४४ किमी चालण्याचे आव्हान

Submitted by विक्रमसिंह on 18 June, 2019 - 03:31

मित्रहो आम्ही मे महिन्यामधे इंग्लंड मधे ४४ किमी चालण्याचे आव्हान पूर्ण केले. त्याची गोष्ट
IMG-20190527-WA0027_0.jpg

आता तुम्ही म्हणाल मी हे का लिहितोय. तू कर ना, आम्हाला कशाला सांगतो. बरोबर आहे तुमच. पण माझा उद्देश माझे वाचून एकाने तरी चालायला लागावे येवढाच किरकोळ आहे. तुम्हाला करायचे नसेल तर सोडून द्या. पण मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो, मला स्वतःला, ८५ किलोच्या व्यक्तिला, या वयात जर येवढ चालता आल तर कुठलिही निरोगी असणारी ५० वयापर्यंतची व्यक्ति हे आव्हान अगदी सहज पार पाडू शकेल. अगदी १०० टक्के. अगदी खूप अवघड वाटत असल तरी.

मी आयुष्यात प्रथमच चालण्याच्या वा पळण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. मग लांब पल्ल्याचे आव्हान तर दूरच. चालण्याचा भयंकर कंटाळा. तसे पूर्वी क्रिकेट खेळत असल्याने व नेहमी काहीना काही व्यायाम करत असल्याने शारिरीक क्षमता बरी आहे. पण कार्डिओ आणि माझ फारस कधी जमलच नाही. क्रिकेट प्रॅक्टिसच्या वेळेस काही चूक झाली किंवा यायलाच उशीर झाला तर प्रशिक्षक राउंड मारायची शिक्षा द्यायचे. तेंव्हा पासून पळणे म्हणजे शिक्षा हे समिकरण डोक्यात फिट्ट बसलय बहुतेक.

या आव्हानात भाग घ्यायचा यासाठी भरीस पाडले आमच्या मोठ्या चिरंजीवांनी. त्याने याआधी १०० किमी चालण्याचे आव्हान पूर्ण केले होते. यावेळेस त्याने आमच्या सूनबाईंना प्रथम तयार केले. त्या मुंबईच्या. व्यायाम म्हणजे स्टेशन पर्यंत चालण्याचा अनुभव. मग त्यांनी आम्हाला कामाला लावले. मग आम्ही भाग घेतोय म्हणल्यावर आमची काळजी घेण्यासाठी धाकटे चिरंजीव स्वतःहून पुढे आले. अशी आमची चौघांची टीम तयार झाल्यावर नाव ठेवले "अल्फान्सो पीपल".

ही व या प्रकारच्या बर्‍याच स्पर्धा युकेमधे दरवर्षी आयोजीत केल्या जातात. याचा उद्देश सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थांसाठी मदत निधी जमा करण्याचा असतो. तुम्ही मदतीसाठी स्वतः पैसे भरू शकता, किंवा मित्रांना आवाहन करू शकता. तुम्हाला मदत करायची नसेल तरी तुम्ही काही फी भरून यात भाग घेऊ शकता. आमची स्पर्धा लंडन ते ब्रायटन या १०० किमी अंतरात होती. पूर्ण १०० किमी किंवा २५ किमी, ५६ किमी, ४४ किमी अशा टप्प्यात भाग घ्यायची सोय होती. २५ किमी ला काय चॅलेंज म्हणता येणार नाही असे सांगून व १०० किमी तुम्हाला जमणार नाही असे सांगून आमच्यापुढे चिरंजीवांनी दोनच पर्याय ठेवेले. मग त्यातला ४४ किमीचा आम्ही निवडला.

पैसे भरल्यानंतर स्पर्धेचे अ‍ॅप डाउनलोड करण्यापासून सुरवात झाली. यात स्पर्धे बद्दलची सर्व माहिती, तयारी संबंधी उपयुक्त सूचना वगैरे सर्व काही होते. कुठलाही प्रश्न चिचारायला लागू नये इतकी सर्व माहिती अगदी विचारपूर्वक दिली होती. ४४ किमी चा मार्ग आम्हाला सकाळी सहा ते रात्री १० या वेळात पूर्ण करायचा होता. ११ किमी, १४ किमी, ८ किमी, व ६ किमी असे थांबे असणार होते. येथे खाद्यपदार्थ, एनर्जी ड्रिंक्स बिस्किटे चॉकलेटस अशी व्यवस्था तर दुसर्‍या थांब्यावर पिझा, पास्ता, सँड्विचेस याचीही व्यवस्था होती. सर्व थांब्यांवर स्वच्छतागृहही असणार होते. इंग्लंड मधे त्यावेळेस त्यांच्या उन्हाळ्याची सुरूवात झालेली असते. त्यामुळे तपमान ८ अंश ते १८ अंश असे असणार होते. ढगाळ हवा, थंड वारे व रिमझिम पाउस सोबतीला असणार होता. ही सर्व माहिती तयारी करण्यासाठी अत्यंत उपयोगी होती.

४४ किमी पळणे व चालणे यात तयारीच्या दृष्टीने मुख्य फरक म्हणजे लागणारा वेळ ४ ते ५ तासाऐवजी १० ते १२ तास. त्यामुळे अंगावर एक कपड्याचा सेट, ज्यादा मोजे, रेनकोट तिकडे ठंडी असल्याने जास्तीचा शर्ट व स्वेटर शिवाय दोन लिटरची चालता चालता पिता येइल अशी पाण्याचे पिशवी इलेक्ट्राल पावडर, एनर्जी बार, औषधे असा सगळा दोन तीन किलोचा जामानिमा चालत जाताना बरोबर असणार होता. वाट शेती व डोंगराळ प्रदेशातून जाणारी असणार होती, आपल्या कडच्या ट्रेक सारखी. पावसात सुद्धा आतून ओले न होणारे विषेश बूट, चढण सोपी व्हावी म्हणून दोन्ही हातात काठ्या, ड्राय फीट कपडे (ज्यावर घाम टिकत नाही) व रात्री सुद्धा दिसावे म्हणून हेडलाईट या सगळ्याची खरेदी झाली.. खूप चालल्यावर पायाला किंवा अंगाला ( काखेत, जांघेत ) ब्लिस्टर्स होऊ नये यासाठी घ्यायची काळजी विशेष महत्वाची होती. म्हणून ओले न होणारे बूट व ड्राय फिट कपडे.

आम्ही मार्च च्या पहिल्या आठवड्या पासून तयारी चालू केली. चार पाच किलोमिटर पासून वाढवत वाढवत २० किमी एका वेळी येवढ पोचे पर्यंत १५ एप्रिल उजाडला. कर्वे पुतळा -कोधरूड- चांदणी चौक, युनिव्हर्सिटी, दशभूजा ते कर्वे पुतळा १९ किमी होतात असा शोध लागला. स्ट्रावा अ‍ॅप मुळे प्रगती व वेग याबद्दल माहिती मिळत होती. कोथरूड ते वाकड, कोथरूड ते औंध असा बंधू भगिनींना धक्का देणारा प्रकारही केला. त्यावेळेस असलेले ४० च्या वरच तपमान, हवेतील प्रदूषण , रात्री सुधा असलेली गरमी ह्या गोष्टी जरा अवघडच गेल्या. एप्रिल २६ -२७ ला मात्र एका पायाला ब्लिस्टर्स आले. चांगली चिंचोक्याच्या आकारची जखम होती. पण ब्लिस्टर्स बद्दल येवढ वाचून सुद्धा मी चूक केली आणि जखम चिघळली. ट्रेनिंगचे १० -१५दिवस मात्र त्यात वाया गेले. शेवटी एक आठवडा आधी जखम पूर्ण बरी झाली व मी सुटकेचा निश्वास सोडला.

मी अजून एक केल होत. ज्यांना ज्यांना म्हणून शक्य होईल त्यांना त्यांना मी स्पर्धेत भाग घेतलाय हे आवर्जून सांगितल. परतीचे मार्ग बंद करायला. अगदी आमच्या चेअरमनना सुद्धा.दोर कापलेले असल्याने काहिही झाल तरी भाग घायचाच असे ठरवले होते. सगळ्या भावा बहिणींनी मला भाग घेण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. व्याही सुद्धा सुनेला परवानगी देत नव्हते. पण आम्हीच भाग घेतोय म्हणल्यावर त्यांचाही नाइलाज झाला. (ही आमच्या सूनबाइंची व मुलाची स्ट्रेटेजी होती अशी मला दाट शंका आहे ). Happy मित्रांनी व त्यांच्या बायकांनी पण आडून आडून आम्हाला कशाला करताय , झेपणार आहे का असा सूर लावला होता. ऑफिसमधे मात्र बेस्ट लक शिवाय कुणी काही बोलल नाही. (काही बहुतेक मजा बघत असावेत). जे मॅराथॉन वा सायकलिंग करतात त्यांनी मात्र प्रोत्साहन व चांगल्या टीप्सही दिल्या.

