काल अचानक बयोचा फोन आला “काका, मी बस स्टॉपवर आहे, न्यायला ये” आणि मला आनंदाचा धक्का बसला. तिचे हे नेहमीचेच आहे. कधी अगोदर फोन करुन येणार नाही. ही बयो म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मुलगी. तिला या नावाने फक्त मी आणि बाबा हाक मारतो. माझ्या आज्जीला आम्ही सगळे बयो म्हणायचो. आज्जीचं दिसनं, सवयी, काही आवडी आणि चक्क काही लकबी सुध्दा हिच्यात आहेत. त्यामुळे मी तिला बयो नावानेच हाक मारतो. या नावाने हाक मारण्यामागे कुठेतरी आज्जीची हळवी आठवणही असतेच. या नावाने तिला हाक मारली की भावाच्या, वहिनीच्या कपाळावर आठ्या पडतात पण मला आणि बयोलाही हे नाव आवडत असल्याने आम्ही कुणाचा फारसा विचार करत नाही. बरं बयोच्या आवडी निवडी सुध्दा अगदी आज्जीसारख्याच आहेत. हिच्या मुळेच वर्षातुन दोनदा घरातील पाटा-वरवंटा, खलबत्ता, वरण शिजवायची तांब्याची तवली या सारख्या गोष्टी तिच्या आज्जीला, म्हणजे माझ्या आईला माळ्यावरुन काढाव्या लागतात. मग सुट्टीभर बयोने पाट्यावर वाटलेल्या मसाल्याच्या भाज्या खायला मिळतात. खलबत्यात कुटलेला कुट टाकलेली खिचडी पानात पडते. मसालाही असा सुरेख वाटते की सहानेवर उगाळलेला गंधही मसाल्यापुढे फिका पडेल. तिला असे अगदी लयीत मसाला वाटताना पाहुन बाबांचे डोळे कैकदा पाणावतात. वहिनीने केस कापले असले तरी बयोने मात्र छान केसांची निगा राखली आहे. कॉलेजला जातानाही सुरेख अंबाडा बांधून जाते. “आमच्या काळात असे नव्हते” असं काही म्हटलं की सगळे कान टवकारुन, डोळे मोठे करुन पहातात पण बयोला मात्र “आमच्या काळातल्याच” गोष्टी आवडतात. त्यामुळे तिचे आणि माझे छान जमते. बयोचे एवढे कौतुक करायचे कारण म्हणजे माझ्या अनेक जिव्हाळ्याच्या गोष्टींमधे ‘आठवडी बाजार’ ही एक गोष्ट आहे, आणि बयोलाही या बाजारात खरेदी करायला किंवा उगाचच निरर्थक भटकायला आवडते. आजची पिढी मॉलमधुन आधुनीक ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करत असताना ही पोरगी माझ्यासोबत बाजारात महिनाभरासाठी शिकेकाई खरेदी करत असते. महिन्याच्या पहिल्या मंगळवारी बयो माझ्याकडे हमखास येते. मग आमची सगळी दुपार बाजारात भटकण्यात जाते. आमच्या सगळ्या घरात मी आणि बयो दोघेच जरा विचित्र आणि काहीसे बंडखोर असल्याने नेहमी बोलणी खातो. पण बाजारात जायचे म्हटले की मग मात्र आम्हा दोघांनाही कुणी विरोध करत नाहीत. विरोध करणे बाजुला उलट बॅग, बास्केट वगैरे हातात आणुन देणे, सुट्टे पैसे वेगळे काढून देणे हे आवर्जुन केले जाते. कारण आम्हा दोघांचे बाजारात जाणे म्हणजे बायकोचे आणि वहिणीचे महिनाभराचे कडधान्य, खडे मसाले, आठ दिवसांच्या भाज्या, किचन टॉवेलसारख्या काही किरकोळ गोष्टींची बेगमी परस्पर आणि क्वालीटीची होते. आणि हे सगळे भावाची घासाघिस न करता अत्यंत स्वस्तात होते. कारण इतके दिवस जात असल्याने बाजारात माझी ‘वट’ आणि बयोची ‘पत’ आहे. तसे बाजारातील भाजीवाल्या मावश्या बायकोलाही ओळखतात पण तिला ट्रिटमेंट मात्र इतर ग्राहकांसारखीच मिळते. मी किंवा बयो सोबत असताना एखादी आज्जी शेतातील डोळे उघडलेले टप्पोरे सिताफळ मागच्या पोत्याखालुन काढून हलक्या हाताने पिशवीत टाकते किंवा दोन चार दिवसांवर एकादशी आलेली असताना एखादी मावशी स्वतःच्या परसातील माती साफ केलेली स्वच्छ रताळी भाजीच्या गड्डीबरोबर हातात सरकवते, तसे बायकोला काही हे त्यांचे प्रेम मिळत नाही. “त्यांचे काय जातेय फुकट द्यायला? लबाड आहेत सगळ्या. इतर वेळी लुटतात तुला त्या. अगदी सोकावल्यात या म्हाताऱ्या” असं म्हणत बायको बाजारात जायचे टाळते आणि पिशव्या माझ्याच गळ्यात येतात. बायकोला हे समजत नाही की हे निखळ प्रेम मिळवायला अगोदर द्यावेही लागते. त्याशिवाय कसा दोन माणसांमधे असा प्रेमाचा पुल बांधला जाईल? अर्थात बयो बाजारात यायला लागल्यापासुन बायकोच्या “ओ बटाटेवाले” “ओ कांदेवाले” अशी भाषा बदलून काका, मावशी अशी झाली आहे सध्या. असो.
