कोकणातील माणिक ... रातांबे ( कोकम )

Submitted by मनीमोहोर on 12 April, 2019 - 14:59

निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगते ... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही. कोकणात कैरीच्या फोडीना मीठ लावून सुकवतात जी शहरात आंबोशी म्हणून ओळखली जाते त्याना जनरली आमसुलं म्हणतात.

कोकमं एका झाडाच्या फळापासून तयार होत असली तरी त्या फळाला कोकम असं न म्हणता रातांबा असं नाव आहे आणि म्हणून ते झाड ही कोकमाचं नसून सहाजिकच रातांब्याचं असत. आमच्याकडे तर अति जवळीकीच्या हक्काने त्याचं "रातांबीण" असं एखाद्या शेजारणी सारखं स्त्रीलिंगी रूपच करून टाकलं आहे. असो. रातांब्यांवर प्रक्रिया केली की मगच त्याची कोकमं बनतात.

रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण खोट्या अशोकाची वाढतात तशी . आमची झाडं खूप जुनी आहेत. ह्याची पान असतात लांबट, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पात्तळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट , आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी आंबटसरच लागते चवीला. कोकणचं सगळ अर्थकारण आंब्यावर अवलंबून असल्याने आंब्याच्या बागांची एकंदरच खूप काळजी घेतली जाते आणि रातांब्याकडे कोणी लक्ष ही देत नाही वर्षभर. पण निसर्ग आपलं काम चोख बजावत असतो. फेब्रुवारी महिन्यात ह्याला मोहोर येतो आणि मे महिन्यात फळं तयार होतात. झाड उंच असल्याने मोहोर नजरेला पडणं कठीण जातं पण हल्ली आम्ही नवीन लागवड म्हणून रातांब्याची काही कलमं लावली आहेत, ती झाड कलमाची असल्याने जास्त उंच वाढत नाहीत त्यामुळे त्यांचा मोहोर मात्र नीट पहाता येतो.

रातांब्याच झाड ( फोटो नेटवरून )

kokkam 3.JPG

रातांबे तयार झाले की एखाद्या दिवशी त्यांची काढणी केली जाते. काढणी म्हणजे ते सरळ काठीने जमिनीवरच पाडले जातात. आंब्याच्या काढणी सारखे घळ वैगेरे लाड काही रातांब्यांचे केले जात नाहीत. लाले लाल पिकलेल्या रातांब्याचे हारे मागच्या खळ्यात येऊन पडतात. ते आंबट रातांबे खाण्यासाठी पोरांच्या त्यावर उड्या पडतात. रातांब्याची बी दाताला लागली तर दात तात्पुरते पिवळे पडतात म्हणून "बी दाताला लावू नका, जपून खा" असे घरातल्या मोठ्या बायका मुलांना अगदी दरवर्षी नेमाने बजावत असतात.
रातांबे
cWIMG_20160423_114601455_1.jpg

फोडलेली फळं
IMG_20160430_153050941.jpg

रातांबे धुवून पुसून ते फोडायला ( आवळ्याहून थोडं मोठं आणि फार कडक ही नाही खर तर हे फळ , त्याला काय फोडायचंय फणस आणि नारळा सारख? पण तरी कोकणात कोकम कापत / चिरत नाहीत तर फोडतातच. ☺ ) घेतले जातात. सालं आणि बिया वेगळ्या करतात. बिया आणि सालं ठेवलेली ताटं कलती ठेवून त्यांचा रस वेगळा गोळा केला जातो. त्यात काम करायला माझे हात शिवशिवतात पण जास्त वेळ आंबटात हात घातले तर माझी बोट दुखायला लागतात म्हणून ह्या कामात माझा सहभाग मात्र शून्य असतो. रातांब्याच्या सालींना त्या वेगळ्या ठेवलेल्या रसाची त्यात थोडं मीठ घालून सात दिवस सात पुटं चढवून ती उन्हात
खडखडीत वाळवली की मग त्याचं कोकम बनत. चांगली वाळलेली कोकमं घट्ट झाकणाच्या बरणीत ठेवली तर दोन एक वर्ष सहज टिकतात. आंबटपणासाठी कोकणात ह्याचा भरपूर वापर होतो. कुळथाच पिठलं, रोजची आमटी वैगेरे मध्ये कोकणात कोकमाचाच वापर होतो. चिंचेसारखी भिजत घाला मग कोळ काढा अशी कटकट नसल्याने नसल्याने कोकम वापरणं सोपं जातं. श्राध्द पक्षाच्या सैपाकात मीठ, गूळ, जिरं आणि तिखट घातलेली अतिशय चविष्ट अशी कोकमाची चटणी करावीच लागते कोकणात. मात्र इतकी चविष्ट चटणी फक्त श्राध्दाच्या सैपाकतच करतात . एरवी कधी विशेष केली जात नाही.

सुखवत टाकलेली कोकमं

IMG_20190413_153604.jpg

रातांब्यांची सालं आणि साखर एकत्र मिसळून उन्हात ठेवलं की चार आठ दिवसात साखर विरघळून त्याचा अर्क तयार होतो. हा वर्षभर सहज टिकतो. आयत्या वेळी ह्यात पाणी , मीठ आणि थोडी जिऱ्याची पूड मिसळून अवीट गोडीचे सरबत म्हणजेच अमृत कोकम करता येते. ह्याला इतका सुंदर लाल रंग येतो की पाहणारा प्यायच्या आधीच खुश ! आणि जर चांदीच्या पेल्यात वैगेरे दिलं असेल तर मग बघायलाच नको. कोकणात आमच्याकडे कैरीच्या पन्ह्या पेक्षा हेच सरबत अधिक प्रिय आहे. एखाद्या वर्षी घरी कोणाची मुंज वैगेरे करायचं घाटत असलं की मुंजीत सगळ्याना पेय म्हणून हेच दिलं जात आणि मग त्या वर्षी त्या हिशोबाने जास्त करून ठेवतो सरबत. अमृत कोकम करून झाल्यावर सालं उन्हात वाळवून ठेवतो. आंबट गोड चवीची ती सालं मुलांना खूप आवडतात आणि त्याना येता जाता तोंडात टाकायला लागतं तेव्हा देता ही येतात.

हल्ली कोकम आगळ म्हणून अमृत कोकम सारखाच पण बिन साखरेचा अर्क बाजारात मिळतो. तो वापरून नारळाचं दूध घातलेली सोलकढी अगदी पट्कन आणि मस्त होते. पण सोलकढी प्रिय आहे जास्त करून मालवण सावंतवाडी भागात. आमच्या देवगड भागात ती फार केली जात नाही . कधीतरी आठवण झाली आणि मुद्दाम केली तरच होते. आणि आम्ही त्याला सोलकढी न म्हणता सोलांचं सार म्हणतो.

हे सगळं करून झाल्यावर रातांब्याच्या ज्या बिया उरतात त्या धुवून चांगल्या वाळवतात आणि मग त्यांची वरची सालं काढून आतला भाग पाण्यात घालून चांगला उकळवतात थोड्या वेळाने बियांच तेल वर तरंगू लागतं. थंड झालं की ते थिजतं. ते अलगद काढून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवतात. हेच ते कोकम तेल. तो गोळा थोडा विस्तवावर धरायचा आणि वितळलेला भाग थंडीत पाय , ओठ फुटतात त्यावर चोळायचा. ह्या वितळलेल्या तेलाचा एक मंद मस्त वास येतो जो मला खूप आवडतो. पूर्वी मे महिन्यात कोकणातून येतानाच्या आमच्या सामानात हे कोकम तेलाचे गोळे हमखास असत. तेव्हा घरोघरी हेच तेल वापरत थंडीत पण आता जमाना बदललाय, पाच दहा रुपयात व्हॅसलीन ची डबी मिळते विकत म्हणून ह्याला कोणी विचारत नाही.

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी बाहेरून आल्यावर हे सरबत प्यायले तर dehydration कमी होत, उन्हामुळे डोकं दुखत असेल तरी ही बरं वाटत. पित्तावर हे रामबाण औषध आहे. कधी कधी अंगावर पित्ताच्या गांधी उठतात त्यावर जर कोकमं पाण्यात भिजवून ते पाणी हलक्या हाताने चोळलं तर लगेच गुण येतो. कधी तोंडाला रुची नसेल तर थोडी साखर घालून एखाद कोकम चोखलं तरी फायदा होतो. असे अनेक गुण आहेत या कोकमाचे.

सालापासून बियांपर्यंत सगळ्यांचा उपयोग असणाऱ्या ह्या बहुगुणी परंतु दुर्लक्षित अशा रातांब्याची आणि कोकमाची ही कहाणी इथे सफल संपूर्ण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख. लहानपणी केलेली कोकण ट्रिप अजून आठवते. रस्त्यच्या कडेला कितीतरी रातांब्यांची आणि फणसाची झाडं. नुसती लगडलेली. खरच कोकण वैभवशाली आहे अगदी.

सुंदर माहिती. एक गंमत आठवली... पुण्यात आमच्या घराजवळचं एक कोकमाचं झाड दर वर्षी फळांनी लगडायचं. एका वर्षी अचानक फळं धरणं बंद झालं. कारण जवळपासचं आम्हाला माहित नसलेलं झाड कुणीतरी तोडलं होतं. रातांबा /कोकमाच्या झाडांमध्ये मेल - फिमेल वेगवेगळी झाडं असतात.

सगळयांच्या मस्त आठवणी आणि प्रतिसाद. मजा येतेय वाचायला.

, वर्षु, ती मैसूर सॅन्डल ची उपमा अगदीच पटली.

@ वर्षु, देवकी, कोणत्या क्षणी कोणत्याही संबंध नसलेल्या गोष्टी आपल्या डोक्यात क्लिक होऊन प्रकाश पडेल काही सांगता येत नाही.

नरेश माने जी आपलं लॉजिक अगदी पटलं. बरोबर लिहीलय .

हिरा, खूप मस्त लिहीलय. अंजू म्हणते तस मला ही आपले अभ्यास पूर्ण प्रतिसाद खूपच आवडतात. मूळ लेखा पेक्क्षा ही प्रतिसाद उत्तम असच वाटत वाचल की.

हर्पेंन , इतक्या छान प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

माझ्याकडे आत्ता कोकम तेलाचा गोळा नाहीये पण खूप म्हणजे खूपच बघायची इच्छा झालीय असेल easily मिळण्यासारखा तर फोटो तरी दाखवा कुणीतरी.

चंद्रा , मनाला चटका लावणार लिहिलं आहेस.

अंजली मस्त आठवणी लहानपणीच्या. त्या वयात किती ही आंबट खाऊ शकत होतो आता आठवण आली तरी दात आमतात.

मी पण खरं तर सिंधुदुर्ग मधलीच तरी भिरंडा, भिरंडेल, मूटी याल हे शब्द माहीत नाहीत मला.
गौरी, अशीच एक आठवण .. ओळखीच्या एकानी पश्चिम महाराष्ट्रात हौशीने हे झाड लावलं , ते छान जगलं आणि वाढलं ही परंतु फळलं मात्र नाही कारण परिसरात ते एकच कोकमाचं झाड होतं. जवळपास नर झाड नसल्याने ते फळलं नाही.

माझ्याकडे आत्ता कोकम तेलाचा गोळा नाहीये पण खूप म्हणजे खूपच बघायची इच्छा झालीय असेल easily मिळण्यासारखा तर फोटो तरी दाखवा कुणीतरी. >>> हे वाचून मी शोधायले पण गेले पण माझा मिळत नाहीये, मिळाला की नक्की फोटो टाकेन, इझिली वस्तू मिळणारं आमचं घर नाही Wink . मधे लेकाने उचलून कुठेतरी ठेवला म्हणून मी परत नीट ठेवला, नाहीतर तो कुठेही टाकेल म्हणून, पण आत्ता मिळत नाही हे खरं Lol त्यामुळे माझं नीट ठेवणं म्हणजे काय हा अंदाज आला असेल. खरंच आठवत नाहीये.

