पाऊस

Submitted by आनन्दिनी on 30 July, 2019 - 05:16

एक पाऊस खुशमिजास
बिनधास्त बरसणारा

वह्या पुस्तकं पाटी दप्तर
सारं काही भिजवून चिंब
घरी येऊन ओरडा खाऊनही
आरशात हसणारं प्रतिबिंब

एक पाऊस लाजरा बुजरा
हलके हलके रिमझिम रिमझिम

कळेल न कळेलंस गुणगुणणारी
सोबत हिरव्या वार्याची बासरी 
मला करून मुग्ध बावरी
बरसत राहिल्या श्रावण सरी

एक पाऊस बेधडक
मुसळधार बेपर्वा

त्याच्या सोबत प्रेमाचे मेघदूत
काळ्या मेघांना चंदेरी किनार
चोरट्या त्या भेटींचा
तो पाऊस साक्षीदार

एक पाऊस भलताच अवेळी
अनाठायी रिपरिप रिपरिप

सारी घडी विस्कटेल
इतका का बरसतो
असं वाटतं कधीं
मला चिडवायलाच तो हसतो

आताशा पाऊस खिडकीच्या बाहेर
आत मात्र घुसमट घुसमट

नाव लौकिक गाडी बंगला
पैसाअडका आला
पण कुठे शोधू, कुठे पाहू
माझा पाऊस सांडून गेला

आनन्दिनी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कविता..
दोन आणि चार ओळींचं छान फाॅरमॅट वापरलंय...

वाह....