ए आई सांग ना

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 June, 2019 - 01:27

ए आई सांग ना

ए आई सांग ना
रात्र होताच कसा
सूर्य जातो झोपी ?
भल्या पहाटे उठून
लावतो मला टोपी

बाळा लवकर निजणे
लवकर उठणे
परिपाठ त्याचा रोजचा
तुही उठशील लवकर
जप हा मंत्र आरोग्याचा

ए आई तो तर
जात नाही शाळेत
दिवसभर तरी नुसता
असतो घाम गाळीत

असते मला शाळेशिवाय
इतरही भरपूर काम
सकाळी उन पडेस्तो नको का आराम ?

काळोख पांघरुन तो बुवा
गाढ झोपी जातो
खुट्ट झाले तरी रात्री
मी मात्र भेदरतो

सांगना झोप माझी
कशी पुरी होईल ?
वर्गात डुलकी येते
कशी थांबून जाईल ?

कुशीत झोपतो तू माझ्या
तरी तू कसा भितो ?
सूर्य मात्र रोज रात्री
एकटाच झोपतो

लवकर उठून तो
किलबिल ऐकतो
झ-यासवे खळाळते
गाणे रोज गातो

वा-यासवे धावायची
शर्यतही लावतो
दहीवरल्या गवतात
मस्त लोळून घेतो

फुलांचे अत्तर तो
अंगाला चोळतो
डोंगरात मनसोक्त
भटकंतीही करतो

होतो रोज सकाळी
मस्त ताजातवाना
दिवस त्यांचा का
होईल कंटाळवाणा ?

देतो पूर्वेला सोनेरी झळाळी
तुझ्यासाठी रोज गातो भूपाळी
प्रतिसाद तू जरा बघ देवून
आळस तुझाही जाईल पळून

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्पा, आनंद, गजानन
खूप आभार प्रेरक प्रतिसादाबद्दल....