

मीठ, मिरची, भाजीचे ठेले:
Webp.net-resizeimage (5).jpgWebp.net-resizeimage (7).jpg
सुरवातीला टेंपो, गाड्या काही अंतरापर्यंत येऊ शकतात म्हणून दुर्लक्ष केलेले पण दुसऱ्या डोंगरावरही पाणी मोफत वाटत होते जे त्यांनी खालून कुठुनतरी लांबून वाहून आणलेले.. बरं ही लोकंही गरीबच दिसत होती.. हे सगळे मोफत वाटणारे अगदी हात जोडुन तुम्हाला आमंत्रण देतात.. तो सेवाभाव बघून शब्द सुचत नाहीत. काही ठिकाणी शहाळेही ५/५ रुपयांना विकत होते.. का? केवळ परिक्रमा वसीयांची सेवा हा भाव.. इकडे शहरातील विक्रेते असते तर अश्या ठिकाणी अजून १०० रुपयांना शहाळे विकले असते.. पहिल्याचढापासुन पुढे तुम्हाला सगळे पाठीवर वाहून न्यावे लागते.. गाडी अगदी ३ऱ्या डोंगराचा उतार संपल्यावरच! मला या माणसांची खूप कमाल वाटली.. मी मनातून या सगळ्यांना नव्हे त्यांच्या सेवाभावाला साष्टांग दंडवत घातला.

वारीत जशी सगळ्या प्रकारची माणसे दिसतात तशी परिक्रमेतही दिसत होतीच. सेवाभावी अनेक गरीब लोक होते तसेच लहान मुलाला घेऊन भीक मागणारे, अपंगलोक, वृद्ध भीकारी अनेक ठिकाणी दिसत होतेच. काही मुलांना शंकर, राम, लक्ष्मी असे साज चढवलेले व पैसे मागायला लावलेले तर काही ठिकाणी साधू जमीनीत पुर्ण डोके गाडून झोपलेले अशी अनेक निरीक्षणे करीत मी चालले होते. दुसऱ्या डोंगरमाथ्याला आम्ही साधारण ११.३०च्या सुमारास होतो. उन आजिबात जाणवत नव्हते. मला जरा जरी उन लागले तरी लगेच पित्ताचा त्रास होतो.. म्हणजे पित्त उसळतेच.. मग विश्रांती घेतल्याशिवाय आराम पडत नाही. पण आज मी अखंड चालत होते, थकवा जाणवल्यावर मधे लिंबू सरबत घेत होते, बरोबर इलेक्ट्रॉलचे पाणी घोट घोट घेत होते. पण पित्ताचा त्रास आजिबात जाणवत नव्हता. उन्हाचे अस्तित्वही डोंगरमाथ्याला जाणवत होते थोडेफार नाहीतर नाहीच.

मधे मधे अनेक ओढे दुथडीभरून वहात होते आणि बूट ओले होऊनयेत म्हणून मी कसरत करत होते. मधल्या एका ओढ्याला अशीच कसरत करताना उडी चुकली आणि पाण्यात पडले.बूट वाचवत होते आता बऱ्यापैकी पाय भिजले. झाले, सगळ्यांना करमणुकीला नवीन विषय मिळाला- "मी व ओढा". पुढे जिथे जिथे ओढा येत असे तिथे लोक आधीच हसायला सुरवात करत. या करमणुकीने आमचा थकवा विसरायला मदत होत होती.

Webp.net-resizeimage (2).jpgWebp.net-resizeimage (3).jpg

३रा डोंगर अगदी लहान आहे असे ऐकले होते. लोकही असेच सांगत होते आता फार चढण नाही. त्यामुळे जरा बरे वाटत होते. पण ३रा चढ सुरु झाला आणि संपायचे नाव घेईना. शेवटी १.३० की २च्या सुमारास आम्ही कालीका देवळापाशी आलो. हे ठिकाण मालवेल व परिक्रमेचा मध्य आहे असे नंतर कळले. तेंव्हा मात्र चला आता हा डोंगर उतरला की परिक्रमा संपणार असे वाटत होते. उतारावर एक शॉर्टकट मिळाला, अजून अंतर कमी झाले. ३ऱ्या डोंगराच्या पायथ्यापाशी आलो तेंव्हा २.३० वाजलेले. आता भूक लागली होती. पायथ्याशी असलेल्या एका लंगर मध्ये पुरी, भाजी, गाठीया, शिरा, खिचडी असे पुर्ण गरमागरम जेवण जेवलो. आता मालिशवाले दिसायला लागले होते, निरनिराळ्या माळा, तेले अश्या वस्तूंची विक्री चालू झालेली. हे पाहून मला अजूनच वाटायला लागले की परिक्रमा संपत आली. काही लोक मालीश करून घ्यायला, झोप काढायला थांबले. मी मात्र चालणे सुरूच ठेवले होते. आता थांबायचे ते रूमवर जाऊनच.

