पाऊस म्हटलं की डोळ्यांसमोरून हजारो आठवणी तरळून जातात, त्यातलीच हि एक ओलसर आठवण.
जवळपास 5 वर्ष ओलांडून गेली या गोष्टीला पण सगळं कसं उन्हासारखं लख्ख आठवतंय.
30/जुलै/2014, बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती.सकाळी सकाळी हातात वाफाळलेला चहाचा कप घेऊन मी ते निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवीत, न्याहाळत बसले होते .तेवढ्यात दारावर थाप पडली,अन माझी तंद्री भंग पावली दरवाजा उघडला तर दारात शाळेतील शिपाई मामा बावरलेल्या चेहऱ्याने उभे होते. "सर आहेत का घरात.. ? त्यांनी विचारलं. माझे वडील शाळेत शिक्षक आहेत, त्यांनाच शोधत शिपाई मामा घरी आले होते. वडिलांनी त्यांना घरात बोलावलं, पण बहुदा ते खूप घाईत आणि घाबरलेल्या अवस्थेत होते. ते रेनकोट मागतच म्हणाले, "डोंगर कोसळलाय, गाव गडप झालय आमचं, जायला हवं...!"
काही समजायच्या आतच ते लगबगीने निघून पण गेले. बाहेर रस्त्यावर लांबलचक ऍम्ब्युलन्सची लाईन लागलेली, त्यांचा तो कर्णकर्कश आवाज ऐकून मनात भीतीची घंटा वाजू लागलेली . काहीतरी भयंकर घडलय, एवढच समजत होत . पटकन टीव्ही चालू केला तर सगळ्या चॅनेलवर एकच बातमी एक होतं माळीण गाव...!
भिमाशंकरच्या अभयारण्याजवळ, डोंगरांच्या कडयाकपाऱ्यांत वसलेले एक छोटास सुंदर गाव माळीण..!अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या या गावात लोकसंख्या अगदी जेमतेमच.
" स्वप्न पहाटेचे खरेच होणार, घरातले सारे गोड स्वप्नि,
पाहता पाहता दृष्टी गेली पार, सकाळी अंधार अनंताचा."
या उक्तीप्रमाणे गावातील लोक आदल्या दिवशीच्या रात्री गाढ झोपी गेले होते ,पण त्यांना कुठे माहित होतं की त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळनार आहे. पण त्याच दिवशी रात्री एवढी अतिवृष्टी झाली की गावातील जीवन संपुष्टात आले.
काळ्याकुट्ट ढगांमागून नुकतीच सोनेरी सूर्यकिरणे बाहेर येऊ लागलेली, तेवढ्यात डोंगरांमधून कानठळ्या बसवणारा स्फोटकांसारखा आवाज झाला. चिखल ,उन्मळलेली झाडे आणि मातीचा ढिगारा अचानक घसरून खाली येऊ लागले .गावाचा आधार असलेला डोंगरच गावावर कोसळला आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गावाचं क्षणार्धात गडप झाले. होत्याचे नव्हते झाले होते..!" खेड्याचे या कसे भाग्य असे खोटे सुर्यास्त पहाटे पाहण्याचे".
सकाळी सहाच्या सुमारास पहिली एसटी बस गावात आली आणी चालकाला माळीण गाव गडप झाल्याचे निदर्शनास आले. हा हा म्हणता बातमी सगळीकडे पसरली आणि मदत कार्य चालू झाले. आजूबाजूच्या गावातील लोक हातात मिळेल ते हत्यार घेऊन माती उपसायला जात होते. कुठुनतरी कोणीतरी जिवंत सापडेल ही आशा. पण चिखल आणि मातीशिवाय हाती लागत होते ते फक्त मृतदेह...!. "मातीचे पाईक माती खाली गेले असे कसे गेले कष्ट वंत?" .
डोंगरकडा कोसळून तब्बल 44 घरे जागीच गाडली गेली होती .दुपारी साडेबारापर्यंत ३० ऍम्ब्युलन्स, जेसीबी, आणि पोकलँड घटनास्थळी कसेबसे पोहोचले .मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळे झालेला चिखल आणि घटनास्थळी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याकारणाने मदत कार्यास अडथळे निर्माण होत होते.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी आरपीएफच्या जवानांचे युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न चालू होते. तब्बल नऊ दिवस हे बचाव कार्य चालू होते. एकेक करून सारे मृतदेह बाहेर निघत होते.
ही दुर्घटना इतकी भयंकर होती की, गावातील काही लोकांच्या घरातील एखाद दुसरी व्यक्ती दगावली, तर काही लोकांच्या घरातील एखाद दुसरीच व्यक्ती बचावली होती . सुदैवाने शिक्षणानिमित्त शिनोली येथे राहणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थी सुखरूप बचावले होते पण कुटुंबातील माणसे डोळ्यांसमोर गाडली गेल्याच्या भीतीने आजही त्यांच्या जिवाची घालमेल होते
दुर्घटनेतील मृतांनवर गावातील ओढ्या काठच्या स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यावेळचा आक्रोश आणि एकूण वातावरण आजही डोळ्यांसमोरून जात नाही .येथील शाळेची इमारत आणि वाचलेली घरे आजही भग्नावस्थेत पहायला मिळतात. हे सगळं पाहू इंदिरा संत यांच्या कवितेतील ओळी नकळत ओठांवर आल्या
"नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी,
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली."
त्या कोसळलेल्या डोंगराच्या ढिगाऱ्यावर यंदा पावसाने, गवत आणि रानफुले उगवली आहेत. निसर्ग जणू काही स्वतःला सावरतोय पण हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल माळीण गाव कायमच काळाच्या उदरात गडप झालय..! आता उरलीये ती फक्त चिखलमाती आणि एक अनुत्तरीत प्रश्न ..
"जीव जनावरा देत आली ठाय,
धरणी ती माय, कोपली का...?"
विषय दुःखद असल्याने छान तरी
विषय दुःखद असल्याने छान तरी कसं म्हणावं?
लिहीत रहा..
हे सगळे सरकारच्या टार्गेट आणि
हे सगळे सरकारच्या टार्गेट आणि निधी खर्चण्याच्या दबावामुळे झाले असं वाचलं होतं. अति उतारावर भात खाचरे तयार करण्याची योजना राबवल्यानं जमीन भुसभुशीत झाली व पाऊस पडताच वजनदार होऊन मुळ जागेपासून जमीन तुटली व खाली वहात येऊन माळीन गाव गाडलं गेलं.
विषय दुःखद असल्याने छान तरी
विषय दुःखद असल्याने छान तरी कसं म्हणावं?
लिहीत रहा.. +१११
अतिशय दुःखद घटना होती. निसर्ग
अतिशय दुःखद घटना होती. निसर्ग काय करू शकतो याचं एक उदाहरण फक्त
लेखनशैली छान आहे मात्र विषय
लेखनशैली छान आहे मात्र विषय दुःखद असल्याने छान म्हणता येणार नाही
वाचून जीव हळहळला! त्यावेळी
वाचून जीव हळहळला! त्यावेळी तिथे प्रत्यक्षदर्शींची काय अवस्था झाली असेल.
(No subject)
लेखनशैली छान आहे मात्र विषय
लेखनशैली छान आहे मात्र विषय दुःखद असल्याने छान म्हणता येणार नाही Sad>>>> +१
सत्याची कल्पनाही नकोशी वाटली.
सत्याची कल्पनाही नकोशी वाटली.
http://mr.vikaspedia.in
http://mr.vikaspedia.in/social-welfare/90692a92494d924940-93594d92f93593...
२६ वर्षांपुर्वी नाणेघाट ते
२६ वर्षांपुर्वी नाणेघाट ते भिमाशंकर असा ट्रेक केला होता, भर पावसाळ्यात. त्यावेळी भिमाशंकरला पोचण्यापुर्वीच्या रात्री माळीण गावातल्याच शाळेत झोपलो होतो. त्या शाळेसमोरच पसरलेलं ते सुंदर चिमुकलं गाव!! त्या दुर्घटनेचा पहीला फोटो पाहीला तो ही नेमका त्या शाळेसमोरुनच घेतलेला. सगळं सगळं एकदम लख्खं आठवलं.
निःशब्द
निःशब्द
बाप रे! मडस्लाईड!! हॉरिबल
बाप रे! मडस्लाईड!! हॉरिबल असणार.
भयानक दुर्घटना होती ती.
भयानक दुर्घटना होती ती.
किती लोकसंख्या होती गावाची? आणि त्या रात्री कितीजण तिथे होते? त्यापैकी किती वाचले?
> हे सगळे सरकारच्या टार्गेट आणि निधी खर्चण्याच्या दबावामुळे झाले असं वाचलं होतं. अति उतारावर भात खाचरे तयार करण्याची योजना राबवल्यानं जमीन भुसभुशीत झाली व पाऊस पडताच वजनदार होऊन मुळ जागेपासून जमीन तुटली व खाली वहात येऊन माळीन गाव गाडलं गेलं. > +१
असल्या लेखनामधे अलंकारीक भाषा, कविताबिविता मला आवडत नाहीत...
सहमत
सहमत
https://youtu.be/9FlRFcabxr8
https://youtu.be/9FlRFcabxr8
तुमचा लेख चोरीला गेलाय आरुश्री
१००% जसा आहे तसाच. परवानगी
१००% जसा आहे तसाच. परवानगी घेतली असल्यास उत्तम.
परवानगी घेतलेली नाही, काय
परवानगी घेतलेली नाही, काय करता येईल?
काय करता येईल>> मायबोलीवरच
काय करता येईल>> मायबोलीवरच धागा काढा नवा, youtube लिंक द्या, मायबोलीकरच त्या व्हिडिओ वर जाऊन रिपोर्ट करतील! मायबोलीकर नेहमी मदत करतात