मला Writer's Block आलाय. पण वेगळ्या तऱ्हेचा बरं का. लिहायला काही नाही अश्यातली गोष्ट नाही. लिहायला खूप काही आहे. पण खच्चून भरलेल्या पिशवीत गोष्टी एकमेकांत अडकून बसाव्यात तसं सगळं गुंतलंय मनात. अशी पिशवी उघडून आतलं सामान खेचून बाहेर काढताना जी चिडचिड होते तशी चिडचिड होतेय.
का माहिताहे? आजकाल मनातलं हे सगळं बाहेर काढायला भीती वाटायला लागलेय. आपण सांगतोय ते सगळंच सगळ्यांना पटणार नाही हे उघड आहे. पण पटत नसलेलं काही कधीकधी सोडून द्यावं लागतं हेच आताशा कोणाला पटेनासं झालंय. आपल्याला पटलेलं दुसऱ्याला पटलंच पाहिजे. कसं नाही पटत तेच पहातो/पहाते. ‘तुझं चूक बरं का. सगळंच चूक. माझं बरोबर. सगळंच बरोबर. आणि हो, फक्त माझंच बरोबर’ अशी आपल्या सगळ्यांची गत झालेय. अगदी सगळ्यांची. तुमची. माझी. सगळ्यांची.
काय म्हणताय? हे पटत नाहीये का तुम्हाला? तुम्ही अपवाद आहात? नक्की?
------
“तू लहान होतीस ना तेव्हा रोज संध्याकाळी मी तुला घेऊन पार्कवर जायचे. गणेश उद्यानच्या समोरच्या बांधावर बसायचे आणि तू सगळीकडे धावायचीस.”
माझ्या भावाने ‘झालं चालू पुराण’ ह्या अर्थाचा चेहेरा केला. आपण मोठे झालो की आपण लहानपणी कायकाय केलंय ते सांगायची सवय आपल्या आईवडिलांना लागते. हा त्यातलाच प्रकार. मी मोठ्या भक्तिभावाने आईचं पुराण श्रवण करत होते. पण दोन्ही आजीआजोबांसाठी पहिलं नातवंड असल्यामुळे माझे जास्त (किंवा फाजील!) लाड झाले असं भाऊसाहेबांचं ठाम मत असल्याने त्यांना हे पुराण ऐकायला अजिबात आवडत नाही. खरं तर मी चांगली गुटगुटीत होते आणि तो पाप्याचं पितर निपजला हे त्यामागचं मुख्य कारण आहे पण ते त्याला कुठे पटायला?
“शिवाजीमहाराजांच्या स्मारकाच्या पहिल्या ३-४ पायऱ्यांनंतर आत जे छोटं पटांगण आहे ना तिथे तेव्हा जाता यायचं. आता तिथे कुलूप घालून दार बंद केलंय. तुला त्या पायऱ्या चढून आत धावत जायला फार आवडायचं. एकदा अशीच पायऱ्या चढताना तू धडपडलीस आणि पडलीस. डोळ्यांच्या कोपर्यातून मी पाहिलं तेव्हा तू पडता पडता तोल सावरून फतकल मारून बसली होतीस. पण रडं फुटायच्या बेतात होतं. माझ्या जवळ बसलेल्या काही बायका ‘अगबाई, पोरगी पडली वाटतं’ म्हणत उठायच्या तयारीत होत्या. मी त्यांना म्हटलं तिच्याकडे लक्ष देऊ नका, आपली आपण उठेल. जेव्हा कोणी आपल्याला घ्यायला येत नाही असं दिसलं तेव्हा तू स्वत:च उठलीस आणि पुन्हा पायऱ्या चढून गेलीस” आई हसत म्हणाली.
मीही हसले. काही बोलले नाही. पण मनातल्या मनात आईचे शतश: आभार मानले. ‘उंच जिने उपरसे धाडकन पड्या’यचे प्रसंग ‘आयुष्य’ नामक जुगाराने अनेक वेळा आणले. पुढेही आणणार नाही ह्याची खात्री नाही. किंबहुना आणेलच ह्याची मात्र खात्री आहे. पण कोण उठवायला येईल ह्याची वाट न बघता आपणच उठून उभं रहायची शक्ती आपल्यात कुठून येते त्याचं उत्तर मिळालं.
आणखी एक उत्तर मिळालं. मन खूप उदास झालं, काही मनाविरुध्द झालं की मी संधी मिळाली की शिवाजी पार्कात फेरी मारायला जाते. एका अनामिक उर्जेने भरून टाकायची किमया तिथल्या हवेत आहे का मातीत आहे मला माहित नाही. पण ती तिथे आहे हे मात्र नक्की. का ते इतकी वर्षं मला कळत नव्हतं. आता कळतंय.
जेव्हा मी तिथे फेऱ्या मारत असते तेव्हा मी एकटी नसते. माझं बालपण घेऊन शिवाजी पार्क माझ्या सोबत चालत असतं.
---
‘सेंगीलीनीरपट्टू’ मी हा शब्द का उच्चारला ते आता मला आठवत नाही.
‘निळ्या कमळांच्या तळ्याचं चिंगलपुट गाव’ माझा भाऊ टीव्हीवरची नजर न हटवता म्हणाला.
मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहिलं.
‘तुला आठवतंय ते पुस्तक अजून?’
‘फक्त एव्हढंच आठवतंय ग त्यातलं. बाकी काही नाही’
मलाही तेव्हढंच आठवत होतं त्या पुस्तकातलं. पण त्या एका शब्दाने ‘तिळा उघड’ म्हटल्यावर अलिबाबाची गुहा उघडावी तसं शाळेची वार्षिक परीक्षा ज्या दिवशी संपायची तो दिवस तस्साच्या तस्सा समोर उभा केला. शेवटचा पेपर देऊन घरी आलं की भाऊ मित्रांसोबत क्रिकेट खेळायला पळायचा आणि मी आईने परीक्षा होईतो लपवून ठेवलेली चांदोबा, चंपक, किशोर काढून द्यावीत म्हणून तिच्यामागे भुणभुण लावत फिरायचे. मग ती पुस्तकं वाचून संपवेपर्यंत आणखी कश्याचं भान रहायचं नाही.
भावाने टीव्ही म्युट केला आणि मग आम्ही त्या पुस्तकांबद्दल बोलण्यात गुंगून गेलो. काय काय आठवलं आम्हाला - चांदोबातल्या कुठल्याश्या कथेतला पिंगळ नावाचा माणूस आणि भल्लूककेतू नावाचा राक्षस, चंपकमधले चीकू (हा ससा होता), चुंचू (हा उंदीर), डिंकू (हा बेडूक), चीकू उन्हात संत्रं खात बसलेला असतो आणि त्याला एक वाघ खायला येतो तेव्हा तो त्याच्या डोळ्यात संत्र्याच्या सालीचा रस पिळून आपली सुटका करून घेतो ती गोष्ट, कुठल्याश्या भाजीवाल्याच्या ठेल्यात ठेवलेल्या भाज्यांत भांडण होतं तेव्हा हिरव्या मिरचीने टॉमेटोला दिलेली ‘मी तुला कापून काढेन लालू’ ही धमकी (आम्ही ही धमकी लहानपणी एकमेकांना द्यायचो!), त्या भांडणात शेवटी ढेमसं (हे काय असतं ते मला अजूनही माहित नाही!) अंगावर पडून झालेली टॉमेटोची चटणी, ‘काळं भूत’ हे चांदोबामधल्या एका गोष्टीचं नाव (बाकीची गोष्ट काय होती कोणास ठाऊक!).
आमच्या लहानपणी रविवारी संध्याकाळी घराबाहेरच्या रस्त्यावर एक माणूस छोटी छोटी पुस्तकं विकायला घेऊन बसायचा. आम्ही फिरायला बाहेर पडलो की आई आमच्यासाठी २-३ पुस्तकं तरी घ्यायचीच. त्यात एक ‘गाणारा पक्षी’ नावाचं पुस्तक होतं. देशोदेशीच्या परीकथा असलेल्या कुठल्याश्या पुस्तकात एका राज्यात दुष्काळ पडतो तेव्हा एक साधू तिथल्या राजकन्येचे किमती मोती, उंची वस्त्रं आणि तिचे लांबसडक रेशमी केस शेतात पुरायला मागतो आणि मग त्यातून कणसाचं अमाप पीक येतं अशी गोष्ट होती. भारतातल्या छोट्या मुलांच्या साहसकथा असलेल्या पुस्तकात ‘कोट्टायमचा जॉन’ म्हणून एक गोष्ट होती त्यात बहुतेक तो जॉन स्वत:चा जीव धोक्यात घालून फिशप्लेट्स तुटलेल्या रुळावरून गाडी पुढे जाऊ देत नाही. कुठे शिंपल्यात रात्रभर अडकून राहिलेल्या पाण्याच्या थेंबाचा सकाळी झालेला मोती होता तर कुठे युकी नावाच्या जॅपनीज मुलीला कोणा म्हातार्याने दिलेल्या कागदी कंदिलाची आणि कागदी पंख्याची कहाणी होती.
खूप काय काय आठवलं. जाम खुश झाले मी आधी. एखादं अनेक वर्षांपासून न उघडलेलं पुस्तक अचानक हाती लागावं, त्यातल्या एखाद्या पानात जपून ठेवलेलं, कधी कुठल्या रस्त्यावर उचललेलं फूल पुन्हा गवसावं तसं झालं अगदी.
आणि मग आतून खूप भरून आलं. त्या गाणाऱ्या पक्षाचं पुढे काय होतं? तो म्हातारा युकीला त्या गोष्टी का देतो? दोन राजपुत्र आणि त्यांची राजकन्या बहिण ह्यांची बाकीची गोष्ट काय होती? काहीच आठवत नाही. रात्री पडलेलं स्वप्न सकाळी अंधुक आठवावं तश्या ह्या गोष्टी आता अर्ध्यामुर्ध्याच आठवतात.
आणि इथून पुढेही अश्या अर्ध्यामुर्ध्याच आठवत रहातील
----
किती वेळा गेलेय मी ह्या रस्त्यांवरून! पार्कात जाताना, परत येताना, दादरला खरेदीला जातेवेळी, शिवाजी मंदिरला नाटकाला जाताना. पण त्या दिवशी त्या बाईने रस्त्यात थांबवून कुठलीशी सोसायटी कुठे आहे म्हणून विचारलं तर सांगता नाही आलं मला. पुढल्या वेळी सगळ्या बिल्डींग्जवरची नावं नीट निरखून पाहिली तेव्हा ते नाव दिसलं. ओहो, इथे आहे होय ही सोसायटी!
इथून आत उजवीकडे वळणारा हा रस्ता कुठे जातो? इथेही बिल्डींग्ज दिसताहेत. काय आहेत त्यांची नावं? कधी बांधल्या त्या? कोणी बांधल्या असतील? जेव्हा बांधल्या तेव्हापासून तेच लोक तिथे राहत असतील का?
ह्या इथल्या कोपऱ्यावरच्या बिल्डींगमध्ये कोण लोक राहतात? राहतात एव्हढं नक्की. त्यांचे कपडे टांगलेत ना बाल्कनीतल्या दोऱ्यांवर. खाली गाड्या पार्क केल्या आहेत. कुठल्याश्या बाल्कनीच्या एका कोपऱ्यात एक खाकी खोकं मुडपून ठेवलंय. काय विकत आणलं असेल त्यातून? दुसर्या बाल्कनीत लहान मुलांची खेळायची सायकल आणि एक टेडी बेअर दिसतंय. तिसरीत प्लास्टिकचे डबे रचलेत. चौथीत आणखी काही. कुठे शिक्षण झालं असेल ह्यांचं? काय करत असतील उदरनिर्वाहासाठी? ह्यांची सुख-दु:ख काय असतील? ह्यांची स्वप्नं? ह्यांची नावं? कितीदा गेलेय मी इथून. पण मला ह्या लोकांबद्दल काहीच माहित नाही. आणि त्यांना माझ्याबद्दल माहित नाही. मला त्यांच्या बाल्कनीतलं सामान तरी दिसतंय. पण त्यांना मी दिसत असेनच असं नाही. माझ्या घराबाहेरून जाणाऱ्या, अगदी रोज जाणाऱ्या लोकांनाही माझ्याबद्दल काही माहित नाही.
विविधभारतीवर लागणार्या कार्यक्रमात निवेदक कधीही न पाहिलेल्या (आणि कदाचित कधीही पाहण्याची सुतराम शक्यता नसलेल्या!) जागांची आणि तिथून गाण्यांची फर्माईश करणार्या लोकांची नावं सांगतो. 'मालवासे मैथिलीशरण गुप्ता और परिवार, लखनौसे खुशबू और विकास, रांचीसे श्री शशी नेहवाल और श्रीमती कविता नेहवाल, हरियाणासे......'.* तेव्हढा अर्धा एक तास हे लोक आणि मी ती गाणी एकत्र बसून ऐकत असतो. एकमेकांना न बघता. माझ्यासारखेच आणखी काही जण विचार करत असतील - कोण असेल हा मैथिलीशरण गुप्ता? आणि कदाचित तो मैथिलीशरण गुप्ता विचार करत असेल - कोण असेल हा शशी नेहवाल.
हे सगळं माहित करून घेणं अशक्य आहे.
ठाऊक आहे मला.
माहित असणं गरजेचं नाही.
अगदी बरोबर.
अशी माहिती करून घ्यायचा प्रयत्न करणं प्रायव्हसीच्या नियमांना धरून नाही.
हेही ठाऊक आहे.
मग हा काय मूर्खपणा आहे? मूर्खपणा आहे का वाढत्या वयाचा परिणाम आहे? शहरात जन्मून तिथेच लहानाची मोठी झालेली मी. आमचं कुठे गाव नाही. माणसांची फारशी ओढही नाही मला. ‘माणूसघाणेपणा’ हा गुण अंगात पुरेपूर आहे. ‘मै और मेरी तनहाई’ हे शब्द माझ्यासाठीच लिहिले गेलेत जणू. मग उद्या मी ह्या रस्त्यांवरून जायचं बंद केलं तर ज्यांच्या लक्षात येणार नाही अश्या, जे ही जागा सोडून गेले तर मला फरक पडणार नाही अश्या, जिथे कधी जायची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये असल्या सर्वस्वी अनोळखी शहरात राहणार्या ह्या लोकांविषयी ही उत्सुकता का वाटते कधीकधी?
कधीकधी? हो. कधीकधीच. बाकी वेळेस मी आपल्याच तंद्रीत असते इथे. नाकासमोरचा रस्ता धरून चालत. कधीकधी धावत. कधी सामानाचं ओझं घेऊन. कधी विचारांचं. कधी आनंदात. कधी उदास होऊन. कधी उत्साहात. कधी थकूनभागून. तेव्हा नाही दिसत मला बाल्कनीतले लोकांच्या अस्तित्वाचे पुरावे. नाही ऐकायला येत रांचीच्या श्रीमती कविता नेहवालचं नाव. ते कोण, कुठले ह्याबद्दल मला काही देणंघेणं नसतं. ते असले नसले तरी फरक पडत नसतो. एका कळसूत्री बाहुलीला दुसरीबद्दल काय कुतूहल असणार?
दोरी खेचली गेली की आपल्या सगळ्यांना जायचंच आहे. रंगमंचात एव्हढं गुंतून कसं चालेल, नाही का?
----
तुम्ही म्हणत असाल ह्या लेखाच्या सुरुवातीचा उर्वरित लेखाशी काही बादरायण संबंधच नाही की. बरोबर आहे तुमचं. जे होतं ते उरलंसुरलं होतं. सध्या तरी मनात बाकीचं बरंच काही आहे - जे आजूबाजूला घडतंय, डोळ्यांना दिसतंय, कानांना ऐकू येतंय, पेपरातून, टीव्हीवरून, व्हॉटसअॅपवरून मेंदूवर आदळतंय. पण त्याबद्दल मला काय वाटतंय ते नाही लिहू शकणार इथे. कारण त्यावर वैयक्तिक शेरेबाजी आणि शिवराळ भाषा वापरून वाद होतील हे स्वच्छ दिसतंय. विषाची परीक्षा घ्यायची हौस नाहीये मला.
मी शाळेत असताना १०० पानी, २०० पानी वह्या मिळायच्या. मला वाटतं ४० पानांची पण होती एक. तशी ही अर्ध्यामुर्ध्या पन्न्यांची वही शेवटली काही पानं कोरी ठेवून बंद करावी असं वाटतंय आता. आतून जे वाटतंय ते लिहिता आलं नाही तर का लिहायचं माणसाने? ओह, पण कोऱ्या पानांवरच्या न लिहिलेल्या मजकुरावरूनही वाद होतील का? होतीलही कदाचित. पण मग मी असं काही म्हटलंच नाही हा युक्तिवाद करता येईल की मला
मला काय म्हणायचंय ते तुमच्यापर्यंत पोचवायला माझे शब्द अपुरे पडले असतील कदाचित. दुसर्याचे शब्द वापरून बघते.
जुनूंका दौर है किस किसको समझाये
उधर है अक्लके दुष्मन इधर है दीवाने
-----
* नावं काल्पनिक आहेत.
नेहमीप्रमाणेच सुंदर पन्ना.
नेहमीप्रमाणेच सुंदर पन्ना. चंपक , चांदोबाबद्दल वाचून अगदी अगदी झालं. ठकठक, रशियन मासिक ( बहुतेक मिशा नाव होत त्याचं) , जपानी कथांची अनुवादित पुस्तके, आणि अजून बरच काय काय डो ळ्यासमोर उभं राहिलं . लहानपणी लाल डब्यातून प्रवास करायला आई नवीन पुस्तकाच आमिष दाखवायची. आधी बसस्टॅन्डवर चंपक , चांदोबा ख रेदी पार पाडायची आणि मग प्रवास. उतरायचे ठिकाण येईपर्यंत पुस्तक वाचून झाली असायची.
तू खूप तरल लिहीतेस. लिहीत रहा. थांबवू नकोस पन्ने.
छान!
छान!
> आतून जे वाटतंय ते लिहिता आलं नाही तर का लिहायचं माणसाने > स्वतःसाठी लिहायचं. प्रकाशित करायलाच हवं हे जरुरी नाही.
वाह, मस्तच....
वाह, मस्तच....
लिखाण चालू ठेवणे, नविन पन्न्याची मी वाटच पहात असतो...
या वेळचा पन्ना वेगळा वाटला.
या वेळचा पन्ना वेगळा वाटला. स्वतःशीच बोलल्यासारखे..डोक्यातले उलटसुलट विचार कागदावर उतरल्यासारखे..
लिहीत राहा, दर वेळेस काहीतरी वेगळा विचारभुंगा डोक्याला देतेस
रच्याकने, विविधभारती वाचून मला एअर उर्दूवर भेटणाऱ्या खांडवा से तीन बहुये आठवल्या
तुम्ही म्हणत असाल ह्या
तुम्ही म्हणत असाल ह्या लेखाच्या सुरुवातीचा उर्वरित लेखाशी काही बादरायण संबंधच नाही की. >>>तू. सांगेपर्यंत हे जाणवलं देखील नाही.
मनातले कुठले कुठले कप्पे खोलतात तुझे लेख. खोलवर कुठेतरी लपून बसलेल्या कित्तेक आठवणींचा पिंगा सुरू होतो.
लिहीत राहा.
तुला अरे तुरे करतेय आवडलं नसेल तर माफ कर.
वाह! आवडेश
वाह! आवडेश
वेळ घे हवतर पण पन्ने लिहीत रहा
खुप खुप तरल !!!!
खुप खुप तरल !!!!
Submitted by ॲमी on 24 April, 2019 - 14:21
>>>>> + १
सुंदर लिहिलंय.एकुणएक शब्दाला
सुंदर लिहिलंय.एकुणएक शब्दाला तुमच्या भावनांचा परिसस्पर्श झालाय.
तुमची चाहती क्र : 102 पु.ले.शु!
सुंदर लिहिलंय!
सुंदर लिहिलंय!
आशुचँप, सगळ्या पन्न्यांचं
आशुचँप, सगळ्या पन्न्यांचं पीडीएफ बनवावं असं आहे मनात. बघू कधी जमतं ते.
rmd, चैत्रगंधा, अॅमी, पुरंदरे शशांक, साधना, किट्टु२१, कविन, आसा, मन्या ऽ, वावे धन्यवाद
Pages