घरच्या घरी पण दारच्या चवीची मिसळ

Submitted by योकु on 24 July, 2019 - 19:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अचानक पाहुणे यायचे होते. पोळीभाजीचा बेत तसाही फार वेळखाऊ होतो आणि बाकी सौदिंडिअन मेन्यू करायचा फार कंटाळा आला होता. तर दुकानात सहजच या मसाल्याच्या पाकिटावर नजर गेली आणि करून पाहू म्हणून आणला. फारच उत्तम मिसळ झाली तो मसाला वापरून. आता शक्यतो याच पद्धतीनं केल्या जाते. त्याची ही कृती -

दोन वाट्या मोड आणलेली मटकी (मोड आणण्याचा वेळ अर्थातच कृतीत धरलेला नाही)
दोन मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून
सुकं खोबरं किसून अर्धी-पाऊण वाटी
१०/१२ लसूण पाकळ्या
बोटाच्या दोन पेराएवढं आलं
पाऊण चमचा हळद
५-६ चमचे तिखट
दीड वाटी तेल
चवीनुसार मीठ
चमचाभर मोहोरी
दोन पाकीटं सुहाना कंपनीचा मिसळ मसाला (लहान पाकिटं)
वरून कटावर घालायला थोडी कोथिंबीर

सर्व्ह करायची तयारी
दोन तीन मध्यम कांदे बारीक चिरून. यातच थोडी कोथिंबीरही चिरून मिसळून टाकायची; गुलबट कांदा आणि हिरव्या कोथिंबीरीचंं काँबो सुरेख दिसतं.
दोन तीन लिंबं चिरून फोडी करून
लागेल तसं फरसाण
लादी पाव किंवा ब्रेड (मला स्वतः ला लादीपावच आवडतो कारण पावात तो टेस्टी रस्सा मस्त शोषल्या जातो)

क्रमवार पाककृती: 

मटकी एका भांड्यात घालून, धूवून, थोडं मीठ + हळद + थोडं पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या + ५ मिनिटं कमी आचेवर अशी तयार करून घ्यावी.
कटाकरता दोन भांडी लागतील. मसाला भाजायला लोखंडी कढई आणि कट करायला जरा जाड बुडाचं पातेलं. तर लोखंडी कढई दणकून तापू द्यावी, तोवर कांदा उभा (जरा जाडसर सुद्धा चालेल) चिरून घ्यावा. तोवर कढई तापली असेल तर त्यात नुसता कांदा घालून परतायला घ्यावं आणि आच मंद करावी. पहिले ५/७ मिनिटं कांदा तेल न घालताच परतायचाय.
यावर आता एक चमचाभर तेल सोडून पुढे परतत राहायचं. चांगला खमंग लालसर झालाकी काढून गार करत ठेवावा. त्याच कढईत सुकं खोबरं कोरडंच किसाच्या कडा लालसर होइस्तो मंद आचेवर परतून तेही गार करत ठेवलेल्या कांद्यावर घालून दोन्ही थंड होऊ द्यावं.
कांदा खोबरं बर्‍यापैकी गार झाल्यावर, त्यातच आलं आणि लसूण घालून मिक्सरमधून गंधगोळी वाटून घ्यावं. हे वाटपाचं बदगं वाटीभर तरी व्हायला हवं.
आता दुसर्‍या जाड बुडाच्या पातेल्यात दीड वाटी तेल तापत घालावं आणि ते तापल्यावर मोहोरी घालून तडतडू द्यावी. वर हे वाटण घालून परतायला घ्यावं. आच मंदच हवी.
परततांना आधी सगळ तेल गायब होतं आणि जसजसा मसाला होत येइल तसतसं तेल सुटायला लागतं.
या मसाल्याला तेल चांगलं सुटलं की यात ५-६ चमचे लाल तिखट, पाऊण चमचा हळद, मिसळ मसाल्याच्या पाकिटातला मसाला, मीठ, चिमटीभर साखर असं सगळ घालून अजून २-३ मिनिटं पुढे परतायचंय. या स्टेपला मसाला भांड्याच्या तळाला लागतोय असं वाटलं तर जरा पाण्याचा हबका देता येइल.
मसाला खमंग भाजला, नाकात दम आला आणि सुवास घरभर उधळला की ५-६ कप पाणी यात घालून उकळी येऊ द्यावी. एकदा दणकून उकळलं की आच मंद करून अजून १० मिनिटं तरी कट उकळू द्यावा. नंतर आच बंद करून झाकण घालून १० मिनिटं मुरू द्यावा.
आगदी वाढतेवेळी वरून थोडी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. चांगला लालभडक तवंग असलेला कट गरम गरम असतांनाच खायला घ्यावा.

