एकेकाळी म्हणजे इसपू वगैरे काळातच साधारण लोकांचे मेकअप करायचे मी. ब्रायडल, नाचाचे, शाळेच्या गॅदरींग्जचे वगैरे.
ब्रायडल करताना 30 रंगाच्या मुलीला 23 रंगाची करा, साडीला मॅचिंग मोरचुदी रंगाचीच शॅडो लावा, मेकपला पैसे घेता आणि गालावरचा गुलाबी रंग इतक्या कंजूषपणे काय वापरता?, असे बरेच आग्रह नवरीमुलगी आणि इतर जानोश्याचे असायचे. अहो नवरी गोड, सुंदर वगैरे दिसायला हवीये मेकपकी दुकान नाही हे समजवताना मी हैराण परेशान होऊन जायचे. त्यात मुलीच्या सासरच्यापैकी कुणी ब्युटीशीयन असली किंवा साधे थ्रेडिंग शिकत असली तरी ती आत येऊन उगाचच सासरचा तडका देऊन जाणार आणि नसलेली अक्कल पाजळणार. सासरघरची त्यामुळे तिची अक्कल भारी असाच अभिनय करायला लागणार वगैरे धमाल व्हायची. गोरी नाही दिसत असं म्हणत एका नवऱ्यामुलीच्या सासूने मेकअप टेबलावरची पावडर घेऊन केलेल्या मेकअपवरून बचाबचा चोपडून खारा दाणा करून टाकले होते. नवऱ्यामुलीचे अश्रू आणि लिंपलेली पावडर पुसून परत चेहरा होता तसा सुंदर करण्यात रिसेप्शनला स्टेजवर जायला अर्धा तास उशीर झाला होता. लग्न लागल्यानंतर काही तासातच लग्न केल्याचा पश्चात्ताप नवऱ्यामुलीला होउ लागला होता.
नाचाच्या मेकपांची अजून वेगळी तऱ्हा. एखाद्या नाचाच्या क्लासने त्यांच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलेलं असायचं. अरंगेत्रम किंवा
गुरुपौर्णिमा वगैरे. भारतीय शास्त्रीय नृत्य. ठराविक प्रकारे डोळ्यांचा मेकअप ही त्या मेकअपची खासियत. मुळात जेव्हा हे नृत्य सादर होत असे तेव्हा उपलब्ध असलेली प्रकाशयोजना म्हणजे मशाली तत्सम. तर त्यांच्या उजेडात डोळ्यांच्या मुद्रा व्यवस्थित दिसाव्यात यासाठी खरंतर भरदार डोळे रेखनाचे प्रयोजन होते. मग नंतर विशिष्ट प्रकारे आयलायनिंग करणे हा नृत्यशैलीच्या आहार्य अभिनयाचा भाग बनला. आता आपल्याकडे भरपूर प्रकाश असतो स्टेजवर तर हे डोळे रेखन सौंदर्य वर्धन आणि शैलीचा भाग म्हणूनच आणि तितपतच यायला हवे. हे सगळे मला माझ्या गुरूने शिकवले होते. पण अनेक क्लासच्या गुरूंना त्यांच्या गुरूने शिकवले नसावे.
‘गर्दभी अप्सरायते’ वयातल्या गोड मुली, तलम त्वचा वगैरे असताना नको ते मेकअपचे थर असं व्हायचं. पण कार्यक्रमाचा अवधी, नाचून येणारा घाम वगैरे सगळ्यामुळे बराच वेळ टीकेल असा मेकअप करणे ही गरज असे. तसेच शैलीदार डोळे, ओठ रेखणे ही ही. पण किमान दोन मिलीमीटर रुंदीचे आयलायनिंग केले नाही तर आयत्यावेळेला नाच विसरणार असा काही शाप असावा. त्यामुळे क्लासच्या ताईंच्या गुरू मी केलेल्या मेकपवर आपल्या प्रकारे डोळे रेखत. दोन मिलीमीटर जाडीची रेषा, तीही थरथरती आणि गाल कुणी मारल्यासारखे आरक्त. सुंदर मुलीचे आरक्त घुबडात रूपांतर झालेले असे. माझा वैताग होई. आधीच स्टेज परफॉर्मन्सचं टेन्शन, त्यात हा वाढीव बटबटीत मेकअप तोही साक्षात गुरूंच्या गुरूने केलेला त्यामुळे गोंधळलेल्या मुली समोर असत. आरश्यातला स्वतःचा घुबड चेहरा बघून क्वचित डोळ्यात पाणी आलेले असे. यांच्यासमोर मी काय वैतागणार?
