रमा

Submitted by जयश्री साळुंके on 30 September, 2019 - 09:41

डॉ. रमा आज तब्बल दहा दिवसांनी घरी येणार होत्या. भूकंपग्रस्त लोकांना मदत होतं म्हणुन गेल्या दहा दिवसांपासून त्या गुजरात मध्ये गेलेल्या होत्या. इकडे लक्ष्मीकाकी वाट बघत होत्या. रमा त्यांची रक्ताची कोणी नव्हती, पण गेल्या कित्येक वर्ष सोबतीमुळे ती देखील आता त्यांच्या मुलीसारखीच होती. तिच्या जन्मापासून तिला सांभाळलं काकींनी आणि आता ती स्वतः साठीच्या घरात होती. आज कोणास ठाऊक का, पण काकींच्या डोळ्यासमोर रमाचे सगळे रूपं दिसत होते. लहान असतांना बोबडे बोल बोलणाऱ्या रमा पासुन ते कित्येक लोकांचा जीव वाचवणाऱ्या रमापर्यंत. पोरगी शिकून मोठी झाल्याचा आनंद घरातल्या सगळ्यांना झाला होता. पण त्यानंतरचे तिचे निर्णय कोणालाही पटले नाहीत, मात्र ती जिद्दीने सामोरे जातच होती. स्वतःचा निर्णय सगळ्यांना पटवून दिला आणि आज जगातल्या नावजलेल्या लोकांमध्ये तिचं नाव घेतलं जातयं याचाच काय तो आनंद. आयुष्यभर स्वतःला फक्त कामात झोकून दिले, त्याचे फळ आता मिळाले होते. विचार करतांना वेळ कसा निघून गेला ते लक्षातच नाही आलं काकींच्या. दरवाजाचा आवाज झाला तेव्हा कुठे त्या भानावर आल्या. रमा केव्हापासून दरवाजा वाजवत होत्या पण कोणी उघडत नव्हतं म्हणुन स्वतःकडच्या चावीने त्यांनीच दार उघडलं, आणि सर्वात आधी काकींच्या खोलीत जाऊन बघितलं. काकी आरामखुर्चीवर शून्यात हरवलेल्यागत बसलेल्या होत्या, ते बघून रमानी खोलीच दार जरा जोरात वाजवलं, जेणेकरून त्यांची तंद्री मोडेल. रमाच्या चेहऱ्यावरचं तेज जाऊन दहा दिवसांचा थकवा स्पष्ट दिसत होता. रडून रडून सुजलेले डोळे, त्या थकव्याची जाणीव करून देत होते. गेल्या कित्येक वर्षांत रडलेलीच नाही हे काकींना माहीत होते. मग अचानक असं काय झालं असा विचार त्यांच्या डोक्यात डोकावत असतांनाच रमा स्वतःच्या खोलीत निघून गेली सुद्धा. दरवेळी बाहेरून आल्यानंतर कमीत कमी दोन तास बडबड करणारी रमा इतकी शांत बघून काकींना घाबरायला झालं, पण सरळ तिला काही विचारण्यापूर्वी त्यांनी दोन कप फक्कड चहा बनवायचा बेत रचला, चहा बघितला कि बाईसाहेबांची कळी आपोआप खुलेल हे त्यांना सवयीने माहीत होते.
चहा घेऊन तिच्या खोलीत जाऊन शांतपणे त्यांनी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत बसून घेतलं, नेहमीसारखं. पण रमाची नजर मात्र थंड आणि शुन्यात होती. म्हणुन त्यांनीच सुरुवात केली बोलायला. पण त्यांचा प्रयत्न फोल ठरला. अखेर त्यांनी रमाच्या खांद्यावर हात टेकवताच रमाच्या तोंडून पुसटसे फक्त दोनच शब्द निघाले “अहो गेले.”
लग्न होऊन एक तप उलटले होते. पण परकर पोलक्यातली रमा अद्याप माहेरीच होती. छोट्याशा कपाळावर मोठ्ठ कुंकू घेऊन वावरतांना ना तिला विचित्र वाटत होतं, ना तिच्या घरच्यांना. आत्ता कुठे ती तेरा वर्षाची झाली होती. एक दिवस अचानक शाळेतून घरी आल्यावर पोटात दुखायला लागलं. आई-आजी आणि घरातल्या सगळ्या बायकांना आनंद झाला, आनंदसोहळा म्हणुन नात्यातल्या सगळ्या आया-बायांना बोलावण्यात आलं. रमाच्या सासरी सुद्धा तार पाठवून पाहुण्यांना बोलवण्यात आलं. सासू-सासरे, नणंद, आणि रमाचे “अहो” सगळे आलेले. लग्नानंतर गेल्या बारा वर्षात रमा आणि सासरच्या लोकांची भेट एकदाच झालेली. त्यामुळे वयात आलेली रमा बघून सासू आणि नणंद तर अगदीच आनंदी होत्या. रमाला तिच्या “त्या” खोलीतून बाहेर मुख्य घरात यायला आजीची परवानगी नव्हती. तिला जे काही करायचं असेल ते तिच्या खोलीतून मागच्या दाराने वाड्यात जाऊन करायचं, जास्त उड्या मारत फिरायचं नाही, शांत एका जागी बसून रहायचं, अगदी फिक्क आणि बेचव असं जेवण. रमा तर पुर्ण बावरून गेलेली, मुळात होणारा त्रास आणि त्याच्या मुळे होणारे शारीरिक, मानसिक बदल तिला कळत नव्हते. त्यात घरात आलेले पाहुणे आणि मोठ्ठी नियमावली. खोलीत बसून बसून ती खुप कंटाळली होती. खोलीच्या खिडकीतून बाहेर बघतांना अनेकदा कोणी ना कोणी दिसायचे, तेवढाचं काय तो तिच्या मनाला विरंगुळा.
रमा हि रमाकांत देशमुख यांची एकुलती एक कन्या. त्यांच्या लग्नाच्या वीस वर्षांनी, आई-आजीच्या खुप नवसांनी देशमुखांच्या संसार वेलीवर उमललेलं सुंदर फुल. देशमुखांचा गावात दरारा होता, गावातली अर्धीअधिक जमीन त्यांच्या नावावर होती, आणि एवढं असून सुद्धा देशमुख गावात सर्वांच्या मदतीला असत, अंगात कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. देशमुख बाई देखील आल्या गेल्याची व्यवस्थितपणे दखल घेत, गावातल्या बायकांसाठी त्या मोठा आधार होत्या, सगळ्या गावाला त्या ‘वहिनी’ या नावाने परिचित होत्या. घरात देव-धर्माला कधीच ना नसे. आल्या गेल्या ब्राम्हण, साधू, संतांची पूजा आजीकडून होत असे. हे सगळं बघत वाढलेली रमा. वयाच्या पहिल्याच वर्षी बोहल्यावर चढली. त्याला कारण पण तसचं होतं. रमाची सासू म्हणजे तिची आत्या, मुलाच्या जन्माच्या वेळी बाळंतव्याधी ने गेली, पण जातांना मुलासाठी रमाला सुन म्हणून घेऊन. सासू रमाच्या लग्नानंतर सहा महिन्यातच गेली आणि त्या एका प्रसंगालाच काय ती रमा सासरी गेली होती. अधून मधून सासरेबुवांकडून होणारी चौकशी वगळता सासरी जाण्याचं योग रमाच्या नशिबी नव्हताच आज बारा वर्षांनी अचानक समोर आलेल्या सासरच्या मंडळीना बघून रमाला काहीसं अचंबित आणि विचित्र वाटत होतं.
पाचव्या दिवशी आईने रमाला व्यवस्थित न्हाऊ घातलं. सासरचा आलेला शृंगार चढवला. हिरव्या साडी चोळीतली रमा बघून आईच्या डोळ्यातून आपसूक पाणी येत होतं. घराच्या पडवीत आज बायकांची झुंबड उडालेली होती. रमासाठी सजवलेल्या खुर्चीवर रमा अगदी देखणी दिसत होती. एक एक करून सर्व बायकांनी तिची ओटी भरली. आलेल्या सगळ्या भेटवस्तू बघतांना कसा दिवस संपला ते कोणालाच कळालं नाही. रात्रीची पान आटोपल्यावर सासरेबुवांनी विषय काढला. लेकीच्या सासरी जाण्याच्या कल्पनेनेच रमाकांत आणि वहिनी दोघांना गहिवरून आलं.
जाण्याचा दिवस उजाडला. परकर पोलक्यातली रमा आता शालू नेसून, सौभाग्यलेणं, काळ्या मण्यांच मंगळसूत्र, डझनभर बांगड्या, जोडवे घालून तयार होती. घरातल्या सगळ्यांच्या डोळ्याला लागलेल्या धारा बघून रमा देखील रडायला लागली. आतापर्यंत आई-आजीने खुप सूचना दिल्या होत्या. सासरी गेल्यावर कसं वागायचं, मोठ्यांशी कसं बोलायचं, घरातली कामं कशी आटोपायचीत, सासू-सासऱ्यांचा मान कसा राखायचा, असं सगळं सगळं. ज्याच्या सोबत आयुष्य जोडलं गेलं होतं त्याच्या विषयी मात्र पुसटशीही कल्पना कोणाला द्यावीशी वाटली नव्हती. एक वाक्य मात्र आईने आवर्जून आणि वारंवार ऐकवलं होतं कि त्यांना “अहो”च म्हणायचं, पण मुळात हे “अहो” आहे कोण हे जाणून घ्यायची तिला खुप उत्सुकता लागून राहिली होती. पाठवणीच्या वेळी देखील रडत असतांना डोळे “अहो”नां शोधत होते.
गाड्या मार्गाला लागल्यावर मात्र सावत्र सासूने रमाला जवळ घेतलं. समजावून शांत केलं. तेरा वर्षात स्वतःच्या आईला कधीच न सोडलेली रमा आता नवीन जगात जात होती, आयुष्याची एक नवीन सुरुवात करत होती. आई-आजीने सांगितलेलं सगळं मनाशी पुन्हा पुन्हा घोळवत होती. गाडी एका मोठ्ठ्या वाड्यासमोर थांबली, एक एक करून सगळे गाडीतून खाली उतरले. जडशीळ शालूचं ओझं रमाला त्रास देत होतं. हातातला चुडा सांभाळताना तिच्या हातांची होणारी हालचाल अहोंच्या नजरेतून काही सुटत नव्हती. आता हे अहो म्हणजे काही कोणी खुप मोठ्ठ नव्हतं. त्यांच्या वयात मुळात अंतरच दोन महिन्याचं. दोघ आठवीला आणि आता ते एकाच शाळेत जाणार म्हणुन त्याला आधीच धसका बसलेला. तर तिला माहीतच नव्हतं कि तिच्या आयुष्यात आता पुढे काय वाढून ठेवलं होतं. पण तिच्या हालचालीमुळे अहोंची मात्र पुरती मजा होत होती.
नव्या सुनेच्या स्वागताची वाड्यात जोरदार तयारी झालेली होती, माप ओलांडताना रमा त्या घराचाच भाग बनली होती. सुरुवातीचे काही दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यात सरले. एके दिवशी सकाळीच सासूबाईंनी रमाच्या देखील शाळेची तयारी केली. शाळेचा पहिला दिवस म्हणुन रमा प्रचंड आनंदात होती तर अहो मात्र खुप विचारात होते, आत्तापर्यंत शाळेत ते दर वर्षी पहिले यायचे, पण आता बायको जर जास्त हुशार निघाली तर? आणि जास्तीच ढ असली तर? अश्या दोन्ही प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडलं होतं. पण घरच्यांनी तर निर्णयच फर्मावला होता कि दोघांनी एकाच शाळेत जायचं.
शाळा सुरु झाली, अहो सुद्धा तिच्याच वर्गात असल्यामुळे सुरुवातीला बुजून गेलेली रमा मात्र हळु हळु खुलायला लागली. मुळातच हुशार असल्यामुळे शाळेतला पहिला किंवा दुसरा क्रमांक अगदी ठरलेला, कारण पहिला क्रमांक तिचा आला तर दुसरं अहोंचा आणि तिचा दुसरा असला तर अहो पहिले आलेले असायचेत. अशातच दहावीचं वर्ष देखील संपलं. दोघांनी खुप अभ्यास केलेला त्यामुळे दोघांपैकी नक्की कोण पहिला क्रमांक पटकावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे दोघांना अगदी सारखे गुण मिळाले होते, शाळेतच नव्हे तर पुर्ण जिल्ह्यात दोघांचा प्रथम क्रमांक आला होता.
वाड्यातच नाही तर संपूर्ण गावात आनंदाचं वातवरण होतं, गावात पहिल्यांदा असं झालेलं कि गावातले एकाच शाळेतले दोन विद्यार्थी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले. वाड्यात तर आनंदाचं उधाण आलेलं. सासूबाईंनी दोघांची नजर उतरवली. एव्हाना रमा आणि अहोंच्या मधला संकोच दूर जाऊन त्यांच्या नात्यात मैत्री हळूच शिरली होती. दोघांनी दिवस रात्र एक करून केलेला अभ्यास आणि सगळ्या मेहनतीचा परिणाम त्यांच्या निकालामधून त्यांनी सर्वांना दाखवला होता. पण आता पुढे काय? रमाला एव्हाना डॉक्टर बनायचं स्वप्न खुणावू लागलेलं तर अहोंना वडिलोपार्जित शेतीत नवीन प्रयोग करायचे होते, त्यामुळे दोघांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अकरावी आणि बारावी तालुक्याच्या महाविद्यालयातून पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावून पूर्ण केली होती. वैद्यकीय शिक्षणासाठी रमाला शहरात जावं लागणार होतं आणि शेतकीचं महाविद्यालय मात्र तालुक्यात असल्यामुळे अहो तिथेच थांबणार होते. गेल्या कित्येक वर्षांची सोबत आता काही वर्षांसाठी सुटणार म्हणुन दोघ शांतपणे यावर उपाय शोधत होते. घरच्यांचा रमाच्या शिकण्याला विरोध नव्हता पण तिचं घरापासून लांब राहणं मान्य नव्हतं. अर्थात तिने एकटीने लांब राहण्याबाबत तिच्यावर विश्वास असला तरी कुठल्याही निमित्ताने दोघांचं वेगळं राहणं त्यांना पटलं नव्हतं. तसं तिने लांब जाऊन शिकावं यात त्यांना वावग वाटत नव्हतं पण अहो इथे आणि ती तिकडे याला मात्र कोणीही तयार होत नव्हतं. पण अहोंनी पुढाकार घेऊन हा तिढा सोडवला. ते दर शनिवार-रविवार रमाला भेटायला शहरात जाणार होते.
अशाप्रकारे रमाचा वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय सर्वांनुमताने ठरला. रमाला शहरातल्या महाविद्यालयात सुरुवातीला अहोंची खुप आठवण यायची कारण मैत्रीचं रुपांतर कुठे तरी अजाणत्या प्रेमात झालेलं होतं. पुढची पाच वर्ष घर सोडुन राहण्याची रमाने तयारी केली. शहरात जाण्याच्या आदल्या संध्याकाळी अहो आणि ती वाड्याच्या गच्चीवर उभं राहून गप्पा मारत असतांना अहोंचा चुकून हाताला झालेला स्पर्शाने ती पूर्णपणे शहारून गेलेली. मुळात लग्न होऊन इतके वर्ष होऊन देखील त्यांच्या मध्ये फक्त मैत्री होती, त्यामुळे आजच्या स्पर्शात वेगळं का वाटलं याचा तिने रात्रभर विचार केला पण उत्तर काही मिळालं नाही. पहाटे केव्हातरी तिचा डोळा लागला आणि त्यामुळे सकाळी उठायला अंमळ उशीरचं झाला तिला. ती उठली तोपर्यंत सासूबाईंची तुळस पूजा उरकून झालेली. घरात गडी माणसांचा राबता सुरू झालेला. शहरात जायचं म्हणुन गाडी व्यवस्थित आहे कि नाही हे तपासुन बघण्यात अहो मग्न होते. रमाने त्यांच्याकडे बघणं टाळलं आणि ती शांतपणे तुळशीच्या पूजेला लागली. रमाच्या हालचालींमधला बदल सासूबाईंच्या लक्षात आला, त्यांनी हलकेच हसून तिच्याकडे पाहिले आणि त्या बाकी कामांना लागल्यात, त्यांना स्वतःला शिक्षणाच महत्व माहीत होतं म्हणुन त्या देखील आत्तापर्यंत तिला सांभाळत आलेल्या, घरच्या कोणत्याही कामाची जबाबदारी सुन म्हणुन तिच्यावर येण्याची वेळ सासूबाईंनी येऊ दिली नव्हती. रमाच्या जीवाची घालमेल हि तिची तिला देखील कळत नव्हती. जाण्याची वेळ झाली तसा तिचा बांध फुटला, सासूबाईंच्या मिठीत शिरून तिने अश्रूंना जागा करून दिली. गाडीत सामान ठेवलं आणि रमा रडत रडतचं गाडीत जाऊन बसली.
गाडी वाटेला लागली, हळु हळु रमाचे हुंदके देखील कमी झाले. अहो शांतपणे तिला आधार देत होते, थोड्या वेळाने बाहेरचं निसर्गसौंदर्य बघण्यात ती पुर्ण मग्न झाली. गाडीच्या आवाजा व्यतिरिक्त कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. शहर जवळ येत होतं, तिच्या मनाची चलबिचल वाढत चालली होती. पण कारण काय हे मात्र तिला कळायला अजुन वेळ जायचा होता. शहरातल्या त्यांच्या नव्या घरात पोहचल्यावर दोघांनी साफ सफाईला सुरुवात केली. रमाचं नवं घर वाड्यासारखं मोठ्ठ नव्हतं पण त्याच अंगण मात्र सुंदर होतं. अहो दोन दिवस राहून परत गावी जाणार होते. आणि नंतर रमा एकटी तिथे राहणार होती. सोबतीला त्यांच्या घरचा आसरा असलेल्या लक्ष्मीकाकी येणार होत्या, पण अचानक तब्येत खराब झाल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तिला एकटीलाच राहावं लागणार होतं. अहो पुढच्या खेपेला येतांना लक्ष्मीकाकींना घेऊन येणार होते.
महाविद्यालयात रुळायला रमाला जास्त वेळ नाही लागला. संध्याकाळच्या वेळी देखील ती ग्रंथालयात थांबून वाचन करायची, आणि बर्याचदा तर पुस्तकं घरी आणून रात्री उशिरा पर्यंत अभ्यास चाले. दर शनिवार-रविवारी अहो येत त्यावेळी घरातलं लागणार सगळं सामान आणून देत, जेणे करून तिला आणि लक्ष्मीकाकींना त्रास नको. आठवड्याभरात दोघं काय काय शिकले याची चर्चा रात्रभर चालायची, ती ऐकून लाक्ष्मिकाकी देखील अचंबित व्हायच्या. दोघं एवढी मोठी झालीत तरी त्यांच्यात नवरा-बायको सारखं कोणतही नातं नव्हतं. पण काहीतरी बदलतंय हे रमाला जाणवत होतं, प्रत्येक स्पर्शाला पोटात उडणारे फुलपाखरं तिला नवीन होते. आतापर्यंत अश्या काही भावना असतात हे देखील तिच्या गावी नव्हतं. बघता बघता सहा महिने संपले देखील, दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्यात. तसं बघायला दिवाळसणासाठी सवाष्णी माहेरी जातात पण रमा सासरी आली. दिवाळीचे पाच दिवस अगदी भरभरून घरच्यांच्या मायेखाली जगली, जाण्याचा दिवस उगवला तेव्हा मात्र मागच्या वेळेसारखं तिला खुप रडायला येत नव्हतं. शांततेत सर्वांना नमस्कार करून निघाली. ह्या वेळी प्रवासात अहोंसोबत गप्पा मारत गेली. दोघं शिकत असलेलं सगळचं ज्ञान नवीन होतं. जरी घरची सगळी शेती अगदी लहानपणापासून अहो बघत असले तरी आता शेतकी शिकतांना नवीन तंत्रज्ञान पण ते शिकत होते. आणि रमासाठी तर सगळचं नवीन होतं. मानवी शरीराचे भाग शिकतांना कधी कधी येणारी ओकारी तर रुग्णांच्या बरं झाल्यावर मोठ्या डॉक्टरांना मिळणारा देवाचा दर्जा, सगळं काही ती सांगत होती. तिच्या चेहऱ्यावर दिसणारं तेज बघून अहो मात्र प्रचंड आनंदात होते. बडबड करतांना तिला लक्षातच नाही आलं कि तिने त्यांचा हात जोरात पकडलेला होता, अगदी इतका कि तिच्या बोटांचे ठसे उमटले होते. पण अहोंना हा गोष्टीच हसू येत होतं, अचानक ते जोरात हसायला लागले. तिच्या लक्षात नक्की घडलं काय ते येत नव्हतं, म्हणुन त्यांनी अलगद तिचा हात दुसऱ्या हातात घेतला आणि हाताचा लाल झालेला भाग तिच्या समोर धरला. पण त्यानंतर दुसऱ्याच क्षणी त्यांच्या हातापेक्षा लाल काही तरी होतं, ते म्हणजे रमाचे गाल. त्यांच्यात बहरणाऱ्या ह्या नव्या नात्याची जाण हळु हळु दोघांनाही होत होती. अहोंना सुट्ट्या जरा जास्त होत्या म्हणुन ते दोन-चार दिवस जास्त थांबून मग घरी परत जाणार होते. काकी देखील दिवाळी म्हणुन गावी गेलेल्या. दिवसभर रमा घरी नसे तेव्हा शांतपणे पुस्तकं वाचणं आणि वेगवगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ करून ठेवणं हा त्यांचा उद्योग. संध्याकाळी रमा आली कि तिला रोज नवीन काही तरी खायला मिळायचे. रात्रीचं जेवण आटोपलं कि पुन्हा दोघ काही तरी वाचत बसतं. एव्हाना दोघांमधला संवाद बराच वाढला होता. अभ्यास सोडुन एकमेकांची मस्करी देखील वाढली होती.
बघता बघता तीन वर्ष संपलीत आणि आत्तापर्यंत आपापल्या क्षेत्रात दोघही अव्वल स्थानावर होते. प्रत्येक परीक्षेत पहिलं येणं म्हणजे काही मोठ केलं असं त्यांना वाटत नव्हतं. महाविद्यालात सर्व शिक्षकांचे दोघंही लाडके विद्यार्थी बनले होते. अहोंच पदवी शिक्षण पुर्ण झालं होतं आणि विद्यापीठात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांच्या पदवीदान समारंभाच्या वेळी मोरपंखी रंगाची साडी नेसलेली रमा अगदी नजर लागावी इतकी सुंदर दिसत होती. अहोंच्या मित्रांनी तिला पहिल्यांदा बघिलेले, आणि इतकी सुंदर बायको असतांना देखील ते पहिला क्रमांक कसा मिळवता म्हणुन त्यांना चिडवायला सुरुवात केली. रमाच्या शिक्षणाला पुर्ण व्हायला मात्र अजुन वेळ होता.
वैद्यकीयच्या शेवटच्या वर्षाला असतांना तिला एका वैद्यकीय शिबिराला जाण्याचा योग आला. आदिवासी पाड्यावर लावलेल्या त्या शिबिरात पंधरा दिवस काम करतांना तिथल्या लोकांच्या समस्या बघून रमा पुरती भांबावून गेली, अस्वछतेमधून-अज्ञानातुन निर्माण झालेले आजार, मुलांमध्ये असलेलं कुपोषण, अंधश्रद्धेच्या माध्यमातून दिले जाणारे बळी, स्त्रियांचा मासिक धर्माबद्दल असलेला वाईट समज. म्हणजे रमाच्या घरात देखील “त्या” दिवसांसाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था होती, पण त्याला कारण फक्त एकच होतं, ते म्हणजे त्या महिलेला त्रास होऊ नये. पण इथे मात्र सगळचं निराळं होतं. खेड्यात वाढलेली असून सुद्धा रमा आणि तिच्या घरचे प्रचंड पुढारलेल्या विचारांचे होते.
शिबिरात असतांना एक दिवस रमा सहज फेरफटका म्हणुन जंगलात गेली. अचानक एका स्त्री चा ओरडण्याचा आवाज आला, म्हणुन ती आवाजाच्या दिशेने गेली. तर एका स्त्रीने कोणाच्याही मदतीशिवाय बाळाला जन्म देतांना दिसली. रमाला पोहचायला उशीर झालेला, बाळाचा जन्म होऊन गेलेला. पण मात्र त्या बाळाची कोणतीही हालचाल जाणवत नव्हती म्हणुन ती स्त्री बाळाला घेऊन रडत होती. त्या बाईला आशा होती कि ते बाळ जिवंत आहे किंवा त्या बाळाला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं. म्हणुन तिचा नवरा आणि ती पाड्यावरच्या एका बाबा कडे गेलेत.
रमा हे सगळं लांबून बघत होती. बाळ आधीच गेलेलं असल्यामुळे आता कोणताही डॉक्टर काहीही करू शकत नव्हता, म्हणुन शांततेत बघण्याशिवाय पर्याय नव्हता रमाकडे.
बाबाने एका छोट्या यज्ञ कुंडात आग पेटवून बाळाला त्या आगीच्या समोर ठेवले, एका बाजूला त्या स्त्रीला बसवण्यात आले. थोडा वेळ काही तरी पुटपुटण्यात गेला. आणि नंतर अचानक ती स्त्रीच स्वतःच्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार आहे, तिनेच बाळाला खाऊन टाकले, ती पिशाच्चिनी आहे आहे आणि तिला लवकर मोठी शिक्षा द्यायला पाहिजे अन्यथा ती पुर्ण गावाला अश्याच पद्धतीने संपवेल, असं बरचं काही तो बाबा ओरडायला लागला.
आजूबाजूला दुसरी एकही स्त्री नसल्यामुळे रमा मनातून प्रचंड घाबरली होती. पण तिला हे समजत होते कि तिने काही आवाज केला तर तिला देखील संपवण्यात येईल. म्हणुन ती शांततेत सगळं बघत होती.
त्या स्त्रीचे हात पाय बांधून तिच्यावर तिथे असलेल्या सगळ्या पुरुषांनी अत्याचार केलेत, ते हि तिच्या नवऱ्याच्या समोर. आणि नंतर एखाद्या बळीला चढवलेल्या जनावरासारखे तिचे तुकडे करून चार दिशांना फेकण्यात आले.
रमाने हे सगळं बघितलं होतं, त्यामुळे नंतर तिच्यात चालण्याचे देखील त्राण उरले नाहीत. तिथून कोणत्याही परीस्थितीत परत शिबिराच्या ठिकाणी पोहचणे, ते हि लवकरात लवकर, गरजेचे होते. पण भीतीमुळे तिच्याकडून चालले देखील जात नव्हते. खुप कष्टाने ती तिथून चालत थोडी लांब आली, पण त्यानंतर मात्र उभं राहणं देखील तिला कठीण होतं. शिबिराच्या जवळ पोहचल्यावर मात्र तिला भोवळ आली.
दोन दिवस बेशुध्द असल्यामुळे रमाला शहरात हलवण्यात आलेलं होतं. शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा नव्हत्या, त्यामुळे तिला नेमकं झालं काय हे कळायला मार्ग नव्हता. तिच्या घरी कळवून घरच्यांना तातडीने बोलवण्यात आलं होतं. दवाखान्यात अहो, सासरेबुवा, सासूबाई आणि तिचे आई-वडील असे सगळे आलेले होते. रमाची शुध्द जाऊन तिसरा दिवस होता. त्या रात्री तिची आई दवाखान्यात सोबतीला थांबलेली. मध्यरात्री दरम्यान रमा शुध्दीवर आली पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. दोन दिवसांनी दवाखान्यातुन घरी जायला परवानगी मिळाली. वाड्यावर गेल्यावर देखील रमा कोणासोबत जास्त बोलत नव्हती. ती कोणत्यातरी विचारात आहे हे मात्र सगळ्यांना कळत होतं.
काही दिवस घरी राहून रमा पुन्हा शहरात आली. अहो तिच्या सोबतच आलेले. पण आधी सारख्या गप्पा काही आता होत नव्हत्या. रमाची शांतता त्यांना त्रास देत होती. पण रमा मात्र अभ्यासात इतकी गुंतलेली होती कि तिचं लक्षचं नव्हतं बाकी कशात. परीक्षा संपली तसा तिला जरा निवांत वेळ मिळाला. शेवटचा पेपर संपला आणि दुसऱ्या दिवशी दोघं काकींना सोबत घेऊन पुन्हा गावी आलेत.
अहो त्यांच्या शेतीमध्ये रमले तर रमा निकालाची वाट बघत होती. एव्हाना सासूबाईंच एक-दोन वेळा रमाला पुढे काय म्हणुन विचारून झालं होतं. त्यांना आता नातवाचं तोंड बघायची इच्छा होती. कारण रमाचं लग्न होऊन तब्बल दोन तपं उलटली होती. पण रमा मात्र अजुन त्या घटनेतून सावरली नव्हती. आणि कुठे तरी आत काही तरी खदखदत होतं. त्या मेलेल्या स्त्री साठी, तिच्या त्या बाळासाठी काही तरी करावं, त्या आणि तसल्या इतर आदिवासी लोकांच्या जीवनात थोडा तरी फरक पडावा असं रमाला सारखं वाटत होतं. पण नेमकं काय करायचं आणि कसं? ह्या दोघं प्रश्नांची उत्तरं तिला सापडत नव्हती. आणि तिच्या डोक्यात फक्त तेच विचार चालू होते.
वेळ जाण्यासाठी म्हणुन रमाने गावातल्या डॉक्टरांकडे संध्याकाळच्या वेळी जायला सुरुवात केली. ती कोणालाही गोळ्या औषधी देत नव्हती, फक्त शांततेत बसून लोकांच्या तक्रारी ऐकणं आणि त्यावर डॉक्टरांच्या प्रतिक्रिया यांचा फक्त ती अभ्यास करत होती. असचं एकदा दवाखान्यात बसलेली असतांना गावातली एक अस्पृश्य महिला तिच्या नवजात बाळाला घेऊन दवाखान्याच्या पायरीवर येऊन बसली. ते बाळ रडत होतं, आणि ती बाई त्याला पदराखाली घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. डॉक्टर बाकी रुग्ण तपासण्यात व्यस्त होते म्हणुन चौकशी करायला रमा त्या बाईजवळ गेली. बाळाचा चढलेला आवाज आईला त्रास देत होता, त्या बिचाऱ्या माउलीचा पुर्ण जीव त्या लेकरात अडकलेला होता. कोणतीही आई असो बाळाच्या थोड्याश्या रडण्याने कासावीस होते, हे सगळ्या जगाला माहीत असतांना त्या बाबाने केलेलं कृत्य हे किती अघोरी होतं याची जाणीव पुन्हा एकदा रमाला झाली.
रमाने त्या बाळाला बाई कडून घेऊन तपासलं, बाळाच्या पोटाच्या भागात कडकपणा जाणवत होता, त्यामुळे त्याला योग्य ते औषध देऊन त्याचं रडणं रमा ने बंद केलं, तर त्या माउलीने रमाचे पाय धरलेत. बाळ शांत झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. आतून डॉक्टर हे सगळं बघत होतेच, रमाच्या चेहऱ्यावर होणारे बदल त्यांच्या अनुभवी नजरेने हेरले. सर्व रुग्ण संपल्यावर डॉक्टरांनी रमाला तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळीच त्यांच्या लक्षात आले कि रमाला समाजात घडत असलेल्या घटना दिसताय आणि त्यावर काही उपाय केले गेले पाहिजे हे देखील तिच्या लक्षात येतयं.पण त्यासाठी नेमका मार्ग कोणता निवडावा हे मात्र तिला अजुन समजलेलं नाही.
त्यांनी तिला एकच सांगितलं, “बरीच लोकं अशी आहेत जी स्वतः डॉक्टर पर्यंत पोहचत नाहीत पण डॉक्टर जर त्यांच्या पर्यंत पोहचले तर मात्र कदाचित त्या लोकांना मदतच होईल. पण हे करायला कोणताही डॉक्टर धजावत नाही कारण त्या लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा. साधा ताप असू देत कि अजुन काही मोठा आजार, त्या लोकांना डॉक्टरांपेक्षा बाबा-बुवांवर जास्त विश्वास आहे. त्यांची हि अंधश्रद्धा जर मोडून काढायची असेल तर त्यांच्यात जाऊन, त्यांच्या सोबत राहून काम करायला कोणी तयार व्हायला पाहिजे.”
त्या दिवसानंतर मात्र रमा दवाखान्यात परत गेली नाही. तिचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे तिने प्रथम क्रमांक पटकावला होता. गावात तिचा मोठा सन्मान देखील करण्यात आला. सासरेबुवांनी तिच्यासाठी गावात एक मोठा दवाखाना बांधायचं ठरवलं. पण ज्या दिवशी दवाखान्याच्या भूमिपूजनाचा मुहूर्त होता त्याच दिवशी रमाने सर्वांना मोठा धक्का दिला. तो म्हणजेच तिचा आदिवासी पाड्यांवर काम करण्याचा निर्णय. कारण त्यांच्या गावात आधीच एक दवाखाना होता आणि डॉक्टर देखील अनुभवी होते, त्यामुळे गावातल्या लोकांना अजुन एका डॉक्टरची गरज नव्हती, असं तिचं स्पष्ट मत होतं.
घरच्यांना तिच्या ह्या निर्णयाच कौतुक वाटलं पण आदिवासी लोकांसाठी काम करायचं म्हणजे त्यांच्या भागात जाऊन राहायचं याला मात्र घरात कोणी तयार नव्हतं. त्यात आता तिने थोडा स्वतःच्या मुला-बाळांचा विचार करावा असं देखील सगळ्यांना वाटत होतं. यावर उपाय म्हणुन जसं ती शिक्षण घेताना करत होती तसं काही करता येईल का? ह्या विषयावर घरात जोरदार चर्चा सुरु होती. त्यात थोडा बदल म्हणुन तिने आठवड्यातील दोन दिवस घरी येऊन राहावं असा सासरेबुवांनी प्रस्ताव मांडला. पण सासूबाई मात्र ह्या वेळी ठाम मतावर होत्या, त्यांना रमाने गाव सोडुन कुठेही जाऊ नये असेच वाटत होते. त्यांनी रमाला निक्षून सांगितलं कि आता हे सगळं बंद आणि तिने घर सांभाळावं कारण त्याचं देखील वय झालं होतं, घरातली काम करायला जरी गडी माणसं असलीत तरी त्यांच्यावर लक्ष द्यायला कोणी पाहिजे होतं. रमाने जर गावात दवाखाना सुरु करायला हो म्हटलं तर ठीक नाही तर तिने आता फक्त घर सांभाळावं असं सासूबाईंच मत होतं.
पण ह्या सगळ्यात अहोंना कोणी विचारलंच नाही कि त्यांना त्यांच्या बायको कडून काय अपेक्षा आहेत. त्यांना आता रमाला सोडायला जीवावर येत होतं, पण त्यांना माहीत होत कि त्यांची रमा आता त्यांच्यापासून कुठे तरी लांब आधीच निघून गेली होती. आणि रमाला ह्या सगळ्यात कुठे तरी दबून गेल्याची भावना निर्माण होत होती. ह्या सगळ्यात ती अहोंपासून खुप लांब निघून गेलेली हे इतर कोणाच्याही ध्यानात नव्हतं आलेलं पण तिला देखील याची जाणीव होतीच. त्या दोघांमधला संवाद तर केव्हाच संपला होता आणि त्यात आता एक वेगळ्याच प्रकारचा संकोच आला होता. सगळ्यांचं बोलून झाल्यावरही कोणताच निर्णय घेतला जात नव्हता. शेवटी रमाने स्वतःचा निर्णय सांगितला.
तिला कोणत्याही नात्यात अडकायचं नव्हतं, अहो आणि तिच्यात आलेला दुरावा हा इतका वाढलेला होता कि पुन्हा त्यांच्यात मैत्री व्हायला देखील किती वर्ष जातील याचा तिला स्वतःला अंदाज नव्हता. ना तिला मुला-बाळांची हौस होती. घराच्या भल्यासाठी म्हणुन ती गावात राहायला तयार होती, पण यात तिची स्वतःची होणारी घुसमट तिने सर्वांसमोर मांडली. घरातले सर्व अवाक होऊन फक्त तिच्याकडे बघत होते. अहोंच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या पण आता रमाला अडवण्यात अर्थ नाही हे ते जाणून होते.
शेवटी रमा सगळी नाती तिथेच ठेवून पुढे निघाली, एकटी. सोबतीला लक्ष्मीकाकी होत्या. आणि तीच रमा आज रडत होती.
हे त्या दोघांमधलं प्रेम होतं? कि हे अश्रू फक्त माणुसकी म्हणुन बाहेर पडत होते? याचा विचार मात्र काकींच्या मनात चालू होता.

Group content visibility: 
Use group defaults

सासू-सासरे, नणंद, आणि रमाचे “अहो” सगळे आलेले. लग्नानंतर गेल्या बारा वर्षात रमा आणि सासरच्या लोकांची भेट एकदाच झालेली. त्यामुळे वयात आलेली रमा बघून सासू आणि नणंद तर अगदीच आनंदी होत्या.>>>>>>
असं लिहुन पुढे
<<<<<<रमाची सासू म्हणजे तिची आत्या, मुलाच्या जन्माच्या वेळी बाळंतव्याधी ने गेली, पण जातांना मुलासाठी रमाला सुन म्हणून घेऊन. सासू रमाच्या लग्नानंतर सहा महिन्यातच गेली>>>>>>>>>>>
हे जरा कंफ्युजिंग झालं.
ओके. सावत्र सासुचा उल्लेख आहे पुढे.

फारच सुंदर कथानक आहे. लेखिकेनं छान पेललं आहे. सकस लिखाण!!
>>>>>>> कादंबरी होईल या प्लॉटवर.>>>>>>> अ‍ॅमी +१००

छान लिहिलंय,

अ‍ॅमीशी सहमत. नक्की पुढे लिहा

सर्वांना धन्यवाद...
कादंबरी बद्दल तर अजून विचार नाही. पण पुढच्या भागात अहोंबद्दल लिहते.

वास्तू साठी क्षमस्व. कॉलेज च्या कामांमध्ये वेळ नाही मिळत सध्या. आठवड्यात पुढचे सगळे भाग टाकते.