माझं घर - शतशब्द कथा

Submitted by शब्दबम्बाळ on 21 March, 2019 - 13:22

"आये, माझं घर निबंद लिहायला लावलाय म्याडमनी! उद्यालाच द्यायचाय... सांग की काय लिहू..." परश्या वैतागलेल्या स्वरात आईला सांगत होता.
"आत्ता! मी काय सांगू? लिही की तुझं तू! परीक्षेला काय मी येनारे व्हय लिहून द्यायला!" आईने पण आवाज वाढवत उत्तर दिलं.
"मी लिहलता की मग, पन..." खाली बघत परश्या बोलला.
"पन काय मग?" आईचा प्रश्न.

"म्याडम म्हनल्या झोपडी म्हन्जे घर नस्तय..."
एकाच क्षणात आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या... ते बघून परश्यापण वरमला.
.
.
.
.
आज सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी होतं, परश्या तिच्या बाजूलाच उभा होता. एका दगड विटांनी बांधलेल्या पक्क्या इमारती समोर ते दोघेही उभे होते.
ठळक अक्षरात त्या इमारतीवर लिहिलेलं होतं 'माझं घर'

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर Happy

घर असावे घरा सारखे, नकोच नुसत्या भिंती
इथे असावे प्रेम जिव्हाला, नकोच नुसती नाती.

त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रुतुनही प्रित झरावी, नकोत नुसते पाणी

या घर्ट्यातून पिल्लू उडावे, दिव्या घेउनी शक्ति
आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति
सुंदर!!!...

शेवट आवडला, आणी कथा पण. बहुतेक त्या मॅडमनी या झोपडीत माझ्या ही कविता वाचली / अभ्यासली नसावी.

आवडली Happy

इतक्या प्रतिक्रिया येतील असे वाटले नव्हते, सगळ्यांचे खूप खूप आभार! Happy
@पूर्वी, आपण दिलेली 'विनय लिमयेंची' कविता खूप आवडली...