गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

Submitted by 'सिद्धि' on 26 April, 2019 - 06:48

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय."
पण ते शक्य नाही!
किती काही मागे सोडलेले आहे आपण ! आणि किती काही जोडलय ?

' ती खटारा गाडी आणि नदिवरील उडी,
तिखट मीठाची कैरी आणि आजीच्या गोष्टी ऐकण्यात जागलेल्या रात्री,
खळयातील लंगडी, लपाछपी आणि पकडा-पकडी,
शाळेत न जाण्यासाठी केलेले बहाने आणि आईकडून मार खाने,
भातुकलीचा खेळ आणि शुभंकरोती ची वेळ'.
सारं काही निसटून गेल, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.

"प्लुटो कक्षा ओलांडून पुढे निघुन गेला ना तशाच काही गोष्टी आपल्या स्मृतीच्या दुनियेतून बाहेर निघाल्या आहेत! त्यांना उजाळा देउन, स्मृतीत ठेवण्यासाठीच हा पहीला प्रयत्न."

हा भाग कोकणी व इतर महाराष्ट्रातील अश्याच काही साधनां वरती आहे. हि साधने पूर्वी गावोगावी प्रत्येक कुटुंबाकडे वापरात असायची. आता क्वचितच कुठे पहायला मिळतात. अजुन काही वर्षांनंतर समुळ नष्ट होतील असं वाटतं. कालौघात या वस्तू केवळ स्मरणस्मृतीं मध्ये राहिल्या तरी फार झाल. चला तर सुरवातीला करते जात्या पासून.

१) जाते-
धान्य दळून त्याचे बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जातो (जायचा) . जाते वर्तुळाकार गोल दगडाचे असते. त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटी असते. ही खुंटी हाती धरून वरची तळी घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळ्याच्या मध्ये एक छिद्र असते त्यांतून थोडे थोडे धान्य टाकतात. आणि दोन्ही तळ्या एकमेकांनवर घासून धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते.
जात -
जात .jpg

स्त्रिया या जात्यावर धान्य दळत-दळत असताना काल्पनिक गाणी रचतं, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणतात.

"कलपनांचच बघा ना कल्पना ही हवेसारखी असते. जिथे वाट मिळेल तिथे-तिथे जागा व्यापून टाकते."
जसं की या काही काल्पनिक ओव्या....

सरला माझा दळप
सती भरली गंगा
कापुराची आरती
मींया ओवाळी पांडुरंगा ||
सरला माझा दळप
सुप सारीता पलीकडे
सासरी नि माहेरी
राज्य मागते दोनीकडॆ ||
सरला माझा दळप
पीठ काढी मी परातीत
माझ्या त्या गुरुजीचा
नाव घेई मी आरतीत ||

सुंदर माझे जाते ग फिरते बहुत |
ओव्या गाऊ कौतुक तु येरे बा विठ्ठला ||
जीव शीव दोन्ही सुंडे ग प्रपंचाच्या नेटे ग |
लावूनी पाची बोटे तु येरे बा विठ्ठला ||
बारा सोळा घडणी औघ्या त्या कामिणी |
ओव्या गावू बैसूनी येरे बा विठ्ठला ||
सासु आिण सासरा दिर तो तिसरा |
ओव्या गावू भर्तरा तु येरे बा विठ्ठला ||

या ओव्या कित्ती सहजपणे रचल्या गेलेल्या आहेत . जात्या वर दळन करायचं काम फारच कठीण असत. गाण्याने काम करताना थकवा जाणवत नाही, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यांत स्त्रीयांच्या मनातील अनेक भावभावनां व्यक्त झालेले आहेत. बर्याचदा देवांची नावे घेऊन ओवी रचल्या गेलेल्या आहेत, जणु स्त्रीया आपल्या भावभावना देवा समोर व्यक्त करतात. मला वाटतं आज बिझी माणसांच्या युगात भावना व्यक्त करण्याच काम त्या smiley बाईच चांगल करतात ! आणि ओवी चा म्हणाल तर सद्धयातरी 'वापर फक्त मुलींच नाव ठेवण्यासाठीच होतो' (ओवी शिंदे, ओवी देशमुख वैगरे वैगरे).
दुसर म्हणजे बहिणाबाईंच नाव आल की ओवी आठवते.
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'-
बहिणाबाईचे जतन केलेले 'जाते'.jpg

तसं पण तो मिक्सर चालु केल्यावर त्याचाच आवाज नुकता, ओवी काय डोंबलाची सुचणार ?
" जात्यावर बसल्यावर ओवी सुचते ’ अशी म्हण मराठीत प्रचलीत होती, एखादी जबाबदारी स्वीकारली, कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, या अर्थाने ही म्हण असावी."
.
२) पाटा वरवंटा-
पुरणपोळीसाठी डाळीचे पुरण, ओला किंवा सुखा नारळ घालून केलेली चटणी किंवा वाटली डाळ, आंबे डाळ, किंवा इडली-वडय़ासारखे दक्षिणी पदार्थ, मांसाहार किंवा मत्स्याहार करण्यासाठी जो ओला मसाला करावा लागतो आणि देशावर खर्डा वगैरे मसालेदार पदार्थ वाटून तयार करण्यासाठी पाटा-वरवंटा उपयोगी पडतो.
पाटा वरवंटा-
varvanta-pata_0.jpg

"आमच्या कोकणात नारळ विपुल प्रमाणात असल्यामुळे ओल् खोबऱ जणू स्वयंपाचा राजा" जेवणात नारळ नसेल तर जेवणाची सभा रुचकर असुनही आमच्यासाठी व्यर्थच. मग घरी नारळ वाटायला पाटा नसेल तर कसं चालणार??

माझ्या आठवणीप्रमाने पुर्वी दुपारच्या वामकुक्षी वर टाकी ( टाकी घालने म्हणजे घाव/घाला घालने अशी म्हण आहे ना) घालायला काही बायका यायच्या....'मध घ्याव मध, टिकली..य, बांगडी..य,फणी..य,पाटय़ाला.. टाकीय'.असं काही-बाई बोलायच्या. ज्यांच्या घरातील पाट्याला टाकी लावून घ्यायची असेल त्या बायका त्यांच्याकडे घरातील पाटा-वरवंटयाला टाकी लावुन घेत असत.
आणि हो पाट्या वरिल वाटपाच जेवण एकदा तरी खाव, त्याची चव आयुष्यात विसरणार नाही.
.
३) खलबत्ता-
खलबत्ता हा साधारण दगडी किवा अनेकदा धातुचाही असतो. यात एक दगडाचे उभट आकाराचे भांडे असते. आणि एक दगडी दंडगोलाकार काठी असते.
लोखंडी खलबत्ता -
लोखंडी खलबत्ता .jpg

सरण बारीक करण्यासाठी तुम्ब्याचा वापर केला जातो. एखादे मिश्रण तयार करण्यासाठी याचा वापर होतो. खलबत्ता हा पदार्थ बारीक कुटण्यासाठी वापरला जात होता. प्राचीन काळी औषधी-वनस्पती वाटण्यासाठी वापर होत असे. अजूनही गावामध्ये खलबत्ता वापरला जातो. आसडणे, भाजणे, परतणे, पीठ करणे, कुटणे किंवा वाटणे इत्यादी. त्यातील कुटणे ह्य संस्कारासाठी खलबत्त्याचा वापर स्वयंपाकघरात, मिक्सर येण्यापूर्वी बहुतेक ठिकाणी केला जात होता.
दगडी खलबत्ता-
दगडी खलबत्ता.jpg

खलबत्त्यातील खल म्हणजे लोखंडाचे कडा नसलेले एक लहान आकाराचे पातेले. आणि त्यासोबत एक चांगला वजनदार आपल्या मुठीत पकडता येईल असा साधारण फूटभर लांब असा दंडगोलाकृती लोखंडी दस्ता म्हणजे बत्ता. थोडक्यात बत्ता म्हणजे पितळीच जड दोडा ज्याने वस्तू कुटता येईल. त्याची एक बाजू पहारीच्या टोकासारखी पण अणकुचीदार नव्हे, अशी दोन्ही बाजूंनी निमुळती पण बोथट केलेली असते. खलबत्ता लोखंडी, दगडी तर काही प्रमाणात लाकडाच्या पाहूनही बनवला जातो, हे सगळ मजबूतीवर अवलंबून असतं.
अगदी छोट्या प्रमाणावर म्हणजे चहासाठी आलं किंवा फोडणीसाठी मिरच्या कुटणे वगैरे अशा कामापुरते हे यंत्र वापरले जायचे.
विशेषतः कोकणात कोणाच भांडणं वैगरे झाल तर 'खलबत्त्यात घालून ठेसू' असा वाक्यप्रयोग केला जातो. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, पण मरेपर्यंत मारू असा काहीसा अर्थ आहे. म्हणजेच मरेपर्यंत (चिजा/ धाण्य आपल्याला पाहिजे तेवढ बारीक होई पर्यंत) कुंटण्याच काम हे खलबत्त्याच. (कधिही न ऐकणार्याला शब्द थोडे विचित्र वाटतील )
नारायण पुरी, ता.लोहा, जि. नान्देड यानच एक छानस गाण आहे खलबत्त्यावर. एक-एक शब्द अफलतुन. मज्ज्या येते ऐकायला.
youtube Link https://www.youtube.com/watch?v=qoKLcEecVvU
"प्रेमाचा झांगडगुत्ता गं , जीव झाला हा खलबत्ता गं .
उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं "

.
४) उखळ- मुसळ-
उखळ ही विविध प्रकारचे धान्य व शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनविलेली वस्तू आहे. ही कठीण दगडापासून बनवली जाते. दगडाला खोलगट आकार दिला जातो. धान्य कुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो. उखळ या शब्दावरून अनेक वाकप्रचार व म्हणीही निर्माण झाल्या आहेत.
उखळ-मुसळ पासुन प्रचलीत काही वाक्यप्रचार –
उखळ पांढरं झालं-खूप पैसा मिळणे, अवघें मुसळ केरांत- अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणें .

धान्य कांडले/सडणे तांदूळ ,तीळ ई. कुटणे यासाठी मजघरात दणकट लाकडाचे एक उखळ असे.
पूर्वी घरातील बायका दुपारच्यावेळी बेगमीची कामे करत असत. चटण्या, पापड, पापड्या, कुरडया इत्यादी गोष्टी घरीच केल्या जात. उखळ, धान्य सडण्यासाठी वापरले जात असे. गहू यात सडले जात. चटणीसाठी दाणे दगडी उखळात कुटत असत. त्या कुटलेल्या दण्याच्या चटणीची चव व मिक्सरमधल्या चटणीची चव यात फरक आहे. उखळातली चटणी चविष्ट लागते. उखळाचे बरेच प्रकार आहेत. जमिनीत पुरलेले उखळ, आणि एक जमिनीच्या वर उभे उखळ असे. त्याला उखळी म्हणत. जमिनीत पुरलेले उखळ तांदूळ सडण्यासाठी वापरले जात असे. एकत्र कुटुंबामुळे जे काय करायचे ते जास्तप्रमाणात करावे लागे. त्यामुळे उखळ मुसळ पण ब-यापैकी मोठे असे.
हे यंत्र मोठे असून दगडी किंवा लाकडी असायचं. मोठे कमरेच्या उंचीचे उखळ हे खोलगट बादलीप्रमाणे असून त्यात कुटण्यासाठी एक लांब दांडा म्हणजेच मुसळ वापरले जात असे. यात लाल मिरची कुटून मसाला करणे, पोहे कांडणे वा भात कांडणे अशा क्रिया केल्या जात.
उखळ- मुसळ-
लाकडी उखळ-मुसळ.jpg
.
५) व्हाईन / वायन -
हे ट्विटरने काढलेले व्हाईन हे लूप व्हिडीओ शेअरिंग अॅप नाही हा किवा जॉर्जियात सापडलेली 8000 वर्षं जुनी वाईन सुद्धा नाही. ही वेगळी आहे. विशेषत: कोकणात घरातच जमिनीत एक गोलाकार खड्डा करून त्यात घराच्या वापरापुरत्या थोड्या गोष्टी कुटण्यासाठी याचा वापर केला जाई . पुर्वी कोकणातील प्रत्येक घरामध्ये लाकडी किंवा दगडी व्हाईन असायची. व्हाईन किवा वायन असाही उच्चार करतात.
व्हायनात कुटण्यासाठी मुसळीचा उपयोग केला जायचा आणि त्याची माहिती वरती आलेली आहे.
व्हाईन / वायन-
व्हाईन-वायन .jpg
.
६) कणवा/ कणगी/डालगे-
पुर्वी भात ठेवण्यासाठी पिशव्यांचा उपयोग न करता बांबूच्या बेळांपासून तयार करण्यात आलेल्या कणगीचा वापर केला जात असे. ही कणग टोपलीप्रमाणे परंतु पाच ते सहा फूट उंच असते. पश्चिम महाराष्ट्रात याच कणवाला डालगे म्हटले जाते. आता प्लास्टिकच्या पिशव्या स्वस्त मिळतात. तसेच या कणगी तयार करणे आता बंद झाले आणि त्यांची किंमत सुद्धा प्लास्टिकच्या व गोणपटांपेक्षा जास्त असल्यामुळे या कणगीचा वापर करणे बंद झाले. आता कणवाची जागा प्लास्टिकच्या बॅरलने घेतली आहे.
धान्य साठवायच्या मोठ्या म्हणजे जवळपास पुरुषभर आकाराच्या वेताच्या पिंपाला कणगी म्हटलं जातं. एखादा माणुस नक्कीच मावेल एवढा आकार असतो. कणगी हा तर कोकणात हमखास आढळणारा प्रकार .
कोकणात दूध-दुभतं खूप असल्यामुळे अर्थातच शेणाला तोटा नाही. शेणाने सारवलेल्या जमिनीत ही कणगी शेणाच्याच साहायाने पक्की बसवली जाते. आणि तिला बाहेरून शेणाचा लेप दिला जातो. त्यामुळे कणगीची छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किडय़ांपासून धान्याचे संरक्षण होते. कणगीच्या तळाशी गवताचा थर दिलेला असतो. यामुळे आर्द्रता शोषून घेतली जाते आणि धान्य खराब होत नाही.
कणगी-
कणगी.jpg
.
७) डवली/डाव -
नारळाच्या करवंटीला वरून आडवी दोन भोके पाडून त्यामध्ये काठी घालून डवली तयार केली जायची. या डवलीचा उपयोग पूर्वी आमटी वाढण्यासाठी तसेच भात उकडल्यानंतर तो भात टोपलीत टाकण्यासाठी केला जात असे. आता स्टीलच्या विविध आकाराच्या चमच्यांमुळे या डवलीचा उपयोग आता केला जात नाही.
(दुर्दैवाने मला याचा एकही फोटो सापडला नाही, असेल तर क्रुपया पाठवा)
61SYz8_2BOZFL._SL1200_large.jpg
.
८) रोवळी/दुरडी अथवा लहान टोपली -
कडधान्यांना मोड येण्यासाठी ,तांदूळ ,भाजी धुणे इ साठी रोवळी वापरतात.
रोवळी म्हणजे वरती गोल पण तळाशी चौकोनी आकारात विणलेली छोट्या आकाराची उभट बांबूची करंडी.
रोवळी ही लग्नकार्यात सुद्धा वापरली जाते.
रोवळीत धान्य किंवा भाजी धुतली की पाणी जाळीतून आपोआप निथळून जातं आणि आतला पदार्थ सांडतही नाही.
रोवळी-
रोवळी.jpg
बांबू तासून त्याच्या पट्ट्या करून त्या पासून गोलाकार टोपली/ दुरडी तयार करतात. काही भागात टोपलीमध्ये जेवण ठेवण्याची पद्धत होती भाकरी सुद्धा ठेवली जाते .
टोपली-
दुरडी अथवा लहान टोपली.png
उस्मानाबादच्या आठवडी बाजारात दुरड्या विकणारी बुरुड समाजाची अनेक दुकाने आजही आहेत, तशी ती कोकणात ही काही प्रमानात सापडतात .
.
९) सुप-
सुप हा रोवळीची चा जोडीदार आहे. सुपाचा वापर धान्य निवडाण्यासाठी,पाखडण्यासाठी करतात.
सुफ आजही वापरात आहे पण पण थोड मोडर्न झालय, बांबूची जागा आता प्लास्टिक, स्टिल ई ने घेतली आहे.
सुप-
download.jpeg
.
१०) हारे-
हारे म्हणजे मोठ्ठ्या आकाराच्या टोपल्या, यांचा वापर फुलं, पालापाचोळा, शेण तत्सम वस्तू भरण्यासाठी केला जातो.
धान्य साठविण्यासाठी हारे.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! मस्तच !चांगलं लिहिलंय .
मी /आपण या सगळ्या गोष्टी अगदी जवळून पहिल्या / हाताळल्या आहेत म्हणून खरंच नशीबवान आहोत असं वाटतं कधी कधी !! वाईट हि वाटत कि कालौघात प्रगतीसाठी /सोय म्हणून काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
मला वाटतंय मागे जागुताई किंवा मनीमोहोर यांच्यापैकी कोणीतरी अश्या वस्तूंवर लिहिलंय .. लिंक मिळाली तर देते

dilipp- धन्यवाद. ईरल,पाट,चूल,रांजण वैगरे सगळ पोस्ट करणार आहे.
ईथे ते मावत नाहीय, लेख क्रमश आहे, पण लाबी मुळे क्रमश हे सुद्धा पोस्ट होत नाहीय.

किट्टु२१-वा सिद्धी मस्त माहीतीपूर्ण लेख. फोटोमुळे चार चाँद लागलेत.
धन्यवाद किट्टु२१

anjali_kool - लिंक मिळाली तर देते
धन्यवाद, नक्की दया मला आवडेल वाचायला.

भारीच!
या यादित अजुन खुप भर पडेल जाणकारांकडुन,

छान माहिती..
पाट्या वरिल वाटपाच जेवण एकदा तरी खाव, त्याची चव आयुष्यात विसरणार नाही>>+11

आमच्याकडे अजुनही पाटा टाचायाला येतात अधेमधे.. पण आमच्या इकडे वरवंटा टाचत नाहीत कारण ते बारशाला पाळण्यात ठेवतात Happy

विशेषतः कोकणात कोणाच भान्डण वैगरे झाल तर 'खलबत्त्यात घालून ठेसू' असा वाक्यप्रयोग केला जातो. >>>>
वायनात घालून कुटीन असं पण म्हणतात. Wink

मस्त लेख, त्या व्हाईनला आम्ही घळ बोलायचो, दगडी घळ होती आईच्या माहेरी, दुपारी आम्ही सगळी पोरं गोट्या खेळायचो त्या घळीचा वापर करून, नंतर लादी आली आणि घळ त्याच्याखाली गुडूप झाली. आजपण आईच्या माहेरी जाणं झालं की नजर नकळत त्या घळीच्या जागी जाते.

अशक्य सुंदर लिहिलंय... इट्स लाईक अ जर्नी टू ओल्ड टाइम!
पुढचा भाग लवकर येऊ द्या, आतुरतेने वाट बघतोय....

शालीदा -धन्यवाद.

@Shraddha -आमच्याकडे अजुनही पाटा टाचायाला येतात अधेमधे.. पण आमच्या इकडे वरवंटा टाचत नाहीत कारण ते बारशाला पाळण्यात ठेवतात .
"आमच्याकडे पण काही ठीकाणी बारशाला वरवंटा आधी पाळण्यात ठेवतात मग तो काढुन बाळाला पाळण्यात ठेवतात."

किट्टु२१- विशेषतः कोकणात कोणाच भान्डण वैगरे झाल तर 'खलबत्त्यात घालून ठेसू' असा वाक्यप्रयोग केला जातो. >>>>
वायनात घालून कुटीन असं पण म्हणतात.
- हो असा शब्दप्रयोग ऐकलाय मी.

बोकलत- धन्यवाद .

_K_ -हीच का डवली?
-होय हीच डवली आहे, शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद .

अज्ञातवासी-अशक्य सुंदर लिहिलंय... इट्स लाईक अ जर्नी टू ओल्ड टाइम!
पुढचा भाग लवकर येऊ द्या, आतुरतेने वाट बघतोय....
- धन्यवाद, लवकरच पुढचा भाग टाकते.

हे सर्व सर्व पाहिलेली माझी पिढी शेवटाली
माझ्या मुलीला असलं काही अनुभवायला मिळेल याची सुतराम शक्यता नाही

छान संकल्पना आणि संकलन!
लिखाण क्रमशः आहे म्हणून एक सुचवतो-
प्रत्येक भागाची एक मूळ संकल्पना ठरवून त्याप्रमाणे कैटेगरी आखुन घेतल्यास अधिक प्रभावी होईल. जसे की १ भाग निव्वळ ओळख आणि त्या साधनांचे महत्व अधोरेखित करणाऱ्या बाबी ( गुण वैशिष्ट आणि शास्त्रीय आधार ) ज्यास आता पुढील पीढ़ी मुकणार आहे तसेच प्रांतनिहाय उपलब्ध संसाधन वापरण्याची सामाजिक कल्पकता.

नंतर भाग २ म्हणजे फक्त स्टोरिंग कंटेनर्स
भाग ३ प्रत्यक्ष पाककृति संबधित गोष्टी

प्रत्येक भाग हां अनेक ठिकाणच्या माहितीचे संकलन असले तरी लेखकाचे वैयक्तिक मतप्रदर्शन आणि अनुभवाचे बोल ह्याने लेखाची सांगता असा काहीसा प्रकार अधिक रोचक वाटला असता.
धन्यवाद !

ॲमी-छान.

अनिश्का-हे सर्व सर्व पाहिलेली माझी पिढी शेवटाली
माझ्या मुलीला असलं काही अनुभवायला मिळेल याची सुतराम शक्यता नाही

त्रिनेत्र-सुंदर लिहिलय! यातील बहुतेक गोष्टी लहानपणी घरात होत्या.

देवकी- सुंदर लेख.

- प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.
माझ्या गावी देखील या गोष्टी होत्या....१०-१५ वर्षा पूर्वी.

वीक्ष्य- प्रत्येक भागाची एक मूळ संकल्पना ठरवून त्याप्रमाणे कैटेगरी आखुन घेतल्यास अधिक प्रभावी होईल.
- संकल्पना आवडली, धन्यवाद.

माझी संकल्पना ही अशीच आहे.
हा साधनां वरील १ ला भाग असला तरीही अजूनही काही साधनांची माहिती दुसऱ्या भागात येईल, त्याची सांगता झाल्यानंतर इथेच 'गेले ते दिवस...' पूढे कन्टीन्यू करत अशाच काही जुन्या आठवणी, गोष्टी, वस्तू, जुन्या पाककृती, परंपरा, जुने पोषाख, अलंकार इत्यादी इत्यादी जेवढ शक्य होईल तेवढ जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे मी.

लेखना मध्ये काही सुधारणांची गरज असते तर नक्की कळवा.

जुन्या पाककृती, परंपरा, जुने पोषाख, अलंकार इत्यादी इत्यादी जेवढ शक्य होईल तेवढ जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे +१२३

छान संकलन सिध्दी !
उखळ जमिनीत पुरलेलं दगडी वापरलं आहे. ...
पुभाप्र!

झंपी- रोवळी आणी सुपं मला कोणी बनवून देणारे मिळतील का?
किंवा कोणाला माहिती आहे का ? प्लिज इथे माहिती द्या
- आपल्या राहण्याच ठिकाण समजेल का ???
कारणं गावी कोकणात काही ठिकाणी बाजारात उपलब्ध आहेत पण घरी कोणीही आणुन देणारे नाहीत, तिथेच जाऊन विकत घ्यावं लागतं.

उत्तम लेख.
ओवी विशेष आवडली.
खाली क्रमशः लिहायचं विसरलात तुम्ही.
असो भाग २ लवकर टाका.

"कलपनांचच बघा ना कल्पना ही हवेसारखी असते. जिथे वाट मिळेल तिथे-तिथे जागा व्यापून टाकते."
हे अगदी खरं आहे.

A आदि -खाली क्रमशः लिहायचं विसरलात तुम्ही.
लेख क्रमश आहे, पण लाबी मुळे क्रमश हे सुद्धा पोस्ट होत नाहीय हे कमेन्टस मध्ये लिहिलय.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
भाग २ लवकरच.

ओके 'सिद्धि'.
आधिचे प्रतिसाद वाचले तेव्हा हे लक्षात आल माझ्या.

Pages