चतुर कोल्हं स्वांग करतंय (आफ्रिकन लोककथेचा स्वैर अनुवाद)

Submitted by रमणी on 1 October, 2019 - 12:36

"कुssईं.... चला पिलांनो, इकडं या!", चंपकारण्य जंगलातल्या कोल्ह्यांच्या कळपातली एक आज्जी कोल्ही उन्हाळ्यातल्या एका गरम दुपारी कळपातल्या सगळ्या छोटुल्या कोल्ह्यांना हाक मारत होती. उंच कपॉक वृक्षाच्या ढमाल्ल्या खोडाच्या पायथ्याशी गारेगार हिरव्या सावलीत ती बसली होती. नुकतीच पाणी पिऊन आलेली पिल्लं उन्हात पळू नयेत, म्हणून आज्जीने आज एक गोष्ट सांगण्याचा घाट घातला होता.

"कूं कूं" करीत सगळी पिल्लं तिच्याकडे धावत आली. त्यातलं छकोल्लू नावाचं पिल्लू तर तिच्या अंगावरच चढून लाडीगोडी करू लागलं.
"मुलांनो, चतुरपणा हा आपल्या कोल्ह्यांच्या अंगचा मोठा गुण आहे बरं. आणि आपला चंपकारण्य कोल्हेसमाज तर अख्या जगात आपल्या चातुर्याचा लौकिक मिळवून आहे. आपल्या पूर्वजांनी तर चतुरपणाच्या बळावर जंगलाच्या राजालाही बरेचदा हरवलं आहे!"
"हाँ! सिंहाला? खरंच?? आपल्या आत्ताच्या चंपकेश सिंहाएवढ्याच शूर सिंहाला हरवलं होतं?
मला तर तो समोर आला की घाबरायलाच होतं आज्जी!" छोटी मिक्कूल्ली कुईली. ( माणसं बोलतात तसं कोल्हे कुईतात बरं का! म्हणून तर आपण कोल्ह्यांच्या ओरडण्याला 'कोल्हेकुई' असं म्हणतो.)

"अगं, चंपकेश म्हणजे काही एवढा शूर नाही बरं! हल्ली कुठे इतके शक्तिशाली सिंह आलेत! आमच्या लहानपणी सिंह कसला होता म्हणून सांगू... तो आला ना की आपल्या जंगलातल्या हत्तींचा कळप पण पाणवठा सोडायचा. असा दरारा होता चंपकराज महाराजांचा! ह्या चंपकेशाचे ते पणजोबा बरं का."
सगळ्या कोल्ह्यापिल्ल्यांनी आपले कान टवकारले. एकमेकांची ढकलाढकली थांबवून आता सगळे कपॉकच्या हिरव्या सावलीत जागा धरून बसले होते. आज्जीचं सूतोवाच ऐकून, आता एक भारी गोष्ट ऐकायला मिळेल अशी त्यांची खात्री झाली होती. आज्जीपण आपली पिल्लांना उन्हात जाऊ न देण्याची युक्ती बरी साधतेय, हे बघून समाधानाने स्वतःशी हसली. मग पुढची गोष्ट सांगायला लागली.

कोणे एके काळी आपल्या ह्या जंगलात भुबेसी नावाचा सिंह होता. (झुलू लोक जंगलाच्या राजा सिंहाला भुबेसी म्हणतात.) आणि तेव्हा आपल्या कळपाचा नेता होता इमपंगूश. (झुलू भाषेत चतुर कोल्हा म्हणजे इमपंगूश.)

एकदा आपला इमपंगूश खाणं शोधण्यासाठी डोंगरावरच्या अरुंद खडकाळ वाटेवरून भटकत होता. "देवा, जेवणाशी माझी गाठ कधी पडेल! एखादा उंदीर काही एवढ्या भर उन्हाचा मिळणार नाही म्हणा! पण जरा हुंगत राहतो, एखादा सरडा, गिरगीट नाहीतर पाल तरी नक्की मिळेल शिकार म्हणून."
असा विचार करू त्याने दगडांच्या, खडकांच्या कपारीशी आपलं नाक नेऊन हुंगण्याचा प्रयत्न केला.
पण हवेत एक ओळखीचा वास येत असल्याचं त्याला जाणवलं.
"कोणती बरं शिकार असेल? बापरे... शिकार नव्हे... हा तर भुबेसीचा वास आहे! देवा रे!"

त्याने खाली मान वळवून पाहिलं तर काय!! भुबेसी डोंगराच्या त्या अरुंद वाटेने वर त्याच्याच दिशेने येत होता.
"रामा शिवा गोविंदा! आजपर्यंत मी ह्याला चतुराईने फसवुन बरेचदा ह्याच्या शिकारीतला वाटा मिळवला आहे. आणि एकदा त्या माणसाच्या छोट्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची फजिती करून त्याला पळवून पण लावलं आहे. तो माझी वाट लावणार हे नक्कीच. पण आता इकडे पळून जायला काही मार्गच नाही... थोडं पुढे जावं तर दरी आणि मागे जावं तर रस्त्यातच आपला पंजा घेऊन हा भुबेसी खडा!"

भीतीने इमपंगूशच्या पोटात गोळाच आला. त्याने वर पाहिलं, खाली पाहिलं, जरा आजूबाजूला मान फिरवली. मग एक खोल मोठ्ठा श्वास घेतला. थंड डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न केला.

