आमचं परसदार

Submitted by मनीमोहोर on 11 November, 2019 - 12:53

आमचं कोकणातलं घर परसभागाशिवाय अपूर्ण आहे. म्हणून चला ... आज मी तुम्हाला आमचं परसदार फिरवून आणते. परसदार म्हणजे नावातच अर्थ दडलेला आहे... घराचा मागचा भाग.

माजघराच्या चार पाच पायऱ्या उतरून खालच्या पडवीत आलं की परसदार सुरू होतं. ही आमची पडवी व्हरांड्या सारखी आहे... पुढे गज नसलेली... त्यामुळे पडवीतून समोरचं नारळी पोफळी च आगर खूप सुंदर दिसत. आंब्याची ओझी, फणस, रातांबे, घरच्या भाज्या, इतर फळ हे सगळं ह्याच पडवीत आणून टाकलं जातं. त्यामुळे इथे नेहमीच संमिश्र वास दरवळत असतात. दिवाळीत पाट रांगोळी करून सगळयांना तेल - उटणं लावण्याचा मान ही ह्याच पडवीचा. पूर्वीच्या काळी स्त्रिया पुढच्या खळ्यात क्वचितच जात असत. त्यामुळे घरातील बायकांची ही पडवी विशेष आवडती आहे. इथे भिंतीला लागून एक लाकडी बाक ही ठेवलं आहे बसण्यासाठी. कधी विरंगुळा म्हणून, कधी थोडी बाहेरची हवा खायला, मोकळ्यावर निवडणं टिपणं करायला, घरी आलेल्या माहेरवाशिणीचे किंवा जिवाभावाच्या पाव्हण्याचे कुशल क्षेम विचारण्यासाठी वैगेरे बायकांची हक्काची जागा म्हणजे ही मागची पडवी.. माझ्या तिथे रहाणाऱ्या सासूबाई ह्या पडवीच्या पायऱ्यांवर बसून मला अनेक गोष्टी सांगत असत. मिळकत अपुरी आणि प्रपंचाची जबाबदारी मोठी ह्यामुळे ते दिवस सगळ्याच आघाड्यांवर कसोटी पाहणारे होते. म्हणून त्या दिवसांच्या आठवणी सांगताना ही त्यांचा व्यथित झालेला चेहरा त्या पायरीवर बसलं की आज ही माझ्या डोळ्यासमोर येतो.

ह्या पडवीच्या डाव्या बाजूला आणखी पाच सहा पायऱ्या उतरल्या की बाथरूम , कपडे धुवायची जागा हे सगळं दिसत आपल्याला. पूर्वी आमच्याकडे खाली आगरात एक पत्र्याची बाथरूम होती आणि त्याच्या बाजूलाच पाणी तापवायची चूल होती. तेव्हा बाथरूम घरातील फक्त तरुण मुली, सुनाच वापरीत असत. कारण मोठ्या स्त्रिया पालटणं घेऊन पहाटेच बाहेरच स्नान करीत असत आणि पुरुष तर विहिरीवरच डोक्यावर कळश्या ओतून घेत असत. मुलांना विहिरीजवळच्या पाथरी वरच अंघोळ घातली जाई. आता काळ बदलला आहे. बाथरूम घराजवळ बांधल्या आहेत. चूल जाउन तिथे आता धूर न होणारा बंब बसवला आहे आणि त्याच गरम पाणी बाथरूम मध्ये ही फिरवलं आहे. कपडे धुण्यासाठी , भांडी घासण्यासाठी स्वतंत्र पाथऱ्या आहेत आणि विहिरीवर बसवलेल्या पंपामुळे नळाचे पाणी ही खेळवल गेलं आहे सगळीकडे. कोकणातल्या प्रथेप्रमाणे शौचालय घरापासून खूप लांब असल्याने न्हाणीघरा जवळ लघुशंकेसाठी स्त्रिया आणि पुरुषांसाठी स्वतंत्र सोय आहे. घरातलं तीन चार वर्षाच शेम्बड पोर जेव्हा आईचा हात धरून “मी पुलुष आहे मी इकडे जाणार” म्हणत आई बरोबर हट्टाने तिकडे जातं तेव्हा हसू आल्या खेरीज रहात नाही. ☺

