- “शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.
हॉलीवूडचे ३००, ट्राय चित्रपट बघितल्या नंतर मला असे वाटायचे की ऐतिहासिक गोष्टी वर आपल्या कडे चित्रपट का निघत नाही कारण आपला इतिहास इतका समृद्ध आहे की इथल्या सह्याद्रीच्या प्रत्येक कडे-कपारीत कथा आणि पटकथा दडलेल्या आहेत किंवा शोधल्यास पटकन सापडतील. आता आपल्या कडे चित्रपट दिग्दर्शकानी इकडे लक्ष वळवले आहे. आणि यावर चित्रपट यायला आधीच सुरुवात झाली आहे. “फत्ते शिकस्त” चित्रपटात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या पात्याने गाजवलेल्या लढाई आणि इतिहासातील अजरामर करून दंतकथा बनलेल्या एका विशिष्ट प्रसंगावर आधारित आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे चातुर्य, कुशल युद्धनीती, कुटनीती, चपळ गुप्तहेर खाते, गनीमी कावा, लढवय्या नेतृत्व, जाणता राजा, रयते साठी झुंजणारा नेता आणि शत्रूला अचानक खिंडीत गाठून विजेच्या चपळाईने वार करून चाणक्यनीतीने पाणी पाजणारा योद्धा, सरदाराचा सखा, असे अनेक गुण दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न केला आहे. त्यासाठी दिग्दर्शकाची स्तुति करायला हवी.
प्रत्येक पात्राची उत्तम रित्या करून दिलेली ओळख, प्रत्येक पात्रा साठी कथा उत्तम रित्या फूलत जाते. चित्रपट खऱ्या खुऱ्या गडकोट, किल्ले आणि ऐतिहासिक स्थळावर चित्रित केल्यामुळे चित्रपटात वास्तविक वाटतो. चित्रपट छायांकन करकरीत झाले आहे. सह्याद्रीचे कॅमेरा झूम-इन आणि झूम-आउट करून छान चित्रण केले आहे. त्यासाठी सह्याद्रीचा योग्य ठिकाणी योग्य वापर केला आहे. पार्श्व संगीताचा अतिशय योग्यपणे आणि चपखल वापर केला आहे. ज्या वेळेस प्रेक्षकांना कथा माहिती असते त्या वेळेस सुद्धा प्रेक्षकांचा चित्रपटात श्वास रोखून धरणे हे दिग्दर्शकाचे यश आहे. चित्रपट एका गोष्टी भोवती जरी फिरत असला तरी त्यातील तपशीलवार माहिती देऊन तो प्रत्येक क्षण दिग्दर्शकाने व्यवस्थित चित्रित केला आहे. तांत्रिकदृष्ट्या सुद्धा उत्तम आहे. संवाद आणि संवाद शैली यावर सुद्धा दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतली आहे.
- ‘मृणाल कुलकर्णी’ आणि “जिजाबाई” मातोश्री यांची भूमिका हे एक अति उत्तम समीकरण झाले आहे. त्यांनी संवाद आणि अभिनय अतिशय संयतपणे आणि परिणामकारक साकारला आहे. त्यांचा चित्रपटातील राज गडावरील प्रवेश तर चांगला साकारला आहे. “चिन्मय मांडलेकर” यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे पात्र अतिशय उत्तम रित्या रंगवले आहे. सगळ्यात भाव खाऊन जाते ती “अंकित मोहन” यांनी साकारलेली “येसाजी कंक” यांची भूमिका. अंकित यांनी तोफ उचलण्याचे दृश्य ३ वर्षा पूर्वी येऊन गेलेल्या चित्रपटाची आठवण करून देतो. अंकितने कमावलेली पीळदार शरीरयष्टी, चपळाई पडद्यावर दिसते. “अजय पूरकर” यांनी निसर्ग प्रेमी “तानाजी मालुसरे”, “समीर धर्माधिकारी” यांनी “नामदार खान”, “मृण्मयी देशपांडे” यांनी “केसर बाई”, “तृप्ती तोडलमल” यांनी “राय बाघन साहेबा”, “अस्ताद काळे” यांनी “कारतलब खान” आणि “ऋषि सक्सेना” यांनी फत्ते खान ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे. “अनुप सोनी” यांनी “शायिस्तेखान” आपल्या चांगल्या अभिनयातून दर्शवलेला आहे. “सर्जेराव जेधे”(स्वतः दिग्दर्शक), “कोयाजी बांदल” यांच्या भूमिका सुद्धा जमून आल्या आहेत.
उलट्या काळजाचा, धूर्त आणि घातकी नामदार खान समीर ने उत्तम वठवलेला आहे. नामदार खान प्रत्येकावर संशयी आणि बारीक नजर ठेवून फिरत असतो. “ऋषि” ने लहान पण फत्तेखान या व्यक्तीरेखेला न्याय दिला आहे. सगळ्या मोहिमांवर पराजित होऊन आलेले सरदार बघून शाहेस्तीखान नाराज होतो. वरून “राय बाघान साहेबा” यांचे कटू शब्द शायिस्तेखानाला झोंबतात.
