स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १४
बद्री, खुरानाचा मुलगा?
“खुराना, तुम्हाला माहीत आहे का बद्रीचा मृत्यू कसा झाला ते?” वेदांतीने विचारले. खुराना थोडासा सावध झाला. त्याने विचारले, “कोण आहात तुम्ही?”
“आम्ही तुमचे शत्रू नक्कीच नाही आहोत.”
“मग हे का विचारता आहात मला?”
“आम्हाला काही माहिती हवी आहे. ती तुम्ही देऊ शकता हेही आम्हाला माहीत आहे.”
“कसली माहिती?”
“तुम्ही कुणासाठी काम करता?”
“मी नवतेज ऍग्रोमध्ये काम करतो. त्यांच्या गोदामात.”
“ते लोकांना दाखवायला. प्रत्यक्षात तुम्ही गुन्हेगारांना मदत करत आहात. तेही एका फार मोठ्या गुन्ह्यात. या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे माहीत आहे का तुम्हाला?”
“मी कसलाही गुन्हा केलेला नाही आणि कोणाला मदतही करत नाही.”
“तुम्ही त्या खोक्यातून काय आणले आहे ते आम्हाला माहित आहे.” खुरानाच्या चेहऱ्यात सूक्ष्म बदल झालेला जाणवला. परंतु तो बधायला तयार नव्हता.
“या खोक्यात नव्या आलेल्या कीटकनाशकांचे नमुने आहेत. ते मला उद्या काही मोठ्या दुकानदारांना द्यायचे आहेत.”
“कसले नमुने? ड्रग्जचे?” खुराना काहीच बोलला नाही.
“हे बघा खुराना, हा असा किती वेळ काढणार आहात तुम्ही? मी थोड्यावेळ वाट पाहीन आणि पोलिसांना फोन करीन.” असे म्हणून क्रांतीने फोन उचलला.
“कसली माहिती हवी आहे तुम्हाला?”
“हा ड्रग्जचा व्यवसाय कुणाचा आहे?”
“नक्की मलाही माहित नाही. पण मी चंदेलसाठी काम करतो.”
“माल पंजाबमधून येतो?”
“हो.”
“कुणाकडून?”
“ते मला माहित नाही. आमच्या इतर मालाबरोबर तो येतो.”
“इथला सर्व व्यवसाय चंदेल सांभाळतो?”
“हो.”
“तुम्ही काय करता?”
“चंदेल जे सांगेल ते करतो.”
“म्हणजे?”
“माल इकडे तिकडे पोचवणे वगैरे.”
“बद्रीला यात का घेतले? तो तुमचा मुलगा होता न?”
“मी नाही त्याला यात गुंतवले. मी त्याला शिकायला इथे पाठवले होते. चंदेल माझा मित्र. या शहरात होता. त्याने बद्रीची सर्व व्यवस्था केली होती. इथे आल्यावर तो बिघडला. सारखे पैसे पाठवायला सांगायचा. मी गरीब. मी कुठून पैसे पाठवणार? जास्त पैसे पाठवू शकत नव्हतो. एकदा चंदेलशी बोललो. मला वाटले तो बद्रीला समजावेल. त्याने बद्रीला बेकरीत नोकरी दिली. नंतर बद्रीने मला कळवले पैसे पाठवू नका. उलट तोच मला पैसे पाठवायला लागला.” मधेच खुराना थांबला. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.
वेदांतीने विचारले, “तुम्ही त्याला विचारले नाही एवढा पगार कसा काय मिळतो ते?”
त्याने आवंढा गिळला, “मी चंदेलला विचारले. तो म्हणाला ‘इकडे खूप पगार मिळतो. तू चल. तुलाही चांगली नोकरी देतो.’ तिकडेही गोदामात काम करत होतो. पण एवढा पैसा मिळत नव्हता. चंदेलबरोबर इथे येऊन गोदामात कामाला लागलो. त्याला त्याच्या अवैध कामांसाठी माणूस हवा होता. मला ते कळले नाही. त्याचे उपकार मानून तो सांगेल ते काम डोळे झाकून करत गेलो. जेव्हा कळले तोपर्यंत उशीर झाला होता. मी त्याला नकार दिला. पण तो मला ब्लॅकमेल करायला लागला. ‘काम केले नाहीस तर बद्रीला पोलिसांच्या ताब्यात देईन. माझ्याकडे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. बद्रीला समजावले. पण काही उपयोग झाला नाही. या धंद्यात शिरता येते. पण बाहेर येता येत नाही.”
“बद्रीचा मृत्यू कसा झाला याची कल्पना आहे का तुम्हाला?”
“नाही. चंदेल म्हणत होता जॉर्जने मारले. पण मला संशय आहे हे चंदेलचेच काम असणार.”
“तरी तुम्ही त्याच्या बरोबर काम करत आहात?”
“आता माझ्या आयुष्याचे एकच ध्येय आहे. मला शोधून काढायचे आहे नक्की बद्रीला कुणी मारले. मी त्याला पकडून देणार.”
“आम्ही तुमचे हे काम करू शकतो. तुम्ही आम्हाला मदत करा.”
“मी कशी मदत करणार?”
“ते मी तुम्हाला सांगेन. हा जॉर्ज कोण?”
“त्याचे एक जिम आहे. पण ते फक्त लोकांना दाखवायला. तिथे तो प्रोटीन्स वगैरेच्या नावाखाली लोकांना ड्रग्ज देत असतो. त्यामुळे तो पकडला जात नाही. त्याच्या जिममध्ये सगळी श्रीमंताची मुले येतात.”
“म्हणजे हे रॅकेट चंदेल चालवतो याची खात्री आहे तुम्हाला?”
“तसे या क्षेत्रात एकटा माणूस काम करू शकत नाही. मी जे पाहीले आहे त्यावरून चंदेलच सगळी सूत्र हलवतो. पण असे वाटते त्याचा कोणीतरी बॉस असावा. कारण या सगळ्यात कोणीतरी मदत केल्याशिवाय एवढया मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय इथे येऊन चालविणे शक्य नाही. चंदेलला बाहेर कुणी ओळखत नाही.”
“मग मुख्य कोण असावे असे तुम्हाला वाटते? नवतेज?”
“माहित नाही. मागे एक दोनदा आमची माणसे पकडली गेली त्यावेळेस चंदेलने कुणालातरी फोन केला होता. आणि मग आमच्या माणसांना सोडून देण्यात आले.”
“चंदेलला कुणाला भेटताना तुम्ही पाहीले आहे?”
“नाही. कधीच नाही.” खुराना म्हणाला. क्रांती यावर काहीच बोलली नाही तेव्हा त्याने विचारले, “मी तुम्हाला काय मदत करू?”
“तुम्ही हा माल घेऊन आमच्याबरोबर चला.” क्रांतीने अजिंक्यला फोन लावला आणि खुरानाला ताब्यात घेतल्याचे सांगितले.
“त्याला वेदांतीच्या घरी घेऊन या.” अजिंक्य म्हणाला. आता खरी हे प्रकरण रंगायला सुरवात झाली होती.
.....
क्रांतीशी बोलणे झाल्याबरोबर अजिंक्य आणि नरेंद्र गोदामाच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना नवतेज ऍग्रोची छोटी बस दिसल्याबरोबर त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करायला सुरवात केली. दोन ठिकाणी गाडी वाटेत थांबली. दोनही ठिकाणी काही लोकांना उतरवून बस बेकरीच्या दिशेने निघाली. बस काव्या बेकरीपाशी थांबली. गणेश आणि एक माणूस बसमधून उतरून काव्या बेकरीच्या इमारतीत शिरले. दोघांच्याही हातात एकेक खोके होते. नरेंद्रने दोघांचाही फोटो काढला. आणि विक्रमला पाठवून दिला.
“अजिंक्य आपण काय करायचे. त्यांच्या मागे जाऊया का?”
“नाही. त्याचा फायदा होणार नाही. जॉर्ज त्यांचाच माणूस आहे. त्याने आपल्याला पाहीले आहे. एव्हाना आपले वर्णन त्यांच्यापर्यंत पोहोचले असेल. ते आपल्याला ओळखतील. इतक्यात तरी त्यांना भिडण्यात अर्थ नाही. गणेश लगेच बाहेर आला तर ठीक. नाहीतर मला गाडी कुठेतरी पार्क करायला जावे लागेल. इथे फार वेळ थांबता येणार नाही.”
अजिंक्यने विक्रमला फोन लावला. “तू आणि सुहानी नवतेजच्या घरावर लक्ष ठेवा. नरेंद्रने आत्ता तुला एक फोटो पाठवला आहे. तो माणूस किती महत्वाचा आहे माहित नाही. पण जर तो नवतेजच्या घरी आला तर मात्र त्याला नजरेआड होऊ देऊ नका.” त्यांच्या सुदैवाने गणेश पाच मिनिटांत बाहेर आला. यावेळेस त्याच्या हातात काही नव्हते. त्याने एक रिक्षा थांबवली. अजिंक्यने गाडी सुरु केली आणि दोघे त्या रिक्षेच्या मागे निघाले. काव्या बेकरीच्या आऊटलेट समोर आल्यावर दोघांचेही लक्ष त्या दिशेने गेले. बेकरीत काव्या दिसत नव्हती.
पुढची रिक्षा एका चाळवजा घरासमोर थांबली. गाडी कडेला लावून दोघे खाली उतरले. तोपर्यंत रिक्षाचे पैसे देऊन गणेश पुढे निघाला. नरेंद्र पुढे झाला आणि गणेशला थांबवले.
“गणेश, चल आमच्याबरोबर.”
“कशाला, कुठे?”
“सांगतो तुला. चल.” असे म्हणून नरेंद्रने त्याचा हात धरला. गणेशने हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला.
“ओ. सोडा हात.”
“इथे राडा नको असेल तर चल मुकाटयाने. का पोलिसांना फोन लावू?”
तोपर्यंत अजिंक्यही तिथे आला.
“अरे येतो आहे न तो. येतो आहेस न बाळा?” असे म्हणून अजिंक्यने त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. कुणाला वाटले असते दोघे मित्र आहेत. परंतु त्याच्या दणकट हाताचा दाब फक्त गणेशला जाणवत होता. यांच्यासमोर आपले काही चालणार नाही हे त्याच्या लक्षात आले. तो मुकाटयाने त्यांच्याबरोबर आला. गाडीत बसल्यावर नरेंद्रने त्याच्या खिशात हात घालून मोबाईल काढून घेतला. दोघे त्याला घेऊन वेदांतीच्या घरी गेले.
नरेंद्र म्हणाला, “आता दुसऱ्या खिशात काय आहे ते काढून ठेव.” गणेशने मुकाटयाने दुसऱ्या खिशातल्या वस्तू बाहेर काढून ठेवल्या. त्यात काही पैसे, एक किल्ली आणि एक कागदी पाकीट होते. नरेंद्रने ते उघडले. त्यात १-१ ग्रॅमच्या वीस पुड्या होत्या. “दोन लाखाचा माल आहे हा. हे बाळगल्याबद्दल किती शिक्षा होते माहित आहे? याची विक्री केल्याबद्दलची शिक्षा वेगळी.” गणेश हसला.
“तुला चेष्टा वाटते?”
“नाही. तुमची दया येते.”
“तुला काय वाटते तू उद्या सुटशील?” गणेश काही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची भीती दिसत नव्हती. उलट तो कुतुहलाने दोघांकडे पहात होता. हे कोण आहेत ते लक्षात येत नव्हते. “तुझ्या बरोबर एक माणूस होता. तो कोण आहे?”
“त्याचे नाव आदी. तो कधी कधी बेकरीत येतो.” याशिवाय गणेशने अजुन काही माहिती दिली नाही. यानंतरच्या घटना मात्र वेगाने घडल्या. अजिंक्यने गणेश आणि खुरानाला कोठारेंच्या ताब्यात दिल्यावर त्यांनी चंदेललाही ताब्यात घेतले. पण चंदेलच्या घरात काहीच पुरावा न मिळाल्यामुळे त्याला ते फारवेळ अडकवून ठेवू शकणार नव्हते. यातला मुख्य सूत्रधार मात्र अजुन सापडत नव्हता. तो सापडत नाही तोपर्यंत हे काम थांबणार नव्हते. तसेही तो मुख्य जरी सापडला तरी याचा समूळ नयनाट होणे किती अवघड आहे याची सगळ्यांनाच कल्पना होती. पण काही प्रमाणात तरी आळा बसणार होता. आता अजिंक्यला एकच आशा होती ती म्हणजे नवतेजचे घर. जर तो यात गुंतलेला असेल तर आज काहीतरी घडणार हे नक्की होते.
.....
रात्री नऊ वाजल्यापासून बाग बंद झाल्यावर विक्रम आणि सुहानी नवतेजच्या घराशेजारच्या बागेत बसून त्याच्या घरावर लक्ष ठेवत होते. परंतु घराचा फक्त उजव्या बाजूचा भाग त्यांना दिसत होता. घरात सगळीकडे अंधार होता. घराबाहेर एक मोठा दिवा लावलेला होता. त्याचा उजेड रस्त्यापर्यंत पसरलेला होता. वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत आणि तळमजल्यावर स्वयंपाकघरात उजेड दिसत होता. नवतेज आणि काव्या घरात असतील तरी ते असल्याची कुठलीच चाहूल लागत नव्हती. स्वयंपाकघराची खिडकी उघडी होती. एक बाई तिथे स्वयंपाक करत होती. मधेच आतबाहेर करत होती. साडेनऊ वाजता तिने खिडक्या बंद केल्या तसे त्यांना घराचा आतला भाग दिसेना. दार उघडून बंद झाल्याचा आवाज त्यांनी ऐकला. ती बाई घरातून बाहेर गेली असावी. साधारण दहा वाजता सर्व दिवे बंद झाले.
रात्रीचे बारा वाजून गेले. अजुन तरी काहीच घडत नव्हते. रस्त्यावरची रहदारी थांबली. विक्रम आणि सुहानी नवतेजच्या घरासमोरच्या बंगल्यात उडी मारून उतरून गेले. त्या बंगल्यात कुणी रहात नव्हते. म्हणून ते इथे आले होते. इथून त्यांना गेट आणि घराचा मुख्य दरवाजा दिसत होता. बंगल्याशेजारी आवारात एक गॅरेज होते. तिथे एक छोटा दिवा लावलेला होता. बाकी घर पूर्ण अंधारात होते. रस्त्यावरच्या लांबवर असलेल्या दिव्याचा उजेड इथपर्यंत पोचत नव्हता. घराशेजारच्या बागेत अंतरा अंतरावर दिवे लावलेले होते. पण झाडांमुळे त्याचा उजेडही बंगल्यापर्यंत पोचत नव्हता. काही अंतरावर असलेल्या इमारतींमध्ये पहारेकरी एकाजागी बसून डुलक्या घेत होते नाहीतर तंबाखू चोळत होते. एकाचेही लक्ष आजुबाजूला नव्हते.
पहाटेचे चार वाजले. काहीच घडेना तरी ‘तिथून हलायचे नाही’ असे अजिंक्यने सांगितल्यामुळे दोघे घराकडे लक्ष ठेवत बसून राहिले. थोड्या वेळाने बंगल्याच्या पुढच्या दारापाशी हालचाल दिसली. एक माणूस दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. दोन मिनिटांनी तो घरात गेलेला दिसला. तो गेटमधून आत जाताना तर दिसला नव्हता. त्याने दारावरची घंटीही वाजवली नाही. नाहीतर तिथल्या निरव शांततेत कदाचित तो आवाज बाहेर ऐकू आला असता. रात्री ज्या खोलीत दिवा चालु होता तिथेही दिवा लागला नाही. याचा अर्थ कुणीतरी आगंतुक आत शिरलेला होता. विक्रम मधून मधून अजिंक्यला फोन करून अहवाल देत होता.
यानंतर मात्र बराचवेळ काहीही घडले नाही. थोड्या वेळात रस्त्यावर वर्दळ सुरु झाली असती आणि हालचाल करणे शक्य झाले नसते. आत काय घडते आहे याची उत्सुकता सुहानीला वाटत होती. शेवटी बंगल्यात जाण्यासाठी तिने विक्रमला तयार केले आणि दोघे बंगल्यापाशी गेले. गेटचा आवाज झाला परंतु कोणीही बाहेर आले नाही. बंगल्याच्या दारापाशी जाऊन त्यांनी दार उघडायचा प्रयत्न केला. दार सहज उघडले गेले. दोघे आत शिरले. घरात सगळीकडे शांतता होती. सावधपणे त्यांनी घर तपासायला सुरुवात केली. त्यांना कोणीच दिसले नाही. बैठकीच्या खोलीत दोन दारे दिसत होती. सुहानीने एक दार उघडून आत पाहीले. आत टेबलवर एक खोके ठेवलेले होते. तिने नरेंद्रला बोलावले. विजेरीच्या उजेडात त्यांनी ते तपासले. आत फक्त काही पावत्या, किटकनाशकांचे नमुने वगैरे होते. विक्रमने आपल्याकडील फोटो काढून बघितला. हे खोके गणेशकडे असलेल्या खोक्यासारखेच पण आकाराने त्यापेक्षा बरेच मोठे होते. “सुहानी” विक्रम कुजबुजला. “हा आपल्यासाठी ट्रॅप असेल. आपण बाहेर जाऊया.” असे तो म्हणेपर्यंत मागे दार लावल्याचा आवाज झाला. दोघे पटकन दारापाशी आले. दार बाहेरून बंद केलेले होते. विक्रमने प्रथम दार आतून बंद करून घेतले म्हणजे कोणी आत येण्याचा धोका नको आणि अजिंक्यला फोन करून झालेल्या गोष्टी सांगितल्या.
“आम्ही पोचतो. तुम्ही शांत रहा. अजुन काही गडबड करू नका.”
अजिंक्यने इन्स्पेक्टर कोठारेंना झालेल्या गोष्टीची कल्पना दिली. कोठारेंनी बेकरीची तपासणी करण्यासाठी सर्च वॉरंट घेतले होते. त्यांना आता अजिबात वेळ घालवायचा नव्हता. कारण मुख्य आरोपी निसटून जाण्याची शक्यता होती. अजिंक्यला बरोबर घेऊन ते नवतेजच्या बंगल्यापाशी पोहोचले. तोपर्यंत उजाडले होते. रस्त्यावर रहदारी सुरु झाली होती. कोठारेंनी दरवाजाशेजारील घंटी वाजवली. दार दिव्याने उघडले. तिला गाढ झोपेतून उठवले आहे हे लक्षात येत होते. बाहेर गणवेशातील इन्स्पेक्टरला पाहून तिला आश्चर्य वाटले.
“सकाळी सकाळी. पोलीस आमच्या दारात? काय काम आहे?”
“तुमच्या दोन माणसांना आम्ही अटक केली आहे. त्यासंदर्भात बोलायचे होते.”
“कशाबद्दल अटक केली आहे?”
“मॅडम आम्ही आत येऊ शकतो का?”
काव्याने त्यांना घरात घेतले.
“तुम्ही जरा बसता का? मी पाच मिनिटांत आले.” असे म्हणून ती तिथल्या एका दारातून आत गेली. हे बोलणे चालु असताना अजिंक्य घराचे निरीक्षण करत होता. शेजारच्या एका दरवाजाला बाहेरून कडी घातलेली पाहीली. याच खोलीत विक्रम आणि सुहानी असणार याची त्याला खात्री पटली. त्याने कोठारेंना नजरेने इशारा केला. त्यांनीही ते पाहिल्याचे दर्शवले.
“मला माझ्या पद्धतीने जाऊदे. थोडे थांबा.” खरोखरच पाच मिनिटांत काव्या तिथे आली. तिने कपडे बदलले होते. तिने विचारले, “कोणाला अटक केली आहे तुम्ही? आणि का?”
“खुराना आणि ...” गणेशचे नाव घ्यायचे कोठारेंनी टाळले.
“खुराना? तो आमच्या गोदामात काम करणारा? त्याला का अटक झाली?” काव्याने दुसऱ्या माणसाचे नाव विचारले नाही. तिने नीट ऐकले नाही की जाणूनबुजून तसे केले हे कळले नाही. पण ती घाबरून गेली होती हे नक्की.
“तो ड्रग्जचा व्यवसाय करतो.”
“काय सांगता? असे कसे असेल? मला याची काहीच माहीत नाही.”
“एवढेच नाही मॅडम, तुमच्या इथे काम करणाऱ्या अजुन एका माणसाला आम्ही ताब्यात घेतले आहे.”
“काय चालले आहे हे? आमची माणसे असे करणार नाहीत. आणि त्यांनी काही केले असेल तर त्याच्याशी आमचा काय संबंध?”
“मॅडम त्यातला एक माणूस तुमच्या बेकरीत काम करतो. आणि त्याने आम्हाला सांगितले आहे की तुमच्या बेकरीत ड्रग्ज ठेवले जातात. आम्ही सर्च वॉरंट आणले आहे. तुम्ही आमच्या बरोबर चला आम्हाला तुमच्या बेकरीची तपासणी करायची आहे.”
“नाही नाही तुम्ही असे करू शकत नाही. माझे पती घरात नाहीत.”
“कुठे गेले आहेत ते?”
“मित्राकडे.”
“केव्हा येणार आहेत ते?”
“आत्ता. सकाळीच.”
“तुम्ही त्यांना ताबडतोब बोलावून घ्या.” त्याच वेळेस बाहेर गाडीचा आवाज आला. आणि “काव्या, बाहेर पोलिसांची गाडी...” असे म्हणत नवतेज आत आला. त्याने दोघांना पाहिल्यावर तो थबकला.
कोठारेंनी उठून त्याला सांगितले, “आमच्याकडे तुमच्या बेकरीचे सर्च वॉरंट आहे. आम्हाला सहकार्य केलेत तर बरे होईल.”
“तेज. हे काय म्हणत आहेत? तुझी माणसे ड्रग्जचा व्यवसाय करतात. हे काय चालले आहे? कधी तुझ्या ऑफिसमधल्या मुलीचा खून होतो. कधी तुझी माणसे पकडली जातात. आत्तापर्यंत कधी आमच्या घरी पोलीस आले नव्हते. आणि इथे तुझ्या घरी?”
“नाही काव्या. त्यांचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आपल्याइथे अशी कुठलीही गोष्ट होत नाही.” “मग पोलीस बेकरीचे सर्च वॉरंट का घेऊन आले आहेत. सांग तू काय केले आहेस?”
“मी काहीही चुकीचे केलेले नाही. आपल्या इथे काम करणारी माणसेही अशी नाहीत.”
“तुझ्यामुळे ही मानहानी होते आहे. मला जर हे आधी माहित असते तर मी तुझ्याबरोबर इथे आलेच नसते. मला इथे रहायचे नाही. मी चालले.” असे म्हणून ती वरती निघून गेली.
तिचा हा अवतार पाहून नवतेज पुरता हबकला. तिला थांबवावे हेही त्याला सुचले नाही. तो या धक्क्यातून सावरायच्या आधीच कोठारेंनी त्याच्यासमोर सर्च वॉरंट ठेवले.
“हे कशाबद्दल करत आहात?”
कोठारेंनी त्याला थोडक्यात सांगितले तसे तो सुन्न होऊन बसला. नंतर उठून तो म्हणाला, “किल्ली घेऊन आलो. मी तुमच्या बरोबर बेकरीत येतो.” तो जसा वर गेला तसे कोठारेंनी अजिंक्यला खूण केली. त्याने जाऊन बंद दरवाजाची कडी काढली. त्याबरोबर विक्रम आणि सुहानी बाहेर आले.
कोठारे म्हणाले, “ तुम्ही आत्ता इथून जा. पण नंतर चौकीत येऊन मला भेटा. मला तुमच्याशी बोलायचे आहे.”
विक्रम आणि सुहानी बंगल्यातून बाहेर पडले. एव्हाना बागेचे दार परत उघडलेले होते. फिरायला येणारी बरीच माणसे बागेत होती. दोघे बागेत शिरले आणि एका बाकावर बसून नवतेजच्या घरावर लक्ष ठेऊ लागले. विक्रमने नरेंद्रला फोन केला.
.....
काव्या वरून पेटी घेऊन खाली आली. तिच्या मागोमाग तिची समजूत घालत नवतेज खाली आला. काव्या जशी बाहेर जायला लागली तसे कोठारेंनी तिला आडवले. “मॅडम, बेकारीचा कारभार तुम्ही बघता. त्यामुळे तुम्हीही तिथे असलात तर बरे होईल.” काव्याने क्रुद्ध नजरेने नवतेजकडे पाहीले. काव्याने पेटी आपल्या गाडीत ठेवली आणि ती गाडीत बसायला लागली. पण नवतेजने तिला आपल्याबरोबर येण्यास विनवले. कोठारेंनी बेकरीची कसून तपासणी केली. पण बेकरीच्या तपासात काहीच सापडले नाही तेव्हा नवतेज कोठारेंना दोष दयायला लागला. अजिंक्य आणि कोठारे बुचकळ्यात पडले. एवढा माल गेला कुठे. गणेशने बराच माल बेकरीत असल्याचे खात्रीने सांगितले होते.
.....
क्रमशः
कमाल सुरु आहे कथा
कमाल सुरु आहे कथा