झालं... निघालास? आत्ता आत्ता तर परवाच्या सोमवारी आला होतास नं? आणि लगेच निघालास हि?
काय गम्मत असते बघ नं, तू येणार येणार म्हणून अगदी पावसाळा संपत आल्यापासून आम्ही सर्व चातकासारखी वाट बघत बसतो, आणि तू आल्यावर मात्र दिवस कसे भूर्रकन उडून जातात, आणि मग हा दिवस येवून ठेपतो तुझ्या जाण्याचा....
मुळात च गोजिरवाणं रूप लाभलेल्या तुला, तू देव असून ही आपल्या घरी आणायचं; तुझ्या आगमनासाठी एखाद्या प्राणप्रिय व्यक्ती साठी करतो तशी सगळी जय्यत तयारी करायची, मग वाजत-गाजत तुला घेऊन यायचं, दीड, पाच, सात, दहा दिवस तुझं जमेल तसं कोड-कौतुक करायचं आणि मग वंश-परंपरागत ठरवलेल्या दिवशी जड अंतकरणाने तुला निरोप ही द्यायचा..... हि सगळी प्रोसेस च किती विलक्षण किती विलोभनीय आहे, नाही का रे?
१० दिवस तू भक्तांकडे रहायला येतोस त्यांनी केलेले कोडकौतुक, यथाशक्ती केलेली पूजा-अर्चना, तीर्थप्रसाद गोड मानून घेतोस आणि जाताना सर्वांची दु:खे, कष्ट, त्रास घेऊन जातोस, हे असे भाग्य तेहतीस कोटी देवांपैकी फक्त तुझ्या च भाळी लिहिलंय , आणि म्हणूनच लहानपणापासून आत्तापर्यंत मला नेहेमीच हे वाटत राहिलं आहे की जेवढा तू आमचा लाडका, हक्काचा आहेस, तसेच आम्ही पण कुठेतरी तुझे तितकेच लाडके असू. होय नं? खरं तर तुला निरोप देणं फार त्रासाचं असतं, असे वाटते कि तू जाउच नयेस, इथेच राहावं.. आमच्या बरोबर....कायमस्वरूपी... पण मग नंतर विचार येतो की कदाचित ह्या अश्या विरहाने च उदंड प्रेम पाझरत असावं भक्तांच्या मनातून तुझ्यविषयी; आणि तसं ही हि प्राणप्रतिष्ठा, हे विसर्जन हे सर्व केवळ शास्त्रापुरतं च तर असतं.. तू कुठेच जात नाहीस..जाणार ही नाहीस. तू अनादी काळापासून इथेच आहेस आणि अनादी काळापर्यंत असाच आमच्यावर कृपा ठेवणार आहेस....
येत राहास रे बाबा दरवर्षी न चुकता....असाच नेहमीच आमच्याकडे. सर्वांनाच सुख, समृद्धी आणि समाधानाचा आशिर्वाद देत राहा, आणि तुझ्या चरणी आमची जी जागा आहे तीथून आम्हाला कधी ही दूर करु नकोस... अजून काही ही मागणे नाही....
बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये बरं का !!!
पुनरागमनायच !
- प्रसन्न हरणखेडकर
मस्त.
मस्त.
आवडल.
अगदी मनातलं लिहिलंय.
खरंच.असंच वाटतं.
खरंच.असंच वाटतं.