ठेच

Submitted by Asu on 3 June, 2019 - 22:17

ठेच

ठेच लागते जरी पुढच्याला
मागचा तरी व्हावा शहाणा
शिकण्याची पण करी उपेक्षा
माणसा तू तर अति दिवाणा

डोळे असुनि जगी आंधळा
मार्ग आक्रमिता असे वेंधळा
ठेच लागता कोसे नशिबाला
दोष बिचाऱ्या त्या दगडाला

चूक कुणाची दोष कुणाला
जगण्याचा ना मार्ग चांगला
चुकता चुकता तो शिकतो
दोषी स्वतःला जो मानतो

ठेच असे गतिरोधक वेगाला
वेग वाढताच अपघात घडे
पाहुनि खाली इकडे तिकडे
जगण्याचे आपण घ्यावे धडे

बेभान जो जीवन जगला
ठेच असे ताकीद तयाला
सावरण्या संधी जगण्याला
ना तर आमंत्रण मरण्याला

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
(दि.02.06.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults