सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ६

Submitted by स्वच्छंदी on 17 October, 2019 - 11:18

आज खुप दिवसांनी पुढचा भाग टाकतोय. मध्यंतरी न लिहीण्याचे कारण की कामाच्या रगाड्यामुळे लिहायला वेळ झाला नाही हे दुसरे पण खुप दिवसात मनाजोगा ट्रेक झाला नाही हे पहीले आणी मुख्य कारण Happy
------------------------------------------------------------------------
पहील्या पाच भागांच्या लिंक्स.

सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग १ - https://www.maayboli.com/node/66833
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग २ - https://www.maayboli.com/node/66898
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.maayboli.com/node/67132
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ४ - https://www.maayboli.com/node/67676
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ५ - https://www.maayboli.com/node/68989
------------------------------------------------------------------------

शब्दचित्र तेरावे: जलही जिवन है

काही दिवसांपुर्वी एका ट्रेकींग गृपवर चर्चा चाललेली होती की पाण्याचे हाल, किल्ल्यांवरील कोरड्या पडलेल्या पाण्याच्या टाक्या आणि एकंदरीतच सह्याद्रीतील गावागावातले सध्या जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष. खरेतर यावर मागच्या महीन्यातच लिहीणार होतो पण काही हरकत नाही. तसेही यावर्षी जुन महीना हा एक्स्टेंडेड मे महीन्यासारखाच झाला होता. जेष्ठ महीना उगवलाच नाही आणी वैशाख वणवा तसाच पुढे चालू राहीलाय असे रणरणते उन, तसाच दुपारी घरात बसवणारा उकाडा, त्याच घामाच्या धारा हेच यावर्शीच्या जुन महीन्याचे वैषीठ्य. शहरात एकवेळ आपल्याला ह्याची सवय झालीय किंबहुना आपण करून घेतलीय असे म्हणूया पण सह्याद्रीतही असेच जाणवायला लागले की समजते की कुठेतरी चुकलेय. काही गोष्टी निसर्गनिर्मीत असतात तर काही मानव निर्मीत. सध्याचा जाणवलेला हा उन्हाळा हा शहराइतकाच सह्याद्रीतल्या गावागावातही जाणवतोय हे मानवनिर्मीत आहे.

------------------------------------------------------------------------

असेच एकदा मे महीन्यातल्या एका दुपारी मुंबई गोवा हायवेवर उतरून सांक्षी किल्ल्याकरता बद्रुद्दीन गावात चाललो होतो. हवेत धुळ माती प्रचंड फिरत होती तश्यातच आमच्याकडचे पाणी संपले होते. आम्ही तसेच पाय न थांबवता सांक्षी गावात पोचलो. तहानेने घसा कोरडा पडला होता. पण गावात पाणी मागायची हिम्मत झाली नाही कारण आमच्या बरोबरच गावात तिन लहानग्या मुली डोक्यावर हंड्यांचे मनोरे घेउन एक किमी चालत आल्या होत्या. अश्या वेळी त्याच हंड्यातले पाणी आपण संपवून पुन्हा त्या मुलींना तश्या उन्हात जायला लावायची इच्छा काही आम्हाला झाली नाही...

अजुन एकदा मे महीन्यात पालघरजवळच्या अशेरीगड किल्ल्यावर चाललो होतो. किल्ल्यावर जायची वाट विचारली तर समोरची पाईपलाईन धरून सरळ पायवाटेने वर जावा असे उत्तर मिळाले. त्याबरहुकुम आम्ही वर किल्ल्यावर गेलो खरे पण गेल्यावर ती पाईपलाईन किल्ल्याच्या एकुलत्या एका शिल्लक राहीलेल्या आणी तळाशी गेलेल्या पाण्याच्या टाकीतुन निघालेय म्हटल्यावर अशेरी गावातल्या त्या उदास पलेल्या हातपंपाचे रहस्य आम्हाला कळले...

वरची दोन प्रातीनिधीक उदाहरणे मे महीन्यातली. कदाचीत नियमीत ट्रेकर्सना अगदीच अपे़क्षीत असलेली, पण मे महीन्यात कशाला मार्च महीन्यातल्या काही ट्रेक्सनी ही आमच्या तोंडाचे पाणी पळवलेय. घुटका वाटेच्या ट्रेकने पाण्याअभावी दिलेला तडाखा, ५ लीटर कोकम सरबत पिउनही अर्धवट सोडावा लागलेला भैरीच्या वाटेचा ट्रेक, घामावाटे शरीरातले सगळे पाणी निघुन जाताना बघताना विना पाण्याचा केलेला चोरकणा ट्रेक ही अशी काही उदाहरणे आम्ही मे महीन्यात केलेल्या ट्रेक्सची नक्कीच नव्हती. कधीकाळी सह्याद्रीत वाहते पाणी असण्याच्या मार्च एप्रील सुरुवातीचे हे ट्रेक. पण हल्ली जानेवारी संपता संपता ट्रेक मित्रांचे मेसेज येतात की गावात, किल्ल्यावर पाण्याचे हाल आहेत ट्रेक निट प्लान करा. आपण कधीकाळी कुठल्या तरी विकेंडला ट्रेकला जाणार पण ज्याना दररोज तिथेच राहायचे आहे अश्या सह्याद्रीतल्या गावातल्या लोकांनी काय करायचे ???

मार्च दरम्यान येणारी होळी पेटली की घरातले मोठे भाजावळीला शेतावर पळतात तर घरातले छोटे हंडे घेउन पाणवठ्यावर. सकाळच्या शाळा संपल्या की घरातली मुले गुरांमागे चारायला जातात तर मुली हंडा घेउन पाण्याला. मग इतके महीने सढळ हस्ते वापरलेले पाणी रेशनिंग करून वापरायला लागते. गावात अजुनही गोठ्यातल्या गुरांना, ओसरीवरच्या पाव्हण्याला आणी खाटेवरच्या म्हातार्‍यांना पाण्याला नाही म्हणण्याची प्रथा नाही त्यामुळे अतिरिक्त पाणी हे भरावेच लागते. २४ तास नळ सुरु असलेल्या शहरात घरी आलेल्याला एखादा पाण्याचा ग्लास पुढे करतात तर गावात त्याच्यासमोर घरातल्यांनी तासभर उन्हातून खपुन आणलेला पाण्याचा हंडा ठेवतात (काही ठीकाणी तर त्याबरोबर न मागता गुळाचा खडाही). बरे काही गावे ही त्यातल्या त्यात नशीबवान. त्याना गावाजवळ एखाद्या धरणाची किंवा हापशीची लॉटरी तरी असते. बर्‍याच गावांच्या नशीबी तर तेही नाही. कुठेतरी दुरवरचे एखादे टाके, कुठेतरी आंब्याच्या झाडाखालचा झरा, कुठेतरी एखादी जुनी विहीर, कुठेतरी उंबराच्या झाडाखाली खोदलेला एखादा जुना खड्डा, कुठेतरी एखाद्या सुकलेल्या ओढ्यातले किंवा नदीतले कुंड हेच यांचे पंढरपुर. दररोज याच्याच वार्‍या करायच्या. एखाद दिवस वारी चुकली की पाण्याचा उपास घडायचा. अश्या वेळी आपण ट्रेकिंग करत दुपारी गावात पोचल्यावर पाणी मागायचेही जिवावर येते. नकार येईल म्हणून नव्हे, तर त्यांची पाण्यासाठीची मेहनत माहीती असल्याने, नक्कीच होकार येईल म्हणून.

पण सगळाच दोष निसर्ग चक्राला कसा देता येईल. एखाद दुसरा अपवाद वगळता सुरळीत सुरु असणार्‍या निसर्ग चक्राचा तोल बिघडवायला थोड्याफार प्रमाणात हीच माणसे कारणीभूत आहेत हे ही विसरून चालणार नाही. एखाद्या केस उगवणार्‍या जाहीरातीत बिफोर आणि आफ्टर दाखवतात तसे पण एकदम उलट. म्हणजे १५ वर्षांपुर्वी अस्वलासारखे दिसणारे जंगल आता केस झडलेल्या म्हशीसारखे दिसायला लागणे हे आपलेच दान आहे पण निसर्गाच्या विरुद्ध पाडलेले. मग जुनच्या सुरुवातीला (हल्ली तर तेही नाही. पाउस देखील "भाप्रवे" पाळायला लागलाय की कोण जाणे) गावच्या वेशीवर असणारा, जुलै-ऑगस्टला घरात ठाण मांडून बसणारा आणी अगदी दसर्‍याच्या आठव्या नवव्या माळेपर्यंत पुरणारा पाउस आता एकतर जेमतेम तरी पडतो किंवा बंपर इनाम लागल्यासारखा तरी पडतो. म्हणजे कसाही पडला तरी गावचे हाल नक्की. आणि जो पडतो तो तरी थांबतो, जिरतो का? तर नाहीच. कारण थांबवायला जंगले कुठाहेत. "विकास" हाच "ध्यास" असा मुलमंत्र ठरवून सह्याद्री "भकास" करण्याची "आस" असलेले शहरी आणि त्याला साथ देणारे गावकरी यांची अभद्र युती झाल्यावर गावकर्‍यांनी पाण्यासाठी जानेवारीतच ठणाणा करणे हे ओघानेच आले.

सह्याद्रीत जिथे जिथे धरणे आहेत ते अपवाद. पण ते सोडता आजघडीला या चक्रातून ते अपवाद वगळता एकही गाव पाण्याच्या दुर्भिक्षातून सुटलेले नसावे. नाहीतर आपण मारे महाबळेश्वरचा पेपरमधे उदोउदो करतोपण शेजारील कोळेश्वर डोंगरावर जिथे तितकाच महामुर पाउस पडतो त्या कमळगडा खालील वस्तीला मे महीन्यात एखाद्या पाणाच्या खड्ड्यावर का अवलंबून राहावे लागावे? खानू, गारजाईवाडी, चांदर सारख्या सह्याद्रीतल्या क्रेस्टलाईन वरील गावाला जानेवारी नंतर पाण्यासाठी गावाच्या वेशीबाहेर दुर का जावे लागावे? कोळसा हवा म्हणून जंगले तोडत राहायची आणि जंगले नष्ट झाल्यावर निसर्ग कोपला म्हणून टिपे गाळत बसायची. पाण्याची शाश्वत सोय हे सह्याद्रीतल्या बर्‍याच गावांना अजुनही दिवास्वप्नच आहे. फार पुर्वी मे महीना लागला की उल्हास व्हॅलीचा ट्रेक हा "टू डू"* लिस्ट मधे असायचा याचे मेन कारण त्या व्हॅलीत वाहणारी बारमाही उल्हास नदी हे असायचे. पण सध्या असे काही असेल असे वाटत नाही.

कासवगतीने का होईना पण परिस्थीती कुठे कुठे बदललीय. ग्रामपंचायत नळ पाणी योजना बर्‍याच गावात मुलींचे हंडाभर ओझे वाचवतेय हे नक्कीच चांगले चित्र आहे. पण पुरेसा पाउस पडला तरच या योजनेतल्या पाणीसाठ्यात पाणी साठणार आहे आणि मगच गावातल्या नळांतून पाणी येणार आहे हेही तितकेच खरे. निसर्गाची झीज सुरु झालीच आहे ती थांबेल की कसे आणी कधी हे माहीत नाही. पण असेच जर सुरु राहीले तर सद्यघडीला दरवर्शी उशीराने येणारा पाउस कालीदासाचे ते प्रसिद्ध वाक्य "आषाढस्य प्रथम दिवसे" मात्र लवकरच खरे करेल हे नक्की. कारण निसर्ग आपल्याला गेली अनेक वर्ष साईन्स देतोच आहे आणी आपण सोईस्कर दुर्लक्ष करतोच आहे पण तो जेव्हा ग्यांग्स ऑफ वासेपुर मधल्या त्या "तेरी कहके लुंगा" वाक्यासारखा "आता माझी सटकली" सारखा वागायला लागेल तेव्हा मात्र लपायला काँक्रीटची जंगले काही कामाची येणार नाहीत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शब्दचित्र चौदावे : जळता सह्याद्री

गृपवर एकानी विषय काढला खरा पण सध्या बर्‍याच ठिकाणी हेच दृष्य आहे, हेच चालले आहे. अ‍ॅमॅझॉन काय, कॅलीफोर्निआ काय, सुमात्रा काय, ऑस्ट्रेलिआ काय की आपला सह्याद्री काय, सतत कुठे ना कुठे तरी जंगल जळते आहे. पेटते आहे. त्यावर थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून...

------------------------------------------------------------------------

सध्या सह्याद्री पाउसाने न्हाउन निघतोय. सुजलाम सुफलाम अवस्थेत असलेली जमीन, तृप्त होउन वाहणार्‍या नद्या, मुबलक चारा, आल्हाद दायक वातावरण. सगळे कसे पिक्चर पर्फेक्ट. पायाला भिंगरी लागलेल्या कुठल्याही ट्रेकरसाठी "बॅग भरो और निकल पडो" (जर होम मिनिस्टरची परमिशन मिळाली तर Happy Happy ) असे टेम्टिंग वेदर. पण हे असे अजुन थोडेच दिवस. एकदा का वातावरणात ऑक्टोबरची चाहुल लागली, डोंगर तापायला लागले की सह्याद्रीच्या निसर्गाची वाटचाल हळूहळू हिरव्या कडून करड्याकडे, करड्याकडून सोनेरीकडे होते पण याचा शेवट मात्र एप्रील मे महीन्याच्या शेवटी शेवटी जळून काळ्या ठिक्कर पडलेल्या जमीनीकडे होतो. हे विदारक आहे पण बहुतांश ठिकाणी सत्य आहे. यातून सह्याद्रीतली कुठलीही डोंगररांग सुटलेली नाही. पार नाशीकच्या साल्हेर पासून गोवा सिमेवरच्या सदाशिवगडापर्यंत हेच. या भागात जर मार्च ते मे मधे गेलात तर सभोवताली एखादा तरी डोंगर धुरांच्या चिमण्या हवेत सोडीत असलेला दिसेल.

लहानपणा पासुनच्या भुगोलात शिकत आलो होतो की उन्हाळ्याच्या दिवसात, तापत्या उन्हात जंगलात वणवे लागायची ही बरीच शक्यता असते. वैशाख वणवा असा आपण समर्पक शब्दही यासाठी वापरतो. पण जसे जसे सह्याद्रीत ट्रेकिंग करत केलो तशी तशी या नाण्याची दुसरी बाजुही दिसत गेली. वणवा "लागला" आणि वणवा "लावला" या दोन शब्दात व्याकरण दृष्ट्या एका अक्षराचाच फरक आहे पण सामाजिक आणि नैसर्गिक दृष्ट्या मानवाच्या अक्ख्या मानसीकतेचा फरक आहे आणि तो सध्याच्या घडीला इतका मोठा झालाय की दोन आणे पहील्या शब्दाचे असतील तर चौदा आणे दुसर्‍या शब्दाचे झालेत आणि हे भयंकर आहे. मला जे म्हणायचेय ते ह्या चौदा आण्यांबद्दलचे आहे. आमच्या ग्रुपमधल्या ट्रेकर्स बरोबर ह्या फ्रेब्रुवारीत त्याचा प्रत्यय आम्हा सर्वांना आलाच. दमुनभागुन चढताना जेव्हा सावलीची खरी गरज होती तेव्हा चंदेरीच्या शेवटाच्या टप्प्यात जळती पायवाट आम्हा सगळ्यांच्या नशीबी आली. आणि हे हल्लीचे नव्हे तर काही वर्षांपासुनचे आहे. थंडीच्या मोसमात पळू सोनावळेच्या लेण्यांच्या ट्रेकला गेलो होतो. तो डोंगर चढत असताना वाटेतल्या एका वळणावर एका गावठी हातभट्टीवर जाउन थडकलो Happy Happy . आम्ही असे अचानक त्यांच्या समोर आल्यामुळे दारु गाळणार्‍या तिथल्या बायामाणसांना चटकन कुठेच पळता आले नाही. तेव्हा त्यांच्याकडून कळाले अश्या दारुभट्टीसाठी लागणारा कोळसा आजुबाजूची जंगले जाळून येतो. काही भट्टीसाठी वापरतात तर बाकीचा मुंबईला पाठवतात.

सर्व सिस्टीम बांधीव, सगळी साखळी सेट असते. सगळेच पोखरलेले. मुंबईत "वाव्ह.. अस्सल" म्हणत आपण खातो तो डोसा, ते चणे शेंगदाणे, तो भुट्टा याला लागणारा कोळसा हा अश्याच लावलेल्या आगीचा आहे. हो, लावलेल्याच. स्टेप्स तश्या सोप्या असतात हो.... काय एक पैशाची काडी तर लागते. त्या पैशाच्या काडीत विडीपण पेटवायची मग काडी न विझवता तशीच टाकायची आणि घरी यायचे. निवांत आठेक दिवस जंगल जळत असते. मग जंगल विझवायच्या निमित्ताने जायचे आणि पोती भरभरून कोळसा आणायचा. असे पाच सहा वर्षे केले की दारात "बोलेरो" उभी राहते. प्रत्येक वेळी दारुची भट्टी, डोसा, चणे हेच कारण असले पाहीजे असे नाही. कुठे नवीन जमीन तयार करायची असते, कुठे सरपणासाठी हवे असते, कुठे शिकारी साठी हवे असते. कारण काहीही असो निकाल एकच, भस्म.... बरं याची नोंद सरकार दरबारी "वणवा" अशी नैसर्गिक आपत्ती म्हणून एकाच शब्दात केली जाते. सरकारी कागदावर "लागला" की "लावला" या शब्दाचे महत्त्व नाही. म्हणजे तसे ते ठेवले जात नाही. असे केले की हक्काने "सरकारी" कोळसा आणायला आपण मोकळे. मग या नादात कितीएक सरपटणारे जीव, कीतीएक छोटे बिळातले प्राणी, असंख्य किडे मुंगी जिवंत जळाले तरी त्याचे आपण वाईट वाटून घ्यायचे नाही. आपल्याला काय नवीन जमीन, ताजा कोवळा रानडुक्कर, पोत्याने कोळसा मिळाले की झाले.

दोन आठवणी विसरु म्हटल्या तरी विसरता येत नाहीत. अंधारबन ट्रेक करून गाढवलोट घाटाने कोकणात कोंडशेतला उतरत होतो. जवळ पास ट्रेक संपत आला होता. पण शेवटी शेवटी सर्व वाटेवर वणव्याच्या खुणा होत्या. अगदी कालपरवाचाच असावा. हवेत वासही जळकट भरलेला होता. पण जास्त वाईट वाटायले तेव्हा लागले जेव्हा वाटोवाट भाजलेले, मेलेले प्राणी दिसायला लागले. दोन एक साप, एक मुंगुस, अनेक खेकडे अजुन असे बरेच छोटे जिवंत जळालेले जिव बघून कसेसेच झाले. नागशेत गावात आलो. गावकर्‍यांना विचारले की कसा लागला वणवा. म्हणे काय म्हाईत. "मग तुम्हाला अश्या लागलेल्या वणव्याचे वाईत वाटत नाही का?" तो समोरून थंड उत्तर आले "मरु दे. आपल्याला काय जातेय". त्याच्या एक मुस्काटात द्यावीशी वाटत होती पण करतो काय. दुसरा किस्सा असाच. भैरीच्या घाटवाटेचा ट्रेक करत होतो तर पायाखालची ती बारीक वाट सोडली तर आजुबाजुचा सर्व डोंगर जळत होता. एकही झाड झुडूप यातुन सुटले नव्हते. सर्व डोंगर जळून काळा पडला होता. वणवा हा सायलेंट किलर आहे. रादर जंगलात लागलेली आग हीच सर्वभक्षी अजगर आहे. मग ती कशीही लागलेली असो. वाटेत येणार्‍या सर्वाला जाळून भस्म करणे हाच एक गुणधर्म अंगी असलेल्या ह्या पंचमहाभुतांपैकी सर्वात खतरनाक असलेल्या भुताच्या तावडीत जो सापडला तो राख झाला. अ‍ॅमॅझॉन, ऑस्ट्रेलीया, कॅलीफोर्निआ ही याची वार्षीक उदाहरणे आहे. ही उदाहरणे असो किंवा सह्याद्री, निसर्ग सगळीकडचा सारखाच जळतोय.

लहानपणी एक सितेची गोष्ट ऐकली होती. की म्हणे सितेला पळवून नेताना कोकणची माणसे तिला बघून हसली. मग सितेने त्याना शाप दिला की तुमची जमीन जळो, बेवसाउ होओ. लोकांनी प्रार्थना करुन उशा:शाप मागीतला. मग दया येऊन तिने त्यांना वरदान दिले की "जळो पण पिको". मार्च महीन्यात होळीनंतर सर्वत्र दिसणार्‍या भाजावळीची ही कथा. सितेचे वरदान हल्लीच्या माणसांनी फारच सिरियसली मनावर घेऊन नुसतीच जमीन न जाळता मग हळूहळू जंगलेही जाळायला सुरुवात केलीय. ह्यातून सितेच्या वरदानाचे माहीत नाही पण ह्या लावलेल्या वणव्यात त्या जिवंत जळालेल्या निष्पाप आणि मुक्या जनावरांचे तळतळाट मात्र आपल्याला लागण्याची शक्यता दाट आहे. "झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी" हे इथपर्यंत ठीक आहे आणि "धुरांच्या रेषा हवेत काढी" हे ही रेल्वेपुरतेच ठीक असूदेत. ह्या धुरांच्या रेषा ह्या जळणार्‍या जंगलाच्या असतील तर "जळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाउया" असेच म्हणायची वेळ येईल.

मस्त पाउस पडत असताना गरमागरम चणे किंवा दुपारी पोटात वणवा पेटला असताना अण्णाच्या गाडीवरचा तो कडक डोसा खाताना त्याखाली जळणारा कोळसा ह्या सभोवतालच्या अश्याच कुठल्यातरी जंगलात "लावलेल्या" वणव्याचा आहे हा विचार येऊन खाणारा आपला हात जरासा जरी थांबला तरी आपल्या मनातला हवा असलेला निसर्ग हा हिरव्या रंगाचाच आहे, काळा ठिक्कर पडलेला नाही याचे समाधान बाळगूया.

------------------------------------------------------------------------

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

फार अभ्यासपूर्ण लेख! आणि तितकाच काळजी करायला लावणारासुद्धा. हे लिहिल्याबद्दल धन्यवाद!

नद्यांमध्ये प्लॅस्टिक थैलीत निर्माल्य टाकणाऱ्या अनेक लोकांना मी रोखलं आहे पण काय फरक पडतो, देवाचं आहे नदीतच टाकावं लागतं अशी उत्तरे ऐकून स्वत:च्याच तोंडात मारून घ्यावी असे वाटते. वनीकरण वाले लोक सुध्दा आगी लावून परत त्याच सर्व्हे नंबर मध्ये नवीन एस्टिमेट करुन परत झाडं लावतात व पैसा खातात असंही ऐकलं होतं. खरं असलं तर भयंकर आहे.