दादूचं भूत

Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 October, 2019 - 03:47

दादूच भूत….

टुकारवाडी एक आडगाव ज्याला सुधारणेचं वावडं होतं. याचा अर्थ असा नाही की या गावालाच सुधारणा नको होत्या. पण त्यांच्यावाचून लोकांच काहीच अडत नसे. गावात वीज, दवाखाना, शाळा, रस्ते, एस टी नसल्याने या लोकांचं काहीच अडत नव्हतं. लोक प्रत्येक समस्येवर आपापल्या परीने मात करत होते.

सुधारणेच्या बाबत तसा संपूर्ण तालुकाच दुर्लक्षित होता. कारण एकच देशाचं राजकारण एका दिशेला आणि या तालुक्याच राजकारण त्याच्या विरुद्ध दिशेला. विरोधी पक्षाचे पुढारी फक्त सत्यनारायण पुजा,लग्न, उरुस, यात्रा, मैत, दहावं यात दिसायचे. लोक म्हणायचे आमचं आमदार ल‌ई माणूसकीचं, एवढं तालेवार पण बारीकसारीक कारणासाठी आमच्यात येतात. पावसाळ्यात रस्ता खचायचा. तरकारीचा ट्रक गुडघाभर चिखलात रुतून बसला की तेवढ्याच जागेत मुरुम टाकला जायचा. कागदोपत्री पक्का रस्ता वाहून गेलेला असायचा. कुठल्याच बाबतीत प्रगती होत नव्हती. भरीसभर इथल्या लोकांची उदासीनता. आपल्या मागण्या लावून धरण्यासाठी लोकांजवळ वेळ नसे.

लोकोपयोगी काम पूर्ण का होत नाहीत म्हटलं की सरकारचा सापत्न भाव असं सांगून आमदार वेळ मारुन नेत.

टुकारवाडीचं अजून एक वैशिष्ट्य आहे. या गावात टुकार लोकांची कमतरता नाही. बहुदा यावरुनच गावाचं नाव टुकारवाडी पडलं असावं.

टुकारवाडीच्या पंचायत कार्यालया जवळ भला मोठा पार आहे. त्याच्या मधोमध असलेलं वडाचं झाड पडलं आणि पाराला पोरकं झाल्या सारखं वाटलं. हे पोरकंपण त्याला दुपारच्या रणरणत्या उन्हात जास्त ठसठसायचं. एरवी पावसाळा सोडला तर पार सकाळ, संध्याकाळ अणि रात्री माणसांनी फुललेला असायचा. पार गावक-यांचा झोपण्यापूर्वीचा गप्पांचा अड्डा आणि झोप आल्यावर वातानुकूलित शयनकक्ष असायचा. रात्री उशिरापर्यंत गप्पा झाल्यावर एक एक गडी डाराडूर घोरत पडायचा. पाच साडेपाचला कोंबड आरवलं की पाराला जाग यायची. एकदोन गडी सोडलं तर बाकी गडी उठायचं. वाकाळ खांद्यावर टाकायची. घरी जाऊन चिनपाट घ्यायचं अन उजाडायच्या आत हागनदारीला जाऊन यायचं. आंघोळ, चहा झाला की शेतात जायचं हा शिरस्ता. सकाळी काकडा, देवदर्शन करुन म्हातारीकोतारी माणसं पारावर गप्पा करत बसायची. दिवस माथ्यावर चढल्यावर पार एकटा पडायचा.

दिवस रात्र चालणा-या गप्पांची पुंजी म्हणजे पाराच्या लॉकरमधली सुरक्षित ठेवच एखाद्या बॅंकेच्या लॉकर सारखी. पाराच्या चि-याचि-यात टुकारवाडीचीच नव्हे तर पु-या पंचक्रोशीतील अगणित गुपितं लपलेली. कोण कसा याची खडानखडा माहिती पाराला होती. इथल्या लोकांचे राग, रुसवे, प्रेम, स्वार्थ, औदार्य, दुबळेपण, माजोरीपण, लफडी, कुलंगडी, सुख, दुःख, प्रगती, अधोगती आदी सा-या गोष्टी तो पुराणपुरुष वर्षानुवर्ष ऐकत होता. एवढच नाही त्याला देश-विदेशातल्या घडामोडी देखील इत्यंभूत माहित होत्या. यातल्या काही गावक-यांनी सांगितलेल्या तर काही बाजूच्या पंचायत कार्यालयातील बॅटरीवर चालणा-या रेडिओवर ऐकलेल्या. माझ्या लेखी या पाराला एखाद्या जागतिक वारश्याचे महत्व आहे.

मी जेव्हा जेव्हा या पारावर बसायचो तेव्हा तेव्हा तो सारं मला जसच्या तसं सांगायचा आणि म्हणायचा आता कसं मन मोकळं झालं. वरती असंही म्हणायचा की एवढ्या सा-या भानगडी पोटात ठेवल्याने माझं पोट फुटेल की काय असं वाटायचं. अगदी कालच पाराणे सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो.

जेवणखाणं झाली व्हती. पारावर झोपणारा एक एक गडी गोधडी घेऊन जडावलेल्या पावलानं अंधारात चाचपडत येत होता. मधेच कोण भेटल्यावर त्याच्याशी बोलायचं म्हणजे एकदम जवळ आल्यावर गडी अंधुक दिसल्यावर विचारायचं “कोन हाय”. मग पुढच्या गप्पा. हातात कंदील असेल तर तोंडासमोर कंदील करायचा. गावात अद्याप वीज आली नव्हती. कधी रस्त्याच्या कडेच्या घरातला मीनमिनत्या दिव्याचा थोडासा उजेड रस्त्यावर पडायचा तेवढ्याच ठेचा कमी व्हायच्या. नामा नाव्ही गोदडी खांद्यावर टाकून नेहमी सारखा पारावर झोपायला चालला होता.
नामा पारावर आला तेव्हा दोन-तीन गोधड्या एकाला एक चिटकून अंथरल्या होत्या. एका कोप-यावर कुणीतरी कंदील ठेवला होता. भिवा जगताप आणि चौकडी त्यावर बसली होती. रोज गडी मोकळ्या वा-यावर सनाळ्या ठोकायचे. या गप्पा त्यांना चिंता अणि श्रम विसरायला लावायच्या. आज गप्पांची गाडी भराभर रुळ बदलत भुतांवर येऊन थांबली. तेवढ्यात नामा गोदडीवर बसला.
तसा भिवा नामा नाव्ह्याला म्हणला
“आयला नामा खरच त्वा भूत पाहीलं ?”
“व्हय तर! आरं म्या तर दादूच्या भुताची मसनवटीत हजामत करतो”.
तेवढ्यात आडवं पडलेला शिवा सपकाळ आपल्या गरगरीत तोंदीवर हात फिरवत म्हणला
“आयला, दादूचा लय जीव गुतला व्हता पोराबाळात, ऐन जवानीत मेला म्हंजी बायकूत पण आडाकला असणार, म्हून भूत झाला.”
भिवाने शंका काढली
“काय उपेग. त्याची बाईल पोरांना घेऊन तिच्या माहेरी राहते. नाम्या लेका तुलाच बरं मसनवटीत भेटलं दादूचं भूत ? तिच्या मारी दाद्या जितं असतानी सा सा महिनं हजामत करायचं नाय. नाच्या सारखं झिप-या वाढवायचं.”
“आरं म्या कशाला खोटं बोलू ”
तेव्हड्यात ना-यानी पच्चाकनं पिंक टाकून त्वांड उघाडलं.
“ नाम्या कशाला तुंबड्या लावतो, तू कवा जित्याची फुकाट हजामत करीत नाय ती भुताची करणार हाय व्हय ? “
“ आरं काय सांगू केली बाबा मला त्याच्यापसनं मुक्ती मिळावी म्हून. झपाटलं असतं तं केवढ्याला पडलं असतं.”
भिवा “ हा ते बी खरं हाय. पण तू कवा केली हजामत तेची?”
नाम्या “ आर म्या बाजारच्या दिशी धंदा कराया दौलतगावला गेल्तो. परत यायला उशीर झाला. आमुशा व्हती . मसनवटीत आलो तर हा किर्रsss अंधार. डोळ्यात आपलचं ब्वाट गेलं तरी दिसणार नाही. वा-यानी पिपरणीच्या पाणांचा सूsss सूsss आवाज येत व्हता. त्यात मधीच दोन वटवाघळं चिर्रsss करत माझ्या टोपीवरुन उडली. बाजूच्या चितेचं इझत आलेलं निखारं मधीच वा-यानी अर्धवट फुलायचं. त्याचा लाल उजेड उरात धडकी भरवायचा. त्या उजेडात पिपरण मधीच उलशीक दिसायची मधीच गुडुप व्हायची. माझं धोतार वल्ल व्हायची यळ आली. तोंडानी राम राम म्हणत सायकल ढकलत व्हतो.”
आत्ता ऐकणारी मंडळी अगदी एकमेकाला चिकटून बसली. कुणाच्या तोंडाला कोरड पडू लागली. कोण लगविला जायला देखील घाबरु लागला.
नाम्या पुढं म्हणाला
“तेवढ्यात सायकल पुढं रेटत नाही हे ध्यानात आलं तसं माझं धाबं दणाणलं. मला वाटलं राम नामाची मात्रा काही चालत नाही कारण आपण एवढं पुण्य कुठं केलंय. जवा सायकलीचं चाक दगडावरून आपाटलं तवा कळलं सायकल पंचर झाली. पिपरणीची पानं पुन्हा सळसळली. मला वाटलं भुतच झाड गदागदा हालवतय. तसं माझं ध्यान पिपरणीच्या खोडाजवळ गेलं. “
आता ऐकणाऱ्यांची उत्सुकता ताणली गेली. काहींच्या तोंडाला अजूनच कोरड पडली. काहींनी आपली जीभ ओठांवरुन फिरवली एकमेकाला अधिक चिकटून बसले. सगळ्यांचे कान टवकारले होते.
नाम्या :-
“इझत आलेल्या निखा-यांच्या उजेडात पिपरणीच्या बुडाला कोणतरी टेकूण बसल्याचं दिसलं. तेवढ्यात पिपरणीवरचं घुबाड घुतत्कारलं. माझ्या आंगाला दरदरून घाम फुटला. कापडं वलीचिप्प झाली. राम, राम जोरात म्हणत होतो. “
पिपरणी खालून आवाज आला
“नामा भिऊ नगस. आरं म्या दादू . म्या तूला काय बी करणार नाही. फकस्त माझी हजामत करत जा”
ऐकणा-यांनी तोंडावर हात ठेवलं.
भिव्याच असामान्य डोकं :-
“नाम्या बहुतेक त्याला हाडळ मिळाली आसल. तिला दादूनं टापटीप राहवं वाटलं असणार. पण भुतात हजाम नव्हता का?”
भिवाच्या बोलण्यावर थोडावेळ खसखस पिकली. पुन्हा सगळे शांत झाल्यावर नामा म्हणाला
“ दादूचं भूत सांगत व्हतं हजाम हाय! पर त्यो मुख्य भुताचा खास हजाम हाय. त्या पुढारी भुतानी आदेश काढला म्हणं. समद्यांनी त्याच्यागत दाढी केस यवस्थित कापायचं. कायतर म्हणं वाढलेले केस, नख, विद्रूप रुप अशीच आपली इमेज. ती पुसायला पायजे. आता एक हजाम त्यो किती पुरणार एवढ्या समद्या भुतावळीला ? बाजूच्या २-३ गावात त्योच जातो. मग ठरलं ज्यानी त्यानी आपापल्या सोईपरमाण करायचं पण टापटीप राहयचं. नामा लय रांग असतीय त्या कारागीराकडं. मला कटाळा येतो. तूच करत जा माझी हजामत.
याच्या आयला भूतं सुधारली पण आपलं गाव सुदरना. हातभर दाढी वाढतीया तव्हा गडी भादराया येतो. वस्ता-याची पार वाट लागतीया. उधारी थकतीया. बलुतं धड कोन घालत नाय.“
तेवढ्यात ना-या पचाकला
“आयला तुला कसं रं दिसलं दादूचं भूत? म्या कितीदा रातचा मळ्यातनं येतो तवा नाय दिसत. ”
भिवा :-
“ च्या मारी तुझा देवगण आसल. आरं देव गण आसल्याव नाय दिसत.”
ना-याचं खाणंपिणं, वागणं खरंतर राक्षसाचंच पण गण मात्र देव. भिव्याला हासायला आलं बोलता बोलता.
भिवा :-
“ आरं दोन गण असत्यात. काहींचा देव तर काहींचा राक्षस. म्हणजी हा नाम्या राकूस म्हणा की.”
संप्या :- “आरं तसं आसलं तर म्या बी राकूस.”
नाम्या :- “ तुला कुठलं भूत दिसलं?”
संप्या:- म्या पठारावनं येत व्हतो रातच्याला. जसा पठार चढलो चार पाच खुटनावर हा दिवटयांचा लखलखाट. ढोल वाजत व्हता. गडी लेझीम खेळत व्हतं. कपाळावर भंडार फासलेला. जीभा बाहेर लोंबकळत व्हत्या. टोकदार उभ कान. सुळयागत दात. पटक्यातून हातभर केसं बाहेर, दाढी, हाताची नखं वाढलेली, पाय ऊरफाटं. समदं भयान. मला घाम फुटला तव्हा आठावलं आज सोमती आवस. आन त्याच दिसी पठाराव भुताचा छबिना निघतो आसं आजा म्हणायचा. म्या जी धुम ठोकली घरच गाठलं.
भिवा :- आरं मला बी आबा सांगायचा पडक्या बारवत हाडळ हाय. पांढरी साडी नेसून रातची बाहेर येती. दिसायला ल‌ई सुंदर हे. कोण बाप्या दिसला की वश कराया बघती.
असं म्हणत भूतं कुठं असतात, कशी दिसतात त्यांचे प्रकार कुठले या विषयावर बरेच चर्वतचर्वन झाले. एरवी पडल्या पडल्या घोरणा-या मंडळीच्या आज झोपा उडाल्या होत्या.
बराच वेळ गुळणी धरुण बसलेल्या शिवानं तोंड उघडलं.
“तो नामा काय म्हणतोय ते तरी ऐका आधी थोतरीच्यांनो. का लागला आपलं घोडं दामटाया.”
ना-या –
“कसलं काय ? मला वाटतं भूतं नसत्यात.”
शिवा –
“ ना-या देव हायं ?”
ना-या :-. हा हाय.
शिवा :- “तसंच भूतं बी आसत्यात. आता देवगण वाल्यांना ते नाही दिसत.”
अशी भूत या विषयावर प्रबंध लिहिण्या इतकी माहिती उजेडात आली. अन शिवा समेवर आला.
हं नामा तू सांग रं पुढची गोष्ट.
मग नामा पुन्हा रिवाइंड करुन मसनवटीत गेला.
त्यानं धोकटी सायकलीवरनं खाली ठेवली. तिच्यातून साबण, वाटी, वस्तरा, एक मधेच खोलगट पातळ दगडाची साहन काढली. वाटीत पाणी घेतलं. चपटा बारीक साबण वाटीत ओला केला. दादूचे केस ओले केले. दादूचे केस कसले जटाच त्या. कितीही भिजवण्याचा परयत्न केला तरी लवकर भिजना. त्यावर ओला साबण चोळला. नामाने दगडी साहनेवर दोन थेंब पाणी टाकलं. वस्तरा खाट खाट करत साहनेवरुन फिरवला. दादूची हजामत म्हैस भादरल्यासारखी खर्र खर्र केली.
दादू खूष झाला म्हणला कुणी बी तुला त्रास दिला तर मला सांग. मी झपाटतोच त्याला. आसं म्हणून दादू गडप झाला. आन म्या घरी आलो. बराच वेळ गप्पा झाल्या. काही पडल्यापडल्या घोरु लागलं.काहींचा डोळाच लागना. बंद डोळ्यासमोर भूतं दिसू लागली.

त्यानंतर भिव्यानं अन शिव्यानं अमावस्येच्या रात्री दादूला मसनवटीतून धोकटी घेऊन येताना पाहिले आणि त्यांची खात्री झाली दादूच्या भुताची हजामत करुन नामा आला. गावभर बोभाटा झाला नामूला दादूचं भूत वश झालं.

त्या दिवसापासून नामूची गावात वट वाढली. त्याच्या वाटेला कोण जात नसे. बलुत्याचे पाचूंदे देखील दाणेदार झाले. शेतातला भाजीपाला सहज मिळू लागला. उधारी बंद झाली. पोरांच्या अंगावर चांगली कापडं आली. सणासुदीला गोडधोड मिळू लागलं. नामाची बायको इरकल नेसू लागली. गळ्यातलं काळं मणी जाऊन ठसठशीत मंगळसुत्र आलं. नामा मसराईचं धोतर नेसू लागला. मांजरपाट सदरा जाऊन हरकचा आला. नव्या धोकटी बरोबर नवी हत्यारं,पावडर, साबण आले. सपरा जागी भेंड्याचं घर आलं अन वाढता व्याप सांभाळायला नवी सायकल आली.

नामाच्या बायकोलाही बरं वाटलं. नव-याच्या कामाचा योग्य मोबदला मिळतो पाहून ती सुखावली.
सगळं सुरळीत चालू होतं पण भिव्या जगतापाला काय नामाचं सुख बघवना. एक रात्री भिवा, शिवा, ना-या, नामा पारावर असताना असाच भुताचा विषय निघाला.
“ आयला नामा तू तर दादूला वरचेवर भेटतो. माझी बी गाठ घालून दे की माझं पैस ऊस्ण घेतलं व्हतं त्यानी. त्याची बायको पोरांना घेऊन गेली माहेरी. इथ असताना मागितलं तर म्हणली कशावरुन त्यानी घेतल पैसं तुझ. ”
नामा :- “आं! मग दादूच्या भुतानं तुला माझ्या बरं बघितल्याव त्ये मला तिथच गाडील की. आन त्यांच्या दुनियेतलं पैसं आपल्या दुनियेत नाय चालत.”
“बरं ! नाय पैसं मागत त्याला. म्या लांबच थांबल. नूस्त बघू दे दादूचं भूत कसं दिस्त ते तरी”.
भिव्याच्या हा मध्ये हा मिळवत शिवा आणि ना-याही म्हणाले आमाला बी बघायचय भुत कस असत? हो ना करता येत्या आमुशेला मसनवटीत नामाच्या मागूमाग जायचं गुप्त ठराव झाला.

अमावस्या कधी येते असं त्यांना झालतं. भुताला आपण दिसू नये म्हणून सगळ्यांनी अंगावर घोंगड्या घ्यायचं ठरलं. हा हा म्हणता अमावस आली. किर्रsss काळोखी रात. रात्रीची जेवणं आटपून झोपायला जातो सांगून मंडळी पारावर आली.
रात्री बाराच्या ठोक्याला नामा, भिवा, शिवा, ना-या वेशीत आले. सगळ्यांनी घोंगड्या पांघरल्या. फक्त डोळे उघडे. एकमेकाला खुणेने किंवा दबक्या आवाजात काहीतरी सांगत होते. गावात सामसुम होती. वेशीत एक कुत्र त्यांच्याकडं पाहून भुंकलं तसं आजुबाजुला इतर चार कुत्री भो भो करु लागली. शिव्यानी एक दगड भिरकावला. तो कुत्र्याच्या जिव्हारी बसला तसं ते कुई कुई करत पळालं. थोड्याच वेळात पुन्हा भयाण शांतता पसरली. सगळे एकमेकांना पकडून चालू लागले.
वेशीच्या बाहेर प्रेतयात्रेच्या विसाव्याची जागा होती. गावातल्या मैताची तिरडी इथे खाली ठेवली जायची. अश्म्याचा खडा इथून घेतला जायचा . प्रेताला नैव्यध्य ठेवत. त्या जागेला गुलाल, हळद, कुंकु वाहत. लाह्या ठेवत.
ना-या सगळ्याच्या मागे चालेला. तो धप्पकन पडला. त्याला दरदरून घाम सुटला. बोबडी वळली. तो म्हणू लागला माझं पोट दुखतया. मी घरी जातो. नामा, भिवा, शिवा समजायचं ते समजले. त्यांनी ना-याला जाऊ दिले.
जसजसं स्मशान जवळ येत होतं तिघांच्या काळजाची धडधड वाढत होती. पिपरणीच्या पाणांचा सूsssss सूssss आवाज येऊ लागला. दूर कुत्र विव्हळ्याचा आवाज येऊ लागला. आता नामालाही घाम फुटला होता पण काय बोलू शकत नव्हता. एवढयात शिवाचा पाय भिवाच्या घोंगडीवर पडला तसे तिघेही फुपाट्यात कोसळले. वाघळं फडफडली. टिटवीनं कलकलाट केला. सगळ्यांचे हातपाय लटपटत होतं. भिवा आणि शिवा म्हणाला
“ नामा आमी हितच थांबतो गड्या तू ये दादूची हजामत करुन. आमी हितूनच बघू. “
नामा उसणं आवसान आणत मसनवटीच्या दिशेनं निघाला. तो मसनवटी जवळ पोहचला. इतक्यात कोबंडं वराडल्याचा आवाज आला. ज्या दिशेने तो आवाज आला तिकडे नामाची नजर गेली. बघतो तर एक भुताची आकृती पुढे सरकताना दिसली. नामा आला त्या दिशेने धावू लागला. भिवाला, शिवाला हलकेच आवाज दिला तर तेही नव्हते. भिवा आणि शिवा जागेवर नाहीत बघून नामाच्या तोंडच पाणी पळालं. पण थोडं पुढं आल्यावर त्यानं निश्चय केला की तो घाबरला होता हे कोणाला सांगायचं नाही. तो अनेक आमावसेला स्मशानातून आला पण असे कधीच झालं नाही.
तो पारावर येईपर्यंत भिवा आणि ना-या भुताच्या भितीनं एकमेकाला चिकटून डोक्यावरून पांघरुण ओढून पडले होते. जागे असले तरी कोण आलाय हे पहाण्याची हिम्मत उरली नव्हती. नामाही तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत कलंडला.
मंगळवारी हजामत करणा-यांची गर्दी उसळते म्हणून पहाटेच नामा घरी आला.

सकाळी सहाच्या सुमारास भिवा आणि शिवा उठून बघतात तर नामा जागेवर नाही. भिवा शिवाला म्हणला
“ आयला नामा लय डेरिंगबाज. माझी तं बोबडी वळली दादूचं भूत बघून. “
“आरं म्या तं डोळंच मिटलं. तू पळ म्हणला तवा सुदीवर आलो”.
“ आयला नामा दादूला भादरुनच आला असणार.”
“व्हय, व्हय”
दोघांनी वाकळा खांद्यावर टाकल्या अन घराकडं निघाले.
रामोशी आळीच्या शिरपा रामोश्याच्या घरी आज सण होता. मागचे दोन चार दिवस कुठच काही कामगिरीवर जायला मिळालं नाही. त्याच्या म्हाता-यानी अंथरुन धरलं. कधी घटका भरल अंदाज येत नव्हता. त्यामुळे खाण्याची आबाळ झाली. तशात म्हातारं म्हणलं शिरपा मला मटान खावसं वाटतय. शिरपाला म्हाता-याची शेवटची इच्छा पुरी करता येत नाही म्हणून खूप वाईट वाटलं. कुणाच्या शेतातनं कणसंबिणसं मिळाली तर चोरावी म्हणून अंधारात तो बाहेर पडला. बाबुराव मस्कयाच्या वावरातली थोडी बाजरी खुडली. आंकुश लवटेच्या वावरातली मकची कणसं घेतली. गठूडं बांधलं आणि घरी निघाला.

वाटेत त्याला मसनवटीत लागली. मसनवटीत त्याला कोंबडं ओरडल्याचा आवाज आला. शिरपाचं डोळं अंधारातही मांजरा सारखं चमकलं. त्याला म्हाता-याची आठवण आली. म्हाता-याला मटान हवं होतं पण देवानी कोंबड धाडलं म्हणजे आंधळं मागतं एक डोळा आन देव देतो दोन असच शिरपाला वाटलं. त्यानं गठूडं खाली ठेवलं. लागला कोंबड्यामागं पळायला. अंधारात कोंबडं हाताला लागना. पण शिरपाला महाभारतात अर्जुनाने बाणाने पक्ष्याचा डोळा कसा फोडला ती कथा आठवली. शिरपाला आता मसनवटी, अंधार काही काही दिसत नव्हतं. त्याला फक्त कोंबड दिसत होतं. क्षणात शिरपाने आपले पोलादी पंजे कोंबड्या भोवती कसले. कुणीतरी लागिरलं असाव गावात म्हणून उरफाट्या पंखाच कोंबडं अंगावरुन उतरुन सोडलं होतं. शिरपानं गठूडं उचललं कोंबड घेतलं कुणाला दिसू नये म्हणून वगळीच्या वाटनं घर गाठलं.

पहाटं लवकर उठून केली कंदूरी. शिरपाच्या बायकोने कोबंड हळद मीठ लावून शिजवलं . पाट्यावर वाटण वाटलं अन चांगल झनझनीत रश्याच कालवण केल. शिरपानं आणलेली बाजरीची कणसं मोगरीनं बडवली. दाणं सुपात पाखडलं. जात्यावर दळलं. अन बाजरीच्या लुसलुशीत हिरव्यागार भाकरी थापल्या.

गेले तीन चार दिवस म्हाता-याच्या बरोबर सारं घर पेजेवर होतं. सगळ्यांच्या तोडंची चव गेली होती. अशात कोंबडीचा रस्सा अन बाजरीची गरमागरम भाकर. जगणं सार्थकी लागलं होतं.

म्हाता-याने रश्यात कुस्करुन पोटभर बाजरीची भाकर खाल्ली. त्याच्या चेह-यावर समाधान ओसंडत होतं. ते पाहून शिरपाची बायको शिरपा, धन्य झाले. म्हातारं समाधानाने मेलं म्हणजे भूत होणार नाही असाच विचार त्यांनी केला. आज ते दोघेही दोन घास जास्तच जेवले.

भिवा आणि शिवाने गावभर बातमी पसरवली
“ नामाने दादूच्या भुताची काल हजामत केली”. भिवाची नामाबद्दल असलेली पोटदुखी थांबली.
दादूच्या कृपेने नामाचा पोटापाण्याचा धंदा तसाच व्यवस्थित चालू राहीला.

आता नामा गावात प्रतिष्ठीत माणसात बसू लागला. नामाने पठारावरचा भुतांचा लेजमीचा खेळ पण पाहिला. वडाखालचं भूत नामाची तंबाखू चाखू लागलं. बारवतली ठकी हडळ नामूला राखी बांधू लागली. या आणि अशा कैक वावड्या गावभर उठू लागल्या.
आणि
शिरपा रामोशी अमावस्येला काळी कापडं घालून शिवारात जाऊ लागला. त्या कापडांवर त्याने चित्रातल्या भूता सारखं पांढरं पट्ट ओढलं व्हतं. त्यामुळ त्यो कधीच कोणाच्या हाती लागला नाही.
( प्रेरणा - जेष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांची भुताचा जन्म )

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली कथा,
द मां बरोबर शंकर पाटलांचीही आठवण झाली

भारी लिहिलयं.

टुकारवाडीच्या आमदाराच वर्णन वाचून पुरंदरच्या त्यावेळच्या आमदाराची आठवण झाली Wink

@ आसा खूप धन्यवाद...
<<<<टुकारवाडीच्या आमदाराच वर्णन वाचून पुरंदरच्या त्यावेळच्या आमदाराची आठवण झाली >>>> Happy
आता बदललय का ? Happy

Lol मस्त मजेदार लिहिलं आहे. तुमच्या ग्रामीण कथा आवडतात. नाही तर ग्रामीण भाषा असली तर माझा पास असतो. कंटाळा येतो वाचायला. मात्र तुम्ही लिहिलेल्या सगळ्या कथा वाचल्या आहेत आणि आवडल्या.

Rofl भारीच झालीय भुताची कथा... विनोद आणि भाषा चपलख बसलेत अगदी एकदम आवडली

>>द मां बरोबर शंकर पाटलांचीही आठवण झाली>>+१११

@ नेहा विलास धन्यवाद
@ shraddha धन्यवाद दोन स्मायली हेच निदर्शक कथा खूप आवडल्याचे.
@ हर्पेन धन्यवाद... खूप मोठी तुलना...
@ शाली धन्यवाद धमाल प्रतिसादाबद्दल...
@ उमानु धन्यवाद, निखळ हास्य, तुम्हीही खूप मोठी compliment दिलीत. प्रतिसाद जबाबदारी वाढवतोय.
@ सिध्दी तीन स्मायली खूप आनंद दिला या कथेने... धन्यवाद
@ अज्ञातवासी धन्यवाद... तुमचा प्रतिसाद अपेक्षित होता.
@ किल्ली खूप हसू आले वाचताना... धन्यवाद.. लिखाण खूप आवडले.
@ प्राचीन धन्यवाद, बनगरवाडी एक उत्तम कलाकृती आहे.
@ मीरा धन्यवाद.. माझ्या ग्रामीण कथा विशेष आवडतात. खूप दिलासादायक...
@ सामो धन्यवाद तूफान प्रतिसाद आवडला. असेच तूफान लिहिण्याचा प्रयत्न करीन.

@ आसा धन्यवाद नंतर विपु करतो.
@ शशांकजी धन्प्यवाद
@ मन्याS धन्यवाद

तुमचे सर्वांचे प्रतिसाद हुरुप वाढवतात.

@ labad kolha
>>>>रामोशी लोकांना चोर दाखवून लेखकाची जातीयवादी मानसिकता दिसून येते.>>>
तुम्ही असा गंभीर आरोप करण्यापूर्वी माझे आधीचे लिखाण तपासायला हवे होते. आपल्या माहिती साठी त्या लिंक देत आहे.
https://www.maayboli.com/node/66190
https://www.maayboli.com/node/70196
https://www.maayboli.com/node/69955
https://www.maayboli.com/node/67605

मी आपल्या मताप्रमाणे जातीवादी असतो‌ तर त्या विरोधात सातत्याने असे लिखाण झाले नसते.
लेखक समाज मनाचा आरसा असतो हेही विसरता कामा नये.
मायबोलीवर येऊन दोन वर्षा पेक्षा अधिक काळ झाला पण कोणी असा आरोप केला नाही. दोन वर्षात ब-यापैकी लिहिले.
आपला आय डी खरा नसावा. तसे असेल तर डु आयडीचे मनावर घ्यायचे नसते एवढं शिकलोय. हा तुम्हाला माझा शेवटचा प्रतिसाद…
आपण इतरांना फसवू शकतो स्वत:ला नाही. माझ्याच डोळ्यात माझे पतन होणे योग्य नाही.
असो कळावे लोभ असावा....

अहो परिस्थितीमुळे पोटासाठी चोरी कोणत्याही समाजाचा माणूस करील. इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेल्या समाजांना लोकशाहीत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि आपण जातीयवादी मानसिकता दाखवून रामोशी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

मला एक कळत नाही शिरप्या रामोशी म्हणजे आख्खा रामोशी समाज कसा ब्वॉ? लबाड कोल्हा यांच्याच मनात खोट असण्यास जागा अहे निदानपक्षी त्यांचाच चष्मा वेगळा असेलही.

परवा अजिंक्य पाटील यांनीही लिहीलेलं होतच ना एक जोशी म्हणून बाई होत्या त्यांचा नवरा चावायचा त्यांना काय कायसं. म्हणजे ब्राह्मणांच्या घरातच डोमेस्टिक व्हायलन्स होतो असा अर्थ घ्यायचा का?

ट्रोल बील काही नाही. आक्षेप फक्त हाच आहे की विशिष्ट वंचित लोकांना चोरांची पात्रे दाखविणं चुकिच आहे. खालच्या जातीतील लोकांना गृहित का धरले जाते म्हणते मी. ब्राह्मणी कावा आणि ब्राह्मणाचे कसब यावर का लिहिलं जात नाही.

Pages