झाड !! (भय कथा -भाग १ )

Submitted by Sujata Siddha on 14 August, 2019 - 06:36

झाड !!

“या झाडाचा हा जो बुंधा आहे ना , तो काहीतरी वेगळाच वाटतो मला , तुला नाही वाटत ?”
“आहे जरा फुगीर ,ओबडधोबड आणि खडबडीत काळपट , पण मग त्याचं काय ? “
“अरे दिसायला नाही येड्या ,त्याचा फील जरा वेगळा येतो आहे “
“झाडाला कसला आलाय फील ? फील माणसाचा येतो ,धुंद sss हवाहवासा sss !, सुमतीच्या केसात लावलेल्या चाफ्यासारखा… “ असे म्हणून तुषारने एक दीर्घ श्वास घेतला . त्यावर शिवानंद ने त्याच्या डोक्यात एक फटका मारला ,” तुला काही सुचत नाही का रे मुलींशिवाय ? आज काय सुमती , उद्या कोण मधुमती ,परवा कोण रश्मी “.
“ ए शिव्या, या वयात हेच करतात , मी नॉर्मलच आहे , तुझ्यासारखा पकाऊ नाहीये, सारखं काहीतरी संशोधकासारखं शोधत फिरायचं , आधीच इथे दिवसरात्र तो दगडांचा अभ्यास , ते ‘रॉक सायकल‘ आणि ती ‘बोवेन रिअक्शन सिरीज ‘ करून पिट्टा पडलाय , म्हणून जरा फिरायला जाऊ मोकळ्या हवेत म्हटलं तर तू आता झाडाचा अभ्यास करायला लाव मला “
“ अरे अभ्यासाचं नाही म्हणत मी , वेगळा म्हणजे तू नीट बघ माणसाचा चेहेरा वाटतो , बुंध्याऐवजी . “
“बरं .. ,माणूस तर माणूस आता तू चल बरं इथून , आपण तिकडे त्या पलीकडच्या रस्त्याने जाऊ.तिकडे हिरवळ जास्त आहे ” तुषार, शिवानंद ला ओढत पलीकडे घेऊन गेला पण मनात तोही जरा चमकलाच होता , त्या डेरेदार झाडाचा प्रचंड मोठा बुंधा खरोखरच एखाद्या रागीट माणसाच्या चेहेऱ्यासारखा दिसत होता , पण त्याने हे कबूल केलं असतं तर शिवानंद रोज येऊन इथे बसला असता निरीक्षण आणि प्रयोग करत .‘जिऑलॉजी ‘ च्या अभ्यासाबरोबरच “‘वैश्विक ऊर्जा “ हा शिवानंद चा आवडता अवांतर विषय होता . संपूर्ण विश्वात एकच ऊर्जा आहे आणि तीच आपल्यातही आणि सर्व प्राणीमात्रात आणि अचल वस्तूत म्हणजे दगडात सुद्धा आहे ,सर्व जग हे स्पन्दनांवर चालू आहे म्हणूनच आपल्या मानसिक सामर्थ्याने आपण हवी तिथली ऊर्जा जागृत करून त्याच्याशी संवाद साधू शकतो , कनेक्ट होऊ शकतो , असा त्याचा ठाम समज होता , रोज मेडिटेशन करून काही अंशी का होईना , एकाग्रता साधणे त्याला जमू लागले होते , भरीस भर म्हणून पातंजल योगा सारखी अनेक पुस्तके वाचून त्याने आपल्या ज्ञानात भर घातलेली होती पण सगळं ज्ञान जरी असलं तरी अजून कुठल्या प्रयोगाच्या फंदात तो पडला नव्हता ,अनुभव नसल्यामुळे त्याचे ज्ञान तसे पुस्तकीच होते .पण त्याचा आपल्या अभ्यासावर ठाम विश्वास होता ,त्यामुळे अलीकडे त्याची या विषयावरून खूप चेष्टा देखील होत असे , होस्टेल वर परत आल्यानंतरही रात्री ‘शिवानंदच्या’ डोक्यात त्या बुंध्याचे प्रश्न सतावत होते .
पुढे काही दिवस परीक्षेच्या गडबडीत गेल्यामुळे शिवानंद झाडाबद्दल विसरून गेला , परीक्षा झाली ,आणि कॉलेज ला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आता सर्व जण आपापल्या घरी निघायची तयारी करू लागले ,शिवानंद ला घरचे कोणीच नव्हते , सगळे गेल्यावर हॉस्टेल एकदम खायला उठणार याची त्याला जाणीव झाली ,
