मनमुराद

Submitted by मुक्ता.... on 20 April, 2019 - 10:30

#कथा
मनमुराद

....आणि तिचं मन इतिहासाची पानं चाळू लागलं.....काही आठवडे झाले होते अलंकार सोसायटीत रहायला येऊन.पण तिचं मन अजून पुरेसं इथे रमलं नव्हतं. तिचं नवीन घर चौथ्या मजल्यावर होतं. गार्डन फेसिंग गॅलरीतून खाली सोसायटीच्या बगिच्यातील परदेशी सायकस आणि इतर रुक्ष झाडं ती पाहत होती.इतरांच्या मते ती डेकोरेटिव होती. तिच्या मते मात्र नाही. हे अमेरिकन ग्रास च लॉन पाहताना तिचं मन जुन्या चाळीतल्या मधल्या चौकोनात मोकळ्या जागी बाकड्यांच्या आसपास वाढलेल्या दुर्वांशी बोलत होते. चाळीच्या जवळ एक महानगर पालिकेच्या नाना नानी बाग होती. तेथे भरपूर खुरट्या गवताची हिरवळ होती।आणि दुर्वा, रानफुले खासच. म्हणायला आंब्याच्या आणि पिंपळाच्या झाडांची सावली थंडावा द्यायला होतीच. त्यांचा सुगंध तिथून येत जात असताना मन मोहुन टाकत असे. आणि वसंत ऋतू आला की पांढरा चाफा आणि लाल चाफा तिकडून पाय हलु देत नसे.
आणि गुलमोहराची टपटप सुरू झाली की त्याची फुलं घरी आणून ती स्टीलच्या ग्लास मध्ये सजवून ठेवत असे. चाळीतल्या त्या दिड खोलीत निटनेटक्या चापून चोपून बसवलेल्या सामानाच्या घरात तिचं एक छोटंसं टेबल होतं. म्हणजे ओन स्पेस,का काय ते.तिथे ती ते ग्लास ठेऊन देई.येता जाता कौतुकाने तिथे पाहत असे. फुलं मरगळली की ती तात्पुरती हिरमुसली होत असे. आणि ती घरात नसताना आई ते भांडे स्वच्छ करून ठेवत असे.मग पुन्हा उद्धवस्त घरटे जसे चिमणी पुन्हा बांधायला घेते तसे डोळे पुसून ती नवी फुल आणून सजवत असे. तिला आपल्या वरच हसू आले.आईचा केव्हढा राग यायचा त्या मलूल फुलांसाठी. फुलं काय आजही आणतो आपण आणि मलूल झाल्यावर आपणच फेकतो. नवी फुलं आणता येतात.पण आईचा सहवास? केसांना मॉलिश करताना तो कपूर घातलेल्या तेलाचा वास, उकळत्या शीकेकाईचा वास आणि आईच्या हाताचा स्पर्श?खसखस केस घासायची आणि टॉवेलने टिपून टिपून पुसल्यावर ,लाल रिबीन घेऊन करकचून दोन वेण्या घालायची. म्हशींची शिंग असं मग दादा चिडवायचा.आणि रिबीन बांधताना आई खसकन खेचायची केस तेव्हा मान वाकडी झाली की पोपटीण म्हणायचा.
आठवणीत ती हरवलेली असताना, अचानक बेल वाजली.ती भानावर आली. आईच्या आठवणीने डबडबले डोळे तिने चटकन ओढणीला पुसले. आणि दार उघडले. सफाईवाली होती.तिला वेस्ट बिन दिली.पाणी लोणी विचारलं. सफाईवाली मावशी म्हटल्यावर कचरेवाली चक्रावली. तिला कुणी असं संबोधलं नव्हतं. तिला ए मावशी अशी म्हणणारी ती पहिलीच असेल. सफाईवाली तिच्याकडे पहात आपलं काम करायला निघून गेली. तिने केस आवरले. अभि नुकताच ऑफिसला पोचला असेल असं म्हणून ती तयार झाली. तडक निघाली स्टेशनकडे. ये अमेरिकन ग्रास, त्याच्यावर उगीचच थुईथुई उडणारी छोटेखानी पाईपमधली कारंजी, पाणी घालणारी..याकडे तिचे लक्ष गेले नाही. तिने गाडी पकडली आणि माटुंग्याला आईकडे आली चाळीत. पुन्हा नाना नानी पार्क दिसले।पण आता गुलमोहर नव्हता. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर तिच्या आठवणींसहित तो ही गेला होता रस्त्यावरच्या लाल फुलांचा रतीबही. तिच्या डोळ्यांच्या कडा हळूवार लालसर झाल्या.

आता बागेजवळची दृश्य वेगळी होती. ती तिकडे दुर्लक्ष्य करून आईकडे आली. आईच्या चंदेरी बटा क्षणभर न्याहळल्या तिने. आता ते कधीकाळी कणखर आणि कडक वाटणारे हात तिच्यावर संस्कार करून मृदू मुलायम झाले होते. गेल्या गेल्या तीने आईच्या ओंजळीत तोंड खुपसले. आणि तिची रीती सुरकूतलेली ओंजळ खाऱ्या पाण्याने भिजवून टाकली.
सगळं आभाळ रिते झाल्यावर तिला जाणीव झाली, अर्थराईटीस असलेल्या आईला आपण गेली पंधरा मिनिटे तसच उभं केलंय. आता आषाढ संपून तिच्या मनात उगाच उन्हाळा दाटला. आई काय ते समजून गेली. जणू लेकीचे अश्रू आईच्या चेतापेशीमार्गे सर्व तिच्या आईपणाकडे घेऊन गेले. ती काहीच बोलली नाही.मग आईनेच सुरुवात आणि शेवट केला.
"एक गुड न्यूज आहे,आपली चाळ रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. मी खूप आनंदात आहे. जोशी काकू,वागळे काकू,नानुमामा,सगळे आधी विरोधात होते अगदी तुझा दादू पण.बाबा असते तर त्यांनी समजावलं असतं सगळयांना.खूप चर्चा,वाद झाले.मग सगळे म्हणाले आज मन्ना भाऊ असते तर त्यांनी काय केलं असतं?मी मग मन्नाभाऊ म्हणजे तुझे बाबा यांचा विचार सांगितला. बदल हा काळाचा महिमा आहे.आणि सृष्टि क्षणाक्षणाला बदलत असते. जुनं जाणार नवीन येणार,आपण का मागे रहा? राहिला प्रश्न संस्कृतीचा तर ती माणसांची आहे वस्तूची आणि वास्तूची नाही.तो वारसा ती ओळख आपण द्यायची असते पुढच्या पिढीला आणि मुभा द्यायची असते ते नवीन जुन्याची सांगड घालून पुढे नेण्याची नाही का? सगळ्यांना पटलं बरं मनी,आणि हा निर्णय झाला."
ती विचारात पडली, आपल्याशी हसली.बाबांच्या स्मितहास्य असलेल्या फोटोकडे पाहिले. आई म्हणाली अगदी त्यांच्यासारखीच दिसतेस हो मन्या!
मनी खुश झाली.आतून बाहेरून.आईला म्हणाली आई पट्कन मेतकूट तूप भात कर. आई म्हणाली हे आता चहाच्या वेळेला? दे ना ग.. आई काही वेळात घेऊन आली.मनी आज मागे मागे किचन मध्ये नाही गेली. विचारात होती.क्षणभर एकदा आपल्या टेबल कडे पाहिलं.आईने मऊभात आणला.मनीने मटमट खाल्ला.त्या चवीने तृप्त झाली. दादूला न भेटता निघाली. पुन्हा येईन म्हणून आईचा निरोप घेतला.
घरी शेअर रिक्षाने न जाता चालत निघाली. आणि वाटेत गुलमोहर दिसला. तिने वेड्यासारखी फुलं गोळा केली झटपट
घरी आल्यावर सोसायटीची नोटीस होती. गणपती उत्सवाच्या मिटिंग ची.
तिने फुलं डायनिंग टेबल वर सजवली. बरोबर तिने पांढऱ्या चाफ्याची काही कलमं विकत आणली होती. सोसायटीत द्यायला.
अभिसाठी डाएट चे ओट्स बनवून ठेवले. म्हणा उपमा पोहे खाऊन तो कंटाळला असेलच ना...जरा नवीन! उद्या मग बनीमावशी बनवायची तसे कोळ पोहे बनविन.अभिला आवडेल.मनाशी एवढी उद्याची तयारी तिने केली. आपल्याशीच हसली.
लगबगीने तयार झाली. सोसायटीच्या गणपती उत्सवाच्या मिटींगला जायला....बाहेर निघताना क्षणभर चाफ्याच्या कलमांकडे पाहिले. आणि गणपतीच्या निमित्ताने सोसायटीच्या गार्डन मध्ये त्यांची प्रतिष्ठापना करायचा मानस तिने मोकळेपणाने बोलायचं ठरवलं. फार काय नाही म्हणतील इतकंच ना!
खाली आली, थोडी लवकरच आली. सगळे येईपर्यंत ती अमेरिकन ग्रासच्या लॉन वर बिना चपलेचे चालण्याचा आनंद घेऊ लागली. तिला खरंच आनंद आतून स्पर्श करत होता.....मनमुराद.....

रोहिणी बेडेकर
20.4.2019

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान कथा.... खूप रिलेट झाल्यासारखी वाटली.... तशी मी कुठल्याही परिस्थितीत लवकर सामावून जाते... रडत बसायला आवडत नाही... पण लहानपणीच्या काही आठवणी आठवल्या की त्या पुन्हा जगाव्याशा वाटतात... Specially सध्या lockdown मध्ये त्यांची खूपच आठवण येतेय... उदा. पेपर मध्ये येणार्‍या जुन्या पुरवण्या मी कितीतरी वर्षं जपून ठेवल्या होत्या.. बरेचदा वाचायची पण... लग्न झाल्यानंतर आईने त्या टाकून दिल्या.. (अर्थात मला विचारूनच) आता त्या पुरवण्यांची खूप आठवण येते..