वस्ल आणि हिज्र या दोन साध्या घटना. "वस्ल्" म्हणजे ,मीलन. तर हिज्र म्हणजे विरह, दुरावा, जुदाई. पण या दोन घटनांमुळे प्रेमिकाच्या मनामध्ये जे चढउतार होतात, कल्लोळ माजतो, त्याबद्दल उर्दू साहीत्यात बऱ्याच अभिव्यक्ती सापडतात. सीधीसी बात आहे, दुराव्यानंतर मीलन येते, मीलनानंतर जुदाई पण या २ घटनांमधील संक्रमण काळात मनाची जी काही अवस्था होते, स्वप्नांचे इमले बांधले जातात, त्याचे रसभरीत वर्णन उर्दूत सापडते. तसेही कविंमध्ये या दोन मानसिक अवस्था हिट्ट आहेतच्. मेघदूत हे तर आख्खं काव्यच विरहाकाळात प्रसवलेले आहे. वस्ल आणि हिज्र च्या ज्या छ्टा मला शेरांमधुन कळल्या त्या इथे मांडते आहे. अर्थातच शेर जो सिलसिला ४ शब्दात, सपृक्तपणे आणि समर्पकतेने मांडणार त्या ताजमहालाला मी रसग्रहणाच्या वीटा लावणार आहे.
आरज़ू दिल की बर आई न 'हसन' वस्ल में और
लज़्ज़त-ए-हिज्र को भी मुफ़्त में खो बैठे हम - मीर हसन
हे म्हणजे तेलही गेले तूपही गेले हाती राहीले धुपाटणे प्रकार कवि बयॉंं करतो आहे. म्हणजे मीलनकाळात कविला(शायर) जे जे काही सांगायचे होते, मनातील इच्छा बोलुन दाखवायची होती, ती काही केल्या बोलुन दाखवता आली नाहीच म्हणजे मीलनक्षण फुकाचा गेलाच पण लज्जतए-हिज्रा ही कवि फुकटचा घालवुन बसला. लज्जत-ए-हिज्रा म्हणजे अँटिसिपेशनची खुमारी. की प्रेयसी भेटल्यावरती मी यंव बोलेन अन त्यंव बोलेन मग ती लाजेल, सलज्ज होकार देईल, मान खाली घालेल्. खरं तर आजकाल असं काही जुनाट आठवलं की मला स्त्रीमुक्तीच आठवते. असो मुक्त स्त्रीची अभिव्यक्ती वेगळी, व्यवहारी स्त्रीची वेगळी. एखादी व्यवहारी स्त्री कदाचित अजुन काही काळ मागुन घेईल की मी विचार करुन सांगते. जे काही कविच्या मनातील मांडे आहेत, मनोराज्ये आहेत् ती एकंदर धुळीस मिळालेली आहेत.
.
हिज्र के बादल छटे जब धूप चमकी इश्क़ की
वस्ल के आँगन में भँवरा गुल पे मंडलाता रहा - आज़िम कोहली
हा शेर मात्र कोण्या नशीबवान कविने लिहीला आहे. मीलनवेळी प्रियतमेच्या चेहऱ्याच्या रौनकने जणू आधीच्या विरहाचे मळभ दूर सारले. "वस्ल के आंगन मे" क्या बात है! मस्त उपमा आहे. मीलनरुपी अंगणात प्रेमिकेच्या फुलासारख्या उमलेल्या चेहऱ्यावर कविचे नेत्र तसेच हृदय एखाद्या खोडकर पण प्रमात धुंद भुंग्यासारखे भिरभिरत राहीले, गुंजारव करीत राहीले. आता हृदय गुंजारव कसे करेल, भुंगा प्रेमधुंद झाला तर तो त्यातल्या त्यात भुंगिणीवरती होइल, फुलावर कशाला होइल वगैरे अरसिक प्रश्न उपस्थित करु नयेत. या शेरात मला अजुन एक गर्भितार्थ आढळला, कविच्या प्रेयसीचेही मुख कलमळासम प्रसन्न, उत्फुल्ल उमलले आहे म्हणजे तिलाही या उत्कट (आला बाबा तो शब्द. माझा फार आवडता तर आहेच पण प्रेमविषयक लेखात हा शब्द आला नाही तर आमच्यात फाऊल धरला जातो.) ,मीलनाची आस होती, वा वा! "खुद ढुंढ रही है शम्मा जिसे क्या बात है उस परवाने की"
.