एक आठवडा आधी लंडनला पोचलो. गेल्या गेल्या पोट बिघडले , सर्दी व खोकल्याने बेजार. बायकोचा जरा माझ्या बद्दलच विश्वास डळमळीत होऊ लागला होता. पण विश्रांती घेतल्यावर मी ओके झालो. ती ओकेच होती. सूनबाई प्रॅक्टिस करताना पडल्या होत्या पण त्याही बर्‍या झाल्या. बायको आधीच लंडनला पोचली होती. आमच्या टीम मधले तीन मेंबर्स स्पर्धेच्या रस्त्यावरील शेवटचे २० किमी चालून आले. त्यात त्यांना शोध लागला शेवटच्या १० किमी मधे तीन मोठे डोंगर आहेत. माहितीपत्रकात ही माहिती होती पण त्याचा सिग्निफिकन्स तिथे गेल्यावरच कळला. बर ही माहिती या मंडळींनी माझ्यापासून लपवून ठेवली.
start_0.jpg
स्पर्धेच्या आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी गॅटविक जवळील एका हॉटेल मधे थांबलो. सकाळी पाचला उठुन ०६१५ पर्यंत स्पर्धेच्या सुरुवातीच्या ठिकाणी उबर करून पोचलो. टुली फार्म म्हणून एक जागा होती. एका हिरव्यागार माळरानावर छान तंबू उभारला होता. जे मंडळी १०० किमी करणार होती त्यांच्यासाठी कँपिंगसाठीचे तंबू होते. रजिस्ट्रेशन वगैरे होऊन एकदाची ०६४० वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. सकाळी थंडी होती. एकदा चालायला सुरुवात केल्यावर मात्र थंडी जाणवली नाही. सुरुवातीला आम्ही एकत्रच होतो. पण नंतर आपापल्या पेसने चालायला लागलो. मुलाच्या आणि आईच्या प्रेमळ गप्प्पा चालू होत्या. आईच्या मते मुलगा सेटल झालाय, तर त्याच्यामते अजून खूप वेळ आहे. आता हा विषय अजून १०० किमी ही पुरेल हे माहित असल्याने मी मात्र माझ्या चालण्याकडे लक्ष देत होतो. येवढे अंतर होते वाटेत हजार ठिकाणी वळायचे होते. पण दिशादर्शक बाण मोक्याच्या जागी योग्य ठिकाणी ईतके व्यवस्थित लावले होते की कुणालाही काहिही विचारायची गरजच पडली नाही.
IMG-20190526-WA0032.jpg

११ किमी नंतर पहिला स्टॉप आला. २४ किमीला दुसरा. तोपर्यंत प्रॅक्टीस असल्याने व पुण्याच्या उन्हाळ्यात तयारी केल्याने तिथे फारसा त्रास झाला नाही. नंतर मात्र पाय बोलायला लागले. दुसर्‍या स्टॉपला मोठा मुलगा आम्हाला प्रोत्साहन द्यायला आमच्या बरोबर सामिल झाला. त्यांना माझी जास्त काळजी होती. आईच्या फिटनेस बद्दल शंका नव्हती. शेवटी दोघे माझ्या मागे पुढेच चालत होते. (मला काही झाल असत तर त्यांनी मला कावडीत सुद्धा न्यायला कमी केल नसत ) . ३२ किमी नंतर मात्र अगदी खूप कसोटी लागली. माझ्या एका मॅराथॉन करणार्‍या मित्राने सांगितलेच होते. एकदा का तू ३० च्या वर गेलास की जिंकलास. नंतर फक्त मानसिक बळाच्या जोरावर पुढे जायचे. त्याने अजून एक टीप दिली होती. पावल टाकताना कसलाही जप करायचा किंवा गाणी ऐकायची. जपाची ट्रीक बायकोनेही आधी वापरली होती. मी पण थोडे किलोमिटर जप करून पावले टाकत होतो. शेवटी डोंगर (टेकड्या) चढताना मराठी गाणी लावली. शेवटच्या १० किमी मधे तीन डोंगर होते. तिथे मात्र फारच कस लागला. केवळ मनाचा निर्धार आणि आमची एकत्र टीम या जोरावरच स्पर्धा पूर्ण करू शकलो.
IMG-20190611-WA0183.jpg

स्पर्धेचा शेवटचा भाग मात्र अगदी स्पप्नवत होता. शेवटचे ३ किमी रेस कोर्स च्या जवळून वाट होती. पायाखाली सगळीकडे हिरवागार गालिचा. संध्याकाळची वेळ. कडाक्याची थंडी. बोचणारा गार वारा. प्रचंड धुके आणि त्यातून लुकलूकणारे फिनिश लाईनचे दिवे. मुलगा आणि सूनबाई आमच्या आधी अर्धा तास पोचले होते. आम्ही १३ तासांनंतर दोन्ही बाजूला होणार्‍या टाळ्यांच्या गजरात विजेत्याच्या थाटात फिनिश लाईन क्रॉस केली. तेंव्हा मला हॅमिलटनला फिनिश लाईन क्रॉस करताना जसा आनंद होत असेल तसाच किंबहुना जास्तच झाला.

Finish_0.jpg
आम्ही कुटुंबातील चौघांनिही एकमेकांना साथ देत एक अवघड आव्हान पूर्ण केले होते, जे मी कधी स्पप्नातही कल्पिले नव्हते.
IMG-20190527-WA0027_0.jpg

अपूर्ण - फोटो टाकतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! अभिनंदन
अजून तपशील वाचायला आवडतील>> हो ना.. ४४ असा मधलाच आकडा का ?

अरे वा भारी आहे. अभिनंदन. आधीपेक्षा आत्ता वाचायला जास्त मजा आली.

>>मुलाच्या आणि आईच्या प्रेमळ गप्प्पा चालू होत्या. आईच्या मते मुलगा सेटल झालाय, तर त्याच्यामते अजून खूप वेळ आहे. आता हा विषय अजून १०० किमी ही पुरेल हे माहित असल्याने मी मात्र माझ्या चालण्याकडे लक्ष देत होतो. >> Lol

मस्त. हार्दिक अभिनंदन विकाका आणि काकू Happy
चालणं हा प्रकार माझ्या अत्यंत आवडीचा. इतकं रिलॅक्सिंग आणखी काही नाही. मला सगळं वर्णन वाचून ही ट्रिप बकेट लिस्ट मध्ये टाकायची इच्छा होतेय.

मस्त!! अभिनंदन तुमचे आणि कुटुंबाचे. ईथे लिहिलेत ते बरे झाले. तुमच्या टीमचा प्रवास वाचून छान वाटले.

अभिनंदन! वाचायलाही मजा आली.
पुण्यात एखाद्या संस्थेनी मनावर घ्यायला पाहिजे.
४४ किमी मॅरेथॉनचं अंतर असतं ना?

वा छान.
आपण शहरातले लोक असं चालतच नाही, लांबलांब चालायची वेळच येत नाही. त्यामुळे साशंक असतो. तुमच्या वयाकडे पाहता आणि सवय नसताना हे कौतुकच आहे.

खुप खुप अभिनंदन.

मी आत्ता कुठे 'मार्गीं'मुळे चालायला लागलीये. नियमितपणे सराव पुढे चालु ठेवायचा प्रयत्न करतीये.

तुमच्या लेखामुळे मला चालत राहण्यासाठी प्रेरणा मिळालीये. Happy

सर्वांचे मनःपूर्वक आभार. सगळे चालते व्हा. Happy चालत रहा हा आशिर्वाद.

म्हणून जॉनी वॉकरची टॅग लाईन मला फार आवडते. Keep Walking.

अनया मॅरॅथॉन थोडी कमी अंतराची असते.

वरदा भारतात पण अश्याच स्पर्धा आयोजीत केल्या जातात.

Pages