युगांतर - आरंभ अंताचा!
भाग ४४
अंगापिंडाने मजबूत असा तो दुर्योधन जागेवरून उठला. त्याचे पिळदार बाहू सोन्याच्या अलंकारांनी मढलेले होते. अंगावरचे रत्नजडित वस्त्र सांभाळत तो सभागृहाच्या मध्यभागी पोचला. तिथून त्याने सर्व राजांकडे नजर टाकली. मनातल्या मनात हसला. त्याची काहीशी झलक मुखावरही आली असावी.
"बघं, माझ्या शिष्याची चाल कशी आहे ते! बाहू बघ किती वळणदार आहेत. बलवान आहे दुर्योधन. शोभतो की नाही राजा! बघ एकदा!"
"बघतोच आहे, दाऊ. बघतोच तर आहे केव्हापासून. चेहऱ्यावर थोडाही पश्चात्ताप नाही त्याच्या. जराही लाज नाही."
"तुला अजूनही संशय आहे ना की दुर्योधनानेच लाक्षागृह कांड केलंय?"
कृष्णाने होकारार्थी मान डोलावली.
"पण अनुज, मला नाही खरं वाटत ते. मी त्याला गदा युद्ध शिकवलंय. त्याला ओळखतो मी. त्याच्या डोक्यात तसा विचार येणे शक्य नाही."
"पण त्याने तशी कृती करणे तर शक्य आहे ना दाऊ?"
"म्हणजे काय आता? सरळ बोलत जा कधीतरी" बलराम थोडा वैतागला.
"दुर्जन मामाश्री केवळ आपल्याच नशिबी होते असे नाही ना?"
बलरामने दुर्योधनाकडे पाहिले.
"जाऊ देत. तू अजूनच गोल गोल बोलतोयस नेहमीसारखं; पुन्हा तेच तेच ! आणि तुला काय वाटतं, दुर्योधन जिंकणारच नाही हे स्वयंवर?"
कृष्ण नुसता हसला.
दुर्योधनाने धनुष्याला हात लावला. बारीक कलाकुसर केलेले भव्य आणि सुंदर धनुष्य! दुर्योधनाने उचलण्याचा प्रयत्न केला. एकदा, दोनदा, तीनदा..... आणि त्याला जाणवले. पण सोप्पा नव्हता. प्रतिबिंब पाहून लक्षभेद लांबच राहिले, पण धनुष्य उचलणेच एक अवघड काम होते....आणि दुर्योधनाकरता? कदाचित अशक्य! त्याला धनुष्याला जागचे हालवताही येईना. दुर्योधनाने सगळी शक्ती पणाला लावली. त्याच्या पिळदार बाहूंवर ताणल्या गेलेल्या नसांचे निळे-काळपट जाळे उमटले. दंडावरील सोन्याचा एक अलंकार घट्ट होत होत एकदाचा तुटून पडला. कपाळावर घर्मबिंदूंची रांग लागली. त्याने एकदा प्रत्यंचे जवळ, एकदा धनुष्याच्या मध्यबिंदूला, एकदा कडेच्या दोन्ही टोकांना उचलण्याकरता जोर लावला. पाय मखमली गालिच्यावर घट्ट रोवले. हाताला तड लागेपर्यंत त्याचे प्रयत्न सुरूच होते. पण व्यर्थ! शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिला. धनुष्य मात्र जागचं तसूभरही हाललं नव्हतं!
रागाने पाय आपटत तो जागेवर जाऊन बसला.
भीमला हसू येत होतं. कृष्णालाही. पण भीमच्या शेजारी युधिष्ठिर होता आणि कृष्णाच्या शेजारी बलराम! हसू आवरले. पुढे कोण कोण येणार भाग घ्यायला हे बघण्यातली उत्सुकता वाढली होती. पांडवांकरता तो एक विरंगुळा होता. जेवणाआधी विनामूल्य मनोरंजन! तेही विविध राज्यांच्या राजांकडून!
लक्ष साध्य करणे पूर्ण करणे राहिले बाजूला, पण धनुष्य उचलण्याचाच असल्या सारखे दृष्य होते तिथले. अनेक राजे थिजलेल्या अवस्थेत असफल प्रयत्न करून अपमानाचा भार घेऊन जागेवर येऊन बसले.
द्रौपदीच्या मनात क्षणभर वादळ घोंगावलं.
'पण कोणी जिंकला नाही तर? नाही.... कोणी ना कोणी जिंकेलच की. या सगळ्या राजांमध्ये कोणीतरी असा उमदा तरुण नक्की असेल.
असेल ना नक्की?
पितामहाराजांची, पांचाल नगरीची प्रतिष्ठा पणाला आहे. मनही भयाने ग्रासलंय. हे गोविंद! माझ्या पिताश्रींची अवहेलना होऊ देऊ नकोस.' डोळे मिटून मनोमन तिने तिच्या देवाला साकडं घातलं. तिने डोळे उघडले तेव्हा कृष्ण तिच्याकडे बघून प्रसन्न हसत होता. त्याने तिच्याकडे बघून एकदा दोन्ही डोळ्यांची उघडझाप केली.
योगायोगाने? की त्याने खरचं काही ऐकलं? माहित नाही, पण द्रौपदीच मन पुन्हा शांत झालं. 'आपली प्रार्थना स्विकारली गेली म्हणल्यावर आज हा पण कोणीतरी पुर्ण करणारच!' तिला मनोमन खात्री वाटली.
__________
"कर्णा, जा!" दुर्योधनाने कर्णाच्या खांद्यावर हात लावून सांगितले.
"दुर्योधन, पण...."
"कर्णा, मला द्रौपदी हवी आहे. कळलं तुला?"
"म्हणजे? दुर्योधन...."
"हस्तिनापुर नाही, आता हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पांचालची राजकुमारी माझीच पत्नी बनायला हवी. विनंती समज किंवा आज्ञा. पण आत्ताच्या आत्ता तू स्वयंवरात भाग घे, म्हणजे घेच."
"पण युवराज...."
"आज्ञाच समज मग!"
कर्णाकरता आता पुढे बोलायला काही उरले नव्हते.
उपकारांच्या, प्रतिज्ञेच्या, शब्दांच्या ओझ्याखाली दबून गेलेले कर्तुत्व! याला एकच अशी ओळख आहे तरी कुठे? कधी त्यास देवव्रताचा चेहरा मिळतो, तर कधी कर्णाचा! ते देवव्रताला भीष्माचार्य बनवून सोडतं आणि कर्णाला अंगराज! त्या ओझाला वाहण्याचा मोबदला म्हणून मिळालेला मान आणि धनही शापितच!
"जशी आज्ञा युवराज!" कर्णाने मान झुकवून खांद्यावरचे वस्त्र सावरत आसन सोडले.
अपेक्षित शब्द कानावर पडले आणि दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
कर्ण सभागृहाच्या मध्यभागी चालत येईपर्यंत सभागृहात उमटणारे आश्चर्याचे उद्गार त्याच्या कानी पडत होते. तो जाईल तिथे त्याचे कवच कितीही नाही म्हणले तरी चर्चेचा विषय बनायचच. दुर्योधनाला आणि कर्णाच्या परिवाराला त्या कवचाची दिव्यता पाहायची, अनुभवाची सवयच झाली होती. पण नव्याने पाहणारा त्या कवचाकडे आश्चर्याने पाहत राहायचा. जवळ जवळ संपुर्ण सभागृह त्याच्याकडे पाहत राहिले आणि कधी त्याने ते धनुष्य उचलले हे कोणाला कळलेही नाही.
"भ्राताश्री, तुम्हाला खात्री आहे की कर्ण अधिरथांचा पुत्र आहे, कोणी राजकुमार नाही?"
"नकुल, त्याने अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले तेव्हाही मला ते खरे वाटले नव्हते. आताही वाटत नाही." भीमाने नकुल उत्तर दिले आणि तितक्यात कर्णाने प्रतिबिंब न्याहाळत धनुष्याच्या प्रत्यंचेवर बाण नेमला देखील.
गुडघ्यावर बसलेल्या त्या कर्णाची आकारबद्ध आकृती कृष्णाच्याही डोळ्यांत भरली गेली. जरासंधाला मारायला भीमच हवा हा विचार तो मागे टाकणार तितक्यात दुर्योधनाकडे कृष्णाचे लक्ष गेले. कृष्ण हसला, "केवळ पात्रता असून काय फायदा?"
"काय म्हणालास?"
"काही नाही दाऊ!"
"मला वाटलं, मी ऐकलं काहीतरी."
"काय वाटत दाऊ? हा पुर्ण करू शकेल पण?" कर्णाकडे बघत कृष्णाने विचारलं.
"मला नाही माहिती." बलराम नजर फिरवत म्हणाला.
आधीच दुर्योधनाबद्दलचे भाकित सफशेल चुकल्याने तो खजिल झाला होता. पुन्हा काहीतरी अंदाज लावले आणि चुकले तर? नकोच ते! पण कर्ण पहिलाच होता ज्याने धनुष्य उचलले होते, हे मात्र खरे.
त्या सोनेरी कवच असलेल्या वीराचा नेम पाहायला सगळे उत्सुक झाले होते. त्या वीराने बाण प्रत्यंवर ताणला आणि मत्स्यावरून लक्ष हलू न देता ताण एकदम नगण्य केला.
.......आणि बाण जाऊन मत्स्याच्या डोळ्याच्या..... डोळ्याच्या काठावर अगदी जराश्या-केसाच्या फरकाने नेम चुकवून बाण खोलवर रूतून बसला.
रोखून धरलेले श्वास सुटले. पाठा पुन्हा आसनाला ठेकल्या. धृष्टद्युम्नच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.
दुर्योधन तावातावाने पुढे आला.
"राजा द्रुपद, तुम्हाला नक्की तुमच्या कन्येचा विवाह करायचा आहे की नाही? हा कसला पण ठेवला आहे तुम्ही? कर्णासारखा सर्वोत्तम धनुर्धारी हा लक्षभेद करू शकला नाही म्हणजे कोणीच हा लक्षभेद करू शकणार नाही. मग आम्हाला काय इथे अपमान करायला बोलावून घेतले आहे?" त्याने कर्णाकडे वळून पाहिले. "कर्णा, तू म्हणाला होतास तेच खरे निघाले. द्रोणाचार्यांना दिलेल्या गुरुदक्षिणेचा प्रतिशोध घेताहेत हे आपला अपमान करून."
द्रुपद काही बोलणार तोवर धृष्टद्युम्न समोर आला.
"शांत व्हा, युवराज दुर्योधन! अंगराज कर्ण हा लक्षभेद करू शकले नाहीत यात पांचाल नरेशना दोषी ठरवू नका."
"हो? मग दोष काय आम्हा सर्वांमध्ये आहे? हे बघा राजकुमार धृष्टद्युम्न, तुमच्या भगिनीचा आज स्वयंवर पुर्ण झाला नाही ना, तर जिथून उत्पन्न झाल्यात तिथेच रवानगी करू त्यांची."
अश्वत्थामा दुर्योधनाचे शब्द ऐकून पुरता अस्वस्थ झाला होता. एकीकडे मानस भगिनी द्रौपदी आणि दुसरी कडे जीवाभावाचा मित्र दुर्योधन! दुर्योधनचे वागणे संतापजनक होते आणि द्रौपदीचा या सगळ्यात काही दोषही नव्हता.
म्हणून..... म्हणून त्याने मौन पत्करले!
का?
कारण तेच! उपकार.... तेच ओझे, तीच हतबलता! ज्याच्या कन्येच्या बाजूने उभे राहण्याची अश्वत्थामाची विवेकबुद्धी कौल देत होती, त्याच द्रुपदाने आपल्या पिताश्रींना रिकाम्या हाताने कुटीत परत पाठवले होते, हे कसं विसरणार होता तो? दूध घ्यायला गेलेल्या पिताश्री द्रोणांना अखंड पांचालनगरीतून अपमानाची शिदोरी मिळाली आणि त्याच द्रोणांना हस्तिनापुराने मान, धन आणि आदराचे स्थान दिले. तेच हस्तिनापुर ज्याचे महाराज दुर्योधनाचे पिताश्री धृतराष्ट्र होते.
अश्वथामाशी ब्राह्मण-क्षत्रिय भेदभाव न करता मैत्री करणारा दुर्योधन, दुसरी कडे पांचालनरेश; आणि दुर्योधनाचे पारडे जड झाले.
अश्वत्थामा शांत राहिला. पण मनात काहीतरी सलत होतं. काय? त्याला कळेना.
दुर्योधनाचे विखारी शब्द ऐकून भीमची मुठ आवळली गेली. तो पाऊल पुढे टाकणारच, तितक्यात....
"नाही भीम."
"भ्राताश्री, आता तर आपल्याला आश्रय देणाऱ्या पांचालनगरीचा अपमान करतोय ना तो?"
"पण आपल्याला महाराजांनी कोणताही आदेश दिलेला नाही. त्यांच्या आदेशाविना त्यांच्या अतिथीला दंड देणे, अयोग्य आहे. आणि भीम, इथे द्वारकादिश आहेत. ते इथे असेपर्यंत कोणताही अन्याय आणि अधर्म होऊ देणार नाहीत."
भीमाने युधिष्ठिराने दाखवलेल्या दिशेने पाहिले आणि सोनेरी मुगुटातल्या झुपकेदार मोरपिसाने त्याची नजर काही काळ खिळवून ठेवली. प्रसन्न चेहऱ्यावर हलकेसे स्मित घेऊन काळ्याभोर विशाल नेत्रांनी भीमाकडे बघणारा तो भीम त्याला परिचित असल्यासारखा बघत होता. त्या रेशमी वस्त्रातल्या निळसर काळ्या वर्णाच्या राजाकडे पाहत भीमने नकळत हात जोडले; आणि क्षणभर डोळे मिटले. ताणल्या गेलेल्या धमन्या पुर्ववत झाल्या. थंड वाऱ्याच्या झोताने अग्नि विझावा आणि पुन्हा शीतलता जाणवावी इतके मन शांत झाले.