पहाटे उठलं की पहिलं काम म्हणजे पाणी तापवणे. पहाटेच्या काळोखात ती धगधगलेली लाकडं अगदी काळजाचा ठाव घेतात. हा बंब म्हणजे चूल आणि बंब याच कॉम्बो आहे. त्यामुळे लाकडं धगवण्यासाठी फुकणी लागेतच. आणि प्रमाण कमी असले तरी धूर ही होतोच . मे महिन्यात पाव्हणे मंडळी जमली की अंघोळीआठी नंबर लागतात आणि तिथे ही मग गप्पांचे फड रंगतात. कार्य प्रसंगी तर काही अति उत्साही मेंबर नंतर नंबर लावायला नको म्हणून पहाटे तीन चार लाच उठून अंघोळ उरकून घेतात आणि मग हवं तर परत एखादी डुलकी घेतात. मे महिन्यात छोटी मुलं एकत्र जमली की एकमेकांच्या अंगावर गार पाणी उडवत , दंगा मस्ती करत ,बाहेर पाथरी वर यथेच्छ अंघोळ करतात. ह्या आठवणी त्यांच्या साठी संस्मरणीय आणि पुढे जन्मभरासाठी अंगावर मोरपीस फिरवणाऱ्या असतात. अशा तऱ्हेने अंघोळी, कपडे धुणे, भांडी घासणे ह्यात सकाळपासून गजबजलेली ही एरिया दुपारी जरा विश्रांती घेते. परंतु संध्याकाळी पुन्हा पाणी तापविले जाते आणि या भागातली वर्दळ वाढते. दिवसभर अंगमेहनतीने शिणलेले गडी संध्याकाळी गरम पाण्याने अंघोळ करून चहा घेतात आणि मगच घरी जातात.

आमच्याकडील पूर्वीची स्वच्छता गृह हा खरं तर स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. आता जरी आधुनिक अश्या स्वच्छतागृहांची घरातच सोय केलेली असली तरी तेव्हा ती पार आगाराच्या दुसऱ्या टोकाला व्हाळाच्या कडेवर बांधली गेली होती. इथे ही पुरुष आणि स्त्रिया यांच्या साठी स्वतंत्र व्यवस्था होती आणि अगदी चित्र वैगेरे काढून ते स्पष्ट ही केलं गेलं होतं. पावसात भिजुन जाऊ नये म्हणून पुढे छोटासा व्हरांडा होता. तिथे छत्री, कंदिल ठेवण्यासाठी खुंट्या होत्या . आत ही खुंटी होती कंदीलासाठी. आत नळाच पाणी होतं.. आणि दाराच्या मागच्या बाजूला स्वच्छता राखण्यासाठी काय करा ह्याच्या अगदी लफ्फेदार मराठीत सूचना लिहिल्या होत्या. फलकाच्या कोपऱ्यात पाना फुलांची वेलबुट्टी ही काढली होती. त्याकाळी फोटो काढणं दुर्मिळ होतं म्हणून त्या सूचनांचा फोटो माझ्याकडे नसला तरी त्या माझ्या हृदयात जणू कोरल्या गेल्या आहेत. आज इतक्या वर्षा नंतर ही सगळे जण जमलो की त्यांची आठवण निघाल्या शिवाय रहात नाही. हे सगळं वाचायला मजेशीर वाटत असलं तरी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असताना पोफळीच्या आगर तुडवत रात्री अपरात्री जावं लागलं तर अक्षरशः ब्रम्हांड आठवे. आधी एक धीट ,धाडसी, न घाबरणारी सोबत शोधायची. मग त्या सोबतीला बाहेर उभं रहायला सोबत म्हणून दुसरी एक सोबत हुडकायची. एवढं झालं की मग छत्री, बॅटरी, कंदिल, काठ्या अशी आयुधं घेऊन मोहिमेवर निघायचं.

परसदारचा मोठा भाग नारळी पोफळी च्या आगराने व्यापला आहे त्यामुळे तिथे नेहमीच थंड वाटत. आगरात आमच्या दोन विहिरी आहेत. एक खालची आगरातली, जी व्हाळाच्या समांतर लेव्हल ला आहे आणि दुसरी घराजवळची जी त्याहून थोडी अधिक वर आहे. दोन्ही विहिरी खाली बघितलं तर डोळे फिरतील एवढया खोल आणि चिऱ्यानी बांधलेल्या आहेत. खालच्या विहिरीचे पाणी वर वापरासाठी आणि वरच्या विहिरीचे पाणी जनरली पिण्यासाठी उपयोगात आणले जाते. पाणी अतिशय गोड आणि मधुर आहे. तहान भागणे , पाणी पिऊन तृप्त होणे ह्या वाकप्रचारांची प्रचिती हे पाणी प्यायलं की होते. कुळथाच्या पिठल्याला मुंबईत ती चव येत नाही म्हणून काही जण दोन चार बाटल्या पाणी खास पिठल्या साठी म्हणून मुंबईला घेऊन येतात. (स्मित). उन्हाळ्यात पाणी खाली गेलं की दोन चार वर्षतून एखाददा विहिरींची गाळ काढून सफाई केली जाते. पाणी शुद्ध राखण्यासाठी कासव सोडलं आहे विहिरीत जे मुंबईच्या मुलांचं खास आकर्षण ठरतं.