चढत जाणारी नागमोडी वाटः
Webp.net-resizeimage (6).jpg

तासाभरात शेवटची कमान आली परिक्रमा संपल्याची, समोर बोरदेवी मंदिराची पाटी दिसली. मनातल्या मनात मी आनंदाने एक उडी मारली. (शारिरीक शक्यच नव्हते.) देवाचे आभार मानले. बोरदेवीचे दर्शन घेऊन पुढे जाण्याची प्रथा आहे परंतू पाटीवाचली तर एक कि.मी. अंतर होते म्हणजे येऊन जाऊन २ कि.मी. बापरे.. आता २किमी सुद्धा जास्त वाटायला लागले होते. मी तिथेच स्टॉल्सवाल्यांजवळ चौकशी केली तर म्हणाले इथे परिक्रमा संपली बोरदेवीचे दर्शन घेतले पाहिजेच असे नाही. ऐकून किती बरं वाटलं सांगू. थोडं चालल्यावर म्हटले किती अंतर बाकी ते तरी विचारू.. तर कळाले की इथून भवनाथ मंदीर अजून १२किमी. आहे. हे ऐकून फक्त पडायचीच बाकी होते. मनाला आवरलं, इतके अंतर चालून आलो आता हेही संपेल. तशी धुगधुगी होती अजून शरीरात आणि मन थकायला तयार नव्हतं.

हाही रस्ता जंगलातूनच आहे पुर्ण. मधे मधे गिरनार दर्शन देत होता. आजूबाजूला दाट झाडी छोटेसे ओहोळ.. रस्ता खरोखर सुंदर होता. मन प्रसंन्न् करत होता. हळूहळू चालत होते, आता टेकायचे झाल्यास अगदी खाली बसावे लागत होते, त्यामुळे शक्यतो ते टाळून उभ्या उभ्या विश्रांती घेऊन चालणे सुरु ठेवले होते. (एकदा खाली बसल्यावर उठताना काय परिस्थीती होत होती ते केवळ माझे मीच जाणे) तिसऱ्या डोंगराच्या उताराच्यावेळी पंकजभाऊंनी काठी दिलेली; तिचा खूपच उपयोग होत होता. त्याचे झाले असे की knee capsमी पहिल्यांदाच वापरत होते आणि त्याने उजव्या पायाची नस कुठेतरी दुखावली होती. मधे रस्त्यात थांबून मी त्या कॅपस् काढल्या तरी पाय उचलायला खूपच त्रास व्हायला लागला होता. मग काठीच कामी आली. मध्ये मध्ये शॉर्ट्कटस् होते पण पाउल नीट पडेल का याची शाश्वती न वाटल्याने सरळ मार्गावरुनच चालत राहिले.

बोलणे कधीच बंद झाले होते. थकव्याने डोळे मिटायला लागले होते. जेंव्हा जेंव्हा विचारू तेंव्हा सगळेजण ५किमी. राहिले सांगत होते पण हे शेवटचे ५ किमी काही संपायला तयार नव्हते. एकदातर मी केवळ खुणेनेच पोलीसांना विचारले किती अंतर आहे.. त्यांनाही माझी परिस्थिती पाहुन हसू आले. अर्थात उत्तर तेच होते -५ किमी. संपूर्ण परिक्रमेत मधे मधे पोलीसांचा तंबू होता, किंवा पोलीस येताजाताना दिसत होते. मदतीलाही तत्पर असावेत कारण एका कुटुंबातील मुलगा हरवला होता तो त्यांनी विक्रमी वेळात शोधून दिला होता.

मी मजल दर मजल करीत चालत होते. खोडीयारमातेचे छोटेसे देऊळ अगदी रस्त्यातच लागते. तिथे कळाले की बोरदेवीचे दर्शन नसेल घेतले त्यांनी इथे दर्शन घेतले तरी चालते. जणू भक्त्तांसाठी माता रस्त्यावर येऊन उभी होती. परिक्रमा सोपी करत होती. स्वत:ला मोटीवेटकरत होते. निघाल्यापासून अनेक वृद्ध माणसे दिसत होती, गुजराथी बायका केवढाली वजने डोक्यावर वहात वेगाने चालत होत्या. त्यांना पाहून अचंबीत होत होते. शेवटी ती वेळ आलीच. एका पाणीवाटपाच्या ठिकाणी बसायला जागा होती, समोर गिरनार दिसत होता.. आता मैलाचे दगड सुरुझाल्याने खरे अंतर कळत होते व खरोखर शेवटचे ५किमी. राहिले होते. शरीर प्रचंड थकले होते, वाटले बस्स आता कोणी काही म्हणो, मी काही इथून ऊठणार नाही.. मागून येणाऱ्यांना विचारू की एखाद्या गाडीवानाला विनंती करायची का ते. आता इथे अगदी दुचाकीपण दिसत होत्या पण रिकामी गाडी एकपण नाही. तेवढ्यात भलमोठं बोचकं घेऊन एक बाई आली आणि माझ्या शेजारी जरा टेकली. तिला विचारलंच न राहवून की बाई गं, एवढ सगळ ओझे कसे वाहतेस. तर ती हसून म्हणाली आम्हाला याची सवय आहे. ओझे नसेल तर भरभर चालता नाही येणार. तिचं कुटुंब आता लवकरच परिक्रमा पुर्ण करणार होतं आणि मग डोक्यावरच्या साहित्यातून तिला स्वयंपाक करायचा होता. बापरे.. इथे चालायची शक्ती नाही आणि ही बाई त्यानंतर स्वयंपाकपण करणारे.. मी स्वत:वरच रागवले.. ते काही नाही हे अंतर पुर्ण करायचेच.. चला यात्रावीरहो.. चालायला लागा.. तु हे करु शकतेस. आता फक्ता ५ किमी म्हणजे १च तास.. "common, you can do it!". परत चालणे सुरु झाले, दत्तात्रयांचे नाम मुखी सुरु केले. मागे नामस्मरणात चालताना असे जाणवले होते की आपले पाय जमिनीला लागतच नाहीयेत.. तो अनुभव आठवला आणि स्वत:ला सांगितले की तेच करून घेत आहेत तेंव्हा परिक्रमा पुर्ण होणारच ! जय गिरिनारी!