तर असा हा माझा आवडता बाजार मी पुण्याच्या ज्या उपनगरात राहतो तेथे अगदी माझ्या घराजवळच अजुनही दर आठवड्याला भरतो. आणि काही खरेदी असो अथवा नसो, मी दोन तास या बाजारात मनसोक्त भटकुन घेतो. त्यात महिन्याचा पहिला आठवडा असेल तर सोबत बयो असतेच. तिच्यामुळे माझी बहुतेक खरेदी मी या आठवड्यासाठी राखुन ठेवतो. मला बाजाराचे एवढे कौतुक वाटत असले तरी मला मॉल अजिबात वर्ज्य नाही. तिकडेही मी रविवारी वगैरे चक्कर मारतो. पायाचे तुकडे पडेपर्यंत सगळे मजले पालथे घालतो. पण मॉलमधे मात्र मी वस्तु पहायला जातो. तंत्रज्ञानाची आवड असल्याने विविध गॅझेटस्, मोबाईल, लॅपटॉप यात मी हरवून जातो. पण बाजारात मात्र मी ‘माणसे’ पहायला जातो. माणसे जोडायला जातो. झपाट्याने बदललेल्या या काळात मी विस वर्षांपुर्वीचे हरवलेले दिवस अनुभवायला बाजारात जातो. या बाजारानेच माझे गेले सात आठ वर्षातले सण मनासारखे साजरे केलेत. पाडव्याच्या दिवशी हातभर काठीला वितभर ग्लास लावून गुढी उभारण्याऐवजी मी आदल्या दिवशी बाजारात जावून चांगला नऊ फुटांचा हिरवागार बांबू घेवून येतो. तो सजवायला हळद आणि कुंकवासोबत या बाजारातुन मी गोपीचंदाची मोठी गंधगुळी आणतो. या बाजाराच्या शेजारी असलेल्या मोठ्या लिंबाच्या झाडावरुन तेथल्याच कुणाकडून तरी चांगली फुलारलेली डहाळी आणतो. बाजुच्या रानात असलेल्या गोठ्यातुन दोन दिवस अगोदर सांगुन ठेवलेले दुध आणुन त्याचे दही लावतो व पाडव्याच्या आदल्या रात्री बेसीनवर त्याची पुरचूंडी लटकवतो. या बाजाराच्या चारही बाजुला अनेक आधुनिक सोसायट्या उभ्या आहेत. जिम, स्विमिंगपुल असलेल्या या अजस्र सोसायट्यांचा या बाजाराशी तसा काही संबंध येत नाही. कारण एक तर बहुतेक सोसायट्यांधे त्यांचे भाजीवाले रोज सकाळी दोन-तिन तासांसाठी स्टॉल्स लावतात. तसेच या सोसायट्यांना हवे असलेले मश्रुम, ब्रोकोली, बेबी कॉर्न, पनिर, टोफू या सारख्या गोष्टी या बाजारात मिळत नाहीत. तसे असले तरी या सोसाट्यांनाही वर्षातुन काही वेळा या बाजाराची आठवण येतेच. दिवाळी, गणपती या दिवसात लागणाऱ्या अनेक गोष्टी या बाजारातच मिळतात. दिवाळीला पुजेसाठी लागणारी झाडू, गणपतीमधे लागणारी पाच प्रकारची पाने, दुर्वा, जन्माष्टीमीला लागणारी हंडी, संक्रांतिला लागणारे सर्व साहित्य हे याच बाजारात मिळते. अशा गोष्टींसाठी मॉल कुचकामी ठरतात. दिवाळीत छाप वापरुन बनवलेल्या अत्यंत आकर्षक आणि सुबक सिमेंटच्या पणत्या घेण्यापेक्षा येथे कुंभारांनी बनवलेल्या गोल गरगरीत, साध्या मातिच्या पणत्या घेण्यात खरी मजा येते. दिवाळी किंवा जो काही सण असेल त्याचा उत्साह येथे आठ दिवस अगोदरच जाणवायला जातो.
चारी बाजुने आधुनिक सोसायट्या असल्या तरी दोन्हीकडच्या आयुष्यांमधे मात्र जमिन-अस्मानाइतका फरक असतो. हा बाजार म्हणजे एक स्वतंत्र आणि स्वयंपुर्ण संस्था असते. यांचे व्यवहार पुर्ण वेगळे असतात. यांच्या आयुष्यातील प्राथमिकता या आपल्या कल्पनेपलीकडे असतात. आठ दिवसातुन एकदा भरणाऱ्या या बाजारात पंचक्रोशितुन माणसे येतात. त्यांच्या अडचणी, आनंद, गरजा या अगदी वेगळ्या असतात. नविन लग्न झालेली एखादी सुनबाई आपल्या संसाराची सुरवात या बाजारातुनच करते. पहिली भाग्याची खरेदी असते कुंकवाचा करंडा, हातभर बांगड्या, लक्ष्मी म्हणून झाडू आणि धान्यासाठी सुप तसेच भाकरीसाठी टोपले हे अत्यंत श्रध्देने घेतले जात. त्याबरोबर, पाटा-वरवंटा, लहान मोठी भांडीही येथेच खरेदी केली जातात. असे नविन दांपत्य जेंव्हा वरिल गोष्टींची खरेदी करत असते तेंव्हा त्यांच्या डोळ्यामधली स्वप्ने, चेहऱ्यावरचा आनंद इतका मोहक असतो की त्यांच्याकडे नुसते पाहुन देखील त्यातले दोन चार तुषार आपल्यावर उडाल्याखेरीज राहत नाही. कुणी शेतकऱ्याचा पोरगा पाठीवर पटक्याचा शेमला सोडुन अगदी मस्तीत बाजारात हिंडत असतो. आपल्या बैलजोडीला नजर लागू नये म्हणून काळी विण खरेदी करताना, गळ्यातल्या घुंगुरमाळा निवडताना किंवा शिंगांना लावायच्या पितळी शेंब्या खरेदी करताना आपल्या कोपरीतल्या पैशाचा हिशोब करत असतो. एक तर त्याला आवडलेली घुंगुरमाळ त्याने दोन आठवड्यापुर्वीच निवडून ठेवलेली असते. आता घासाघिस करुन ती योग्य दरात कशी मिळेल याची चिंता त्याच्या डोळ्यात दिसतेच पण अक्कडबाज मिशा राखलेल्या त्याच्या चेहऱ्यावर ती घुंगरे पहाताना अगदी हरखुन गेलेल्या लहान मुलांचा आनंदही असतो. सौदा ठरल्यानंतर, दुकानदाराकडे पाठ करुन चोरखिशातुन सावधगीरीने पैसे काढताना तो मजेदार दिसतो. या बाजाराच्या गल्लीतुन अनेक आयुष्य एकमेकांना स्पर्श न करता वहात असतात.
येथे वस्तुंच्या देवाणघेवानीबरोबर, भावनांची, अडचणींची, सल्ल्याचीही देवाण-घेवाण होत असते. दुपार पर्यंत आणलेला माल विकुन, आठवड्याचे वाणसामान खरेदी करुन या बायाबापड्या बाजाराच्या कडेला असलेल्या दाट लिंबाच्या झाडाखाली विसावतात. या झाडाखाली काय घडत नाही? मी बाजारात फिरुन कंटाळलो की हमखास या झाडाखाली टेकतो. सावलीच्या कडेला हमखास दोन तिन बैलगाड्या सोडलेल्या असतात. उमद्या बैलजोड्या समोरची वैरण चखळत असतात. बुंध्याच्या जवळ मोठमोठ्या सुपांमधे दळण करणाऱ्या मावशा दिसतात. येथेच धान्य घ्यायचे, झाडाखाली गप्पा मारत दळण करायचे आणि जवळच असलेल्या गिरणीतुन पिठ दळून घ्यायचे. बाजार मोडता मोडता परताणाऱ्या बहुतेकांच्या डोक्यावर, सायकलवर आठवड्याभराचे पिठ हमखास दिसते. याच झाडाखाली मी कैक लग्ने जमताना पाहिली आहेत. त्यांच्या याद्या होताना पाहिले आहे. सोयरीक जुळल्यावर चहा आणि चिवडा मागावून कोंडाळे करुन तो संपवताना पाहिले आहे. म्हाताऱ्यांच्या जरबेने काडीमोड होता होता वाचलेले संसार देखील मी येथे पाहिले आहे. एखाद्याचे शेत दुष्काळात अगदीच विस्कटलेले असताना सगळी सोयरी धायरी त्या माणसाला मदत करुन पुन्हा नव्या दमाने उभे करतानाही मी या झाडाच्या सावलीत पाहिले आहेत. नुसतेच पाहिले नाही तर इतके दिवस मी बाजारात जात असल्याने मी यातल्या कित्येकांना नावानिश ओळखतो. त्यामुळे त्यांच्या चहा-चिवड्याच्या पार्टीत मी देखील सहभागी झालो आहे. हट्टाने त्यांच्या चहाचे पैसे दिले आहेत. येथे अजुनही मिठाईच्या नावाखाली लाल गोडीशेव आणि बुंदीचे लाडुच मिळतात. तिखटाच्या नावाखाली भेळ आणि भडंग हाच येथील मुख्य पदार्थ आहे. लक्ष्मीरस्त्यावरच्या एसी दालनात मुलीसाठी लाखाचा दागीना घेणारी आई छानच दिसते पण येथे निंबांच्या थंड सावलीत सासुरवाशीन लेकीला समोर बसवून, गालावर हाताचा मुटका ठेवून तिच्याकडे विस्फारल्या डोळ्यांनी पहात असलेली आई मला जास्त जवळची वाटते. असं म्हणतात की कासवी आपल्या पिलांना नुसत्या नजरेने वाढवते. अशी नजरेने लेकीला चाचपडारी आई पाहिली की कासवीची कथा नक्की खरी असावे हे पटते. नातवंडांसाठी घेतलेला गोडीशेवेचा पुडा मुलीच्या पिशवीत बळेच कोंबताना एखादी आई मला जगातली सगळ्यात श्रीमंत आई वाटते.
या बाजारात मला मॉलमधे न मिळणाऱ्या अनेक गोष्टी मिळतात. सिजनमधे हरबऱ्याच्या पाल्याची भाजी तर मिळतेच पण व्हिस्कीच्या गडद रंगाच्या बाटलीत हरबऱ्यावरचा आम मिळतो. परसातली खास अळूची पाने मिळतात, डिंक मिळतो, बयोसाठी आठवणीने आणलेली मोराची पिसे, साळींदराचे काटे मिळतात, जी शक्यतो कुणी विकत नाही अशी अंड्यावरची कोंबडी मिळते (ऐकायला क्रुर वाटेल काहींना पण अंड्यावरची कोंबडी कापली तर तिच्या पोटात लहान अंड्यांची एक माळ असते, ती खुप चवदार लागते.) या तर वस्तू झाल्या. पण त्यापलीकडे या सरळ साध्या लोकांनी दिलेले प्रेम अगदी समृद्ध करुन जाते. असे प्रेम कुठल्या बाजारात विकत मिळत नाही. एखाद्या आज्जीने खरबरीत हाताने घेतलेल्या आलाबलाची किंमत काय ठरवायची हो?
१. सोसायट्यांच्या मधोमध भरलेला बाजार.
२. बुरुडांसाठी वेगळा बाजार भरतो.
३. बुरुडआळी
४. कासारआळी. येथे बांगड्यांची दुकाने असतात.
५. बांगड्याचा एक फोटो.
७. यांची दुकाने बाजाराच्या एका बाजुला असतात. हे साहेब फक्त आजच्या दिवसांचे पाहुने असणार.
८. अजुन एक फोटो.
९. गावठी अंड्यांच्या नावाखाली बरेचद चहाच्या पान्यात बुडवलेली अंडी मिळतात. पण बाजारात मात्र अगदी खात्रीने चांगली अंडी मिळतात.
१०. जाते हा प्रकार दुर्मिळ झालाय असे आपण म्हणतो पण यांची सर्रास विक्री होते. म्हणजे हा प्रकार गावाकडे अजुनही वापरला जातो.
११. पाटा-वरवंटा अजुनही बाजारात मिळतो.
१२. हा गायी बैलांचा श्रृंगार.
१३. या माळा देखील बैलांसाठीच.
१४. या आहेत एरंडाच्या बिया. यांचे एरंडेल काढतात.
१५. किबोर्डमुळे बियांचा आकार लक्षात येईल.
१६. ही खाऊची दुकाने. स्वच्छता मात्र यथातथाच असते.
१७. उसाचा चरक. या रसाची चव नक्कीच वेगळी लागते.
१८. हायब्रिडच्या या जमान्यात बाजारात मात्र हमखास गावठी धान्ये, डाळी वगैरे मिळतात.
१९. हिरव्या भाज्यांचे ढिग.
२०. कलिंगडांची मोठी आवक.
२१. चिवड्यांचे ढिग.
२२. सुक्या मासळीचा बाजारही एका बाजुला भरतो.
फोटो ठरवून काढले असते तर अजुन चांगले आले असते. उगाच फोटो दिसले म्हणून लेख लिहिला आहे. बाजार ही वाचण्यापेक्षा जवळून अनुभवण्याची गोष्ट आहे हे नक्की.
छान लेख आणि फोटो.
छान लेख आणि फोटो.
मला हे बाजारहाट, जत्रोत्सव वैगेरे फार आवडतात फिरायला.
एखादी सुनबाई आपल्या संसाराची
एखादी सुनबाई आपल्या संसाराची सुरवात या बाजारातुनच करते. पहिली भाग्याची खरेदी असते कुंकवाचा करंडा, हातभर बांगड्या, लक्ष्मी म्हणून झाडू आणि धान्यासाठी सुप तसेच भाकरीसाठी टोपले हे अत्यंत श्रध्देने घेतले जात. >>>> सुरेख वर्णन आणि फोटो.
सगळ्यांचेच खुप धन्यवाद
सगळ्यांचेच खुप धन्यवाद प्रतिसादासाठी!
बाजारात खरच खुप धमाल असते. जसे दिवस बदलतात तशी ती धमाल बदलत जाते. लगीनसराई पहायची तर ती बाजारातच, बैलपोळा पहावा तर तो बाजारातच, सुगी झाल्यानंतरचा शेतकरी पहावा तोही याच बाजारात. आणि एका महत्वाच्या गोष्टीचा लेखात उल्लेख करायला विसरलो. वारी करुन आलेला वारकरी तर आवर्जुन बाजारात पहावा. त्यालाच पांडुरंग समजुन त्याचे भर रस्त्यात दंडवत घालून दर्शन घेणारे लोक दिसतात. आहा हा! भारी असते ते दृष्य.
हे असेच सहज काढलेले काही फोटो
हे असेच सहज काढलेले काही फोटो टाकायचे राहीले होते.



१
२
३ ही एरंडाची बी. जरा जवळून. फोटोत रंग पकडता आले नाहीत. ही चक्क सोनेरी रंगाची असते.
रंगीबेरंगी खाऊ मस्तच आहे शाली
रंगीबेरंगी खाऊ मस्तच आहे शाली.
छान वर्णन
छान वर्णन
निखळ प्रेम मिळवायला अगोदर द्यावेही लागते. त्याशिवाय कसा दोन माणसांमधे असा प्रेमाचा पुल बांधला जाईल --- एकदम पते की बात !
सुंदर लेख व फोटो
सुंदर लेख व फोटो.
९ नंबर फोटो - चहाच्या पान्यात बुडवलेली अंडी.. म्हणजे?
चहाच्या पान्यात बुडवलेली अंडी
चहाच्या पान्यात बुडवलेली अंडी.. म्हणजे?-----
गावठी कोंबडीची अंडी मोस्टली ब्राउनिश असतात आणि आकाराला छोटी असतात. त्यांचा दर नेहमीच्या / इंग्लिश कोंबडीच्या अंडयापेक्षा दुप्पट ते अडीचपट असतो आणि अनेक शहरी व्यापारी चुकीच्या मार्गाने नफा कमावण्यासाठी रेग्युलर अंडी चहाच्या पाण्यात बुचकाळुन त्याला आर्टिफिशल गावठी अंडयासारखा लुक देतात. आणि त्याना काही प्रमाणात गावठी अंडयाच्या स्टॉक मध्ये बेमालूम मिसळत भेसळ करतात.
आठवणी ताज्या झाल्या.
आठवणी ताज्या झाल्या. प्रकाशचित्रा पेक्षा मला या बाजारातल्या भावविश्वाचे केलेले शब्दाकंन खूप, खूप आवडले. खरच या बाजारात आर्थिक उलाढाल होतेच पण त्याबरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे भावना, अडचणी, सल्ले यांची देवाणघेवाण जास्तच होते. काही माणसं घरात सगळं असलं तरी एक दोन वस्तुंसाठी बाजारात येतात. तासंतास कोण भेटेल त्याच्याशी बोलतात. अशाच परगावच्या ओळखी होतात आणि मग उरसाचे, लग्नाचे, अगदी आमरस जेवणाचं आमंत्रणही एकमेकाला केले जाते. सोयरीकी जुळतात.
त्यांच्या छोट्या खरेदीसाठी ते किती प्लान करतात. त्या गोष्टी मिळाल्या की त्यांचे हरखणे. सुख कसं मिळतं हे सहजच सांगून जातात.
प्रकाशचित्रेही छान आहेत. अशी प्रकाशचित्र पुढच्या पिढीसाठी सांस्कृतिक ठेवा ठरतील.
छान लेख आणि फोटो!
छान लेख आणि फोटो!
बाजार ही वाचण्यापेक्षा जवळून
बाजार ही वाचण्यापेक्षा जवळून अनुभवण्याची गोष्ट आहे हे नक्की.
हो. वर्णन मस्त जमवलय. फोटो चांगलेच आहेत.
आयफोन वर इतके सुंदर फोटोज -
आयफोन वर इतके सुंदर फोटोज - मान गाये शालिजी
लेख वाचला नाही, पण फोटो
लेख वाचला नाही, पण फोटो अप्रतिम, खूप छान☺️
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
सगळ्यांचे खुप धन्यवाद!
सगळ्यांचे खुप धन्यवाद!
सुंदर प्र. ची.
सुंदर प्र. ची.
इकडे भुसारी कॉलोनीतही आठवडी
इकडे भुसारी कॉलोनीतही आठवडी बाजार भरतो. त्यात भाजी, फळं ह्याशिवाय पॉपकॉर्न, budhdhi के बाल असं पण काय काय असतं. त्याशिवाय वडापाव ची गाडीही असते.
आठवणी ताज्या झाल्या.
आठवणी ताज्या झाल्या.
चित्रापेक्षा मला या बाजाराचे केलेले शब्दाकंन आवडले.
शालीदा,
शालीदा,
तुमचे सर्वच लेखन अत्यंत वाचनीय असते. काहीतरी चांगले वाचल्याचे समाधान देऊन जाते. तुमची निरीक्ष़णशक्ती आणि ते शब्दबद्ध करण्याची
कला खुप समृद्ध आहे. हा लेख आणि सर्व प्रकाश चित्रे ही खुप सुंदर. तुम्ही म्हंटले आहेच की स्वच्छता मात्र यथातथाच असते तरी वाटले की तो चरकातील ऊसाचा रस कितीही मधुर असला तरी शेजारील सोल लेल्या ऊसावरील माश्या बघितल्यावर तो पिण्यास मन धजावणार नाही.
शालिदा, अप्रतिम!
शालिदा, अप्रतिम!
तुमचं लेखन चित्रदर्शी आहेच पण निरीक्षण अफाट आहे. वाचतांनाच मी मनाने बाजारारातून फिरत होते. प्रकाशचित्रण पाहिल्यावर दृश्य परिणाम झाला तो वेगळाच...फक्त त्या झाडाखालचं कुतूहल राहिलं. एक फोटो हवा होता असं वाटलं. .
धन्यवाद Priyas
धन्यवाद Priyas
उसाच्या रसाबाबत खरे आहे. नाही प्यावा वाटत.
मानसी खुप धन्यवाद!
झाडाखालील एखादा फोटो हवाय खरेतर पण मीच टाळला तो फोटो घ्यायचा. आपण कॅमेरा सरसावला की ती माणसे अवघडून जातात. त्यांच्या गप्पा वगैरे थांबतात. अर्थात त्यांचे क्लोजप आहेत माझ्याकडे. पुढच्यावेळी बाजारात गेलो की तो फोटो नक्की काढेन मी.
शालिदा
शालिदा
तुमचे लेखन , विषय , छायचित्रे सगळंच भारी काम असतं राव !
Apratim lekh ani photohi
Lekh ani photos donhi khup avadle. Ajunhi ha bajar bharto ka?
Pages