एकदा एका मनीच पिल्लू खेळता खेळता विहिरीत पडलं. मग रात्री लक्षात आल्यावर त्याचा शोध घेतला . बॅटरीच्या उजेडात बांबूची छोटी टोपली दोरी बांधून विहिरीत सोडली आणि महत् प्रयासाने त्याला त्या टोपलीत घेऊन वर काढण्यात आणि त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवलं. ही गोष्ट तिथल्या आणि मुंबईच्याच नाही तर परदेशात रहाणाऱ्या बच्चे कंपनी ची ही अतिशय आवडती आहे. कधी कधी व्हिडीओ कॉल वर ही माझ्याकडे ह्या गोष्टीची फर्माईश केली जाते. आणि विहीर फक्त कल्पनेतच पाहिली असल्याने गोष्ट संपली की प्रत्येक वेळी “ मी तिकडे आले की शोत्ता विहिलीतून पिल्लू काढीन. ” हे धाडसी विधान ही ऐकायला मिळतं.

जेव्हा आमच्याकडे वीज नव्हती तेव्हा पाणी लाटणे हे एक मोठेच काम असे. खालच्या आगरातल्या विहिरी वर रहाटगाडग बसवलं होतं आणि एक गडी जवळ जवळ दिवसभर पाणी लाटायचेच काम करत असे. सहाजिकच कपडे, भांडी अंघोळी वैगेरे सारखी सगळी पाण्यातली कामं तिथेच केली जात असत. दुपारी परत आगराला शिपण करण्यासाठी पाणी लागत असेच. वरच्या विहिरीवर हात रहाट होता म्हणजे emergency साठी अजून ही आहे. त्याने सोवळ्यातलं पाणी घरातील स्त्रियाच भरत असत. एवढं पाणी कळशीने विहिरी पासून सैपाक घरा पर्यंत आणणे हे सुद्धा खूप भारी पडत असे. अर्थात त्याला त्या काळी पर्याय नव्हता. उलट दुसऱ्यांकडे पाण्या साठी जावं लागत नाही हेच खूप मोठं वाटत असे तेव्हा.

म्हणून गावात वीज आल्यावर माझ्या तिथल्या सासऱ्यांनी प्रथम काय केलं तर विहिरीवर पंप बसवला. घरापासून उंचावर एक मोठी टाकी बांधली. आणि नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन ते पाणी गोठा, खळं, आगर सैपाकघर, बाथरूम अस सगळीकडे फिरवलं. त्यामुळे पाणी वाहून आणण्याचा त्रास संपला. घरातल्या स्त्रियांचे मोठेच कष्ट कमी झाले. एवढंच नाही तर आजूबाजूच्या वस्तीत जर कधी पाण्याचा आटाट झाला तर त्यांच्या साठी आगरात एक नळ घेऊन ठेवला आहे. तसेच आमच्या विहीरी ही त्यांच्या साठी सदैव खुली असतात. असो.

विहिरीला उतराई होण्यासाठी पावसाळ्यात ती भरून वाहू लागली की तिची विधीवत पूजा केली जाते. मंगल कार्य प्रसंगी शहरात जल कलशाचे पूजन केले जाते पण आमच्याकडे ह्या विहिरींचे पूजन करतात. कृतज्ञता व्यक्त करण्याची किती ही अनोखी पद्धत.

असं आमचं परसदार...आम्हाला पुढच्या खळ्या इतकच प्रिय आहे ह्यात शंका नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे बघा आमचं परसदार. तिथे दोणीत पाणी येतं आपोआप आणि सगळीकडे जाईल झाडांना ही सोय केली. खूप जुना फोटो, साधा कॅमेरा. तेव्हा मोबाईल नुकतेच आलेले पण आमच्यासाठी ते लांबून बघण्याची गोष्ट होती. खरंतर आम्ही याला खालचं आगर म्हणतो. खूप पायऱ्या उतरून खाली जायचं आणि ही दोण जुन्या विहिरीजवळची. खाली पुढे नारळ, पोफळी, फुलझाडे आहेत . डाव्या बाजूला वर खोपी, त्याला लागून एक बाथरूम प्लस पुढे बाथरूम आणि toilet आहे.

