ना. धों. !
एक कवि तोहि शेतकरी
मातीत रूजली खोल मुळे
रानांतही लदबदलेली त्यांच्या
कवितेतली मधूर फळे.!
कवि तोवर पांढरपेशे
पुणे मुंबई अन् नाशिकचे
वाटत नव्हते कास्तकरी हे
असतील आपल्याच गांवाचे..!
हरखून गेले भान जेव्हा
झोपडीतला कवी वाचला
हा तर माझा शेजारी जणू
मृदगंधाने लदबदलेला..!
सरस कोण बरे यांच्यामधे
तुलना तयांची करा तरी
बेहोशलेला कविराज खरा
कि गहिवरलेला शेतकरी..!
मृगातल्या सरींनी चिंब
हा माझा आरसाच होता
काट्याकुट्यांच्या वाटेवरचा
आशेचा कवडसाहि होता..!
अनुभवलेले क्षण कितीतरी
कवितेत त्यांच्या पहात गेलो
ठेचाळलोहि आटाआटीने
सोबत यांच्या धुंदही झालो.
इथेच जमला मिलाप ऐसा
सिद्ध हात अन् गोड गळ्याचा
घेऊनी वसा मांडला तयांनी
सवाल बळीच्या जगण्यांचा..!
ऩाहि भूलले सिंहासनीं ते
मोह न चंदेरी दुनियेचा
विसर कधी न पडला त्यांना
करपल्या काळ्या आईचा..!
उदंड साधली किर्ती आणिक
लाभाविण ही प्रेम मिळाले
विश्वव्यापल्या मायबोलीला
पळासखेड्यांतून दूवे मिळाले..!
T. J. Patil