खालून येणाऱ्या भुबेसीनेपण इमपंगूशला पाहिलं. त्याचं डोकंच तिडीकलं. " हा इमपंगूश मला नेहमी फसवतो. स्वतःला फार शहाणा समजतो... मागे तर माणसाच्या पोराला वाचवण्यासाठी त्याने माझी कसली फजिती केली होती! जंगलाच्या राजाची अशी खोडी काढण्याची त्याची हिम्मत कशी होते नेहमी. त्याच्यामुळे बाकी प्राण्यांमध्ये माझी दहशत कमी होतेय.
बरा सापडला आज. आज ह्याची खंडोळीच करतो एकदम. कुठे पळशील बच्चमजी! सरळ वर जातो आणि एक पंजाने झापड लागावतो. ताळ्यावर येईल लगेच!" असा विचार करत भुबेसी त्या अरुंद चढणीवर चालत वर येत होता.

इतक्यात इमपंगूशने आपण हुंगत असलेल्या जड खडकाला एक पाय लावला आणि ओरडायला लागला! "वाचवा! मदत करा! मेलो मेलो!"

भुबेसी सिंह इमपंगूशच्या असल्या ओरडण्याने जरासा चक्रावलाच. "ह्याचा काहीतरी कांगावा असणार नक्की. दरवेळी काहीतरी क्लुप्ती काढतो आणि निसटतो. यावेळी मी लक्षच देणार नाही काही!" असा विचार करून भुबेसी आपली वाट परत चढायला लागला.

आपल्या ओरडण्याला भुबेसी बधत नाहीसा बघून इमपंगूशने जास्तच घाबरल्याचं सोंग घेतलं. आता त्या खडकाला आपलं डोकं लावलं आणि पुढच्या दोन्ही पायांचे पंजे डोळ्यांवर घेऊन मागच्या दोन पायांवर उभा राहिला आणि भीतीने गळून गेल्यागत रडू लागला.

"भुबेसी महाराज, अहो मला मदत करा. हा भला थोरला खडक दरड बनून घसरतोय ह्या वाटेवरून. त्याखाली आधी मी चिरडला जाईन आणि नंतर तुम्हीसुद्धा. खाली पळून जाऊनही वाचणं कठीण आहे. ही दरड आपल्याला आधीच गाठेल.
महाराज, तुमच्या मजबूत पंजाने हा खडक पकडा... मला वाचवा... आपल्या दोघांना वाचवा.! कूं कूं!"

आता मात्र भुबेसीला खरं वाटलं. आपल्या शक्तीचा गर्व असलेला भुबेसी धावत दोन ढेंगांत इमपंगूशपाशी पोहोचला. त्याने त्या खडकाला अडवण्यासाठी आपल्या मजबूत पंजाचा टेकू पूर्ण जोर लावून दिला. मग तो खडक हलत नाहीसे बघून त्याला वाटलं की आपल्या मजबूत पकडीमुळे तो अडलाय. मोठ्या फुशारकीने तो इमपंगूशला म्हणाला, " चल निघ इथून आणि मोठा ओंडका बघून आण. ह्या खडकाखाली आपण तो टेकू म्हणून लावू. मग ही दरड कोसळणार नाही. तोवर माझी काळजी करू नकोस. मी ही दरड थोपवून ठेवेन."

इमपंगूश गालातल्या गालात हसत भुबेसीच्या पंजाखालून बाहेर पडला आणि लवून मुजरा करत कुईला "जी सरकार! आत्ता एक ओंडका घेऊन येतो."
त्या डोंगराच्या उतारावरून इमपंगूश सुसाट धावत सुटला ते थेट ह्या, आपण बसलोय ना, ह्या कपॉक झाडामागे कळपात येऊन मगच त्याने श्वास घेतला. आपल्या कोल्हे मित्रांना सगळी हकीगत सांगून टाकली आणि ते सगळे पोट धरधरून खुं खुं करून हसले.

इकडे आपला भुबेसी वाटच बघत राहिला. जसजसा सूर्य पश्चिमेकडे कलला, त्याची आणि त्या खडकाची सावली लांब मोठी मोठी झाली त्याचे पुढचे पाय दुखून ओरडू लागले. त्याने एक पंजा थोडा ढिला केला, मग त्याला कळलं की तो खडक कधीही कोसळणार नव्हताच! तो तर मुळी हलत पण नव्हता. आपली परत एकदा फजिती झाल्याचं मनोमन त्याला लक्षात आलं आणि तो पुन्हा एकदा वैतागला. तो खडक सोडून डोंगराच्या उतारावरून इमपंगूशला धडा शिकवण्याची अजून एक फालतू योजना आखत तो खाली उतरायला लागला!

" आणि तेव्हापासून सगळे सिंह आपल्या कोल्ह्यांना धडा शिकवण्याची फक्त योजनाच आखत आहेत! कारण आपण सगळे चतुर कोल्हे त्यांच्या सगळ्या बेतांना पुरून उरत आलोय!" आज्जीने आपली गोष्ट संपवली.

"कुर्रे!" सगळ्या पिल्लानी आपला आनंद व्यक्त केला आणि आपणही चतुर कोल्हे बनण्याचा ठराव पास केला.

Group content visibility: 
Use group defaults

छानच!!