डोळे उघडले तेव्हा धृष्टद्युम्न सभागृहाला संबोधत होता.
"वेगवेगळ्या राज्यांचे राजे-महाराजे इथे जमले आहेत. तुमच्या पैकी कोणीच नाही जो हा पण पूर्ण करू शकेल? कोणीच नाही?"
सभागृहात शांतता पसरली होती. विलक्षण प्रयत्न करूनही अपयश पदरी पडलेले सारे मान झुकवून बसले होते. मात्र दुर्योधन ताडकन उठला.
"पांचालनरेश, आता तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एकतर तुमच्या कन्येला आमच्यापैकी कोणा एकाला निवडायला सांगा, अन्यथा आज इथे मृत्यूशीच विवाह लावून देऊ तिचा!"
दुर्योधन गरजला.
"पाहिलंत दाऊ? तुमचा शिष्य किती विनम्र आहे ते?" कृष्णाच्या टिप्पणीवर बलराम खजिल झाला.
'पराभूत, कर्तुत्वशुन्य राक्षसी वृत्ती. अश्यांना का निमंत्रण धाडले असेल पिताश्रींनी?' धृष्टद्युम्न विचारात पडला आणि पुढच्याच क्षणी त्याने मनाशी ठरवले. 'द्रौपदी, तुझी वरमाला अयोग्य व्यक्तीच्या कंठाभोवती पडू देणार नाही मी.'
धृष्टद्युम्नने द्रौपदीकडे पाहिले. ती कृष्णाकडे बघत होती. धृष्टद्युम्ननेही कृष्णाकडे नजर टाकली.
त्याचा निर्विकार चेहरा आपल्याकडे आश्वासक नजरेने बघतो आहे.... 'तुमचा आशादिप जिथे हरवला, तिथेच शोध.' असं सांगतोय.
..... आणि धृष्टद्युम्नने पुन्हा पाचारण केले.
"या संपूर्ण सभागृहात कोणीच धनुर्विद्येत निष्णात नाही असे समजायचे का आम्ही? की द्रोणाचार्य शिष्य अर्जुनासोबतच महान धनुर्विद्याही जळून खाक झाली लाक्षागृहात? धनुर्विद्येचा हा अपमान बघत उभे असणारे तुम्ही सर्वजण विसरला आहात की अचूक लक्षभेद केल्याशिवाय जर हा स्वयंवर संपला, तर पांचालनगरीचीच प्रतिष्ठा काय पण यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची प्रतिष्ठा देखील अबाधित राहणार नाही; आणि धनुर्विद्येची ही नाही. मी पुन्हा आवाहन करतो आहे. हा स्वयंवर आता सर्वांकरता खुला करतो आहे..... सर्वांकरता!"
क्षणभर स्पर्धक राजांमध्ये कुजबुज झाली. पण युद्ध-शस्त्रास्त्रांचा सराव असणारे, धमन्यांमध्ये शूर विरांचे रक्त असणारे क्षत्रिय जिथे पण पूर्ण करू शकले नाहीत तिथे बाकीचे नगरवासी काय बाण मारणार? असा विचार करत दुर्योधन फक्त सगळ्यांनी हार मानण्याची वाट पाहत होता.
धनुर्विद्येचा मान पणाला लागला होता. त्या आवाहनाला उत्तरादाखल मौन पाळणे आता अर्जुनाकरता अशक्य झाले होते. त्याने युधिष्ठिराला प्रणाम करून सरळ पांचाल नरेशच्या दिशेने पावले टाकली. समोर जाऊन त्याने पांचाल नरेशला नमस्कार केला आणि त्याची श्वेत वस्त्रे पाहत पांचाल नरेशने होकारार्थी मान डोलावत पण पुर्ण करण्याची परवानगी दिली सुद्धा!
अर्जुनाने मध्यभागी येण्याकरता पाऊल उचलले आणि दुर्योधन आश्चर्याने त्याच्याकडे बघतचं राहिला.
"अरे ब्राह्मण? इथे जे आम्ही क्षत्रिय करू शकलो नाही ते एक वेद पाठ करणारा ब्राह्मण कसं करणार?" आणि बोलता बोलता अश्वथामाकडे पाहून दुर्योधनाला द्रोणाचार्यांची आठवण झाली. तसा तो खजिल होऊन गप्प बसला.
भीमने पुन्हा राग आवरला. अर्जुन मध्यभागी पोचला तेव्हा सारे सभागृह त्याच्याकडे एकटक लावून बघत होते.
"त्याची चाल बघा, मद्रनरेश."
"अहो, त्याचे दंड बघा."
"अंगापिंडाने तर राजघराण्यातला वाटतो हा."
कुजबुज अर्जुनच्या कानावर पडत होती. पण आज ओळख लपवण्यापेक्षा धनुर्विद्येचा मान जपणे जास्त महत्वाचे होते.
अर्जुनाने धनुष्याला नमस्कार केला आणि एका विशिष्ट वळणदार आकारावर पकडून ते धनुष्य सहजपणे एका हातावर पेलले आणि संपूर्ण सभागृह डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहतच राहिले.
अचंबित झालेले सभागृह पुन्हा श्वास रोखून समोरचे दृष्य डोळ्यांत टिपून घेऊ लागले.
__________________
©मधुरा
जबरदस्त.... एकच नंबर.. आणि
जबरदस्त.... एकच नंबर.. आणि मोठा भाग... येऊद्या लवकर.... पू ले शु
धन्यवाद धांग्या!
धन्यवाद धांग्या!
आज किंवा उद्याच पुढचा भाग टाकेन.
मस्तच भाग !
मस्तच भाग !
लक्ष्यभेद तरी पुर्ण करायचा कि
धन्यवाद आसा.
धन्यवाद आसा.
लक्षभेद लवकरच पुर्ण होईल.
मधुरा.. खुप छान लिहिता तुम्ही
मधुरा.. खुप छान लिहिता तुम्ही.
मन पुर्ण गुन्तुन गेल वाचताना.
एक शन्का आहे. आम्ही अस वाचलय की कर्ण ज्यावेळी पण पुर्ण करण्या करीता उठला तेव्ह्या "'मी सुतपुत्राला वरणार नाही" असे द्रौपदी म्हणाली व त्याला अपमानित करुन खाली बसवल. त्याला धनुष्या पर्यन्तही जाउ दिल नव्हत.
धन्यवाद सुर्यकांत!
धन्यवाद सुर्यकांत!
महाभारतात द्रौपदी स्वयंवर हा 'जय-विजय' या व्यासांच्या मुळ अतिदीर्घ काव्याचे भाषांतर करणाऱ्या लेखकांनी वेगवेगळा रेखाटला आहे. त्यातल्या एका भाषांतरात केवळ चार प्रतिंमध्ये 'कर्णाला द्रौपदीने पण पुर्ण करू न देताच तो सूतपुत्र असण्याचे कारण दिले.' असा उल्लेख आहे.
नंतर महाभारतावर बनलेल्या अनेक मालिकांमध्ये याच कथानकाचे चित्रीकरणही आहे.
मला त्यावर अनेक प्रश्न पडले.
यज्ञसेनी ही यज्ञातून जन्मलेली. तिला हे कसं कळलं की कर्ण रथचालकाचा पुत्र आहे?
ओळख तर त्यांची झालेलीच नव्हती आधी! आणि भर सभागृहात असं काही सांगण्याची हिंमत कोण करणार होतं?
म्हणजे तिला हे माहिती असणे जवळजवळ अशक्य होते.
आता तिला ते माहिती होते, असं आपण गृहीत धरू.
पण मग जर गरीब ब्राह्मणालाही (जो खरतर अर्जुन होता.) वरमाला घालायला तिने मागेपुढे पाहिले नाही, तर रथचालकपुत्र म्हणून ती कर्णाला का नाकारेल?
ही तीच द्रौपदी, जिचे पिताश्री द्रोणाचार्यांवर राग बाळगून आहेत. (क्षत्रिय नाही असे कोणीच द्रुपदला नातेवाईक काय - पण अगदी फक्त मित्र म्हणूनही चालत नाहीत. ) मग या परिस्थितीत तिने श्वेत वस्त्रातल्या धनुर्धारी (अर्जुन) ऐवजी रथचालक पुत्र कर्णाला निवडणे जास्त बरे नव्हते का ?
आपण असं मानू की तिला यातले (द्रोण-द्रुपद वैर) काहीही माहिती नव्हते.
मग तिने महाल न निवडता वनातले काट्याकुट्यांचे जगणे का निवडले?
याला समाधानकारक उत्तरेच नाहीत.
दुसरी आख्यायिका जिचा आधार मी लिहिताना घेतला, ती मला तंतोतंत पटली.
समाधानकारक उत्तरेच नाहीत.>>>
समाधानकारक उत्तरेच नाहीत.>>>>१
<<जरासंधाला मारायला भीमच हवा
<<जरासंधाला मारायला भीमच हवा हा विचार तो मागे टाकणार तितक्यात दुर्योधनाकडे कृष्णाचे लक्ष गेले. >>> वाह वाह काय लिहलं आहे हे वाक्य.. संपूर्ण महाभारत सामावलं आहे यातच.
<<यज्ञसेनी ही यज्ञातून
<<यज्ञसेनी ही यज्ञातून जन्मलेली. तिला हे कसं कळलं की कर्ण रथचालकाचा पुत्र आहे?>> तुम्ही शिवाजी सावंत यांचे युगंधर व मृत्युंजय वाचला आहे काय? त्यांनी पण खुप तार्किक लिहलं आहे..
यज्ञसेनी ही यज्ञातून जन्मलेली
यज्ञसेनी ही यज्ञातून जन्मलेली. तिला हे कसं कळलं की कर्ण रथचालकाचा पुत्र आहे?
ओळख तर त्यांची झालेलीच नव्हती आधी! >>>>
का नसेल कळलं तिला ?
कधीतरी अधिरथ बदली ड्रायवर म्हणून द्रुपदाकडे गेला असेल त्यावेळी झालं असेल माहिती. लहानग्या कर्णाला सोबत नेलं असेल तर ओळखही झालेली असेल.
धन्यवाद शितलकृष्णा!
धन्यवाद शितलकृष्णा!
तुम्ही शिवाजी सावंत यांचे युगंधर व मृत्युंजय वाचला आहे काय? त्यांनी पण खुप तार्किक लिहलं आहे.>>>>>>>>>> प्रत्येक लेखकाचे तर्क-वितर्क वेगवेगळे असतात. त्यांना पटलेले त्यांनी लिहिले, मला पटलेले मी.
@हाडळीचा आशिक, कुठल्या प्रकारचा विनोद आहे हा? हसणं अपेक्षित आहे का? की द्रौपदी यज्ञाच्या अग्नितून प्रगटली तेव्हा ती तरुणावस्थेत होती, हे तुम्हाला माहितीच नाही?
लहानगा कर्ण आणि द्रौपदीशी ओळख? अधिरथ बदलीचा ड्रायव्हर? काहीही!
मस्त छान...ह्या भागातली शैली
मस्त छान...ह्या भागातली शैली विशेष आवडली..सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहीले..
मला एक प्रश्न पडलाय.. मी वाचलय असं की, द्रौपदी ही दुर्योधनाची चुलत चुलत बहीण होती तर ती पांडवाचीदेखिल असायला हवी ना...
कारण पांचाल आणि कौरव खुप खुप पूर्वी सख्खे भाऊ होते..त्या नात्याने गांधारीने दुर्योधनाला बजावलेदेखिल होते म्हणूनच दुर्योधन केवळ पण जिंकून तिचा विवाह दुसर्या कुणाशी तरी लाऊन देणार होता...बहुतेक कर्णाशीच...त्याला स्वतःला द्रौपदीत रस नव्हता...सुभद्रेच वचन दिल होतं बलरामाने आणि दुर्योधनालादेखिल ती आवडत होती ..पुढे अर्जुनाबरोबर विवाह झाल्यानंतर..दुर्योधनाने केवळ रित म्हणून भानुमतीशी विवाह केला आणि एकपत्नीच होता.
छान झालाय हाही भाग
छान झालाय हाही भाग
धन्यवाद अजय, किल्ली.
धन्यवाद अजय, किल्ली.
@अजय,
पांचाल आणि कौरव यांचात एकच दुवा आहे. द्रोणाचार्य! बाकी काही नाही. कौरव आणि द्रुपद हे पुर्णत: वेगवेगळ्या वंशाचे आणि घराण्यातले! त्यांच्यात रक्ताचे कुठलेही नाते नव्हते.
ना ते चुलत भाऊ होते, ना सख्खे! कारण मुख्य म्हणजे, धृतराष्ट्र आणि पंडु, दोघे वेदव्यासांनी दिलेला मंत्रप्रसाद! मग त्यांची वंशावळ (bloodline) पूर्णत: वेगळी बनते. त्यातही पांडव म्हणजे वेगवेगळ्या देवांचे अंश! मग त्यांच्यात तसे कोणते नाते बनतंच नाही.
स्वयंवर कर्ण जिंकला असता, तर द्रौपदीला तो दुर्योधनाच्या हवाली करणार होता. कारण कर्णाचे अनेक विवाह आधीच झाले होते, ज्यात एकही राजकन्या नव्हती. एक तर दासी होती आणि एक सामान्य नगरवासी. ना राजकन्या असलेल्या अजून एका पत्नीची गरज त्याला होती, ना काही महत्त्व.
खरतर अर्जुनला हरवून सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असल्याचा मान त्याला मिळवायचा होता. ते एकच ध्येय होते त्याचे. ना त्याला राजकुमारींशी विवाह करण्यात रस होता, ना राज्य करण्यात आणि ना धन- दौलतीत! त्याला फक्त द्रोणाचार्यांना दाखवायचे होते की त्यांनी विद्या नाकारली तरीही त्याने उत्तम धनुर्विद्या अवगत केली आहे.