“ यार तुष्या तुम्ही सगळे गेल्यावर मी एकटा काय करू ? किती बोअर होईल राव “.. तुषारच्या आईने दिलेली चकली खाता खाता , शिवानंद काळजीने म्हणाला . तुषार भराभर सामान आवरून निघायची तयारी करता करता त्याच्या प्रश्नाने एकदम थबकला , “एक काम करतोस का शिव्या , फॉर अ चेंज… तू पण चल माझ्याबरोबर आमच्या गावी . आमचं गाव तुला नक्की आवडेल. घरात एवढी माणसं आहेत त्यात तु सहज सपादून जाशील ,शिवाय तुझं काय ते ‘ मेडिटेशन ‘आणि ‘कॉस्मिक एनर्जी रिसर्च ‘ ते करायला आमच्या माळरानावर तुला भरपूर निवांत जागा आहे , तिथे तु दिवसभर ध्यानाला बसलास तरी तुला कोणी डिस्टर्ब करणार नाही .. चल !.. “ एक क्षणभर विचार करून शिवानंद तयार झाला , सर्व आवराआवर करून त्या दोघांना निघायला संध्याकाळ झाली . होस्टेल वर राहिलेली काही मुलं आणि ते दोघे असे बस यायची वाट बघत आपापल्या सामानासकट स्टॉप वर गप्पा मारत उभे होते ,थोडयावेळाने बस आली पण ती तुषार ची नव्हती , हळूहळू एक एक करत सगळे गेले फक्त तुषार आणि शिवानंद राहिले , त्यांची बस यायला अजून तास भर , अवकाश होता मग वेळ आहे तर गंगू बाईच्या खानावळीत जेऊया असं त्या दोघांनी ठरवलं . गंगूबाईची हि खानावळ सध्या त्यांची लेक सुमती चालवायची , सुमती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच तिच्या हाताला एक अद्वितीय अशी चव होती , त्यामुळे कायम तिच्या इथे waiting असायचं , एरवी मुलांना घाई असायची त्यामुळे तिच्याकडे जेवायचा योग क्वचितच येत असे ,आजही बस यायच्या आत नंबर लागला तर नशीब उजाडलं म्हणायचं असं त्यानां वाटून गेलं . त्यात कौतुक तिच्या जेवणाचं होतं कि दिसण्याचं कि दोन्हीचं हे मात्र त्यांचं त्यांनाच माहिती .पण आज नशीब उजाडलं आणि त्याना जागा मिळाली , पण अरेरे !.. ते जेवायला बसले तितक्यात बस आली आणि लोक पटापट उतरल्यावर गेलीसुद्धा , डोळ्यासमोरून बस निघून गेली होती, वेडी वाकडी तोंड करत त्याना सामानासकट परत रूमवर कडे परतावं लागलं. वाटेत पुन्हा एकदा ते झाड शिवानंद ला दिसलं . एवढ्या अंधारातही त्याला ते स्पष्ट दिसलं ,”तुषार ते बघ ते झाड !..बघ कसं आपल्याकडे एकटक बघतंय “ बस चुकली हा राग तुषार च्या मनात होताच . त्याने रागानेच शिवानंद कडे पहिले त्याबरोबर तो गप्प बसला . ते दोघे परत आले तेव्हा सगळं हॉस्टेल रिकामं झालं होतं .
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून ते निघाले , स्टॉप वर ना शेड होती ना बसायला बाकडे , सामान खाली ठेऊन दोघेही वाट बघत उभे राहिले . तास झाला दोन तास झाले एकही बस आली नाही , दुपार होत आली तसे ते कंटाळले . लांबून एक गावकरी येताना दिसला , घाटात अचानक दरड कोसळल्यामुळे बसचा यायचा मार्ग बंद झाला असे त्याने सांगितले . म्हणजे आता उद्यापर्यंत तर काहीच नाही , चला परत , वैतागलेल्या चेहेऱ्याने परत येत असताना अर्थातच झाड लागलं , पण आता शिवानंद शहाणा झाला होता त्याने तुषार जवळ झाडाचा विषय काढला नाही . परत आल्यावर मात्र त्याने मनाशी एक निश्चय केला , “तुष्ट्या तू जा !.. माझा काही यायचा योग दिसत नाहीये ,माझ्यामुळे तुझं पण कॅन्सल होतंय राव! “
“काहीही खुळ्यासारखं बोलू नकोस , नैसर्गिक आपत्ती त्याला कोण काय करणार ?”
“नाही , मला असं वाटतंय की मी जाऊ नये असा संकेत असावा “ शिवानंद शून्यात बघत म्हणाला .
“ हॉ ?...खरंच ?, आणि कोण देतंय हे संकेत ? तुझं ते छपरी झाड ?”
“ यार छपरी वैगेरे कशाला म्हणतोस? कोणाबद्दल असे उगाचच अपशब्द काढू नयेत , तुला खोटं वाटतंय तर सोडून दे पण निदान अपमानास्पद तरी बोलू नकोस “.
“कोणाला अपमानास्पद बोललो मी ? त्या झाडाला छपरी म्हणालो मी , तुला नाही . “
“एकवेळेस मला म्हटलेलं चालेल लेका पण तु त्या झाडाला … “ शिवानंद चाचरत म्हणाला
“तू शिव्या डोक्यात जाऊ नकोस माझ्या , एका जागी शुंभासारखं उभं असलेलं ते झाड , त्याला एक इंच पण हलता येत नाही आणि ते तुला संकेत देतंय ,दरडी पाडतंय , का ? तर म्हणे तू माझ्याबरोबर येऊ नयेस ? अरे हट SSS थांब आत्ता जाऊन एक लाथ मारून येतो म्हणजे कळेल तुला की ते खरंच काहीही करू शकत नाही आपल्याला . “ तुषार तिरीमिरीने गाडी काढून निघाला , शिवानंद त्याला थांब थांब म्हणेपर्यत तो गेला देखील . शिवानंद त्याच्या मागे तसाच पळत गेला. झाडापर्यंत पोहोचताच तुषार ने बुंध्यावर एक सणकून लाथ घातली , आणि पायाला झिणझिण्या आल्यामुळे तो अंगठा धरून बसला तेवढयात शिवानंद तिथे पोहोचला , त्या बुंध्यातून क्रोधाच्या ठिणग्या पडतायत असा भास त्याला झाला , मनोमन त्याची माफी मागून शिवानंद ने तुषार ला गाडीवर मागे बसवले आणि दोघे रूम वर परत आले . दुपारी जेवण होईपर्यंत तुषार बराच शांत झाला होता , मग दोघांनी मिळून ठरवलं की गाड़ी वरून फाट्यापर्यत जायचं आणि तिथून पलीकडच्या बायपास ने जी बस मिळेल ती पकडून पुढे जायचं ,परत येईस्तोवर गाडी फाट्याजवळच्या गॅरेज वाल्याकडे ठेवायची . रात्री सामान आवरून रूमची चावी रेक्टर कडे देऊन अखेर ते दोघे निघाले , बाईक तुषार चालवत होता , मागे शिवानंद दोघांचे लगेज सांभाळत कसा बसा बसला होता , दोघेही फाट्यापर्यंत पोहोचले पाहतात तो काय ?.. गॅरेज बंद !.. आता काय करायचं ? तुषार वैतागला तेवढ्यात एक जीप धुराळा उडवत त्यांच्या शेजारी येऊन थांबली ,आतून लाल पिचकारी सोडत ड्रायव्हर न विचारलं, “पाव्हणं कुणीकडं ?”
“ कुंजीरवाडी फाट्याला निघालोय दादा , पण काही योग् येईना झालाय , तिथून बस पकडून पुढच्या गावाला जायचंय . “फुढं कंच्या गावाला जानार ? “
“बामणोली”
“मंग चला माझ्या संगट , मी बी थीतच चाललूया ,लांबचा पल्ला हाये तेवढच मलाबी कुनीतरी सोबतीला व्हईन . “
“पण दादा तुम्ही हिकडं कसं काय ?” शिवानंद न विचारलं
“अरे काम हाये एक पाटलांकडं , चला बसा आत ,काम करून मंग फुढं जाऊ, लयी न्हाई तासाभराचंच काम हाये “
ड्रायव्हरचे तोंड जरी पाना ने लालभडक झाले होते तरी gentleman वाटत होता, दोघेही तयार झाले , पण गॅरेज बंद आहे तर गाडी हॉस्टेल वर लावायची आणि तासाभराने ड्रायव्हरने त्यांना पिक अप करायचे असे ठरल्यावर तुषारने गाडी वळवली ,आता तो आणखीन खूष झाला , थेट गावापर्यंत जायची सोय झाली होती , दोघेही सुसाट होस्टेलवर निघाले , रस्त्यात पुन्हा एकदा ते झाड दिसल्यावर तुषारने त्याला कशी जिरली ? आता आम्ही थेट जाणार ,अशा अर्थाने बत्तीशी दाखवून वेडावून दाखवलं , आणि त्याच वेळेला त्याचा चा एकदम बॅलन्स गेला , सरळ जाणारी गाडी एकदम झाडाच्या दिशेने तिरकी जाऊन जोरात त्या बुंध्यावर धडकली ,पुन्हा मागे रिव्हर्स घेऊन पूर्ण गोल फिरून पुन्हा आपटली , तुषार फुटबॉल सारखा उंच उडाला हे शिवानंदने सामानासकट पडताना पाहिलं आणि त्याची शुद्ध हरपली.!!!!
कुणी तरी किंकाळी फोडल्याच्या आवाजाने शिवानंद ने डोळे उघडले , क्षणभर त्याला आपण कुठे आहोत हेच कळेना, तो त्या झाडाखालीच पडला होता, तेव्हढ्यात त्याचे लक्ष वर गेले, झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर वर मानवी कवटीचा अर्धा भाग लटकत होता आणि .....आणि उरलेला अर्धा भाग आणि पूर्ण बत्तीशीसकट वेडावून दाखवत असलेला चेहेरा तुषार चा चेहेरा खालच्या फांदीवर लटकत होता … शिवानंदची पुन्हा शुद्ध हरपली !!!..

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे...
शेवटचं वर्णन..!!
सॉलिड जमलाय पहिला भाग, पुलेशु.

खुप दिवसांनी काहीतरी वाचण्यासारखं मिळालं मायबोलीवर आणि क्रमशः असलेली कथा चक्क पुढील अनेक भागा पर्यन्त लवकर उपलब्ध म्हणजे दुधसाखर योग.