- छत्रपती शिवाजी महाराजांची त्या काळी शत्रू पक्षात किती दहशत होती ते फक्त एका संवादात अधोरेखित होते. चित्रपटाच्या पूर्वार्धात पूर्व तयारी आणि उंबरखिंडीत घाटातील लढाईचे क्षण चित्रित केले आहेत. चित्रपटाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात कशी मोहीम केली आणि त्यात शायिस्तेखानाची बोट कापली जातात यावर आधारित आहे. “मृण्मयीने” छोटाश्या भूमिकेत प्रभाव पडून जातात. त्यात विशेष उल्लेख करावा लागेल “बहिर्जी नाईक’ याचं पात्र साकारणारे “हरीश दुधाडे”. “हरीश” या पात्रात जीव ओतला आहे. बहुरूपी, प्रसंगा अनुरूप रूपे बदलणारा, सह्याद्रीच्या वाटा ओळखणारा, आणि रूप, आवाज बदलून फिरणारा बहिर्जी मस्त वटवून पूर्ण न्याय दिला आहे. “हरीश” चित्रपटात क़व्वाली गातात हे थोडे खटकते. एका क्षणी एक पात्र गायनाची जाण नसलेले दाखवले आहे आणि दुसऱ्या क्षणी तेच पात्र क़व्वाली गातो हे सुद्धा पटत नाही.
तगडी स्टार कास्ट, प्रत्येक भूमिकेला दिलेला न्याय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला यशस्वी सर्जीकॅल स्ट्राईक ची कहाणी उलगडणारा, कलाकाराची मोलाची साथ, चांगला पूर्वार्ध आणि उत्तम उत्तरार्ध, छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम युद्ध नीती सांगण्याचा उत्तम प्रयत्न, उत्तम संगीत आणि चांगले पार्श्वसंगीत, अतिशय थरारक मांडणी, तांत्रिकदृष्ट्या उत्तम, आणि कथा, पटकथेला दिलेला न्याय, कथेची प्रवाही मांडणी त्यामुळे मी चित्रपटाला देतो ४ स्टार. चित्रपट चुकवूच नये असाच आहे.
नोट:- चित्रपट सुरू होताना साधारण साठ वय असलेल्या आज्जी चित्रपट गृहात एक-एक पायरी काठी घेऊन चढत होत्या. बहुतेक हेच चित्रपटाचे यश आहे.
>>नोट:- चित्रपट सुरू होताना
>>नोट:- चित्रपट सुरू होताना साधारण साठ वय असलेल्या आज्जी चित्रपट गृहात एक-एक पायरी काठी घेऊन चढत होत्या. बहुतेक हेच चित्रपटाचे यश आहे.<<< यापेक्षा महाराष्ट्रापासुन हजारो मैल दुर, ऑस्ट्रेलियात, हा चित्रपट बघायला पुढच्या पिढिचे वय ५ पासुन मुले-मुली आल्या होत्या. याचं जास्त कौतुक वाटलं!
शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
शिवाजी महाराजांच्या भूमिकेत जरा बरा अभिनेता हवा होता. चिन्मय मांडलेकर तसाही आवडता नाही. महाराजांच्या भूमिकेत इमॅजिन नाही करू शकत.
अगदीच बकवास सिनेमा आहे.
अगदीच बकवास सिनेमा आहे. मनोरंजनासाठी, काल्पनिक गोष्टी कथानकात घुसवणे हे समजू शकतो. मात्र ह्या सिनेमात मुळ इतिहासाशी इतकी फारकत घेतलेय की पाहावत नाही सिनेमा. तो चिन्मय मांडलेकर कोणत्या अँगलने शिवाजी वाटतो हेच कळत नाही, निदान चंद्रकात मांढरेंचा मुखवटा तरी लावायचा त्याला.
प्रतिसादा् साठी धन्यवाद चंबू,
प्रतिसादा् साठी धन्यवाद चंबू, 'पुरोगामी गाढव' आणि प्रसाद...
यापेक्षा महाराष्ट्रापासुन हजारो मैल दुर, ऑस्ट्रेलियात, हा चित्रपट बघायला पुढच्या पिढिचे वय ५ पासुन मुले-मुली आल्या होत्या. याचं जास्त कौतुक वाटलं! >> +१
मात्र ह्या सिनेमात मुळ इतिहासाशी इतकी फारकत घेतलेय की पाहावत नाही सिनेमा. >> +१ सिनेमात मुळ इतिहासाशी सिनेमाटीक liberty घेऊन फारकत घेतली आहे काही ठिकाणी.