माऊली

Submitted by meenakshi.vaidya on 8 August, 2019 - 05:08

माऊली

' 'ग्रुहस्थीच्या मांडवाखाली
म्रुद् गंधाचा स्पर्ष प्यायले।
भोगाच्या रांगोळीमधूनी
सोनसळीचे तेज ल्यायले।'
अशीच अवस्था असते प्रत्येक गर्भारशीणीची.अवखळ बालपणातील रंग सोडून संसाराच्या उंबरठ्यावर माप ओलांडतांना एका ग्रुहीणीच्या जबाबदार व्यक्तीमत्वाची साथ द्यायची शपथ अग्नी ब्राह्मणांच्या साक्षीनं सात पावलं उचलतांना तिला त्या ग्रुहस्थाबरोबर घ्यावी लागते.
नव्या नवलाईचे इंद्रधनुषी तोरण त्यांच्या दारावर झुलतांना दिसतं.हळूच एके दिवशी कळतं की त्या घरात लहान पावलं दुडदुडणार आहेत.ग्रुहिणी तर आनंदान निथळलेली असते.ग्रुहस्थही जबाबदारीच्या चौकटीतून बाहेर येऊन खळखळून हसून घेतो.कारण त्याच्या आणि। तिच्या बालपणीची पुनराव्रुत्ती आता अवतरणार असते.
सातजन्माच्या जोडीदाराचे काही रंग तिच्या कुशीत लपलेल्या बाळात दिसणार असताय.त्याचा स्वभाव,त्याचा राग,त्याची इच्छा,,त्याचा अहंकार तिला त्या गर्भात रुजवायचे असतात.ते रुजवतांना स्वतःमध्ये रुजले गेलेले त्याचे रंग हळूच ती त्या गर्भात सोडते.तिच्यातील अवखळ,उत्कट,समर्पित रंग आधीच त्याच्यात उमटलेले असतात.असा हा दोन रंगांचा समन्वय साधणारा तान्हुला या जगात जेव्हा पाऊल टाकेल तेव्हा 'ती' नि 'तो' एका अद्भूत विश्वात रमलेली दिसतील.
"ह्या ता-याहून त्या ता-याशी
अनंत योजने झुला झुलले"
असच ती म्हणणार. बालपणाच्या ता-यापासून प्रतिक्रुती निर्मीतीच्या ता-यापर्यंत तिनं घेतलेला झोका बघून ईश्वरालाही तिचा हेवा वाटेल
सोनसळीच्या तेजानं रसरसून उठलेली ती एका चैतन्यमयी वातावरणाच्या साक्षात्काराकरीता सिद्ध झालेली असते.
तिच्या छोट्याश्या आयुष्यात घडणारं ते एक पवित्र कार्य,अनुभव आणि ज्ञानयुक्त कर्म असतं.
निळ्या आकाशाच्या अथांग निळाईला डोळ्यांमध्ये साठवून तान्हुल्याच्या आईची भूमिका करण्याचं व्रत ती घेते ते न उतण्यासाठीच. या व्रताची पूजा करतांना घर,आंगण, निसर्ग,तन आणि मन एका अद्भूत अनोख्या आणि ममतेच्या वावरणानी भारून जातं
निसर्गावर अम्रूत शिंपणारे हे घन आनंदित होऊन मंगलगीत गातात.ते ऐकतांना'ओमकाराचा'साक्षात्कार होतो.मन आनंदानं,प्रेमानं भाराऊन जातं.हा क्षणिक सुखाचा व आनंदाचा बहर नसून पूर्ततेचा बहर आहे.
' पूर्तता'.....पूर्तता ही सगळ्या निसर्गाचे अविभाज्य अंग आहे मानवाच्या आयुष्याचीचौकट ख-या अर्थानी र्सुबक,नेटकी दिसते ती यामुळेच.तिच्या अंगणात पूर्ततेचा बहर आलाय.कारण तिच्या तना-मनात मात्रुत्वाचं गाणं उधाणलं आहे.त्याची अवखळ चाल सतत मनात घुमत असते.ओढाळ मनाची झालेली पूर्तता एका चिरंतन आनंदाची निर्मीती करते. पूर्ततेतूनच उभारल्या गेलेल्या आनंद मंदीरात गजर होतो तो 'ओमकाराचा' चैतन्याचं देणं देणा-या मूळ पुरूषाचा.या गजरात। हिरीरीनं सामील झालेली असते....'माऊली'.
माऊली म्हणून जगतांना दुघड वाटेवरून आपल्या पिलाला सही सलामत कसं घेऊन जावं?याच विचारात ती अहोरात्र बुडलेली असते.
एखादा सिद्ध तपस्वी जसा आपल्या ज्ञानानी आणि पवित्र आचरणानी आजुबाजूचा परीसर उजळून टाकतो.तपस्व्याच्या ज्ञानपान्ह्याचं प्राशन ज्ञानासाठी जे जे आसुसलेले ते ते करू शकतात.पण,माऊलीचा स्नेहपान्हा मात्र फक्त तिच्या तान्हुल्याच्या हक्काचा असतो.
न ऊ महिने या छकुल्याची साथसंगत असते.प्रत्यक्ष जन्मानंतर जेव्हा तो तिच्या मांडीवर खेळू लागतो,तेव्हा त्याच्या बाळलिला बघतांना ती ध्यानस्थ होते.
बाळाच्या जन्मानंतर अपल्या घरात। माऊलीनं अग्निहोत्र सुरू केलेलं दिसतं.अग्निहोत्र घेणारा जसा कुंडातील ज्योत सतत तेवत ठेवतो तसच माऊलीही आपल्या बाळामधील ज्ञानाची,सत्याची,अभिमानाची,विवेकाची ज्योत सतत तेवत ठेवते.
आता त्यांच्या संसाराची गाडी कशी आखीव रेखीव रस्त्यावरून चालली आहे.जाता जाता गुणगुणायला अनेक ओळी असतात.या ओळींबरोबर स्वप्नपक्ष्यांचीही साथ असते. आतापर्यंत सभोवताली पसरलेलं नैराश्याचं धुकं पार पलीकडल्या तिरावर फेकल्या जातं.मिळालेल्या सुखाला शाश्वत आणि निरामय करण्यासाठी माऊली अहोरात्र डोळ्यात तेल घालून सजग असते.
------------------------------------------------------------------
## सौ.मीनाक्षी वैद्य.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults