मला मायबोलीबद्दल बोलायचं आहे

Submitted by म्याऊ on 16 June, 2019 - 23:14

नमस्कार

म्याऊ हा आयडी माझा तात्पुरता आहे. त्यांमुळे संशोधन करू नये.

मायबोलीची बदलती रूपं मी बघत गेले आहे. अनेक कारणांसाठी मी मायबोलीचा प्रभावी वापर पाहिला. इथे स्त्री वादाबाबत झालेल्या चर्चा वाचल्या. लिंगनिरपेक्षता सारखे अतिशय मार्गदर्शक परिसंवाद वाचले. मी त्यात सहभागही नोंदवला. पुरूषांना इथे बोलतं केलं गेलं. काहींचे कबुलीजबाब आले. मायबोलीला जर आपण सोशल मीडीया समजणार असू तर असा वापर मी कधीही कुठेही पाहिलेला नाही.

भाषाविषयक उपक्रम, गणेशोत्सवाचे उपक्रम आणि दिवाळी अंक हे सर्व मायबोलीच्या यशातले मानाचे तुरे आहेत. हे सर्व मायबोलीचे अधिकृत उपक्रम आहेत. याशिवायही अनेक काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. त्या म्हणजे इथल्या मंडळींनी येऊन एक नाही दोन दोन शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत. माझ्या माहीतीत नसलेले ही अनेक उपक्रम असतील. हे पण मायबोलीचेच यश नाही का ?

इथे संशोधक आहेत. खेळाडू आहेत. सायकलस्वार आहेत. ट्रेकर्स आहेत. अनेक व्यावसायिक आणि छंदी फोटोग्राफर्स आहेत. या सर्वांच्या अनुभवांनी मायबोली समृद्ध होत गेली आहे.

माझ्या माहितीत मायबोली म्हणजे नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती. मी त्याच साठी इथे आले. बाकीचे उपक्रम नंतर समजत गेले. मी कुणाचेही नाव घेण्याचे टाळतेय. पण इथे उत्तमोत्तम कथा, कविता, गझला, ललितं वाचायला मिळायची हे अगदी सत्य आहे. या काळात मला वर्तमानपत्रातले लेख वाचवेनासे झाले होते. कारण नव्या दमाचे साहीत्य मी इथे वाचत होते. मी पण तोडका मोडका प्रयत्न केला. पण तो अगदीच बालीश असल्याने सोडून दिला.

इथे लिहीणा-या मंडळींना खुले आकाश मिळाले. हे नैसर्गिक आहे. त्यांची जागा नव्यांनी घेतली. वाचकांची नवी पिढीही आली.

पुढे पुढे मायबोलीवर काही तरी बिनसत गेले.
कुठून आणि कसे ते सांगता येत नाही. पण साहीत्याचा दर्जा घसरला ही सुरूवात होती कि सदस्यांतली धूसफूस ही सुरूवात हे मला सांगता नाही येणार. मला इथे कारणांच्या मुळाशी जायचे नाही. परिणाम दिसताहेत. त्यावर बोलायचे आहे. कदाचित माझे इथून पुढचे लिखाण चुकीचे असेल, एकांगीही वाटू शकेल. कारण माझ्या चष्म्यातून मी लिहीणार आहे.

- नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही
- नव साहीत्यिकांना मार्गदर्शन करायला कुणालाच वेळ नाही
- साहीत्यिकांचा दर्जा म्हणावा तसा नाही.
- त्यामुळे करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत.
- इतर काही घडत नसल्याने राजकारण, करंट अफेअर्स पुरतीच मायबोली आहे का असे वाटते.
- जर राजकारणावरच्या चर्चांपेक्षा इतर घडामोडींमधे वाढ झाली तर राजकारणाकडे फारसे लक्ष जाणार नाही

हे काही मुद्दे आहेत.
याशिवाय राजकारणाचा चिखल होण्यामागे काही जण सातत्याने फेक आयडीज घेऊन ख-या नावाने लिहीणा-यांवर चिखलफेक करत राहतात. यावर मायबोलीचे कोणतेच धोरण नाही.

मायबोली जर सोशल साईट आहे असे म्हणणे असेल तर युझर्सला समान वागणूक हवी.
मायबोली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे म्हणणे असेल तर त्या पद्धतीचा डिसक्लेमर सदस्यत्व घेताना मिळायला हवा.

अनेकदा सक्रीय सदस्यांचं जे बहुमत आहे त्यापेक्षा वेगळ्या मताची टिंगल करणे किंवा त्याच्यावर तुटून पडणे हे न्याय्य असल्याप्रमाणे मायबोलीचे धोरण असते. अल्पमताचा आदर मायबोलीवर पूर्वी व्हायचा. तो आता होत नाही. मायबोली ही इतर अनेक साईट्सपेक्षा वेगळी होती. पुरोगामी होती याचे असंख्य पुरावे आहेत.

पण ती तशीच राहिलेली आहे का याबद्दल शंका आहेत.
उजव्या विचारसरणीचा वरचष्मा मायबोलीवर जाणवतो. इथे अनेक सभ्य आयडीज फेक आयडीज घेऊन पुरोगाम्यांना त्रास देत राहतात. रॅशनलिस्टना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी मायबोलीचा मुक्तपणे वापर सध्या वाढलेला आहे. उजव्या विचारसरणीचे नसाल तर तिरस्कारयुक्त , द्वेषपूर्ण वागणूक मिळते.

अनेक तटस्थ समजले जाणारे आयडीज देखील उजव्या विचारसरणीला अनुकूल आहेत. त्याचे त्यांना नक्कीच स्वातंत्र्य आहे. पण तसे ते कबूल करत नाहीत. यातले काही राजकारणाच्या धाग्यावर येऊन झाली का चिखलफेक सुरू असे शेरे मारतात आणि फेक आयडीने एका कंपूवर तुटून पडतात. मूळ आयडीने कितीही तटस्थपणाचा आव आणला तरी ही मंडळी आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा राग धरतात. हे दुर्दैवी आहे.

मतभेदांना जागा असावी.
माझ्या पाहण्यात काही जण आले आहेत. ज्यांच्याकडे मी मत मांडले नव्हते तोपर्यंत ते माझ्याशी खूप चांगले होते. यांच्या तोंडून मी ऐकलेल्ञा गोष्टी आहेत. काही लेखक या मंडळींना आवडायचे. पण यातल्या काहींनी आपली राजकीय विचारसरणी स्पष्ट केल्यानंतर त्यांना वाळीत टाकले गेले आहे. तसे एसएमएस पूर्वी जायचे. नंतर व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवर अमूक तमूक ला रिप्लाय देऊ नका असे मेसेजेस येऊ लागले. फेसबुक ग्रुप्स काढूनही तिथे हे उद्योग झाले आहेत.

मी अनेकदा असे मेसेजेस इग्नोर केले. पण अती झाल्यानंतर संबंधितांना फोन करून सांगितले. याचा परिणाम म्हणून मलाही तीच वागणूक मिळाली. याच कारणाने मी मायबोलीवर अनेक वर्षे नव्हते. यावेसेच वाटले नाही. पण इतर ठिकाणीही रमले नाही.

अधून मधून नवे काही दमदार आले आहे का हे बघत राहीले. पण छे !
मध्यंतरी काही दमदार गझलांची सुरूवात झाली. आश्वासक वाटले. पण गझलकारांचा एक कंपू झाला आणि त्याने नको नको केले. रोगापेक्षा उपाय भयंकर झाला.

अजूनही दाद तैंचं काही येत अधून मधून येता राहतं. (तिच नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. खूप आवडती लेखिका आहे ती माझी). तेव्हढ्यासाठी मायबोलीवर उगवून अंतर्धान पावणारे आयडीज पण पाहीलेत. हे माझ्यासारखेच नंतर कुठे तरी गायब होतात. खरेच आम्ही मायबोलीवर वैयक्तिक स्वार्थासाठी येतो. आम्हाला मायबोली सुधारावयाची नाही का ?

पण, आमच्या हाती आहे का हे ?
किंबहुना हे आमचे काम तरी आहे का ? मायबोलीला तसे मनापासून वाटत असेल तर सक्षम लोक आहेत इथे. आपोआप सुधारेल. पण तसे खरेच वाटतेय का कुणाला ?

मायबोलीचे मत म्हणजे कुणाचे मत आहे ? जगभर पसरलेली मायबोली आहे. ५०००० च्या पुढे पोहोचलीय ना संख्या ? (कदाचित मी खूप मागच्या जमान्यात असेन)

मग इथे मूठभरच का सक्रीय ? ही मंडळी नेमकी काय करतात ? एखादी चांगली कथा व्हायरल होते. नावाशिवाय चोरी होते ही सक्रीय न दिसणारे लोक मायबोली वाचतात याची पावतीच नाही का ? या सर्वांना सामील करून घेण्यासाठी काय योजना आहेत ?

मुठभरांच्या आवड निवड बाजूला सारून बहुजनांची आवड लक्षात घेऊन आपल्याला उपक्रम आखता येऊ शकतील का ?

माफ करा. जरा जास्तच बोलले. कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादासाठी ईमेल मधून भिका मागाव्या लागतात तेव्हां कुठे प्रतिसाद येतात>>>>

काहीही.... मला आजवर कुणीही इमेल करून भीक मागितलेली नाही. तरीही मी कित्येक बऱ्या वाईट लिखाणावर हात हात भर लांब प्रतिसाद देत असते, प्रवासात किंवा गाडीसाठी वाट बघताना वगैरेंच्या वेळात.

ज्यांना लिहायचे आहे ते लिहितातच. त्यांना प्रतिसादांशी देणे घेणे नसते.

काहींंना >> प्रतिसादासाठी ईमेल मधून भिका आणाभाका मागाव्या लागतात तेव्हां कुठे प्रतिसाद येतात ?? >>>
अशी वेळ येते?
थोडे प्रतिसाद येऊन धागा जरा बरा दिसल्यावर फेसबुकवर लिंक टाकत असावेत.

फेसबुक / व्हाट्सएप कुठेही लिंक द्या, प्रतिसाद द्यायला मायबोलीचे सदस्य असायला हवे ना.

ईमेल मधे आलेली आठवत नाही. धुंद रवीच्या ब्लॉगची लिंक असायची. पण ती बहुतेक आपोआप येत असावी.

मायबोलीवर धुंद रवी, कौतुक शिरोडकर, दाद, वैभव जोशी, जया एम अशांनी कधी प्रतिसाद द्या म्हणून सांगितल्याचे आठवत नाही. त्यांचे लिखाण आले रे आले की देवळाबाहेर रांग लागते तशी लागायची.

काही जणांच्या बाबतीत वाहत्या पानावर रिक्षा फिरवली जायची. फार तर विपू मधे काही जण रिक्षा फिरवत. अशांना डाफरावे लागायचे.

नमस्कार म्याऊ. मी तुमच्याशी शत प्रतिशत सहमत आहे. इथेच काही मानभावी आयडींनी स्वत: फार साळसूद असल्याचं दाखवत न असलेल्या अकलेचे तारे तोडले आहेत.
मराठी माणसाचा मुर्ख इगो इकडं फार धुडगूस घालत असतो. मी बापडी एक फुकटी पण चोखंदळ वाचक आहे. म्हणून राजकारणाच्या घाणीत कधीच जात नाही.

बोकलत यांची शैली तशीच आहे हे खरंच. पण बोकलत यांना मी भगवा नाही हे समजल्यापासून मी त्यांच्या लाडक्यांच्या यादीत गेल्याचे नुकतेच समजले.
भगवा नाही मग..
काळा, पिवळा,हिरवा,निळा, जांभळा, करडा यांपैकी कोणता आहे?

<गझलांची शीर्षके हा एकमेव भन्नाट टाईमपास आहे. बोंबिल बटाटा पीठ लावून कालवण हे सुद्धा गझलेचे शीर्षक वाटले होते.

(पूर्ण गझल वाचण्याची आवश्यकता नाही )>

अगदी अगदी!!
काय भयाण शिर्षकं एक एक!

गजलांच्या बाबतीत पूर्णपणे सहमत.
काहीतर काहीच्या काही या प्रकारात मोडणाऱ्या गजला येतायेत, आणि नेहमीचे यशस्वी हुकुमी कलाकार त्यांना दादही देतात.

Pages