काकबळी

Submitted by pintee on 4 March, 2019 - 02:29

श श क ( शत शब्द कथा ) लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आपल्या सूचनाचे स्वागत
आकाशात घोंघावणार्या कावळ्यांकडे प्राची विमनस्कपणे बघत होती.पुन्हापुन्हा तिची नजर पिंडावर जात होती. व्यथित असणारे नातेवाईक कुतूहल,आशा,चिंता,अपराधीपण अशा भावनेत बुडून गेले होते.त्यांची कुजबुज चालू होती. या सगळ्यापासून अलिप्त असणाऱ्या आप्पांकडे बघताना तिचे मन कडवट विचाराने भरून गेले.नजर जमिनीत रुतवून ते निश्चलपणे उभे होते.नेहमीसारखाच त्यांच्या मनाचा थांग कोणालाच लागत नव्हता . यांच्यामुळेच सुखापासून फारकत झाली तिची. कुणाकडे जाण्याचे स्वातंत्र नाही की मोकळेपणाने बोलण्याचे समाधान नाही.पुन्हा एकदा नव्याने तिला उमाळा आला.जन्मभर बिचारी त्यांच्याच तालावर नाचत होती.कशा आधीच्या पिढीतील बायका जाच सहन करायच्या, तिला नव्याने प्रश्न पडला.

तेवढ्यात “आशा...” आप्पाचा करडा स्वर पुन्हा कानावर आला.आणि पिंडाच्या रोखाने एका कावळ्याने सूर मारला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिला प्रयत्न असे बिलकुल वाटले नाही एवढी मस्त जमलीय. पुलेशु !
फक्त मला १०२ शब्द वाटले
जरा चेक करुन २ शब्दांचा बळी घ्या.

धन्यवाद वावे किल्ली वनिता आणि उमानु ज्यांच्या कथा
इतके दिवस वाचत आलो , प्रेरणा घेतली त्यांनी आपल्या छोट्याश्या कथेचे कौतुक करायचे म्हणजे भारीच की

जबरी आहे! डोक्यात शिरायला थोडा वेळ लागला पण भारी आहे.

काकबळी नाव समजले नाही मात्र. पिंडाला काकबळी म्हणतात का?

मला कळली नाही कथा.

प्राची अप्पांची मुलगी आणि आशा बायको का? कि उलटं आहे?
> यांच्यामुळेच सुखापासून फारकत झाली तिची. कुणाकडे जाण्याचे स्वातंत्र नाही की मोकळेपणाने बोलण्याचे समाधान नाही.पुन्हा एकदा नव्याने तिला उमाळा आला.जन्मभर बिचारी त्यांच्याच तालावर नाचत होती. > हे तर बायकोचे विचार वाटतायत.

> कशा आधीच्या पिढीतील बायका जाच सहन करायच्या, तिला नव्याने प्रश्न पडला. > हे मुलीचे विचार वाटतायत....

> व्यथित असणारे नातेवाईक कुतूहल,आशा,चिंता,अपराधीपण अशा भावनेत बुडून गेले होते.त्यांची कुजबुज चालू होती. > कसा झालाय मृत्यू? आत्महत्या?

आशा म्हणजे बायको. प्राची म्हणजे मुलगी. अप्पांची बायको जिवंतपणी त्यांच्या इतक्या धाकात होती की त्यांनी तिचं नाव घेताच पिंडाला कावळा शिवला. हा मला लागलेला अर्थ. बाकी काकबळीचा अर्थ मलाही समजला नाही.

धन्यवाद अभिप्राय दिल्याबद्दल कथा समजली नसेल तर नक्कीच मी कमी पडले मेघना स्पष्टीकरण अगदी बरोबर.पण आशा प्राचीची कोणीही असू शकते आई,सासू कोणीही.काकबळी म्हणजे मृत्यूनंतर दहावा घालून मृताला पुढील मार्ग मोकळा करून देण्याचा विधी.त्यावेळेला कावळा शिवला तर आत्मा मुक्त झाला असे समजतात पण आशा मात्र मृत्यू नंतरही आप्पांच्या धाकात दहशतीत आहे असे दाखवायचे होते

जबरदस्त
मी वेगळंच समजत होते
अप्पा मेलेत(सर्व भावनांपासून अलिप्त जमिनीला खिळलेली नजर म्हणजे स्थिर ठेवलेला पिंड) आणि बायकोला मेल्यावर पण त्यांचा आत्मा हाक मारतो आणि त्या धाकाने ती दचकल्यावर आत्मा तृप्त होऊन कावळा शिवतो असे काही.

सगळ्यापासून अलिप्त असणाऱ्या आप्पांकडे बघताना तिचे मन कडवट विचाराने भरून गेले.नजर जमिनीत रुतवून ते निश्चलपणे उभे होते.

'सगळ्यांपासून अलिप्त' मुळे निश्चलपणे उभे असलेले अप्पा म्हणजे सर्वांपासून अलिप्त असलेला पण आत्म्याचं प्रतीक असलेला निश्चल उभा पिंड असे काहीसे वाटून घेतले

कथा मस्तच आहे.

व्यथित असणारे नातेवाईक कुतूहल,आशा,चिंता,अपराधीपण अशा भावनेत बुडून गेले होते.त्यांची कुजबुज चालू होती. >>याचा अर्थ उघडच त्या भावनांपासून अलिप्त असणारे आप्पा असा आहे
मी- अनु फारच तरल कल्पनाशक्ती आहे तुमची.लेखकाला अपेक्षित असण्यापेक्षा वेगळा अर्थ वाचकाला जाणवतो तो असा.

भारी आहे कथा.

<आणि पिंडाच्या रोखाने एका कावळ्याने सूर मारला> या वाक्यात एखादं क्रियाविशेषण वापरून अर्थ अधिक स्पष्ट करता येईल.

<व्यथित असणारे नातेवाईक > हे असणारे उडवायचं. १०० शब्दांत बसवायचं म्हणजे अनेकदा पुनर्ले खन करावं लागतच असेल.

मस्त

Pages