शेतकर्‍यांचा आदिम सण : बैलपोळा

Submitted by ravin on 30 August, 2019 - 06:04

शेतकऱ्याचा रानसखा बैल

शेतकऱ्याचा जिवाभावाचा काळया मातीतला सवंगडी म्हणजे जित्राब . शेतकऱ्याची खरी रानातली सुखदुःखे ज्याला समजतात असा 'काळी 'तला सोबती म्हणजे बैल. सनातन काळापासुन शेतीतली नांगरणी , वखरणी, पेरणी, मळणी इत्यादी सारी कामे बैलाच्याच मदतीने केली जातात.
बैल हा श्रमसंस्कृतीचा कणा आणि समृद्धीचे लक्षण मानल्या जातो. तो खर्‍या अर्थाने सृजनाचा मानस्तंभ व शेतीमातीतल्या हिरव्या जगाचा निर्माता आहे.

आद्य मानव शिकारी कडून शेतीकडे वळला तेव्हा पासून बैल शेतीत काम करू लागलेला दिसून येतो. बैलाची शक्ती शेती मशागतीसाठी वापरण्यास आद्य शेतकऱ्यांनी ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी सुरुवात केल्याचे स्पष्ट ऐतिहासिक दाखले आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वीय संशोधनामध्ये घोड नदीच्या खोऱ्यातील इनामगाव येथे वीस हजार वर्षांपूर्वीचा आद्य बैलाचे अवशेष सापडले आहेत.

ऋग्वेदाच्या मंत्रांमध्ये शेती क्रियांचा उल्लेख आलेला आहे. त्यानुसार तेव्हाचे शेतकरी बैलाचे सहाय्याने नांगर वापरून पेरणी करीत असत. बैलांनी ओढले जाणारे अवजड अनस गाडे वाहतुकीसाठी वापरीत असत. त्याकाळची सामाजिक प्रतिष्ठाही पशुधनावर अवलंबून होती. उत्तर वैदीक काळामध्ये लोखंडाचा शोध लागल्यानंतर जास्तीत जास्त जमीन वहितीखाली आणण्याच्या हव्यासामुळे उत्तरोत्तर बैलाचे महत्त्व अधिक वाढत गेले. एकावेळी 24 बैल वापरून अोढावा लागणारा प्रचंड मोठा लोखंडी नांगर वापरला जात असल्याचे उल्लेख वेदवाङमयात आढळतात. त्याकाळी देशाची संपत्ती म्हणजे देशात उत्पन्न होणारे धान्य आणि गुरांची समृद्धी मानल्या जात असे. ऋग्वेदातील पूषण देवता ही भरभराटीची ग्रामीण देवता आहे. पुषण देव जनावरांची देखभाल करतो. रानात वाट भरकटलेल्या जनावरांना रस्ता दाखवितो. तेव्हापासून बैल हा समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानला जातो.

सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये सापडलेल्या स्टिएटाइट दगडांमधील मुद्रांमध्ये आखूड शिंगाच्या बैलाची मुद्रा सापडलेली आहे. तसेच लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये मान हलविणार्‍या या बैलाचे खेळणे सापडलेली आहे. यावरून बैल आणि शेतकर्‍यांचे नाते किती जुने आहे ते स्पष्ट होते.

प्राचीन काळापासून बैल है शक्तीचे साधन मानले जाते. ऋग्वेदामध्ये देवांचे वर्णन करताना बैलासाठी शक्तिमान ,अविचारी आणि गर्जणारा इत्यादी विशेषणे वापरली आहेत. महाभारतामध्ये विराट राजाच्या गोशाळांचा उल्लेख आलेला आहे. महाभारतामध्ये विराट राजाच्या गो शाळेवर कौरवांनी केलेले आक्रमण प्रसिद्ध आहे. वेदांमध्ये शत्रूंच्या गाई पळवण्यासाठी इंद्रदेवाची प्रार्थना केलेली दिसते. कृष्ण हा तर गोपालक म्हणून प्रसिद्ध आहे. बल रामाचे वर्णन बैल व नांगरधारी म्हणून आलेले आहे. महाभारतातील भिमदेखील बकासुराला आव्हान देताना बैलगाडीभर भोजन आणि बैल घेऊन गेल्याचे वर्णन केलेले आहे

मौर्य काळातील सारनाथ येथील सिंह स्तंभशीर्ष विशेष प्रसिद्ध आहे. या स्तंभावर धर्मचक्र परिवर्तनाचे प्रतीक म्हणून चक्रांचे आकार कोरलेले आहेत. दोन चक्रांमध्ये कोरलेल्या धावत्या प्राण्यांमध्ये घोडा सिंह हत्ती यासोबतच बैलाचा ही समावेश आहे. गौतमाचा जन्म वृषभ राशीतील असल्याने बैलास बुद्धाचे प्रतीक म्हणून धार्मिक महत्त्व देखील आहे. याच काळातील बैलाचा स्वतंत्र स्तंभ बिहार मधील राम पूर्वा येथे सापडलेला आहे . हाच तो वृषभ स्तंभ शीर्ष होय. चुणार खाणीतील एकसंध पिवळ्या वालुकाश्म दगडांमध्ये हे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पातील वृषभ मुद्रा ही आखूड शिंगांची टवकारलेल्या कानांची आणि पुष्ट वशिंड असलेल्या बलदंड बैलाची आहे. सर जॉन मार्शल यांनी या शिल्पाचा सर्वोत्कृष्ट शिल्प म्हणून गौरव केलेला आहे.

