युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४१

Submitted by मी मधुरा on 28 September, 2019 - 00:32

युगांतर- आरंभ अंताचा
भाग ४१

"माताश्री, तुम्ही भ्राताश्रींना सांगून ठेवा, सगळी कडे शक्ती दाखवून काम करायची नाहीत म्हणून. पुन्हा सगळं नव्याने उभारावे लागते नविन ठिकाणी स्थलांतर करायचे म्हणले की."

"माताश्री, अर्जुनाला सांगा की लाकडं गोळा करण्याचे काम त्याने स्वतःच करावे. मला मदत मागितली तर मी माझ्या पद्धतीनेच काम करणार."

"पण भ्राताश्री, म्हणून अख्ख झाड उचलून आणायचं? आजूबाजूचे नगरवासी 'आ' वासून बघत होते."

"आणि जसं काय तू कधी नेम धरून फळं पाडतच नाहीस. तुझा अचूक नेम पाहून कोणालाच कळणार नाही आपल्याबद्दल असं वाटतं का तुला?"

"हे बघा भ्राताश्री....."

"तुम्ही दोघं बरोबर आहात आपापल्या जागी. परंतु वृकोदर, असे अनुजाशी वाद घालू नयेत. तू मनाने आणि मानानेही ज्येष्ठ आहेस. त्याला क्षमा कर. आणि अर्जुन, भीम ज्येष्ठ बंधु आहे तुझा. त्याच्याबद्दल असे अनादराने बोलणे योग्य नाही."

"पण भ्राताश्री आपण किती वेळ असे स्थलांतर करत ओळख लपवत....." त्याची नजर कुंती कडे गेली. तिचा चेहरा पडलेला!

"नाही, म्हणजे मी म्हणत होतो की किती छान आहे ना ही जागा?"

"ही जागा तुम्हाला आवडली भ्राताश्री?" नकुलने सभोवतालच्या घनदाट जंगलावर नजर फिरवत आश्चर्याने विचारले.

"नकुल, माझ्या दृष्टीने बघ." खांद्यावर हात दाबत अर्जुनाने नकुलाचे कुंतीकडे लक्ष वेधले.

"हो भ्राताश्री.... छान आहे वातावरण इथले." नकुलने चेहऱ्यावर आनंद दाखवत सारवासारव केली.

जंगलातल्या हिरवळीवर गाठोडीत आणलेली वस्त्रे तिने अंथरली आणि त्यावर सगळे आसनस्थ झाले. चालून चालून सगळ्यांच्या घशाला कोरड पडली होती.

"वृकोदरा, थोडे पाणी आणून दे रे."

"आज्ञा, माताश्री."
भीम जवळचा जलाशय शोधत वनात फिरू लागला. काही वेळातच एक सुंदर नदी प्रवाह दिसला आणि त्याने अनेक पर्णांची जोडून एक पत्रचषक तयार केला आणि त्यात पाणी भरून घेतलं. तिथून निघेपर्यंत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असा भास त्याला होत होता. नजर जाईल तिथवर एका दिशेलाघनदाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला वाहणारी प्रचंड मोठी नदी. चिटपाखरू सुद्धा नजरेला पडत नव्हतं इतका निर्जन परिसर वाटत होता. भीमने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि लाक्षागृह मुळे आपण सगळीकडेच संशयाने बघतो आहोत असे स्वतःलाच समजावत त्याने वनाकडची वाट धरली. बघतो तर कुंती सकट सगळे झोपून सुद्धा गेले होते. त्याने पत्रचषक बाजूला ठेवला आणि निगराणी करायची म्हणून त्यांच्या भोवती फेऱ्या घालत त्याने चौफेर नजर फिरकली. रात्रीचे गार वारे वाहू लागले तसे शेजारच्या गाठोड्यातले एक लांब उंचीचे वस्त्र त्याने कुंती आणि बंधुंच्या अंगावर पसरवले.
तितक्यात कुठलातरी आवाज आला.... 'आवाज तर नैसर्गिक वाटत नाही. बहुदा पैजणांचा वाटतो आहे. पण मगाशी तर कोणीच नव्हते इथे....'
त्याने दोन पावले पुढे टाकली आणि समोर एक उंच, मजबूत अंगयष्टीची एक सुंदर कन्या उभी होती. भीमाच्या नजरेत नजर मिसळून हसून त्याच्याकडे पाहत होती.
"प्रणाम देवी"
त्याचा आवाज ऐकून ती गोड हसली.

"तुम्ही इथे काय करता आहात? तेही या वेळी?" भीमाने आश्चर्याने विचारले.

