कविताला आठवताना

Submitted by pkarandikar50 on 1 October, 2019 - 05:38

कविताला आठवताना
कविता महाजनच्या पहिल्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून 27 सप्टेम्बर 2019 ला ‘कविताला आठवताना’ हा अभिवाचनाचा एक सुंदर कार्यक्रम सुषमा देशपांडे आणि म्रुदुला बेहेरे-भाटकर यांनी पुण्यात सादर केला. कविताच्या असंख्य कविता, कादंब र्‍या, ललित लेख यातून नेमके वेचे निवडणं आणि संहिता तयार करण्याचं आव्हान उज्वला मेहेंदळे यांनी उत्तमरित्या पेललं होतं. अभिवाचनातलं नेटकेपण आणि सफाई यांमुळे कार्यक्रम संस्मरणीय झाला.

कविता महजन हे एक अजब रसायन होतं. अनेक क्षेत्रात तिने मुक्त संचार केला. फक्त साहित्याचा विचार केला तरीही, कविता, कादंबरी, ललित-लेखन, बालसाहित्य अशा अनेकविध प्रकारातली तिची कामगिरी सरस आणि उत्तुंग होती. ती उत्तम चित्रकारही होती. आदिवासी वस्त्या आणि पाड्यांवर राहून तिने आदिवासी जीवन-वास्तवाचा सखोल अभ्यास केला होता. दुसरीकडे, महानगरातल्या बकाल वेश्या-वस्यांत जाऊन एडसच्या समस्येची निरीक्षणेही तिने एखाद्या समाजशास्त्रज्ञाला शोभेलशा तटस्थ आणि अभ्यासू वृत्तीने केली. तिच्या ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या कादंबर्‍यातली सामाजिक वास्तवाची ‘ऑथेंटिक’ पार्श्वभूमी तिच्या संशोधनामुळे लाभली होती. आदिवासींच्या भाषांचा शब्दकोष तयार करण्याचा एक अत्यंत महत्वांकांक्षी प्रकल्प तिने एकटीच्या हिमतीवर हाती घेतला होता. अशी कामं एकट्या-दुकट्या संशोधकांची नसतात. त्यासाठी खूप मोठं संस्थात्मक पाठबळ आणि आर्थिक सहाय्य आवश्यक असतं पण त्यासाठी अडून न बसता ‘आपल्याला जमेल तेवढं आणि जमेल तसं’ या पद्धतीने ती झटत राहिली. तिच्या अकाली निधनामुळे हे ऐतिहासिक कार्य अर्धवटच राहून गेलं.

साहित्यिकाची थोरवी कशात असते? त्याला मिळालेल्या लोकप्रियतेत की समीक्षकांच्या गौरवात की सरकारी सन्मान-पुरस्कारात? खरं तर, अंगभूत प्रामाणिकपणा, कल्पनाशक्ती, उत्कटता आणि वैशिष्ठपूर्ण अभिव्यक्ती या श्रेष्ठत्वाच्या कसोट्या असतात. या फूटपट्ट्या लावून पाह्यल्या तर कवितेच्या प्रतिभेची उंची मोजमाप करण्यापलीकडची ठरावी. साहित्यिकांचे काही कंपू असतात. ‘अहो रूपम अहो ध्वनिम’ या पद्धतीने ते परस्परांचे ‘प्रमोशन’ करतात. समीक्षक, प्रसार माध्यमे आणि शासकीय विभाग यांची ‘फिल्डींग’ लावण्याचंही एक तंत्र रूढ़ झालेलं आहे. कविता या सर्वांपासून कोसो दूर राहिली. शिष्टसंमत संकेत, परंपरा आणि प्रथा वगैरेंनाही तिने आपल्या अभिव्यक्तीच्या कधीच आड येऊ दिलं नाही. तिची शैली बेमुर्वतखोर आणि बेछूट होती. कुणी तिला बंडखोर म्हणाले, कोणी तिला कम्युनिस्टांच्या कळपात ढकललं तर कोणी ‘स्त्रीवादी’ साहित्यिक ठरवलं. आपल्या परीने तिने या शिक्क्यांचं सौजन्यपूर्वक खंडनही करून पाहिलं पण त्या वादात तिने स्वत:ला कधी अडकवूनही घेतलं नाही. कोणताच ‘वाद’, कोणताच ‘इझम’ यांचा गंडा तिने बांधून घेतला नव्हता. ‘आलं अंगावर, घेतलं शिंगावर’ याच पद्धतीनं ती जगत राहिली आणि लिहित राह्यली.

कविताची ‘कुहू’ ही मराठीतली पहिली (आणि आजवर तरी एकमेव) नितांतसुंदर ‘मल्टी-मिडीया’ कादंबरी. बहुदा 'कुहू'ची गणना बालसाहित्यात होते पण वाचनालयातल्या कोणत्या कप्प्यात हे पुस्तक ठेवावं असा प्रश्न अनुभवी ग्रंथपालालाही पडावा असं तिचं स्वरूप आहे. कविताची तरल सौन्दर्य-दृष्टी आणि विलक्षण कल्पनाशक्ती ‘कुहू’च्या पानापानातून अखंड वहातात. माझ्या मते, मानवतावादाचा इतका प्रभावी आणि कलापूर्ण आविष्कार मराठी साहित्यात क्वचितच पहायला मिळतो.

कविता महाजनच्या स्मृतीस माझं नम्र अभिवादन!

=बापू करंदीकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहित्यिकाची थोरवी कशात असते? त्याला मिळालेल्या लोकप्रियतेत की समीक्षकांच्या गौरवात की सरकारी सन्मान-पुरस्कारात? खरं तर, अंगभूत प्रामाणिकपणा, कल्पनाशक्ती, उत्कटता आणि वैशिष्ठपूर्ण अभिव्यक्ती या श्रेष्ठत्वाच्या कसोट्या असतात.

हे पटलं एकदम.

लिखाण अजून विस्तृत हवं होतं

हो, थोडे विस्तृत लिहिले असते तर आणखी काही पैलूंवर प्रकाश पडला असता किंवा अंगभूत पैलूंवर अधिक प्रकाश पडला असता. कविता महाजन ह्या व्यक्तीसाठी इतके थोडे शब्द पुरेसे नाहीत.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन.