निळाई

Submitted by मुक्ता.... on 15 April, 2019 - 14:14

निळाई

26 मार्च,कवी ग्रेस यांचा सातवा स्मृतिदिन.संध्याकाळचा हा कवी पश्चिम क्षितिजवरच्या गुढगर्भ शांततेत विलीन झाला.तीन वर्षे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी त्यांनी लढा दिला. अखेर त्यातच मराठी साहित्याला एक दुःखाची कायमची देणगी देऊन ग्रेस हे जग सोडून गेले.
ग्रेस आणि त्यांची कविता एक निराळं समीकरण आहे.पठडीपेक्षा वेगळ्याच त्यांच्या कविता. कवितेतल्या दुःखाला एक लय आहे.गर्द रानाची गूढता आहे. अवकाशाचा सखोल पणा आहे. ग्रेसच्या सगळ्या कविता वाचल्या नाहीत. काही वाचल्या. काही समजल्या नाहीत.कारण एवढी सखोलता आणणार कुठून? ग्रेस च्या कविता माहीत नाही पण अंतर्मुख मात्र करतात. एखाद्याला कुठल्याही रंगाच्या छटा इतक्या परिणामकारक रीतीने कशा शब्दात मांडता येऊ शकतात,त्यातली आध्यात्मिकता इतकी झिरपलेली? त्यांची निळाई पहिल्यांदा वाचली. आणि त्या कवितेने वेड लावले.मिळेल तिथून आणि तसा अर्थ शोधण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. ग्रेस याना अभिप्रेत असलेली सखोलता मला किती समजली माहीत नाही, पण कविता मात्र कायम वेड लावून गेली.
आज ग्रेस च्या स्मृतिदिनानिमित्त ती कविता इथे देतेय. अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करतेय.

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा ?
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेऊन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले
निळे सूर आणि निळी गीतशाळा
निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची
भिजेना परी ही निळी पालखी...
किती खोल आणि किती ओल वक्षी
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे ?
प्राणातले ऊन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे

संध्याकाळ झाली की पश्चिम क्षितिजावर प्रकाशाचा खेळ सुरू होतो. सूर्य जसजसा अस्ताचला कडे झुकतो तसं फिका तरी सतेज आकाशाचा कायापालट होतो. आणि हलका केशरी ते पिवळट शेंदरी अशा अनेक केसरीया छटांमधून आकाश न्हाऊन निघते. पण त्यानंतर येणारी गूढ काळसर निळी छटा मन कातर उदास करून जाते. सर्व काही गडद गडद होताना अगदी देवळाची शिखरे,गाभारा, डोंगर,दर्या पर्वत, समुद्र,नदी, दिमाखात हिरवाई मिरवणारी गवत-झाडे त्या गूढ गडद छटेला धारण करतात. करावेच लागते. सृष्टीचे नियम कुणाला चुकले? आणि अस्तचलावर वासरमणी निवांत होताना त्याची होणारी निळसर छटा आपण कधी नोटीस तरी करू का? असं हे कविमन....निळ्याच्या अनंत छटांना आपल्या संवेदनशील मनाने टिपणे सोपे नाही.
प्राणातले उन प्राणात गेले...सूर्याची उन्हे,यात गर्भितार्थ प्रकाश संश्लेषण क्रिया असावा. कारण उन्हे असतात तेव्हा झाड आपले अन्न तयार करते. आपण सर्व जाणतो हे. म्हणजे आपल्या शरीरात जी प्राणशक्ती आहे ते सुर्याचेच तेज नव्हे काय?
निळी पाखरे, निळे वारे...पुन्हा तेच सत्य...
सत्य स्वीकारणे हाच पर्याय...सृष्टीचे नियम...जो उगवलाय त्याला मावळायचे आहेच. जन्माला आला त्याला जायचे आहेच. कुठे ते गूढ आहेच...त्या निळाई सारखे.
ही निळाई वाचताना हिमालयातील गूढता सतत समोर येते. हाक देते. या पर्वतराजीत अनेक छायाप्रकाशाचे खेळ सुरू असतात. आणि आदिम शिवाचे स्थान तेच तर आहे. तोही गहिरा निळा.मला तरी ही कविता त्या शिवाला,म्हणजे नुसता देव नव्हे तर रोजच आपल्या निलकोशात सृष्टीला ओढणाऱ्या या तत्वाला साद देते आणि समजून घेते असे वाटते. या निळ्या लेण्याला ग्रेस निळे चंदन अशी उपमा देतात. आणि तरीही हे सत्य.कवींना हे व्याकुळ करत आहे कदाचित.ही कविता अशीच व्यापून टाकते. ग्रेसना इथे शिवत्व तर अभिप्रेत नसेल ना?
फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही या नगण्य व्यक्तीकडून एक छोटी भावांजली.....

जसराज जोशी यांनी हे गाणे अप्रतिम गायले आणि संगीतबद्ध केले आहे.लिंक देतेय,नक्की ऐका.परिणामकारक आहे.
https://youtu.be/43jU84Ky5lQ

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
पण ग्रेस यांची रचना गूढतेचं वलय घेऊन यायची, तसा त्यांच्या रचनेवरचा लेखही गूढ आणि स्पष्ट सांगायला गेलं अवजड असायला हवाच असा अट्टाहास कशाला?
सोप्या शब्दांत जर उलगडता आलं असतं तर अधिक वाचनीय आणि समजून घेता आलं असतं हे माझं वैयक्तिक मत.
बाकी शब्दसंपदेला मात्र माझा सलाम!!!

अज्ञातवासी, प्रथमतः तुमच्या प्रतिसादासाठी मनपूर्वक आभार.विवेचन वाचलेत.आपण केलेले टिप्पण मार्गदर्शनपर आहे.अजून एक मार्गदर्शन करावे ,की हा लेख,विवेचन कुठल्या कुठल्या ठिकाणी गूढ वाटले,किंवा अवजड वाटले ते आवर्जून सांगावे म्हणजे त्या ठिकाणी मी बारकाईने पाहीन आणि चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. खूप आभार

@ रोहिणी - ते माझं वैयक्तिक मत आहे, लेख गूढ किंवा अवजड वाटणे म्हणजे त्यात तुमची चूक नाही हो, काहीही गरज नाही दुरुस्ती करायची! Happy
"आणि अस्तचलावर वासरमणी निवांत होताना त्याची होणारी निळसर छटा आपण कधी नोटीस तरी करू का? असं हे कविमन....निळ्याच्या अनंत छटांना आपल्या संवेदनशील मनाने टिपणे सोपे नाही.
प्राणातले उन प्राणात गेले...सूर्याची उन्हे,यात गर्भितार्थ प्रकाश संश्लेषण क्रिया असावा. कारण उन्हे असतात तेव्हा झाड आपले अन्न तयार करते. आपण सर्व जाणतो हे. म्हणजे आपल्या शरीरात जी प्राणशक्ती आहे ते सुर्याचेच तेज नव्हे काय?
निळी पाखरे, निळे वारे...पुन्हा तेच सत्य...
सत्य स्वीकारणे हाच पर्याय...सृष्टीचे नियम...जो उगवलाय त्याला मावळायचे आहेच. जन्माला आला त्याला जायचे आहेच."
हे जरा अवजड आणि गूढ वाटलं एवढंच.
बाकी पुन्हा वाचताना लेख अप्रतिम झालाय हे प्रकर्षाने जाणवलं. थोडा छोटासाच झाला!

अज्ञातवासी,तुम्ही शब्दन शब्द वाचला आहात, एक लेखक म्हणून याव्यतिरिक्त काय हवे असते? मनापासून आनंद वाटलाय याचा.

जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा अनेक रंग दिसतात. केशरी ,पिवळा,गुलाबी. सूर्य जसा जसा अधिक मावळतो तसतसा प्रत्येक रंग निवळतो.नीट निरखत राहिलं.तर काळसर निळा रंग उत्तर संध्याकाळी दिसतो. जो काळोखात विलीन होतो. वस्तुतः रात्रीचा काळोख हाही निळ्याचीच एक गदडतम छटा आहे. मावळणे सूर्याला अपरिहार्य आहे. त्याशिवाय उगवणे नाही।तसेच आयुष्याचे आहे. जन्म आणि मृत्यू असेच पाठशिवणीचा खेळ.
सूर्य उगवतो तेव्हा त्याच्या प्रकाशात झाडे प्रकाशसंश्लेषण करून अन्न तयार करतात. त्यावर पुढली सर्व जैव साखळी अवलंबून असते. आणि सूर्य मावळल्यावर वेगळे जैव चक्र असते.
असा त्या शब्दांचा अर्थ आहे.
मी असे लिहायला हवे होते.

खूप आभार सर्वांचे!
ग्रेस यांच्या कवितांना दुःखाची किनार आहेच.संध्याकाळचे कवी ग्रेस यांनी अनेक विचारात टाकणाऱ्या अप्रतिम कविता लिहिल्या आहेत. त्या वृत्तबद्ध असल्यामुळे साहजिक लय आहे.
निळाई ही कविता मला खूप आवडते. तिचा अर्थ माझ्यापरीने समजण्यास काही महिने लागले.