तामिळनाडूमधील गंगाई कोंडा सोलापूर येथील शिव मंदिरातील नंदी चे पाषाणशिल्प विशेष प्रसिद्ध आहे. सतराव्या शतकातील चामुंडी हिल्स , म्हैसूर येथील नंदी शिल्पदेखील बैलाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अधोरेखित करते. बहुतेक सर्व शिव मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीची प्रतिष्ठापना केलेली असते. पुराणांमध्ये नदीचे वर्णन कैलास पर्वतावरील शिव-पार्वतीचा पहारेकरी म्हणून केलेली आहे. एका पुराणकथेनुसार नंदीने लंकाधिपती रावणाला तुझी राजधानी एका माणसाकडून भेटली जाईल असा शाप दिल्याचे म्हटले आहे. पुढे हनुमाना कडून सीतेच्या शोधार्थ लंकादहन केल्याचे सर्वश्रुतच आहे.

कौटिल्य चाणक्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथाच्या सहाव्या प्रकरणामध्ये गोपाल,पिंण्डारक(म्हशींचा गुराखी), दोहक (दुध काढणारे), मंथक (ताक घुसळणारे), गोध्यक्ष यांनी गाईगुरांची कशी काळजी घ्यावी याबाबत सूचना दिलेल्या आहेत.तसेच गाय बैलांसाठी प्रत्येक खेड्यांमध्ये विशिष्ट जमीन गायरान म्हणून राखीव ठेवण्याबाबत सुचना दिलेली आहे. प्राचीन वाङमयात अनेक ठिकाणी बैलाचे संदर्भ आलेले आहेत. बुद्धाच्या धम्म पदांमध्ये ही बैलाचे उल्लेख आहेत.
हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशती मध्ये देखील शृंगारपर रचना करताना बैलाचे संदर्भ आलेले आहेत. भारतीय संस्कृतीमधील धर्म,साहित्य, शिल्प, चित्रकला, मुद्रा, स्तंभ,मंदिरस्थापत्य इत्यादी अनेक ठिकाणी बैलाला प्रमुख स्थान दिलेले आहे.

रामचंद्रपंत अमात्यकृत आज्ञापत्र या ग्रंथामध्ये शिवरायांनी उध्वस्त व अोसाड झालेले सुपे परगणे वसविताना सरकारी पडीक जमिनीचे रयतेला कौलपट्टे देण्याची आणि ज्यांच्याकडे बैल नाहीत अशा रयतेला बैल उपलब्ध करून देण्याची पद्धत सुरू केली होती; असा उल्लेख आहे. बैलांची श्रमशक्ती व रयतेच्या कष्टातूनच हा अोसाड भाग पुन्हा सुपिक बनला. शिवरायांनी शेतीसोबतच युद्धनितीमध्येही बैलांच्या शक्तीचा वापर गनिमी काव्याने केलेला दिसून येतो. लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटल्यानंतर सिंहगडाकडे परततांना खानाच्या सैन्याला हुलकावणी देण्यासाठी शिवरायांनी कात्रजच्या घाटामध्ये बैलांच्या शिंगांना पेटत्या मशाली लावून पाठविले होते.

युद्ध तंत्राबरोबरच मनोरंजनाच्या उद्देशाने साहसी खेळांसाठी देखील बैलांचा प्राचीन काळापासून वापर केल्या जातो. या साहसी खेळांमध्ये बैलांच्या झुंजी, छकड्यांचे शंकरपट, बैलांच्या धाव स्पर्धा आणि बैल व माणसातील बुलफाईट इत्यादी खेळांचा समावेश होतो. अलीकडे प्राण्यांना क्रूरताविषयक वागविण्याचे नियमन कायद्यांनी अशा साहसी खेळांवर अनेक मर्यादा टाकल्या आहेत. या साहसी खेळांबरोबरच लोककलांमध्ये, लोकनृत्यांमध्ये वापरले जाणारे बैलांचे मुखवटे देखील लोकांचे मनोरंजन करतात.

गेली अनेक शतके बैल खांद्यावर जू घेऊन खासर, गाडा, बंडी, दमणी, छकडे, रेंगी अशी सर्व वाहने ओढत अालेला आहे. वाहतुकीची आधुनिक साधने नव्हती , त्याकाळी खिलार बैलांची जोडी आणि या वाहनांना मोठे महत्त्व होते. ब्रिटिश काळात बिन बैलांची रेल्वे आली; त्यामुळे लांबचा प्रवास सुकर झाला. परंतू जवळचा प्रवास मात्र बैलबंडीनेच करावा लागत असे. त्याकाळी सर्वसामान्य खेडूत लोकांना बिन बैलाच्या रेल्वेचे मोठे आकर्षण वाटत असे. ते म्हणत -
" साहेबाचा पोर कसा अकली रे
बिन बैलाची गाडी कशी हाकली रे ? "

डॉ.रवींद्रकुमार कानडजे
सरस्वती नगर, बुलढाणा .
भ्रमणध्वनी : 7350688852

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वीय संशोधनामध्ये घोड नदीच्या खोऱ्यातील इनामगाव येथे वीस हजार वर्षांपूर्वीचा आद्य बैलाचे अवशेष सापडले आहेत.

>>>

वीस हजार नजर चुकीने झाला आहे का?