शास्त्रीजी....

Submitted by Narsikar Vedant on 30 September, 2019 - 13:10

कुठल्याही पदावरील दुसऱ्या मानकऱ्याला पहिल्या इतकी ओळख आणि प्रसिद्धी मिळत नाही. लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबतीतही नेमके तेच झाले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे दुसरे पंतप्रधान. मात्र त्यांच्या नशिबी प्रसिद्धी कमीच आली.

खाजगी कामासाठी सरकारच्या गाडीच्या 15 किलोमीटर उपयोग झाला तेव्हा आपल्या पत्नीला त्या खर्चाची रक्कम सरकारी कोषात भरायला सांगितली. 2 ऑक्टोबर ला जन्मलेल्या महात्मा गांधींनी जगाला सत्य आणि अहिंसा ही तत्वे दिली तर त्याच दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर ला जन्मलेल्या लालबहादूर शास्त्रींच्या वरील उदाहरणावरून सत्य आपल्या जीवनात कुठवर रुजला पाहिजे याची प्रचिती दिली.आज असा नेता भारतात होणे विरळच.

दुष्काळात आठवड्यातून एक दिवस पूर्णतः उपाशी राहणारा नेता भारताला शास्त्रींच्या रुपाने मिळाला हे आपले भाग्यच!

पत्नीला फाटलेल्या शर्टापासून रुमाल तयार करून द्यायला सांगणारे शास्त्रीजी आठवल्यावर आजच्या पुनर्वापराच्या कल्पनेविषयीची त्यांची दूरदृष्टी दिसून येते.

१९६५ च्या भारत-पाक युद्धात भारतीय जवानांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहत त्यांनी मुत्सद्दी धोरणांचा अवलंब करून पाकला चारीमुंड्या चीत केले व भारतीय सेनेने विजय मिळवला. हे युद्ध अजून काही दिवस चालले असते तर पाकिस्तानात देश जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे नष्ट झाला असता.

एका दुर्दैवी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे 'ते' भारतीय राजकारणातील पहिले व्यक्ती होते.

राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सैनिक आणि शेतकरी यांचे महत्त्व लक्षात घेऊन दोघांच्याही सन्मानार्थ त्यांनी 'जय जवान, जय किसान' हि घोषणा दिली, जी आजही लोकप्रिय आहे.

असे हे उत्तुंग व्यक्तिमत्व, साधी राहणी, देशाचे पंतप्रधान असूनही कोणतीही संपत्ती त्यांच्या नावावर नव्हती, उलट मरतानाही त्यांच्या खिशात अवघे ६ आणे होते.

अशा त्यागी, मूर्तिने लहान पण कीर्तीने महान असणारे भारतरत्न स्व. लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शत शत नमन!

Group content visibility: 
Public - accessible to all site users