"मी येते इथे अनेकदा.... पण तुझ्यासारखा देखणा पुरुष मी या आधी नाही पाहिला या जंगलात. कोण आहेस तू?" त्याच्या पिळदार बाहुंकडे पाहत ती उद्गारली. भीमची रेखीव अंगयष्टी तिच्या डोळ्यांत भरली होती.
तिच्या स्पष्ट बोलण्याने भीम थोडा दचकलाच.

"मी माझ्या परिवारासोबत इथे आलो आहे देवी. वाटेत जंगल लागलं. काही वेळ विश्राम करून निघणार होतो. पण थकल्यामुळे सारे निद्रावश झाले. म्हणून आजचा दिवस इथे वास करून प्रभात समयी निघण्याचा विचार आहे."

"सगळे झोपले? मग तू जागा का?"

"त्यांची निगराणी करायला हवी ना कोणीतरी.... म्हणून."

"खूप चांगला मनुष्य आहेस रे तू."

"देवी, तुमचा परिवार कुठे आहे?" तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव बदलले. पण तिने विषय बदलला.

"तुला फळे आवडतात?" भीमाच्या आवडीच्या विषय!

"हो देवी. गोड फळे अधिकच आवडतात." आठवणीने त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं.

"चला माझ्या सोबत मग. उत्तम फळं देणाऱ्या वृक्षाचा पत्ता माहिती आहे मला."

त्याचा हात धरून तिने त्याला जवळच्याच एका डेरेदार वृक्षाखाली नेले. त्याला भरगच्च फळे लागली होती. भीमने काही वेळ फळे काढण्यात घालवला आणि तितकाच वेळ तिने त्याच्याकडे बघण्यात.

"घ्या देवी, तुम्हीही घ्या." भीमाने खांद्यावर टाकलेल्या वस्त्रात गोळा केलेली फळे तिच्यापुढे धरली. ती मात्र त्याच्याकडे बघण्यात गर्क!

दोघे पांडव आणि कुंती झोपलेल्या ठिकाणाहून जवळच फळे खात बसले. आणि काहीच वेळात एक महाकाय, अक्राळविक्राळ देह त्यांच्या पुढे ठाकला. त्याने भीमासमोर त्या सुंदरीवर हात उगारला आणि भीमाने हातावर फटका मारत त्याचा हात बाजूला केला.

त्याचे लक्ष भीमाकडे वेधले गेले आणि भीमाला पाहून आनंदाने आरोळी ठोकली. धष्टपुष्ट शरीर म्हणजे आज खूप छान मेजवानी होणार वगैरे स्वप्नरंजन करत त्याने भीमाला हात लावला. खुद्द भीमाला !! पुढे काय होणार होते?..... विनाश! बकासुरासारखा राक्षस टिकला नाही, तिथे हा राक्षस भीमापुढे काय टिकणार होता?
नेहमीप्रमाणे रडण्याचे ओरडण्याचे आवाज जंगलात घुमले पण या वेळी आवाज खुद्द जंगलाच्या राजाचा होता. कोणा निष्पाप मनुष्याचा नाही..... ओरडण्याचा आवाज ऐकून आणि रक्तबंबाळ हिडिंबचा मुटकुळा होऊन पडलेला देह पाहून ती सुंदरी रडू लागली.
या सगळ्या आवाजांनी एव्हाना कुंतीही जागी झाली होती. भीमाने राक्षसाला लगावलेले ठोसे सुद्धा तिने पाहिले होते आणि त्या सुंदरीचे अश्रूही.
भीमाला तिच्या रडण्याचे कारण न कळल्याने तो गोंधळून तिला म्हणाला, "तुम्ही चिंता करू नका देवी. तो राक्षस आता तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही."
ती मात्र रडतच होती. पंडुपरिवार तिच्या आणि भीमाच्या जवळ येऊन उभा ठाकला. मग कुंतीने एकंदर परिस्थिती लक्षात घेत पुढे होऊन तिचे अश्रू पुसले.

"काय झालं? का रडते आहेस?"

"हा... हा माझा बंधु होता." दाबलेला हुंदका बाहेर पडत ती अस्पष्टपणे म्हणाली. सगळे बघतचं राहिले. त्या भयंकर राक्षसाची भगिनी? इतकी सुंदर?

"माफ करा मला. पण हा......." भीम शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला.

"नाही..... माफी नको मागूस. तू त्याला मारले नसतेस तर..... त्याने तुला.... तुम्हा सगळ्यांना मारले असते."

"का?" भीमने आश्चर्याने विचारले.
ती रडत राहिली आणि कुंती तिला थोपटत राहिली.

