जेम्स आणि लिलीची हत्या झाली तेव्हा पीटरने विश्वासघात केला ही गोष्ट सिरियसच्या लक्षात आली . जेम्सवर त्याचं भावापेक्षाही अधिक प्रेम होतं . तो संतप्त अवस्थेत पीटरला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्यामागे गेला . त्यांची गाठ अनेक मगल लोक असलेल्या रस्त्यावर पडली . मात्र सिरियसपेक्षा पीटर चपळ ठरला . " तू लिली आणि जेम्सचा विश्वासघात केलास " असं मोठ्याने ओरडून पीटरने एक मोठा जादुई स्फोट घडवून आणला , या स्फोटात 12 मगल लोक मृत्युमुखी पडले . याचवेळी आपलं एक बोट पीटरने कापलं आणि क्षणार्धात उंदराच्या रुपात परिवर्तीत होऊन तिथून पळून गेला . तपासासाठी आलेल्या जादू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना / ऑरर्सना रक्तरंजित 12 मृतदेह आणि जखमी मगल लोकांनी भरलेल्या रस्त्यावर बेभान अवस्थेत हसत असलेला सिरियस सापडला ... ना त्याने बचावाचा प्रयत्न केला ना कुठलीही सफाई देण्याचा प्रयत्न केला .. आपण आपल्या जिवलग मित्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो ही भयंकर अपराधीपणाची भावना आणि पीटरने केलेल्या जबरदस्त विश्वासघाताचा धक्का त्याला पचवता आला नाही . पीटर , जेम्स , सिरियस हे बेकायदेशीर प्राणिरुपधारी होते , तेव्हा पीटर उंदीर आहे यावर कोणाचा विश्वास बसणं कठीण होतं आणि सिद्ध करायचं म्हटलं तरी बरेच प्रश्न उपस्थित झाले असते , त्यातून कदाचित लुपिनच्या वेअरवुल्फ असण्याचं सत्य जगभर झालं असतं आणि त्याचं आयुष्य आणखी खडतर झालं असतं .
आपल्या बचावाचा कोणताही प्रयत्न न करण्यामागे सिरियसच्या मनात नक्की काय कारण होतं हे निश्चित होत नाही .. दृश्य पुरावा इतका ढळढळीत त्याच्या विरोधात होता , पीटर गायब होण्यापूर्वी काय ओरडला हे ऐकलेले अनेक मगल होते ... त्याचं कापलेलं बोट सापडलं होतं , त्यामुळे स्फोटात त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या आणि फक्त एक बोट हा ओळखता येण्याजोगा अवयव शिल्लक राहिला अशीच जादू मंत्रालयाची समजूत झाली होती . सिरियसला न्यायालयात सुनावणीचीही सवलत दिली गेली नाही , सरळ अझ्काबानमध्ये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली . डिमेंटर्सच्या प्रभावाखाली कैदी तिथे असेपर्यंत आपल्या आयुष्यातील एकूण एक आनंदी आठवणी विसरून जात असत ( आनंदी आठवणी हा डिमेन्टर्सचा जीवनरस आहे ) आणि फक्त वाईटात वाईट , दुःखाच्या आठवणीच लक्षात राहिल्यामुळे हळूहळू कैदी आपलं मनोसंतुलन गमावून बसत असे . सिरियसच्याही आनंदी आठवणी धूसर बनू लागल्या ... पण आपण निरपराधी आहोत ही एक गोष्ट तो विसरला नाही कारण ही गोष्ट कोणती आनंदी आठवण नव्हती तर ते निखळ सत्य होतं . ह्या एका गोष्टीने त्याचं मानसिक संतुलन शाबूत राहिलं , तो इतर कैद्यांसारखा नैराश्याच्या गर्तेत गेला नाही . डिमेन्टर्सचा प्रभाव कमी करण्यासाठी सिरियस बऱ्याच वेळा आपलं कुत्र्याचं रूप धारण करी , प्राणिरूपात भावना कमी गुंतागुंतीच्या असल्याने डिमेन्टर्सचा अगदी कमी प्रभाव पडत असे .
इकडे लिलीकडून अनभिज्ञपणे कोणती प्राचीन जादू केली गेली ज्यामुळे वोल्डेमॉर्टच्या शक्ती लयाला गेल्या याचा एल्बस डम्बलडोरनी अचूक अंदाज बांधला . हॅरीला मिळालेलं सुरक्षाकवच अतिशय शक्तिशाली होतं पण ते तेव्हाच त्याचं रक्षण करू शकलं असतं जेव्हा तो लिलीच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या घराला आपलं घर म्हणू शकला असता . लिलीचे आईवडील यापूर्वीच मरण पावले होते . लिलीचं रक्त हॅरीव्यतिरिक्त जिच्या अंगात खेळत आहे अशी एकमेव जीवित व्यक्ती होती ती म्हणजे पेटुनिया . पेटुनिया आणि लिलीचे संबंध बरेच दुरावले होते ... ख्रिसमस साठी गिफ्ट पाठवण्याची फॉर्मॅलिटी पुरी करणे यापलीकडे पेटुनिया आपल्या बहिणीशी फारसे जवळचे संबंध ठेवू इच्छित नव्हती ... पेटुनियाने आपल्या नवऱ्यापासून - व्हर्नन डर्स्ली याच्यापासून लिली जादूगार असल्याची गोष्ट लपवली नव्हती .. त्याचबरोबर जादूगारांच्या जगाशी आपण तिळमात्रही संबंध ठेवू इच्छित नाही हेही त्याला सांगितलं होतं .. त्यांचा त्यावेळी दोन वर्षांचा असलेला मुलगा डडली याचाही जादूगार लोकांशी विशेषतः मावसभाऊ हॅरीशी अजिबात संपर्क येऊ नये अशीच या दाम्पत्याची इच्छा होती ... पेटुनियाइतकाच व्हर्ननला जादूगार समाजाबाबत तिरस्कार होता फक्त दोघांची कारणं वेगळी होती.. पेटुनियाच्या मनात आपल्याला अव्हेरले गेल्याच्या , आपण जादू करू शकत नसल्याच्या भावनेतून कडवटपणा निर्माण झाला होता आणि त्या कडवटपणातुन पुढे आपल्यालाही या समाजाशी काही संबंध ठेवायचे नाहीत अशी तिची भूमिका बनत गेली होती , तर व्हर्ननचा तिरस्कार हा जादुबद्दलच्या प्रचंड भीतीतून निर्माण झाला होता ... आपले अशा लोकांशी दूरचे का होईना पण नातेसंबंध आहेत ही गोष्ट तो शरमेची / दुर्दैवाची मानत असे , उद्या हे लोकांना कळलं तर काय होईल ह्या कल्पनेनेही त्याला भीती वाटत असे . बाकी काही असलं तरी व्हर्ननचं पेटुनियावर मनापासून प्रेम होतं आणि ती दुखावली जाणार नाही याची तो काळजी घेत असे , कुटुंबाबाबतचे सगळे निर्णय ते मिळून घेत .
दोघांचं आपला मुलगा डडली वर आंधळं प्रेम होतं . त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणे , त्याला नको तितका लाडावून ठेवणे , त्याची हरेक मर्जी राखणे , त्याला शहाणपणाची कुठलीही गोष्ट न शिकवणे / कोणताही चांगला संस्कार न करणे या सगळ्यामुळे डडली प्रचंड स्वार्थी , मतलबी , काहीसा आडदांड , किंचित क्रूर स्वभावाचा बनला होता पण डर्स्ली दाम्पत्याला मात्र हे सत्य लक्षात येत नव्हतं , त्यांच्या लेखी डडलीइतका गोंडस आणि सर्वोत्तम लहान मुलगा दुसरा असणं शक्यच नाही .
हॅरीला पेटुनियाने आपल्या घरात स्वीकारणं हे लिलीचं सुरक्षाकवच त्याचं रक्षण करत राहण्यासाठी आवश्यक होतं . डम्बलडोरने शक्य तितक्या सोप्या शब्दात ही गोष्ट पेटुनियासाठी एका पत्रात लिहिल्या . हॅरीच्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्याच मध्यरात्री 1 वर्षाचा हॅरी आणि हे पत्र डर्स्ली दाम्पत्याच्या घराच्या पायरीवर ठेवले . पेटुनियाला अर्थात वोल्डेमॉर्टने जादूगार समाजात जी प्रचंड दहशत निर्माण केली होती त्याबद्दल , मगल लोकांच्या त्याने व त्याच्या अनुयायांनी केलेल्या कत्तली , घडवून आणलेले अपघात / गुन्हे , अनेक जादूगारांचे केलेले खून या सगळ्यांबद्दल माहिती होती . त्यानेच आपल्या बहिणीला मारलं हे कळताच तिला धक्का बसणं साहजिक होतं .
पेटुनियाच्या मनात लिलिबद्दल कितीही कडवटपणा , जेलसी असली तरी या सगळ्याखाली कुठेतरी थोडंस का होईना बहिणीवरचं प्रेम जिवंत होतंच .. लिलीच्या मृत्यूच्या बातमीने तिला दुःख झाल्याशिवाय राहिलं नाही .. मत्सराच्या भावनेतून आपल्या बहिणीबरोबरचं नातं आपण जवळपास तोडलंच आणि ते सुधारण्याची संधीही आता पूर्ण नष्ट झाली ... असा विचार तिच्या मनात आला असण्याची शक्यता आहे , अर्थात जर लिलीचा अकाली मृत्यू झाला नसता तर पेटुनियाच्या मनात कधी नातं सांधण्याचा विचार डोकावला असता अशी फारशी शक्यता नाही .. एकाचवेळी पश्चाताप दुसरीकडे आईवडिलांनी लिलीवर अधिक प्रेम केल्याची भावना , बालपणातील मत्सर , आपण दुय्यम किंवा कमी ठरलो याचा राग आणि या सगळ्याखाली बहिणी बहिणीचं प्रेम अशा संमिश्र गुंतागुंतीच्या भावना पेटुनियाच्या मनात होत्या .
पण जर आपल्यामुळे आपल्या बहिणीच्या लहानशा मुलाला अधिक संरक्षण मिळणार असेल तर त्याला नकार देऊन त्याचं काहीही होऊ दे , आपल्याला घेणंदेणं नाही असं म्हणण्याएवढी पेटुनिया निर्दय मुळीच नव्हती . हॅरीच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी त्याचं तिच्याबरोबर एका घरात राहणं आवश्यक आहे ही गोष्ट समजताच तिने त्या गोष्टीला संमती दिली . आपला मुलगा एका जादूगार मुलासोबत लहानाचा मोठा व्हावा ही कल्पना तिला अत्यंत अप्रिय होती . तरीही मनाविरुद्ध , राग राग करत का होईना तिने हॅरीला घरात ठेवून घेणं स्वीकारलं .
व्हर्ननला जादूगारांच्या जगाशी कसलाही संबंध नको होता . जादू ही अनैसर्गिक आणि भयानक विकृती आहे असं त्याचं मत होतं . जर पुरेसे प्रयत्न केले तर ही विकृती नष्ट करणं शक्य आहे असं त्याला वाटत होतं . त्यामुळे कठोर शिस्त आणि कठोर वर्तनाचा वापर करून हॅरी मधली ही शक्ती नष्ट करून टाकायची आणि त्याला जादूच्या शाळेत वगैरे पाठवायचं नाही , तो सामान्य माणसासारखाच म्हणजे मगल्स सारखाच लहानाचा मोठा होईल , असं व्हर्ननने ठरवलं . पेटुनियानेही नवऱ्याच्या मताला संमती दर्शवली .
परिणामी डर्स्ली दाम्पत्याने हॅरीला अत्यंत हृदयशून्य वागणूक दिली . घरात 2 अधिकच्या बेडरूम असताना त्याला जिन्याखालचं कोंदट कपाट खोली म्हणून देण्यात आलं , तिथेच त्याच्या सगळ्या वस्तू , कपडे आणि झोपण्याचा बिछाना असे . एक बेडरूम क्वचित वास्तव्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी राखीव होती तर दुसऱ्या बेडरूममध्ये डडलीची न मावणारी खेळणी , त्याला आणलेल्या पण त्याने मोडून तोडून टाकलेल्या किंवा तो आता न वापरत असलेल्या वस्तू , त्याने कधी उघडूनही न पाहिलेली भरपूर पुस्तकं असा सगळा ऐवज भरला होता . हॅरीला स्वतःचे नवीन कपडेही घेतले जात नसत , डडलीचे जुने कपडे त्याला दिले जात , डडलीचं वजन आणि आकारमान हॅरीच्या दुप्पट तिप्पट असून सतत वाढत असल्याने त्याचे कपडे हॅरीला भरपूर ढगळ होत .. डर्स्लींची आर्थिक परिस्थिती अजिबात वाईट नव्हती , डडलीला महागड्या अनावश्यक वस्तू घ्यायला आणि इतर सर्व सुखसोयी चैनींसाठी त्यांच्याकडे भरपूर पैसे होते पण दुसऱ्याच्या मुलासाठी खर्च करण्याची त्यांची दानत नव्हती . डडलीला घरातल्या कुठल्याही कामाला बोट लावावं लागत नसे तर साफसफाई , बागेची देखभाल , स्वयंपाकाच्या तयारीतील जमण्यासारखी छोटीमोठी कामं हे सगळं हॅरीला करावं लागत असे . डडलीचा वाढदिवस थाटात साजरा होई तर हॅरीच्या वाढदिवसाला केक सुद्धा आणला जात नसे , ना कोणा मित्रमैत्रिणींना बोलावून तो साजरा केला जाई .. भेटवस्तू म्हणून काहीतरी मामुली किंवा जुनीशी गोष्ट दिली जात असे .
देहयष्टी लहानखुरी असलेल्या हॅरीला डडली आणि त्याचे मित्र अनेकवेळा त्रास देत .. अर्थात ते फक्त हॅरीलाच नाही तर अनेक कमकुवत मुलांशी मारामारी करत असत . ज्याला बुलीइंग म्हटलं जातं ते . पेटुनिया व्हर्ननला डडली घराबाहेर काय करतो याबाबत अज्ञान होतं असं जरी गृहीत धरलं तरी त्यांच्या नजरेसमोर घरात डडली हॅरीशी कसा वागतो हे त्यांना उघड दिसत असूनही त्यांनी त्याला कधीही समजुतीचे दोन शब्दही सांगण्याचा प्रयत्न केला नाही , त्याकडे साफ दुर्लक्ष केलं . डडलीने हॅरीची घरात असलेली किंमत जोखली होती , आपण कसेही वागलो तरी आईबाबा आपल्याला काहीही बोलत नाहीत किंवा हॅरीला वाचवण्याचा प्रयत्नही करत नाहीत हे त्याच्या लक्षात आलं होतं ... त्याच्या या वागण्याला व्हर्नन पेटुनियाच जबाबदार होते . ते हॅरीशी कधीही चार प्रेमाचे शब्द बोलत नसत. सतत त्याच्याशी तुसडेपणाने वागत .
त्यातच निसर्गक्रमाप्रमाणे वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून हॅरीने ऍक्सिडेंटल मॅजिकच्या खुणा दाखवण्यास सुरुवात केली .. आणि व्हर्नन पेटुनिया चिंतित झाले . वास्तविक ऍक्सिडेंटल मॅजिकवर जादूगार मुलाचा कोणताही ताबा नसतो पण अशा घटनांच्या वेळी त्यांनी हॅरीला शिक्षा देण्यास सुरुवात केली , त्याला त्याच्या कपाट-खोलीत कोंडून ठेवणे , क्वचित कधी उपाशी ठेवणे .. असं करून आपण त्याच्यातली जादू दडपून टाकू आणि कालांतराने तो "नॉर्मल" होईल असं त्यांना वाटत होतं . आपण हे त्याच्या भल्यासाठीच करत आहोत अशीही त्यांची समजूत होती . या ऍक्सिडेंटल मॅजिक मध्ये लहान लहान गोष्टी होत्या . हॅरीचे केस इतर मुलांपेक्षा वेगाने वाढत त्यामुळे दर आठवड्याला त्याला हेअर कटिंगला घेऊन जाण्यात येई , एके दिवशी हेअर कटिंगहुन आल्यावरही त्याचे केस कापल्यासारखे वाटतच नव्हते त्यामुळे पेटुनियाने कात्री घेऊन ते अगदी बारीक कापले , फक्त त्याच्या कपाळावर असलेल्या खुणेवर एक केसांची बट ठेवली , त्यामुळे तो अगदीच वाईट दिसू लागला ... डडलीने त्याची भरपूर चेष्टा करण्याची संधी सोडली नाही . दुसऱ्या दिवशी शाळेत मुलं आपल्याला हसणार , चिडवणार या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नाही , दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्याचे केस होते तसे वाढलेले होते ... हे कसं झालं त्याला अजिबात समजलं नव्हतं पण तरीही ह्याबद्दल त्याला 1 दिवस कपाटातून बाहेर न पडण्याची शिक्षा देण्यात आली . एकदा हॅरीने नकळत त्याच्या एका शिक्षकाचे केस निळे केले , एकदा डडली व त्याचे मित्र शाळेत त्याचा पाठलाग करत असताना कचऱ्याच्या मोठ्या बिन मागे लपायचा प्रयत्न करत असताना हॅरी हवेत तरंगत उंच छपरावर पोहोचला ... याबद्दल शाळेतून घरी तक्रारीचं पत्र पाठवण्यात आलं आणि हॅरीला बरेच दिवस दिवसाचा बहुतेक वेळ कपाटातच राहण्याची शिक्षा देण्यात आली .
डर्स्ली कुटुंबातील हॅरीच्या वास्तवातील त्यातल्या त्यात सुदैवाची म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे त्याचे अंकल व मावशी हे जाणूनबुजून ठरवून छळ करणारे म्हणजे अमानुष मारहाण किंवा उपाशी ठेवणं अशा निर्मम शिक्षा करण्यात आनंद मानणारे नव्हते . हॅरी एक वर्षाचा असल्यापासून 4 - 5 वर्षांचा होईपर्यंत पेटुनियानेच त्याची काळजी घेतली , प्रेमाने नसेल कदाचित पण जाणीवपूर्वक हाल केले नाहीत .. पुढेही त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या ..
व्हर्नन डर्स्लीची बहीण मार्ज डर्स्ली ही कधीकधी त्यांच्या घरी पाहुणी म्हणून राहायला येत असे . तिचं हॅरीशी वर्तन फार वाईट होतं , त्याच्याबद्दल किंचितही सहानुभूती किंवा दया तिच्या मनात नव्हती . सतत त्याला भयंकर घालून पाडून बोलणे , अपमान करणे असं तिचं वर्तन होतं . हॅरीचे आईवडील जादूगार होते हे सत्य व्हर्ननने आपल्या कुटुंबापासून लपवलं होतं , कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला असंच सर्वांना व हॅरीलाही सांगितलं होतं . त्यामुळे मार्ज आपल्या भावाला नाहक तुझा खर्च सहन करावं लागत आहे , तुझे बेजबाबदार , गरीब आईवडील स्वतः मरण पावले आणि तुझं ओझं माझ्या बिचाऱ्या भावावर टाकलं , माझा भाऊ मोठ्या मनाचा म्हणून तुला ठेवून घेतलं , मी असते तर तुला अनाथाश्रमात सोडलं असतं ... असं हॅरीला आपल्या वास्तव्यात अनेकदा ऐकवून दाखवी ... लहान मुलाशी अशा भाषेत बोलू नये याची तिला काडीची पर्वा नव्हती . डडली साठी मोठ्या मोठ्या महागड्या भेटवस्तू ती आणत असे आणि कुत्सित नजरेने हॅरीकडे पाहत असे , जणू तुला का बरं नाही आणली असेल ? एका भेटीत तर ती डडलीसाठी कम्प्युटराईझ्ड रोबोट खेळणं आणि हॅरीसाठी कुत्र्यांची बिस्किटं घेऊन आली होती . हॅरीचा शाब्दिक अपमान करायची एकही संधी ती दवडीत नसे .
हॅरी 11 वर्षांचा होणार होता व हॉगवर्ट्स मध्ये त्याच्या शिक्षणाला प्रारंभ होणार होता . प्रवेशाचं लेटर आलं आणि डर्स्ली दाम्पत्य भयंकर चिंतित झालं , त्यांना कोणत्याही परिस्थितीत हॅरीला जादूच्या शाळेत पाठवायचं नव्हतं . पत्र त्यांनी हॅरीच्या हाती पडू दिलं नाही , त्याला तो जादूगार आहे हे त्यांना समजूही द्यायचं नव्हतं . डर्स्ली हॅरीला काय वागणूक देतात याची एल्बस डम्बलडोरना पूर्ण कल्पना होती . पण आपण हस्तक्षेप केला तर गोष्टी कदाचित अधिकच बिघडतील म्हणून असेल कदाचित किंवा आपल्या काही वेगळ्या हेतुपायी त्यांनी डर्स्लींना भेटून वा संपर्क साधून त्यांच्या वागण्यात बदल घडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता . पण हे वागणं त्यांना पसंत नव्हतं . जेव्हा डर्स्ली दाम्पत्याने हॅरीला पत्र न मिळू देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हैराण करण्यासाठी डम्बलडोर किंवा कदाचित प्रोफेसर मॅक्गॉनागलनीही असू शकतं रुबियस हॅग्रिड या हॉगवर्ट्सच्या चौकीदाराच्या हस्ते अक्षरशः शेकडो पत्रं वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्या घरात पाठवली यात , दरवाजाच्या फटीतून , दूध / डेअरी सोबत येणाऱ्या अंड्यात बोळे करून , घरात बसवलेल्या दगडी फायरप्लेस मधून अशा अनेक अतर्क्य मार्गांनी घरात पोहोचवली . पण व्हर्नननी एकही लेटर हॅरी वाचू शकणार नाही यासाठी आकाशपाताळ एक केलं ... जेव्हा पत्रं यायची थांबेनात तेव्हा त्याने पेटुनिया , डडली आणि हॅरी तिघांना घेऊन लांबवर जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून पत्रं त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीत .. मोजकंच सामान सोबत घेऊन कुठलाही निश्चित मार्ग / जाण्याची जागा न ठरवता त्यांनी प्रवास सुरु केला .. एका स्वस्तातील लॉजसदृश्य हॉटेलात ते थांबले पण सकाळी पाहतात तर हॉटेलच्या मालकिणीने तुमच्यापैकी एच. पॉटर कोणी आहे का , त्याच्यासाठी खूप पत्रं आली आहेत अशी विचारणा केली . त्या पत्रांची विल्हेवाट लावून व्हर्नन बाकीच्यांना घेऊन पुन्हा सुरक्षित जागेच्या शोधात निघाला ... शेवटी त्याला हवी होती तशी जागा सापडली .. समुद्रकिनाऱ्यापासून नौकेने बऱ्याचशा अंतरावर समुद्रात एक दुमजली पडीक मोडकळीस आलेलं झोपडीसदृश्य घर होतं , त्याच्या मालकाला थोडे पैसे देऊन आपली 1 - 2 दिवस तिथे राहण्याची सोय व्हर्ननने केली ... यावेळी समुद्रात वादळी वातावरण होतं ... अशा वादळात पत्रं पोहोचवणं त्या जादूगारांनाही शक्य नाही अशी त्याची खात्री होती . त्या दिवशी हॅरीचा अकरावा वाढदिवस होता .
( रुबियस हॅग्रिड हा डम्बलडोर यांचा एकनिष्ठ सेवक होता . हॅग्रिड हा अर्धदानव होता , त्याचे वडील सामान्य जादूगार आणि आई 20 - 22 फूट उंचीची दानवी होती . जादुई जगात अशा जोड्या अर्थातच खूप कमी आढळून येतात . हॅग्रिडच्या जन्मानंतर त्याला व त्याच्या वडिलांना सोडून त्याची आई निघून गेली , त्याचं पालनपोषण त्याच्या वडिलांनीच केलं . हॅग्रिडची उंची आणि आकार सामान्य माणसांपेक्षा बराच मोठा होता पण तो अर्धदानव असेल असा संशय येण्याइतपत मात्र नाही .. ही गोष्ट त्याने फार कमी लोकांना कळू दिली होती कारण दानव ही प्रजाती अतिशय हिंस्त्र , फारशी बुद्धी नसलेली , आक्रमक होती आणि जादूगार समाजात त्यांच्याबद्दल भीती आणि तिरस्काराची भावना होती .. त्यामुळे लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत या भीतीपोटी त्याने ही गोष्ट क्वचितच कुणाला कळू दिली .. डम्बलडोरना याची माहिती होती पण हॅग्रिडचा स्वभाव इतका पारदर्शक निष्पाप होता की तो पुर्णपणे संतुलित माणूस आहे याबद्दल त्यांच्या मनात कसलीही शंका नव्हती .
हॉगवर्ट्सच्या तिसऱ्या वर्षात एका कारस्थानात त्याला अडकवलं गेलं होतं , त्याला गुन्हेगार सिद्ध केलं गेलं आणि शाळेतून काढून टाकून जादू मंत्रालयाने त्याच्या जादुई छडीचे दोन तुकडे केले होते , पण डम्बलडोरनी त्याला हॉगवर्ट्समध्ये नोकरी दिली , शाळेची छोटीमोठी कामं करणं , इतर काही जबाबदारीची - विश्वासू माणसाची गरज असलेली कामं पार पाडणं इत्यादी.. त्यामुळे हॅग्रिडची डम्बलडोर वर अक्षरशः भक्ती आहे , त्यांच्याविरुद्ध कोणी बोललेलं त्याला सहन होत नाही , त्यांची अनेक वैयक्तिक महत्वाची कामं प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून करायची त्याची तयारी असते , डम्बलडोरचाही हॅग्रिडवर , त्याच्या निर्दोषत्वाबद्दल आणि एकूण मनाच्या शुद्ध चांगुलपणावर , एकनिष्ठतेवर 100 % विश्वास आहे . हॅग्रिडमधला एकच स्वभावदोष म्हणजे तो खूपच सरळ स्वच्छ मनाचा आहे , ठरवलं तर एखादा चलाख माणूस त्याला सहज शब्दात अडकवून त्याच्याकडून वाटेल ते रहस्य काढून घेऊ शकतो , त्याला छक्केपंजे फारसे कळत नाहीत , न बोलायच्या गोष्टी तो क्वचित बोलण्याचा ओघात बोलून जातो . हॅग्रिडचं एकूणच जादुई प्राण्यांवर प्रेम आहे त्यातही हिंस्त्र भयानक प्राणी ही त्याची विशेष आवड , त्याला ते धोकेदायक वाटतच नाहीत , माणसं उगीचच त्यांना घाबरतात आणि जरा समजून घेतलं आणि प्रेमाने वागलं तर असे प्राणी धोकादायक नाहीतच मुळी असा त्याचा गोड समज आहे . काही प्राण्यांच्या बाबतीत त्याचा अंदाज खराही ठरतो पण काहींच्या बाबतीत चुकतो सुद्धा . ते काही असलं तरी जादुई प्राण्यांविषयीचं त्याचं ज्ञान अत्यंत सखोल , प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं आहे यात वादच नाही .. जादुई प्राण्यांचं शिक्षण हा विषय हॉगवर्ट्स मध्ये शिकवला जातो , हा विषय ठरवलं तर सहज शिकवू शकेल एवढं सखोल त्याचं ज्ञान आहे पण शिक्षकाच्या पदाला जी योग्यता / डिग्री लागते ती मात्र शाळेतून काढून टाकल्यामुळे त्याच्याकडे नाही परिणामी 50 वर्षं एका विश्वासू नोकराचं काम करावं लागतं आहे , पण हॅरीच्या हॉगवर्ट्समधील दुसऱ्या वर्षात मात्र ज्या आरोपाने हॅग्रिडला शाळेतून काढून टाकलं होतं त्या आरोपाचं निराकरण होतं आणि जवळजवळ 50 वर्षानंतर त्याचं निर्दोषत्व सिद्ध होतं , त्यामुळे पुढच्या वर्षीपासून डम्बलडोर त्याची जादुई प्राण्यांच्या शिक्षक पदावर नेमणूक करतात .. शिक्षणही पूर्ण नसलेल्या हॅग्रिडला शिक्षकाची नोकरी मिळणं ही अत्यानंदाची गोष्ट असते , ह्या विषयाचा शिक्षक होणं हे मनात खोलवर बाळगलेलं - कुणाकडे बोलूनही दाखवायची हिंमत न झालेलं त्याचं स्वप्न असतं ... )
त्या रात्री त्या भयंकर वादळात हॉगवर्ट्सचा रखवालदार हॅग्रिड त्या बेटावरच्या घरात आला ... डर्स्लींच्या विरोधाला कवडीची किंमत न देता त्याने हॅरीला तो जादूगार असल्याचं सत्य सांगितलं . सुरुवातीला तर हॅरीला हॅग्रिडची काहीतरी चूक होत आहे आपण जादूगार असणं कसं शक्य आहे , कारण तसं असतं तर डर्स्ली कुटुंबाने आपल्याला एवढा त्रास दिला तेव्हा जादूने त्यांना शिक्षा करता आली असती असं त्याला वाटत होतं . पण हॅग्रिडने हॅरीला तुला खूप भीती वाटली किंवा राग आला अशा काही वेळा विलक्षण घटना घडल्याचं आठवतं का असा प्रश्न विचारला .. हॅरीच्या डर्स्लींकडील वास्तव्यात अशा कितीतरी लहान लहान घटना ऍक्सिडेंटल मॅजिकच्या घटना घडल्या होत्याच.. आता त्यांचं कारण समजलं आणि हॅरीचा हॅग्रिडवर विश्वास बसला .
हॅरीची शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यात हॅग्रिडनेच त्याची मदत केली , जादूगारांची अनेक दुकानं असलेल्या डायगॉन ऍले / गल्लीशी , जादूगारांची बँक ग्रिंगॉट्सशी हॅरीची ओळख करून दिली . ग्रिंगॉट्स मध्ये जेम्स आणि लिलीची सगळी संपत्ती म्हणजे सोने चांदी कांस्याची भरपूर नाणी होती .. सात वर्षे हॅरीच्या शिक्षणाची अगदी सहज सोय होऊन उरेल एवढी संपत्ती त्यांच्या लॉकरमध्ये होती . पहिल्या वर्षाची पुस्तकं , कपडे , इतर वस्तू खरेदी करून झाल्यावर हॅरी जादुई छडीच्या दुकानात गेला . छडीतज्ञ ऑलिवॅन्डरच्या मते जादूगार छडी निवडत नाही तर छडी जादूगाराला निवडते ... पहिलीच छडी खरेदी करायला आलेल्या जादूगाराने ती नुसतीच हवेतून फिरवायची असते , कुठलाही मंत्र म्हणायची गरज नसते .. जी छडी त्याला जाणवण्यासारखा अनुभव देईल ती त्याची छडी ठरते .. अनेक छड्यांची ट्रायल घेतल्यावर हॅरीसाठी कोणती छडी अचूक ठरेल याचा अंदाज ऑलिवॅन्डरला आला आणि शेवटी हॅरीला त्याची छडी मिळाली . यावेळी ऑलिवॅन्डरकडून त्याला एक धक्कादायक गोष्ट समजली .. प्रत्येक छडीमध्ये विशिष्ट जादुई प्राण्यापासून मिळवलेला एक कोअर / मूळ जादुई घटक असतो ( उदा . युनिकॉर्नचा केस / ड्रॅगनच्या हृदयाचा तंतू / थेस्ट्रॉलचा केस / फिनिक्सचं पीस व आणखी बरेच आहेत . प्रत्येक छडीसाठी वापरलेलं लाकूड हे वेगळ्या झाडाचं असतं , काही ठराविक झाडं त्यासाठी ठरलेली आहेत , प्रत्येक छडी ही लांबी , जाडी , ठिसूळ पणा , कठीणपणा , लवचिकता , कठोरपणा या अनेक बाबतीत ) .. जी छडी हॅरीची ठरली त्यात मूळ घटक फिनिक्स पक्षाचं पीस आहे , त्या फिनिक्स पक्षाने फक्त 2 पिसं दिली होती आणि त्यातलं एक पीस हॅरीच्या छडीत आहे तर दुसरं वोल्डेमॉर्टच्या छडीत होतं ... वोल्डेमॉर्टसारख्या असामान्य शक्तिशाली जादूगाराच्या छडीची ही जुळी छडी होती आणि तिने नेमकं हॅरीलाच आपला मालक म्हणून निवडणं ही काही साधीसुधी गोष्ट किंवा योगायोग मुळीच नव्हता . ज्यावेळी वोल्डेमॉर्टने हॅरीला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यावेळी त्याच्यात आणि हॅरीमध्ये कसलातरी अज्ञात बंध निर्माण झाला . अर्थात याची ऑलिवॅन्डरला कितपत कल्पना आली माहीत नाही पण जशी अचाट ( पण भयानक ) कामं वोल्डेमॉर्टने केली तशीच अचाट कामं हॅरीच्या हातून घडण्याची शक्यता आपल्याला वाटते असं त्याने बोलून दाखवलं . पुढच्या पुस्तकांमध्ये हॅरी आणि वोल्डेमॉर्ट मध्ये नक्की कशामुळे हा बंध उत्पन्न झाला त्याची सविस्तर माहिती मिळते .
हाही भाग मस्त झालाय! पुभाप्र!
हाही भाग मस्त झालाय!
पुभाप्र!
धन्यवाद ... ☺️ हा शेवटचा होता
धन्यवाद ... ☺️ हा शेवटचा होता .. एवढेच लिहिलेत .. आणखी एक अर्धा लिहिला होता पण तो मलाच आवडलेला नाही आणि अनावश्यक माहिती फार लिहिली जातेय असं वाटून बंद केलं पुढे लिहिणं ...
अरे अरे थाम्बवू नका सिरिज!
अरे अरे थाम्बवू नका सिरिज! बुक्स आणि मूव्हीज चे पारायण होउन सुद्धा वाचायला मजा येतेय.
खूप छान लिहिलय तुम्ही....काही
खूप छान लिहिलय तुम्ही....काही प्रश्न जे पडले होते त्यांची उत्तरे मिळाली....हॅरी पॉटर सिरीज चे सगळे movies खूप आवडते आहेत आणि ही सिरीज देखील....प्लीज पुढचे भाग लिहावे... विशेषतः शेवटचा भागात काही भाग कळालं च नाही....
लवकर टाका पुढचा भाग... वाट बघते..
धन्यवाद ☺️ प्रयत्न करते
धन्यवाद ☺️ प्रयत्न करते लिहायचा ..
लोकांनी हॅपॉ वाचावं म्हणून
लोकांनी हॅपॉ वाचावं म्हणून तुम्ही लेख लिहिताय ना?
हे नवनीत गाईड झालंय. असो.
अरेरे, इतकी छान लेखमालिका
अरेरे, इतकी छान लेखमालिका एवढ्यातच संपली, ये ना चोलबे. अजूनही पुभाप्र!!!!
(आणि नसेल लिहायचा तर तो अर्धवट भाग संपर्काद्वारे तरी पाठवा, तेवढीच अजून ज्ञानात भर!)
धन्यवाद ☺️ प्रयत्न करते
धन्यवाद ☺️ प्रयत्न करते लिहायचा ..
Submitted by radhanisha on 12 October, 2019 - 00:45
>>>>
पुढचा भाग येऊ दे लवकर
पुढचा भाग येऊ दे लवकर >>>+१
पुढचा भाग येऊ दे लवकर
>>>+१
पुढचा भाग होऊनच जाऊ दे ... !
पुढचा भाग होऊनच जाऊ दे ... !