मूळ लेखा पेक्क्षा ही प्रतिसाद उत्तम असच वाटत वाचल की. >>> मूळ लेख पण उत्तम आहे हेमाताई, या लेखामुळेचं अजून माहिती मिळतेय ना.

मनीमोहोर, तुमचे सगळेच लिखाण अत्यंत वाचनीय असते. आणि मला संस्कृतीच्या बारीक सारीक खुणा जपण्यामध्ये रस असल्याने ते अधिकच आवडते. त्यात लेखांवर प्रतिसादही उत्तमआणि माहितीपूर्ण येतात. इथेही अंजू, साधना, देवकी, झंपी, रश्मी, मीरा, वावे, वर्षू, सिद्धी, किल्ली, ॲमी, अमा, नरेश माने,कारवी आणि इतर सगळ्यांसगळ्यांचेच प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. आधीच स्वतेजाने लखलखणाऱ्या हिऱ्याला उत्तम कोंदण मिळावे तसे झाले.
ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचे दस्तऐवजीकरण झाले पाहिजे असे वाटते. कोणीतरी ही माहिती संकलित करून विकीवर द्यावी. मुठलें, भिरंड, मुठेल(मुठ्याल), सोलें या वस्तूंची शास्त्रशुद्ध माहिती जगासमोर यावी.
साधना, मुठल्यांचा फोटो सुंदर.
ता. क. : बोलीभाषांतले उच्चार समजून घेण्यासाठी बोलीच्या काही प्रवृत्ती ध्यानात घ्याव्या लागतात. उदा. प्रमाण मराठीतला ' ए ' हा उच्चार अनेक ठिकाणी ॲ , या, ई असा होतो. तेल चा उच्चार तॅल, त्येल, त्याल होतो. येईल ऐवजी यील होते. मी ऐवजी म्यां, मियां होतो.( हे खरे म्हणजे संस्कृतातल्या मया या रूपाला जवळचे आहे). कित्येकदा नपुंसकलिंगाचा अधिक वापर असतो. प्रमाण मराठी ते पोर असे कमी वापरतात. पण बोलींमध्ये लहान, तुच्छ, क्षुल्लक, किरकोळ हा अर्थ दाखवण्यासाठी त्याचा अधिक वापर होतो. कारण बोलींमध्ये अकृत्रिमता असते. उगीचच कृत्रिम आदर दाखवला जात नाही. त्यें पॉर/ प्वार, तां पॉर , त्यें म्हातारं वगैरे. ओ' कारही तसाच. कुठे ऑ होतो तर कुठे यो होतों. आता इथे प्रतिसादांमध्ये भिरंड या फळाचा उल्लेख आहे. प्रमाण मराठीत ते भिरंड आणि ती भिरंडे होईल तर किनारपट्टीवर तां भिरंड आणि तीं भिरंडां होईल. उत्तर कोकणात ' जल्ला मॅला करपटला' म्हणतात तर दक्षिणेकडे जळ्ळें/ जळ्ळां करापलां' म्हणतील. घाटावर येतंय, जातंय चालतंय (की) म्हणतील. असो.

अंजू भले न का मिळेना पण एवढया रात्री तू शोधाशोध सुरू केलीस जस्ट मी म्हणले म्हणून ... काय लिहू कळत नाहीये. पण खूप छान वाटलं वाचून. आठवणीने ठेवलेली वस्तू कुठे ठेवलेय न आठवणे हे माझ्या बाबतीत ही होत , पण एखाद दिवशी अचानक आठवेल तुला .

साधना फोटो बघून मन तृप्त झालं . मी म्हटलं काय आणि लगेच फोटो आला ही इथे . ग्रेट च आहेस तू.

हीरा हा प्रतिसाद ही खूप छान.

अगं हिरा, माझे प्रतीसाद कसले अभ्यासपूर्ण? उलट तुझेच प्रतीसाद भरभरुन असतात. कालपासुन लिहीन म्हणत होते. तू बियांची खूप सुंदर माहिती दिली आहेस. माझ्यासारखीला हे खूप नवीन आहे. पण एक आहे ममो व जागुच्या लेखांमुळे कोकणाचे वैभव सतत नजरेसमोर रहाते. कोकणाने काय नाही दिले ! आता परत एकदा जायचे आहे कोकणात. पण योग केव्हा येईल माहीत नाही.

साधनाची पण मजा आहे. गावाकडची नै शुद्ध हवा, निसर्गाने भरभरुन दिलेले देणे अनुभवायला मिळणे हे भाग्य नाहीतर अजून काय !

किती मस्त माहिती / फोटोची भर घातली आहे सगळ्यांनी.
आता फक्त कोकम फुलांचा फोटो राहिलाय, तो द्या कोणीतरी.
हीरा आता भिरंडचा उच्चार हवाय मनीमोहोरना तो सांगा. मी ऐकलाय पण अचूक करता येत नाही.
भिर्ण्डा कसे वाचाल मनीमोहोर तसे. ण नाकात हलकाच.

बाकी कोकम तेल फोटो नेटवर शोधताना कोकमाचा आयुर्वेदातील उल्लेख सापडला. हिमालयाचे वृक्षाम्ला प्रॉडक्ट आहे. वजन कमी करणे आणि रक्तातील चरबी संतुलित ठेवणे यासाठी. म्हणजे नारळ सढळ हाताने वापरताना पदर्थात कोकम टाकणे यात चव + आरोग्य हे दोन्ही हेतू साधलेत आपल्या पाककृतींनी.
किती गोष्टी माहीत नसतात आपल्याला !! पण जे पूर्वापार होत आलेय त्यालाही काही बैठक आहे. गरज जाणून घेण्याची आहे.

देवकी, फुटी कढी कशी करतात नारळ दूध नाही तर? फक्त कोकमाचा अर्क + त्याला फोडणी?

माझ्या आजोळवरून आलेले आहे,
टाकते फोटो उद्या / परवा.
माझ्याकडाचॅ हलके गुलाबी आहेत. घरचेच गडी काढतात तेल.

नारळ दुध न वापरता फक्त सोलांची हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर लावून बनवतात त्याला तिवळ/ टिवळ असं म्हणतात ना?

माधव बघून आले रातांब्याचं पन्ह गूळ घातलेलं. उडी मारून हातासरशी यो च पण गाव बघून आले.

हिरा , कारवी मस्तच माहिती.
भिरंड चा उच्चार कसा असेल ह्याची साधरण आयडीया आलेय. उगाचच म्हणून ही बघतेय तो ☺

फुटी कढी म्हणजे कोकमं भिजवलेलं मीठ साखर थोडी मिरची लावलेलं तूप जिऱ्याची फोडणी दिलेलं पाणीच असतं अस मला वाटतंय. ते भातावर घालून खातात जेवणाच्या शेवटी.

लगेच दिसला फोटो हे महत्त्वाचं साधना. झंपी, तुमच्या कडच्या फोटोच्या प्रतीक्षेत. आणि आता मोहोराचा ही येऊ दे म्हणजे सर्कल पूर्ण. मी आत्ता सुखत घातलेल्या कोकमाचा केलाय अपलोड. रिसाईज केला तेव्हा झाला अपलोड.

हिरा नाही हो माझे प्रतिसाद फार साधे असतात, कोकणांत माहेर सासर असून मला फार माहीती नसते. हेमाताई कोकण, घर, सण याबद्दल जितकं समरसून लिहीतात तेवढं काही मला सांगता येणार नाही. तुम्ही खूप ग्रेट आणि विनयी आहात. आत्ताचा प्रतिसाद पण मस्त माहीतीपुर्ण.

फुटी कढी म्हणजे कोकमं भिजवलेलं मीठ साखर थोडी मिरची लावलेलं तूप जिऱ्याची फोडणी दिलेलं पाणीच असतं अस मला वाटतंय. >>> हो ती जरा उकळवायची, फुटते ती. सा बा फुट्या सार म्हणतात त्याला. मी केलं तर आलं, लसूण, कोथिंबीर पण घालते, फोडणीत कढीलिंबाची पानं म्हणजे कडीपत्तापण घालते. गरम गरम नुसतं प्यायला ते सार मस्त. मी कधी कोकम चिंच मिक्स पण करते.

रातांब्याचं पन्हं वाचून आले मीही.
आमच्याकडे ताज्या कोकमांच्या सालींचे हाताने मोठे तुकडे करून पाण्यात भिजत घालतात. जरा वेळाने त्यात मीठ, साखर, जिरेपूड, बास. चव छान लागतेच, पण रंग अहाहा!

देवकी, फुटी कढी कशी करतात नारळ दूध नाही तर? फक्त कोकमाचा अर्क + त्याला फोडणी?>>>>>> हो. गोव्याला भातावर घेतली होती.सोलांच्या पाण्यात हि.मि.,कोथिंबीर चिरून घातली होती.आता आठवत नाही नक्की पण हिंगराईची फोडणी होती बहुतेक.हिंगाचा स्वाद आठवतो.त्यात चिमूटभर साखर घालायची. तूप-जिर्‍याची फोडणी नव्हती.

सा बा करतात तुप जिरं फोडणी, म्हणून मीही करते. हिंग पण घालते. नुसतं प्यायला जास्त आवडतं मला असं.

माहेरी फुट्या सार माहीती नव्हतं मला, साबा करतात म्हणून समजलं.

हा आमचा अर्ध मुटियार. आधी पूर्ण होता पण एकदा खूप लावून अर्धा केला.हा कुठून घेतला आठवत नाही, त्यात थोड्या इम्प्युरीटीज आहेत.एकदा वितळवून गाळला की नीट होईल.
IMG_20190416_204104.jpg

आणि हा त्याचा बंगल्यात राहणारा सूट बूट वाला इंग्लिश बोलणारा हाय फाय भाऊ.
IMG_20190416_203922.jpg

अरे इकडे तर धमाल चालली आहे. सगळीच माहीती, फोटो भारी. मी ममोंच्या फेबुवरच्या पोस्टवर म्हटलो होतो तेच म्हणेन. आम्हा घाटावरील लोकांना हे अगदी अचंबीत करणारं आहे. प्रत्यक्ष पहायचा तर संबंधच नाही पण उच्चार वगैरे तर कल्पनेत पण येणार नाही. कुणी तरी म्हटलेय ना वर तसे ही सगळी माहिती संकलीत व्हायला पाहीजे अगदी.

यो च्या मागे लागुन त्याच्या गावी जाणार आहे मी आता. Happy

साधनाताई तु माझे ओतुरचे शेत घे आणि मला तुझे गावाकडचे दे. Happy

धन्यवाद सर्वाना पुन्हा एकदा.

शाली, मे महिन्यात कोकण गटग झालंच पाहिजे.

सुंदर लेख! कोकम हे सुपर्फ्रुट म्हणून सध्या प्रसिद्धी पावत आहे. >> हो ना ! ती टर्मरिक लाटे तरी किती इन आहे परदेशात हल्ली !

अनु , ते जे विकत च बाटली बंद दिसतय त्याला कोकम तेला चा ओरिजनल वास आहे की काही मिक्स वास आहे ? ओरिजनलच असेल तर नक्की घेईन मी. ओरिजनल वासाला मन आसुसलं आहे

दोन्ही ला (गोळा आणि बाटलीबंद) एक तेलकट वास आहे.पण तो कोकम चा सुगंध आहे का माहीत नाही.कैलास जीवन ट्यूब मध्ये वर तरंगणाऱ्या तेलासारखा किंवा अमृत मलम सारखा तो नाही.नुसताच सौम्य तेलकट आहे.बाटलीबंद चा वास मध्ये मध्ये खवट शेंगदाण्या सारखा पण वाटतोय म्हणजे ते कदाचित एक्सपायर झाले असेल.

Pages