आतातर अगदी हळूहळू चालत होते, चालणे कसले म्हणा खुरडतच होते. काठी टेकवायची मग तिच्यावर जोर टाकून पाय ओढायचे. मधे क्षणभरच उभे रहायचे की उर्जा मिळायची, तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जेवढा वेग साधता येईल तो साधायचा की परत थोड्यावेळाने पाय ओढणे सुरु, परत विश्रांती असे चक्र चालू होते. एकीकडे पुणेरी मन म्हणत होते, यांना कुणीतरी सांगायला पाहिजे, जिथे परिक्रमा संपल्याची कमान आहे तिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट ठेवा. किती लोक घेतील तो. दुसरीकडे स्वत:ला सांगत होते, तुला कैलास-मानसरोवर चालत जायचे आहे ना, त्याची रिहर्सल समज. हे अंतर पुर्ण केलेस तर तुझी थोडी तरी तयारी होऊ शकते तिकडे जायची. तुला हे अंतर पुर्ण करायलाच हवे. मधेच रुम मधील बेड आणि आरामदायी वातावरण डोळ्यासमोर येत होते, हे अंतर कापले की आपल्याला आराम मिळणार आहे. तेंव्हा एकला चलो रे..
अश्या प्रकारे अनेक विचारांना फाटे देत, नामस्मरणकरत पावणे सहाला मी धर्मशाळेत प्रवेश केला. सकाळी ४.३०ला निघालेली मी ५.४५ म्हणजे जवळ जवळ १४ तासांनी परतले होते.

न आलेल्या व आधी पोचलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले तेंव्हा खुप मस्त वाटले. बाहेरच बाकावर बसून घेतले, रुमची चावी काकूंकडे होती. त्या मागे होत्या पण परिक्रमा चालत पुर्ण केल्याचे समाधान एवढे होते की लगेच आडवे व्हायला नाही मिळाले त्याचे आजिबात दु:ख झाले नाही. मी एक उद्देश्य पुर्ण केले होते. लगेच उद्या गडावर येणार का लोकांची चर्चा सुरु झाली. सगळेच इतके दमले होते की उद्याची कल्पना करवत नव्हती. मी म्हटले उद्याचे उद्या पाहू. खोलीवर गेल्यावर गरम पाण्यानी अंग शेकले, लवकर जेवून आडवे झालो तेंव्हा काय वाटत होते ते शब्दात मांडणे कठिण आहे.
क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! दुरुस्ती केली आहे.
परिक्रमा सलग चालून करता येते काहीजण मधे एक मुक्कामही करतात. आमचा ग्रुप थांबणार नसल्याने सलग चाललो.

ननि, शैलजा, प्रविण, भावना .. प्रतिसादांसाठी धन्यवाद!
परिक्रमा अवघड आहेच, ३८ ते ४० कि.मी. चालता तुम्ही परिक्रमे दरम्यान!

तरीही एकदा तरी करावीच !

वाचतेय....
गोविंदघाट ते घांगरीया ट्रेक आठवला..
छान लिहीतेयस...

म.मो., सामो, ऋतुराज आणि मंजूताई धन्यवाद!
फोटो साईझचा प्रोब्लेम आहे, प्रयत्न करतेय पण जमत नाहीये.

मस्त आहे वर्णन. फोटो का नाहीत?
मी गिरनार गुगल केले आणि फोटो पाहिल्यावर समजले की हे काही आपले काम नाही. तरीही एकदा जावून यायला हवे असे ठिकाण नक्कीच आहे.

धन्यवाद हरिहर !

फायनली.. फोटो टाकणे जमलेय! .. मी काही चांगली छायाचित्रकार नाही.. हे थोडे मोबाईलमधले आहेत.

चालाणे इतके छान होते की फोटो विसरायला होत होते.