सर्व्ह करतेवेळी - जरा मोठ्या खोलगट डिश मध्ये आधी थोडी मटकी त्यावर फरसाण आणि त्यावर कांदा-कोथिंबीर घेऊन उकळता कट त्यावरच्या तवंगासकट घ्यावा. सोबत पाव, लिंबू घ्यावं.
सुपरटेस्टी मस्त तिखट मिसळपाव मनसोक्त खावा. अगदी दारच्या चवीची होतो पण ताजे, चांगले मसाले आणि घरचं तेल असल्यानी बाधत नक्कीच नाही Happy

वाढणी/प्रमाण: 
३-४ लोकांकरता
अधिक टिपा: 

- कट बर्‍यापैकी तिखट होतो या प्रमाणात
- तेलात आणि लाल तिखटात अजिबात कंजूषी करयची नाही तरच ती अपे़क्षित स्वर्गीय चव साधेल. तसंच खाताना लिंबू अवश्य घ्यावं. चव मस्त खुलते लिंबाच्या रसानी
- सोबत दही भात फार सुदिंग म्हणून जातो आणि पूर्ण जेवण होतं

माहितीचा स्रोत: 
मसाल्याच्या पाकिटावरची रेसीपी + माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची कुठेही शाखा नाही ह्या पुणेरी स्टाईलप्रमाणं आम्ही कधीच फोटो देत नाही ही योकु ह्यांची स्टाईल दिसते. Happy
तुमच्या स. ता. कढईचा फोटो बघायची उत्सुकता आहे.

रेसिपी नेहमीप्रमाणेच भारी.

या पद्धतीने मिसळ केली होती. छान झाली होती, आणि किती पटापट! माझ्याकडे एक काटदरे मिसळ मसाला पाकीट पडून होतं तेच वापरलं.
फक्त रस्सा जरा कोकोनट फ्लेवर डॉमीनेटेड झाला होता. पुढच्या वेळी खोबरं कमी घालणार किंवा चिवट यांनी लिहिलंय तसं खोबऱ्याऐवजी बटाटा add करणार. आधी तसा रस्सा केलेला आहे ,तोही छान लागतो.
तेल आणि मसाला दोन्ही थोडं कमीच घातलं पण छान तवंग आला होता. या रेसिपीत पोहे नाहीत, मीही करायचा आळस केला पण ते असते तर अजून भारी बेत झाला असता.

नो फेल रेसिपीसाठी योकुना लोखंडी कढईभरून धन्यवाद!

योकु, भारीच! Happy

फोटू नसल्याने मिसळीसोबत लिंबूच वाढला नसल्यागत वाटत राहिले.
(किंबहुना रेस्पी उघडून बघण्यात नजर शेकून काढेल असा फोटू बघायला मिळेल ही सुप्त इच्छाही होती. Proud )

इथे तरी सगळीकडे मिळतो. तिथे ज्या दुकांनांत सुहानाचे इतर मसाले असतात त्यांना विचारून पाहू शकता. मला खात्रीचं दुकान नाही माहीत

१५ adults आणि सहा kids.
घरी brunch ला येणार आहेत
मिसळ करण्याचे योजिले आहे
कुणी प्रमाण सांगेल काय?
मटकी किती?
पाव किती?
हीच पाकृ follow करते मी नेहमी त्यानुसार सांगा
किंवा कसंही

साधारण अशीच रेसिपी लालुने दिलेली आहे. मला मिसळ म्हणजे काहीतरी भयन्कर कठिण प्रकार असे वाटायचे. पण ह्या प्रकारे एकदा करुन पाहिली तेव्हा खुप सोपी वाटली. आता बरेचदा करते.

लालुच्या रेसिपीत आले लसुन कोथिम्बीर वेगळे वाटण करुन आधी ते तेलात परतायचे व नन्तर खोबर्याचे वाटप परतायचे असे लिहीलेय. मी एकदा कन्टाळा करुन दोन्ही वाटपे एकत्र वाटली तेव्हा मिसळीला आले लसुणाचा कच्चट वास राहीला असे वाटले. तेव्हापासुन दोन्ही वेगळेच वाटते व परतते.

खोबरे चान्गले लाल होइतो भाजले नाही आणि तर्री जाड ठेवली तर खोब-याची overwhelming चव जाणवते, तर्री पातळ
ठेवली तर खोबरे घातलेले आहे याचा पत्ता लागत नाही असा अनुभव आहे.

बदगं म्हणजे किती मोठे भान्डे माहीत नाही. मी दोन माणसांसाठी छोटी वाटी भरेल इतकेच वाटप करते. तेल मात्र कमीच. वाटीभर तेल घालायची हिम्मत अजुन केली नाही Happy
मटकी पातेल्यात शिजवुन घेते, मला मिसळीत थोडी कडक मटकी लागते. कुकरच्या दोन शिट्या अधिक दोन मिनिटे म्हणजे माझा प्रेस्टिजचा प्रेशर पॅन हाती मटकीचा लगदाच द्यायचा. उसळ करतानाही प्रेशर यायला लागले कि कुकर बन्द करते नाहीतर गेलेच काम…

हो ते बऱ्याच जणांनी दारूची वाचले आहे...
>>>
मी पण दारूच्या वाचूनच आता आलो Happy
मी तर दारूला पित नाही
मग असे का होतेय सर्वांचे?

Pages