"तो नरभक्षक होता." सगळ्यांनी दचकून एकमेकांकडे पाहिले. "आणि.... आणि नेहमीसारखं मला पाठवलं होतं त्याने तुम्हा सगळ्यांना पकडायला. " कुंतीही क्षणभर दचकून तिच्याकडे बघत होती.
'ही मानव नाही? पण तिच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे काय आहे? पण तरीही..... जर तिचा बंधु नरभक्षक आहे, तर कशावरून ही सुद्धा नसेल?'

"तू एकटीच आहेस?"

"हो." तिने डोळे पुसले.

"मला क्षमा करा देवी...." भीम हात जोडून म्हणाला.

"हिडिंबा..... हिडिंबा नाव आहे माझं. आणि हा हिडिंब...." प्रेताकडे बोट दाखवून सांगितले.
भीमकडे बघता बघता तिच्या चेहऱ्यावर पहिलेच भाव परतले. ती त्याच्या कडे बघून हसली.
भीमला जाणवलं..... तो काही बोलणार तितक्यात त्याच्या पायाला स्पर्श झाला.
"हे काय? कृपया माझ्या पाया नका पडू."
"भीम, मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे."
लग्नाची मागणी! संपूर्ण कुटुंबासमोर! जंगलात.... एका राक्षसीने, एका देवपुत्राला मागणी घातली होती.
"नाही देवी. हे शक्य नाही. मी.... मी मनुष्य आहे. दानव प्रजातीतला नाही. एक मनुष्य आणि एक दानव..... कसं शक्य आहे हे?"
"का भीम? त्याने काही फरक पडतो तुला?"
"मला नाही, पण विवाह केवळ एका गोष्टीचा विचार करून केला जात नाही ना? आमचे राज्य, त्यातले नगरवासी, समस्त हस्तिनापुर तुम्हाला कसे स्विकारेल?"
"पण मी हस्तिनापुरास आलेच नाही तर?"
भीम निरुत्तर झाला. हिडिंबा क्षणभर त्याच्याकडे बघत राहिली आणि तिने कुंती कडे नजर फिरवत तिलाच विनवले, "तुमचा पुत्र मला जे कारण देऊन नकार देतो आहे, ते कारण मी दूर करेन. मला समजले आहे की तो तुमच्यापासून दूर इथे नाही राहू शकणार. आणि मला मानवी वस्तीत केवळ अपमान मिळेल. कदाचित त्याने तुमच्या कुटुंबालाही अवहेलना सहन करावी लागेल." भीम च्या चेहऱ्यावर एक असहायतेची छटा पसरली.
"पण एक वर्ष.... एक वर्ष तुम्ही इथे राहू शकाल? मला तुमचा पुत्र खरचं आवडला आहे.... निदान एक वर्ष मला त्याच्या सोबत जगायचे आहे."
कुंतीने भीमावर नजर फिरवली आणि काही बोलणार तितक्यात हिडिंबेने तिच्या मनातले प्रश्न ओळखले.
"कशाबद्दलची साशंकता आहे, माते ? आणि काय पुरावा हवा आहे तुम्हाला अजून?
मी माझ्या एकमेव जवळच्या व्यक्तीला मृत्यूपंथी एकटे सोडून दिले, हा पुरावा पुरेसा नाही का? भीमाला मी माझ्या बंधुपुढे निवडलं हा पुरावा नाही का?
हे माझं रूप...... ही माझी वाचा, वाणी, अश्रू.... हे एका राक्षसीचे असू शकतात का माते?
माझे सारे दैत्य कुळाचे सारे वैशिष्ट्य त्यागावे वाटले मला. पहिल्यांदा मला माझे दिसणे, वागणे, वावर, अन्नपद्धती.... सर्व बदलावे वाटले. नरभक्षक असूनही आणि भीम समोर येऊनही माझ्या मनाला त्याच्या हत्त्येचे विचार शिवले नाहीत, हा पुरावा नाही का माझ्यात झालेल्या परिवर्तनाचा? या परिवर्तनानंतर माझे स्वतःचे कुळ, इथले जंगलवासीही मला अधिपती म्हणून स्विकारतील का याचाही विचार मी केला नाही माते.
मी भीमाला नदीकाठी बघितले आणि बघतच राहिले.... हे असे सुंदर सात्विकतेचे रूप माझ्या समोर होते आणि मग मलाही वाटले..... त्याच्या सारखे बनावे, दिसावे.... त्याची सोबत असावी असेही वाटले त्यात काय चुकले?
जर भीमाला माझ्यापासून आत्ता दूर केलेत तर मला जगण्याचे काही कारणच उरणार नाही. दैत्य कुळात जन्मलेल्या ज्या देहामुळे मला भीम नाकारतो आहे, तो देह त्याग करण्यावाचून काही पर्याय उरणार नाही माझ्यापुढे."
कुंती तिच्या अश्रूंमध्ये विरघळून गेली.
"भीम, तुझ्याकडे आता काही कारण उरले आहे नकाराचे?"
आणि भीमाने चक्क मान फिरवली तेही लाजून!

_________________

"दाऊ, तुम्ही किती अजून फेऱ्या घालणार आहात अश्या अस्वस्थपणे म्हणजे तुम्हाला शांतता मिळेल मनाला?"
"तू तर बोलूच नकोस. सरळ उत्तरे देणे तुझ्या स्वभावात नाही आणि तुझी बहूआयामी उत्तरे समजून घेणे माझ्या वैचारिक कक्षेच्या पलिकडचे आहे."
कृष्णाने उठून बलरामासोबत फेऱ्या मारायला सुरवात केली.
"तू माझी नक्कल करतो आहेस अनुज?" बलरामाने चढता आवाज लावला.
"नाही दाऊ. पाहतो आहे की फेऱ्या घालून पांडवांबद्दलची काही माहिती हाती लागते का!"
"अनुज..."
"..... आणि माहिती अशी आहे दाऊ, की भीम खरचं खूप उदार मनाचा आहे आणि तितकाच साहसी सुद्धा."
"काय?"
"हो दाऊ. किंबहुना मी समजत होतो त्यापेक्षा किंचित जास्तच सामर्थ्यवान आहे तो."
"हेच तू मागच्या वेळी म्हणाला होतास ना?"
"हो दाऊ, एकदा झालेली गोष्ट अपघात असू शकतो. पण तिची अनेकदा पुनरावृत्ती झाली, तो सिध्दांत बनतो."
"तुला खात्री आहे की पांडव जिवंत आहेत?"
"तुम्हाला काय वाटतं दाऊ?"
"तू जे सांगतोस ते तुझ्या डोळ्यांत पाहिलं की सगळं सत्यच वाटतं बघं. पण ते सहजासहजी विश्वास ठेवण्यासारखही नसत."
"आणि तुमच्याकडे विश्वास ठेवण्यापलिकडे पर्यायही नसतो!" कृष्ण हसत म्हणाला.
"तसचं म्हणावं लागेल. पण भीमाने अजून कुठला पराक्रम दाखवला ? आणि आहेत कुठे ते आता?'
"दैत्यवध.... ते ही काम्यक वनात!"
"आणि हे सगळे तुला फेऱ्या घालताना कळले?"
"मला नाही दाऊ. तुम्हाला." कृष्ण हसला आणि बाहेर निघून गेला.

_____________

"अर्जुन सर्वांसोबत परत कधी येणार विदुर? आता खूप काळ लोटला. मला अस्वस्थ होते आहे आता."
"चिंता करू नका महामहीम. ते स्वस्थ आहेत. परंतु अजूनही....."
"अजूनही त्यांना इथे यायला सुरक्षित वाटत नाही, असचं ना?" भीष्म दु:खी होत म्हणाले.
"नाही, महामहीम. असा विचार करू नका. पण ते सुज्ञ आहेत. योग्य वेळ आली की ते परत नक्की येतील." विदूर धीर देत म्हणाला.
"मला सहन नाही होत हे विदुर. तो दुर्योधन राजगादीची स्वप्न बघतो आहे. धृतराष्ट्राने गादी दुर्योधनाच्या हाती देण्याआधी पांडव इथे पोचले पाहिजेत, विदुर."
"महामहीम, क्षमा असावी, पण धृतराष्ट्र ही गादी सोडणार नाहीत. अगदी स्वतःच्या पुत्राकरताही नाही."
"विदुर तू काय बोलतो आहेस?"
"सत्य बोललो महामहीम! दुर्योधनाच्या नजरेत भरलेली राजगादी..... ज्या नजरेने तो राजगादीकडे बघतो आणि ज्या नजरेने त्याला त्याचेच बंधु राजगादीपर्यंत जाण्याच्या वाटेतले काटे दिसतात...... ती नजर नेत्रहिन धृतराष्ट्राचीच देणगी आहे, महामहीम. म्हणूनच म्हणतोय, चिंता करू नका. हस्तिनापूरचे वर्तमान काळातले महाराज त्यांची जागा सध्या कोणालाच देणार नाहीत. फार फार तर युवराज घोषित केले जाईल दुर्योधनाला."
"तू बोलतो आहेस तसेच व्हावे विदुर. तसेच व्हावे."
___________________

©मधुरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

, कथा आवडली .!

(तुझ्याकडे आता काही कारण उरले आहे नकाराचे?"
आणि भीमाने चक्क मान फिरवली तेही लाजून!)
+111
पुढील भागाची प्रतिक्षा .