विज्ञानवादी संत आदरणीय गाडगे महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन करून सादर -
बाबा, मोठा-छोटा
एक होता बाबा मोठा
भगवी कफनी डोईवर फेटा
कुत्रहि ना भुंकी गल्लीत त्याला
जगत् गुरू म्हणे स्वतःला
चमत्कारावर चमत्कार केला
हवेतून काढी तुलसी माला
हळूहळू जमला भोळा मेळा
बाबांने केली माया गोळा
भक्तजन जेव्हा मुठीत आला
कफनीखाली लफडा केला
असेच अचानक वादळ आले
कपनी बाबाची उडवून गेले
बाबा झाला उघडानागडा
वाटे त्याचा भरला घडा
तुरुंगात आता अडकून पडला
भोळा भक्त पण नाही थकला
अजूनही पुजतो पूज्य बाबाला
काय म्हणावे या कर्माला !!!
दुसरा होता बाबा छोटा
डोईवर गाडगे हाती सोटा
स्वच्छतेचा तो भुकेला
दमडीची ना आशा त्याला
झाडू घेऊन झाडी रस्ता
उगाच खाई लोकांच्या खस्ता
खापरात खाई जेवण फक्त
शिळी भाकरी करी ठेचा फस्त
किर्तन करून सांगे विज्ञान
लोकां देई जगण्याचे ज्ञान
अशिक्षित साधा डेबुजी
गाडगे बाबा त्या म्हणतीजी
नाही लुटले जनतेला
तुरुंगातही तो नाही गेला
विसरले पण लोक तयाला
काय म्हणावे या कर्माला !!!
प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.23.02.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita