अचानक पाहुणे यायचे होते. पोळीभाजीचा बेत तसाही फार वेळखाऊ होतो आणि बाकी सौदिंडिअन मेन्यू करायचा फार कंटाळा आला होता. तर दुकानात सहजच या मसाल्याच्या पाकिटावर नजर गेली आणि करून पाहू म्हणून आणला. फारच उत्तम मिसळ झाली तो मसाला वापरून. आता शक्यतो याच पद्धतीनं केल्या जाते. त्याची ही कृती -
दोन वाट्या मोड आणलेली मटकी (मोड आणण्याचा वेळ अर्थातच कृतीत धरलेला नाही)
दोन मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून
सुकं खोबरं किसून अर्धी-पाऊण वाटी
१०/१२ लसूण पाकळ्या
बोटाच्या दोन पेराएवढं आलं
पाऊण चमचा हळद
५-६ चमचे तिखट
दीड वाटी तेल
चवीनुसार मीठ
चमचाभर मोहोरी
दोन पाकीटं सुहाना कंपनीचा मिसळ मसाला (लहान पाकिटं)
वरून कटावर घालायला थोडी कोथिंबीर
सर्व्ह करायची तयारी
दोन तीन मध्यम कांदे बारीक चिरून. यातच थोडी कोथिंबीरही चिरून मिसळून टाकायची; गुलबट कांदा आणि हिरव्या कोथिंबीरीचंं काँबो सुरेख दिसतं.
दोन तीन लिंबं चिरून फोडी करून
लागेल तसं फरसाण
लादी पाव किंवा ब्रेड (मला स्वतः ला लादीपावच आवडतो कारण पावात तो टेस्टी रस्सा मस्त शोषल्या जातो)
मटकी एका भांड्यात घालून, धूवून, थोडं मीठ + हळद + थोडं पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या + ५ मिनिटं कमी आचेवर अशी तयार करून घ्यावी.
कटाकरता दोन भांडी लागतील. मसाला भाजायला लोखंडी कढई आणि कट करायला जरा जाड बुडाचं पातेलं. तर लोखंडी कढई दणकून तापू द्यावी, तोवर कांदा उभा (जरा जाडसर सुद्धा चालेल) चिरून घ्यावा. तोवर कढई तापली असेल तर त्यात नुसता कांदा घालून परतायला घ्यावं आणि आच मंद करावी. पहिले ५/७ मिनिटं कांदा तेल न घालताच परतायचाय.
यावर आता एक चमचाभर तेल सोडून पुढे परतत राहायचं. चांगला खमंग लालसर झालाकी काढून गार करत ठेवावा. त्याच कढईत सुकं खोबरं कोरडंच किसाच्या कडा लालसर होइस्तो मंद आचेवर परतून तेही गार करत ठेवलेल्या कांद्यावर घालून दोन्ही थंड होऊ द्यावं.
कांदा खोबरं बर्यापैकी गार झाल्यावर, त्यातच आलं आणि लसूण घालून मिक्सरमधून गंधगोळी वाटून घ्यावं. हे वाटपाचं बदगं वाटीभर तरी व्हायला हवं.
आता दुसर्या जाड बुडाच्या पातेल्यात दीड वाटी तेल तापत घालावं आणि ते तापल्यावर मोहोरी घालून तडतडू द्यावी. वर हे वाटण घालून परतायला घ्यावं. आच मंदच हवी.
परततांना आधी सगळ तेल गायब होतं आणि जसजसा मसाला होत येइल तसतसं तेल सुटायला लागतं.
या मसाल्याला तेल चांगलं सुटलं की यात ५-६ चमचे लाल तिखट, पाऊण चमचा हळद, मिसळ मसाल्याच्या पाकिटातला मसाला, मीठ, चिमटीभर साखर असं सगळ घालून अजून २-३ मिनिटं पुढे परतायचंय. या स्टेपला मसाला भांड्याच्या तळाला लागतोय असं वाटलं तर जरा पाण्याचा हबका देता येइल.
मसाला खमंग भाजला, नाकात दम आला आणि सुवास घरभर उधळला की ५-६ कप पाणी यात घालून उकळी येऊ द्यावी. एकदा दणकून उकळलं की आच मंद करून अजून १० मिनिटं तरी कट उकळू द्यावा. नंतर आच बंद करून झाकण घालून १० मिनिटं मुरू द्यावा.
आगदी वाढतेवेळी वरून थोडी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. चांगला लालभडक तवंग असलेला कट गरम गरम असतांनाच खायला घ्यावा.
सर्व्ह करतेवेळी - जरा मोठ्या खोलगट डिश मध्ये आधी थोडी मटकी त्यावर फरसाण आणि त्यावर कांदा-कोथिंबीर घेऊन उकळता कट त्यावरच्या तवंगासकट घ्यावा. सोबत पाव, लिंबू घ्यावं.
सुपरटेस्टी मस्त तिखट मिसळपाव मनसोक्त खावा. अगदी दारच्या चवीची होतो पण ताजे, चांगले मसाले आणि घरचं तेल असल्यानी बाधत नक्कीच नाही
- कट बर्यापैकी तिखट होतो या प्रमाणात
- तेलात आणि लाल तिखटात अजिबात कंजूषी करयची नाही तरच ती अपे़क्षित स्वर्गीय चव साधेल. तसंच खाताना लिंबू अवश्य घ्यावं. चव मस्त खुलते लिंबाच्या रसानी
- सोबत दही भात फार सुदिंग म्हणून जातो आणि पूर्ण जेवण होतं
नेमकं.
नेमकं.
मस्त पाककृती.
मस्त पाककृती.
दोन वेलची आणि चिमूटभर साखर हवी.
मला स्वतः ला लादीपावच आवडतो
मला स्वतः ला लादीपावच आवडतो कारण पावात तो टेस्टी रस्सा मस्त शोषल्या जातो)>> लादिपावच रे! ब्रेड कुठे आला मिसळपावात
कोल्हापुर भागात मिसळबरोबर
कोल्हापुर भागात मिसळबरोबर ब्रेड खातात.
मिसळ म्हटले की पावच हवेत.
चित्रदर्शी लिखाण. मी अल्मोस्ट
चित्रदर्शी लिखाण. मी अल्मोस्ट बघितल तुम्हाला मिसळ करताना, उधळलेल्या सुवासाने शिंका आणि तोंडाला पाणी सुटलं. बेस्ट !! मी पण अशीच करते मात्र थोडी चिंच आणि छोटुस्सा खडा गुळ घालते. बाकी सेम टु सेम.
ते असं दमदार वाचूनच खावंस
ते असं दमदार लिहलेलं वाचूनच खावंस वाटतं.
पन लय कुटाना हाय करन्याचा.
फोडनीत बडी वेलची आनी लवंग आमी टाकतो की राव
जबरदस्त. गंधगोळी वाटण, बदगं
जबरदस्त. गंधगोळी वाटण, बदगं हे शब्द आवडले.
चित्रदर्शी लिखाण. मी अल्मोस्ट
चित्रदर्शी लिखाण. मी अल्मोस्ट बघितल तुम्हाला मिसळ करताना, उधळलेल्या सुवासाने शिंका आणि तोंडाला पाणी सुटलं. बेस्ट !! मी पण अशीच करते मात्र थोडी चिंच आणि छोटुस्सा खडा गुळ घालते. बाकी सेम टु सेम.>>>>++११११११
अधिक टीपा मध्ये लिहीलय तरी तेल मला अंमळ जास्त वाटतय
चित्रदर्शी लिखाण.>>>>>>+१.
चित्रदर्शी लिखाण.>>>>>>+१.
अधिक टीपा मध्ये लिहीलय तरी तेल मला अंमळ जास्त वाटतय>>>>>>>हो मलाही.यापेक्षाही कमीतकमी तेल घालून घरी मिसळ केली जाते.तीही तर्रीवाली आणि स्वादिष्ट!
फारच चविष्ट रेसिपी दिसतेय.
फारच चविष्ट रेसिपी दिसतेय. आजच घरी गेल्यावर करून पाहतो. मिसळ म्हणजे जीव की प्राण माझा
फारच मस्त!
फारच मस्त!
छानच .. फोटू मिसला की राव
छानच .. फोटू मिसला की राव पुन्हा एकदा
बदगं..!! अगदी डोळ्यासमोर
बदगं..!! अगदी डोळ्यासमोर आलं!
आणी टोमॅटो नाही का अगदीच वापरायचा? एखाद दुसरा किसून/ प्युरे करुन टाकला तर..?
मस्तच !! आता करणं आलं
मस्तच !! आता करणं आलं
मी अशीच करते फक्त टोमॅटो प्युरी घालते
हे पा, मिसळीत आरामानांन त्येल
हे पा, मिसळीत आरामानांन त्येल, तिखाट वतल्याशिवाय चव येत न्हायी. वर हवं ते ताक प्या पण इथं कंजूशी आज्याबात नको. हा त्ये टामाटू, गूळ वगैरे पन न्हाय वापरू
वाटण न करताही मस्त तर्री होते
वाटण न करताही मस्त तर्री होते. मटकी शिजवताना त्यात बटाट्याच्या फोडि घालाव्यात.
मसाला खमंग भाजला, नाकात दम आला आणि सुवास घरभर उधळला की ५-६ कप पाणी यात घालून उकळी येऊ द्यावी >> हे पाणी चांगलं उकळी आलेलं लगलीच घालावं. तर्रीवर मस्त तवंग येतो
हे पा, मिसळीत आरामानांन त्येल
हे पा, मिसळीत आरामानांन त्येल, तिखाट वतल्याशिवाय चव येत न्हायी. वर हवं ते ताक प्या पण इथं कंजूशी आज्याबात नको. हा त्ये टामाटू, गूळ वगैरे पन न्हाय वापरू >>>>> जशी आज्ञा
झक्कास पाकृ आन झक्कास लिवली
झक्कास पाकृ आन झक्कास लिवली हाय!
करून पायतो बा यकदा.
>>> हा त्ये टामाटू, गूळ वगैरे
>>> हा त्ये टामाटू, गूळ वगैरे पन न्हाय वापरू <<
हा हे बराबर. ते उठसुठ हाताशी गुळ आहे म्हणून टाकत बसा आणि गुळचट बनवा. टमाटा पण त्यातलाच , आहे म्हणून घाला.
टमाटे राहु दे बरे त्या पंजाबी जेवणात..
हा हे बराबर. ते उठसुठ हाताशी
हा हे बराबर. ते उठसुठ हाताशी गुळ आहे म्हणून टाकत बसा आणि गुळचट बनवा. टमाटा पण त्यातलाच , आहे म्हणून घाला.
टमाटे राहु दे बरे त्या पंजाबी जेवणात..>>>>> +१.
भन्नाट रेसीपी, या विकेंडला
भन्नाट रेसीपी, या विकेंडला हाच ब्रेकफास्ट नक्की.
बाकी सगळं ठीक पण दोन वाट्या मटकीला दीड वाटी तेल :omg: एवढं प्रमाण फक्त बदलून टाकणार.
सुहाना ची अत्तापर्यन्त फक्त
सुहाना ची अत्तापर्यन्त फक्त चकली भाजणी वापरली आहे, मिसळीचा मसाला वापरुन बघायला पाहीजे.
कट जबरदस्त आहे. योकु पुढल्या
कट जबरदस्त आहे. योकु पुढल्या वेळी काटदरे मसाला वापरुन बघा. ही पाकृ बुकमार्क केलीय. आता येत्या शनीवारी याच पद्धतीने करेन.
योकु चविष्ट पाककृती. फक्त
योकु चविष्ट पाककृती. फक्त फोटो हवे होते. मी मोड आलेली मटकी सुद्धा फोडणीत टाकून एकच उसळ करते , वेगळा कट असा करत नाही आता या पद्धतीने करुन बघेन.
लिखाण कितीही चित्रंदर्शी
लिखाण कितीही चित्रंदर्शी वगैरे असलं तरी फोटू नसल्याने रेस्पी नापास करण्यात येत आहे.
एवढी झक्कास रेसिपी लिहतोस,
एवढी झक्कास रेसिपी लिहतोस, फोटोचा का कन्टाळा?
एकदा मिसळीत टोमॅटोची एकच फोड
एकदा मिसळीत टोमॅटोची एकच फोड दिसल्याने ती मिसळ न खाता पूर्ण पैसे भरून बाहेर पडले आहे.
बाकी पाककृती मस्तच!
जबरी लिहिलंय. फोटो हवा होता.
जबरी लिहिलंय. फोटो हवा होता.
@योकु ......तुमच्या रेसिपी
@योकु ......तुमच्या रेसिपी प्रमाणे मिसळ बनवली काल... मस्त झाली होती....फक्त मी सुहाना च्या ऐवजी काटदरेंचा मिसळ मसाला वापरला. धन्यवाद ...
मला दरवेळी शीर्षक" दारुच्या
मला दरवेळी शीर्षक" दारुच्या चवीची मिसळ "असे दिसते व मनात गुदगुल्या होतात.
Pages