(अवांतर: तू म्हणतोस ना, की सहदेव आणि नकुल दुर्लक्षित पात्र आहेत, पण त्याहून जास्त द्रोणाचार्य हे जास्त दुर्लक्षित पात्र आहे, जे खूप उत्तम आहे आणि गैरसमजांच्या फेऱ्यांमुळे किंवा वेगळ्याच प्रकारे दाखवल्या गेलेल्या एकलव्याच्या कथेत अडकून पडल्याने नाहक बदनाम झाले आहे.)
असो, तर पत्नीची गरज दुर्योधनाला होती. राणी मिळाली की राज्याभिषेकाला महत्त्व प्रदान होत असे म्हणून स्वयंवर जिंकण्यावर त्याचा भर होता.
.......आणि मुळात दुर्योधनाची धनुर्विद्या सोसोच होती, हे त्याला स्वतःलाही माहिती होते.
जिथे पण होते, तिथे तो जिंकू शकला नव्हता आणि ज्या स्वयंवरात पण नव्हते, तिथे दुर्योधनाला कोणी निवडले नव्हते. तो एकपत्नी होता कारण त्याला दुसरी पत्नी मिळणारच नव्हती सहजासहजी. भानुमती देखील पळवून आणलेली आहे बरं का त्याने स्वयंवरातून........ (तेही कर्णाच्या सामर्थ्यावर!) महत्त्वाचे हे, की दुर्योधनाच्या एकमेव पत्नीनेही त्याला स्वयंवरात निवडले नव्हतेच.
भीम आणि अर्जुन होते म्हणून, नाहीतर द्रौपदीलाही पळवूनच नेले असते दुर्योधनाने.
वा छान .... !
वा छान .... !
किती मस्त फोटो आहेत! Exhibition ला ठेवण्याच्या लायकीचे
फोटोग्राफर ला सलाम ...!
वाचतोय..छान लिहिता तुम्ही.
वाचतोय..छान लिहिता तुम्ही.
रत्न, कुठे आहेत फोटो?
रत्न, कुठे आहेत फोटो?
<भानुमती देखील पळवून आणलेली
<भानुमती देखील पळवून आणलेली आहे बरं का त्याने स्वयंवरातून........ (तेही कर्णाच्या सामर्थ्यावर!) महत्त्वाचे हे, की दुर्योधनाच्या एकमेव पत्नीनेही त्याला स्वयंवरात निवडले नव्हतेच. >
कौरव आणि पांडव दोघांच्याही आज्या (आज्याच बहुतेक) या स्वयंवरातून पळवून आणलेल्या होत्या. त्याही त्यांच्या आजोबांनी नव्हे. दुसर्या कोणी.
धन्यवाद बोलकत.
धन्यवाद बोलकत.
कौरव आणि पांडव दोघांच्याही
कौरव आणि पांडव दोघांच्याही आज्या (आज्याच बहुतेक) या स्वयंवरातून पळवून आणलेल्या होत्या. त्याही त्यांच्या आजोबांनी नव्हे. दुसर्या कोणी.>>>>>>>>>>>>>आणि त्याचा अत्यंत दाहक दंड ही मिळाला भीष्माचाऱ्यांना.
खूप छान मधुराताई. आपण खूपच
खूप छान मधुराताई. आपण खूपच छान तऱ्हेनं समजावून सांगता आहात. मला हे माहितीच नव्हते की याज्ञसेनी किशोरावस्थेत यज्ञातून जन्मली आहे ते.
माझी एक शंका
>>>यज्ञसेनी ही यज्ञातून जन्मलेली. तिला हे कसं कळलं की कर्ण रथचालकाचा पुत्र आहे?
ओळख तर त्यांची झालेलीच नव्हती आधी!>>>
याज्ञसेनीला जर कर्ण हा सूतपुत्र आहे हे माहिती असण्याची शक्यता नव्हती तर गवळ्याघरचं पोर असलेला कृष्ण देव आहे हे कसं माहिती होतं ?
त्यांची भेट आधी कधी, कुठे व कशी झालेली ?
>>>...॥आणि भर सभागृहात असं काही सांगण्याची हिंमत कोण करणार होतं?>>>>
धृष्टद्युम्न!
पाहुणे बघायला आल्यावर आधी एकमेकांची ओळख करून घेतात-देतात. याज्ञसेनीचा भाऊ या नात्यानं धृष्टद्युम्नानं स्वयंवर सुरू होण्याआधी प्रतिष्ठित अशा हस्तिनापुरहून आलेल्या सर्व महाविरांची त्यांच्या कुळाच्या उल्लेखासह ओळख द्रौपदीला करून दिली असेल असं नाही का वाटत ?