पूर्वी विहिरीवर पायरहाट होता आणि सासरच्या दोन्ही विहिरी चौकोनी आहेत.

खोपी आणि चुलीचा फोटो नाही, आता गावाला गेल्यावर काढू.

sarthak playing in water.jpg

अंजू मी म्हटलं आणि फोटो दाखवलास , खूप छान वाटलं.

फोटो क्लिअर नसला तरी मस्तच वाटतोय। छोट्या मुलामुळे चित्र सजीव झालंय. तो सार्थक आहे का ग ? दोणीतल पाणी आणि बाजूची झाड छान वाटत आहेत .

A M I T , शशांक जी आणि लसावि प्रतिसादासाठी धन्यवाद.

हो हेमाताई, सार्थक आहे. त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं, अजूनही. तो त्या दोणीत उभा राहायचा, बसायचा. जवळ मोठं हवं कोणीतरी लक्ष ठेवायला. दोणीत उतरला की पाणी कमी ठेवायचो दोणीत.

गोड दिसतोय सार्थक अंजू.

दवणीय कढ निघायला अगदी पोषक विषय असूनही तसे लिहिलेले नाही याचे विशेष कौतुक आणि आभार.>> लसावि ☺

>> कोकणातले व्हिडीओज केले पाहिजेत, फणस भाजी चिरून तो करेपर्यंतचा. रातांबे फोडून त्याची आमसुले म्हणजे कोकम आणि इतर प्रकार करतो त्याचा, आंबे झाडावरून काढून त्याचे विविध प्रकार कसे केले जातात त्याचा, पण वेळ आणि चांगला कॅमेरा हवा. >>
>> आरारूटाच्या कंदापासून आरारूट तयार करणे, नागकेशराच्या फुलातून केशर गोळा करणे ह्याचे युनिक व्हिडीओ बनू शकतात. >>

बाये माझ्ये! तुमका बराच घोपण आसा ह्या सगळा करूक! आता आमका रतांब उतरौक पण माणसा मेळणत नाय. आम्ही ल्हान असताना करू भावाशींवरोबर. माझी पणजी माका चेडूहोईस्तो जाय केसरासाठी फुला वेचुक. आता आमका दोन कामा धड येणत नाय.

Lol

आमचं एकुलते एक रातांबा झाड आम्ही अधेलीने दिलंय, त्यामुळे अर्धे रातांबे घरी येतात आपोआप Wink .

बाकी माणसे मिळत नाहीत हे बरोबर पण काहीजण वर्षानुवर्षे आम्हाला मदत करतात सासरी.

दोणीचा फोटो मस्तच अंजू.

माझ्या काकीच्या माहेरी वर्‍हाडात मोठा वाडा होता त्यांचा. तिथे चौकोनी हौद होता. आम्हाला असंच खेळायला सोडायचे पाण्यात. काकीची आई बसायची बाजूला लक्ष ठेऊन. किती आठवणी जाग्या झाल्या ह्या लेखाने?

काकी छान अळूवडीची रस्सा भाजी करायची, तिच्या आईसारखी. मी किती प्रयत्न केला तरी मला काही जमत नाही. माझे बाबा आत्ताही जशी पिठी करतात तशी पण मला जमत नाही. आईच्या सारखी केळफुलाची भाजी जमत नाही की हिरव्या मटारची वाफेवरची उसळ जमत नाही. मी मनापासून प्रयत्न करते पण अनुभव कमी पडतो किंवा माया.

माझ्या काकीच्या माहेरी वर्‍हाडात मोठा वाडा होता त्यांचा. तिथे चौकोनी हौद होता >>> हे माहेरी कोकणात घरात आहे, घर मोठं नाहीये पण बाथरूम मोठी आहे आणि त्यात हौद आहे, त्यात आम्ही उतरून खेळायचो लहानपणी.

एक जिव्हाळ्याचा विषय , खूप लोभसपणे मांडलेला ! फारच छान.

( 10 वर्षांपुर्वीची माझी इथलीच पोस्ट ' परसदार'-
*[ [ जलरंगाची मनाला पडलेली भुरळ स्वस्थ बसूं देत नाही; हा आणखी एक रांगडा, प्रामाणिक प्रयत्न.]

प्रत्येक आयुष्याच्या दॄश्य बाजूला
एका खाजगी बाजूचं अस्तर असतं
आणि तें तसं असावंच असावं
कारण, तिथेच तर खरं
त्याच्या अस्तित्वाचं सार असतं

घराचं पण काहीं वेगळं नसतं
त्यालाही एक परसदार असतं !
- भाऊ * )
DSC01335_4.jpeg

Pages