बहुत दिनों में वो आए हैं वस्ल की शब है
मोअज़्ज़िन आज न यारब उठे अज़ाँ के लिए - हबीब लखनवी
मीलनाची रात्र आहे, आज तरी "नमाज पढण्यास्" सूट दिली जावी, आज तरी शेख साहेबांनी "नमाज पढण्यास बोलावु नये" असे कविला प्रामाणिकपणे वाटते आहे. कारण अजॉं दिली, नमाज पढण्याची हाक दिली की कविला नाईलाजाने प्रेयसीला टाकुन नमाज पढण्यास जावे लागणार किंवा कदाचित तीच स्वत: नमाज पढण्यास सुसज्ज होणार म्हणजे परत मीलनात खंड. वा! खरं तर खरा धार्मिक आपल्या कर्तव्यापासुन च्युत होऊ नये पण प्रेयसीसमोर ना कविचे असे झालेले आहे "तू जान क्या है चाहे तो ईमान भी ले ले." या कविला "कोण्या पंतोजीने, अरे बाबा श्रेयस काय प्रेयस काय याचा डोस देण्याची गरज आहे असे वाटते. काय बरोबर ना? असो. पुढे वळू यात्.
.
दिन पहलुओं से टाल दिया कुछ न कह सके
हर चंद उन को वस्ल का इंकार ही रहा - दाग़ देहलवी
दाग देहेलवी हे नामवंत, अग्रणी शायर आहेत. त्यांनी शेरामध्ये मांडलेली व्यथा वेगळी आहे. दिवसभर प्रेयसीने काहीना काही बहाणा करुन, मीलनाचे वचन देण्याची टाळाटाळच केली, कदाचित तिला भेट नकोच होती.प्रेयसी नक्की एच आर मध्ये असणार, थेट "नाही" बोलली नाही तर काहीना काही बहाणा शोधत राहीली आणि कविला बिचाऱ्याला दिवसभर आशा राहीली. तरा खरं तर दु:खदच शेर आहे.
दाग देहेलवी यांचा च दुसरा शेर आहे-
.
जल्वे के बाद वस्ल की ख़्वाहिश ज़रूर थी
वो क्या रहा जो आशिक़-ए-दीदार ही रहा
.म्हणजे कविचे प्रेम प्लॅटॉनिक नाही."जल्वे के बाद्" वा! म्हणजे नेत्रांनी प्रेयसीच्या सौंदर्याचे आकंठ रसपान करुन झाल्याने कविची इच्छा पूर्ण झालेली नाही तर त्याला भेटिचीही तळमळ आहे, मीलनाची अपेक्षा आहे. पण परत "ख्वाहीश थी" या थी मुळे ती पूर्ण झाली नसावी असे मानण्यास वाव आहे. वरील दोन्ही शेर एकाच गझलेतील आहेत. ती गझलच एकंदर अपेक्षाभंगावरती आहे असे वाटते.
.
दिल सुलगने का सबब हिज्र, न वस्ल
मसअला इस से सिवा है मुझ में - ख़ालिद मोईन
हा एक सुंदर शेर आहे.कविला अनुभवांती, हे कळलेले आहे की त्याच्या अंतकरणात जे निखारे आहेत, जी आग आहे, तिचा संबंध ना मीलनाशी आहे ना विरहाशी. हे असे वेडावणे, झुरणे हा जुनून ही त्याची स्वत:ची प्रकृती आहे. वस्ल् आणि हिज्र हे तर सारे बहाणे. हे जे मानचे आंदुळणे आहे, हेलकावे आहेत याचा संबंधच त्याच्या स्वभावाशी आहे , कुठेतरी खोल रुजलेल्या त्याच्या प्रकृतीशी आहे. या संबंधात मला नितांत आवडणारा शेर स्मृतीकप्प्यातुन काढुन देते आहे
.