आणखी एक शंका
आणखी एक शंका
>>>स्वयंवर कर्ण जिंकला असता, तर द्रौपदीला तो दुर्योधनाच्या हवाली करणार होता. कारण कर्णाचे अनेक विवाह आधीच झाले होते, ज्यात एकही राजकन्या नव्हती. एक तर दासी होती आणि एक सामान्य नगरवासी. ना राजकन्या असलेल्या अजून एका पत्नीची गरज त्याला होती, ना काही महत्त्व>>>>>
ज्यात एकही राजकन्या नव्हती!!
हे कर्णानं स्वयंवरात सहभागी होण्यासाठीचं एक मोटिव आहे! कर्णाला द्रौपदी स्वत:साठीच पत्नी म्हणून हवी असणार बघा.
गवळ्याघरचं पोर असलेला कृष्ण
गवळ्याघरचं पोर असलेला कृष्ण देव आहे हे कसं माहिती होतं ?
त्यांची भेट आधी कधी, कुठे व कशी झालेली ? >>>>>>> तिला हे स्वयं कृष्णाकडून कळालं होत.
कृष्ण आणि बलराम जरासंधा विरूध्द एक प्रबळ सेना बनवायच्या प्रयत्नात होते. त्यातच कृष्णाने अनेक राज्यांच्या राजघराण्यांशी सख्य जोडले. द्रुपदही त्यातलाच एक राजा. द्रौपदी-धृष्टद्युम्न यज्ञातून अवतरले, ही वार्ता ऐकून कृष्ण भेट द्यायला आला द्रुपदाकडे आणि द्रौपदीशी त्याची ओळख झाली. दोघेही सावळे-कृष्णवर्णी. जमली गट्टी. आणि देवत्व ही प्रचिती, जाणीव असते. ती जाणवते. सांगावी लागत नाही.
धृष्टद्युम्न!>>>>>>> कसं काय? मुळात तो ही द्रौपदी सोबतच यज्ञातून प्रगत झाला होता.
..... आणि त्यावेळी कर्णाला जास्त कोणी ओळखतही नव्हत. म्हणूनच तर त्याला आमंत्रण नव्हत स्वयंवराच.
कर्णाला सगळे कसे आणि का ओळखायला लागले, ते पुढे कथेत येईलच.
हे कर्णानं स्वयंवरात सहभागी
हे कर्णानं स्वयंवरात सहभागी होण्यासाठीचं एक मोटिव आहे! कर्णाला द्रौपदी स्वत:साठीच पत्नी म्हणून हवी असणार बघा. >>>>>>> धन्य आहात!

मधुरा तु तर फूल्ल कर्णविरोधक
मधुरा तु तर फूल्ल कर्णविरोधक आहेस..तुला कृष्ण किंवा अर्जुन जास्त आवडत असतील.
मधुरा तु तर फूल्ल कर्णविरोधक
मधुरा तु तर फूल्ल कर्णविरोधक आहेस..तुला कृष्ण किंवा अर्जुन जास्त आवडत असतील.>>>>>>>> मला भीम आवडतो.
छोटा भीम का?
छोटा भीम का?
भरत,
भरत,
Sorry चुकीच्या धाग्यावर comment post zali
तसा हा धागा पण छान आहे मधुरा
तुमचे पात्रान्बद्दलचे पूर्वग्रह छान आहेत
तर्क पण महाभारताच्या ऐकलेल्या कथांपेक्शा वेगळे आणि पटणारे आहेत
तुम्ही या लेखमालेचे पुस्तक का छापत नाही...? या महाभारतात मला एक नवी चमक दिसते
माझे सासरेबुवा TV वर च्या जून्या महाभारताचे fan आहेत
त्यांन्आ तुमची लेखमाला refer करणार आहे खुप आवडेल त्याना
म्हणजे एकंदर कर्णाला द्रौपदी
म्हणजे एकंदर कर्णाला द्रौपदी 'सूतपुत्र' म्हणालेली नाही आणि त्यानं स्वयंवरात भाग घेऊन त्याचा नेम जराश्या-केसाच्या फरकाने
(केस चाळीस ते साठ मायक्रॉन जाड असतो.) चुकला हेच खरंय तर!
एवढुशा फरकावरून तेथे भांडणं जुंपायला हवे होतेत यार!
छे! बिचाऱ्या कर्णावर व्यासांनीही अन्याय केला आणि आताचे महाभारतकारही अन्याय करताहेत.

>>>धृष्टद्युम्न!>>>>>>> कसं
>>>धृष्टद्युम्न!>>>>>>> कसं काय? मुळात तो ही द्रौपदी सोबतच यज्ञातून प्रगत झाला होता.>>>
पण नंतर तो द्रोणांकडे युद्धनीती शिकायला गेलेला न् हस्तिनापुरला ? तेव्हा त्याला कर्ण माहिती झाला असेल
Pages