"जाने क्यों लोग दर्या पे जान दिये जाते है,
तिश्नगीका तो ताअल्लुक नही पानीसे"
वेडी झाले होते मी हा शेर वाचला तेव्हा. तहानेचा नदीशी संबंधच काय, पाण्यासी संबंधच काय कदाचित ही तहान आदिम आहे, अंतहीन आहे. हा कविमनाचा शाप आहे.
.
शबे फ़ुर्क़त में क्या क्या सांप लहराते हैं सीने पर
तुम्हारे काकुल-ए-पेचॉं को जब हम याद करते हैं
हा एक नितांत सुंदर शेर आहे. माझ्या स्मृतीकप्प्यातून अगदी ठेवणितुन काढलेला. मला शायर आता आठवत नाहीत. शोधुन सांगते. नक्की शोधते कारण इतक्या अप्रतिम शेराचे ड्यु क्रेडीट दिले गेलेच पाहीजे. तर कवि म्हणतो की विरहाच्या रात्री माझ्या छातीवर काय काय नागसाप खेळतात तुला काय माहीती? अर्थात त्याचा निर्देश आहे प्रेयसीच्या कुरळ्या केसांकडे.ओह माय गॉड!! काय लावण्य आहे या उपमेत. मीलन समयी जेव्हा प्रेयसी कविच्या छातीवर माथा ठेवते, तेव्हा तिचे मुक्त कुरळे केस जसे कविच्या छातीवरती रुळत, बिखरत ते कविस आता विरहात आठवत आहेत आणि त्याच कुरळ्या बटा, मुक्त केस जणू नाग साप नबनुन त्याच्या हृदयास डंख मारत आहेत्. या कविकल्पनेची तुलनाच नाही. सवालही नही ऊठता.
बाकी काकुले-ए-पेंचॉं वरुन अजुन एक शेर आठवतो आहे तो ही मस्त आहे. शब्द अगदी जसे च्या तसे नसतील कारण आठवणींच्या कप्प्यातून काढुन लिहीते आहे.
.
ना संवारो तुम अपने काकुलए-पेचॉं
के देखो जमाना और उलझता जाये है|
हाय! क्या बात है. हे प्रिये तुझ्या मोकळ्या कुरळ्या केशसंभाराशी खेळत तू केस सावरते आहेस खरी पण तुला कल्पना तरी आहे का की केस जरी सावरले जात असले तरी हे जग मात्र उलझ जाये है, अधिकाधिक गुंतत चाललय्.
"आवर आवर अपुले भाले, मीन जळी तळमळले ग" आणि या वरील शेराच्या संदर्यात मला क्वालिटेटीव्ह (दर्जात्मक) फरक अजिबात वाटत नाही. एक प्रियेच्या डोळ्यांचे वर्णन करतो तर दुसरा तिच्या केसांचे.
.
तर अशी ही कहाणी वस्ल आणि हिज्र ची. अजुन तर या विषयावरचे कित्येक शेर आहेत, कित्येक छ्टा आहेत. त्या परत केव्हातरी.
मीलन आणि विरह
Submitted by सामो on 18 September, 2019 - 14:28
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर. शेरोशायरी प्रेमी
सुंदर. शेरोशायरी प्रेमी लोकांनी वाचला नाही वाटतं हा लेख.
awesome!
awesome!
पाटील आणि स्वप्नील धन्यवाद.
पाटील आणि स्वप्नील धन्यवाद.
-----------------
भला हम मिले भी तो क्या मिले वही दूरियाँ वही फ़ासले
न कभी हमारे क़दम बढ़े न कभी तुम्हारी झिजक गई - बशीर बद्र
हा देखील सुंदर आहे. कॉलेजचे दिवस आठवतात.
----------------------
शब-ए-विसाल है गुल कर दो इन चराग़ों को
ख़ुशी की बज़्म में क्या काम जलने वालों का - दाग़ देहलवी
हा एक. किती रसिक असणार हे कवि! अप्रतिम शेर आहे. 'क्या काम जलनेवालोंका'
मस्त.