शाळेच्या गॅदरींग्जचे वेगळे नियम. सर्व मुलांना गालांवर गुलाबी टिळे आणि चट्टक लाल लिष्टीक (शाळेत असेच म्हणतात!) लावली नाही तर मेकअपवाल्यांना पैसे देत नाहीत. मग मुले ‘आज गोकुळात’ वर नाचणार असोत की ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे बनून भिंत हलवणार असोत की कोवळा शिवबा आणि मावळे बनून रोहिडेश्वराची शपथ घेणार असोत गालावर गुलाब फुललेले आणि डाळिंबाचं दानं व्हटावरी चुरडलं असायलाच हवं. अशी समस्त शिक्षक आणि पालकांची धारणा. चुकून अशी धारणा नसली तर आम्ही कौतुकाने ज्ञानेश्वर, राधा, शिवबा, टिळक वगैरे रंगवत जायचो. अचानक राधाबालेच्या माऊलीला गालावरच्या गुलाबांची हौस यायची. मग ती आमच्या मेकपवर गुलाब फुलवायची. तिच्या गालावरचे गुलाब बघून टिळकांना आपल्याशी मेकपमध्ये पार्श्यालिटी झालीये असे वाटून रडू येऊ लागायचे. ते रडू थांबवायचे तर टिळकांचेही गाल गुलाबी. मग लागण कंटिन्यू टू ज्ञानेश्वर, शिवबा, मावळे, नाटकातले आजोबा इत्यादी. मेकअपवाले हताश!
आता काम बदललं. पण या दर्जाचा हताशपणा अजूनही अनुभवायला मिळतोच. त्याबद्दल पुढे केव्हातरी.
तळटिप: भरतनाट्यम या कलेविषयी मला अपार प्रेम आहे आणि सर्व गुरूंविषयी आदरही आहे. मात्र त्यातल्या काही गुरूंची मेकप वगैरे बाबतीतली समज थोडी अविश्वासार्ह आहे इतकेच.
भारीच लिहिला आहे लेख. दर दोन
भारीच लिहिला आहे लेख. दर दोन वाक्याला 'अगदी अगदी' चा जप करत होते मनात.
बऱ्याच काळानंतर आलं लेखन. पण छान आहे, आवडलं.
फारच विनोदी लेख.
फारच विनोदी लेख.
पण मी किल्लीताईंशी सहमत. तुम्ही शिकला काहीही असाल पण काम ब्युटिशियनचंच करत होतात असं दिसतंय. म्हणजे तुम्ही एस्ट्रोफिजिक्स मधे ग्रॅज्युएट केलं पण शा़ळेत पीटी शिकवत असाल तर तुम्हाला पीटी टीचर म्हणूनच ओळखणार ना? त्या दृष्टीनं,
आता तुम्ही मेकप आर्टिस्ट म्हणून काम करता का?
थँक्स ऑल!
थँक्स ऑल!
वा, खुसखुशीत!
वा, खुसखुशीत!
लहानपणी (हौस असायची तेव्हा) स्टेजवर जाताना असा वर लेखात उल्लेख आहे तसला मेक-अप करून घेण्याचा बराच अनुभव आहे. बरेच वेळेला ( पैशाची चणचण) ह्यामुळे चक्क कॅमलिन च्या बॉक्स मधले कलर्स वाटतील असे रंग चोपडले जायचे. मला तर भायाण आगआग व्हायची तसला मेक-अप केला की. मग प्रोग्रॅम ला उशीर झाला की मी तर रडारड च सुरू करायचे. माझी रडारड सुरू झाली की आई ची चीडचीड व्हायची
नी च्या लेखाने लहानपणिच्या
नी च्या लेखाने लहानपणिच्या रम्य आठ्वणी जाग्या झाल्या, शाळेची कला समिती लुज पावडर्,फाउडेशन, रुज्,लाल भडक लिप्स्टीक अस सगळ सामान आणून सगळ्या नाचर्या टिम्ला वाटुन द्द्यायची मग कुणाची तरी जरा मॉडर्न आई/ताई हे सगळे तिच्या परिने चोपडुन रन्गरन्गोटि करुन सगळे तयार व्हायचे पण आता ते फोटो बघताना मजा येते.
(विक्रम गायकवाड कडे म्हणजे फारच भारी की! )
(No subject)
छान लेख, बऱ्याच ठिकाणी अगदी
छान लेख, बऱ्याच ठिकाणी अगदी अगदी वाटले☺️
बरेचदा मेकपने सुंदर दिसण्यापेक्षा आपण विचित्र दिसतो हेही खरे.
मी याबाबतीत लकी आहे, न माझा पार्लरमध्ये खर्च होतो न मेकपसाठी
भावाच्या साखरपुड्यात जो मेकप गेला होता त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधी मेकप करणार नाही असे ठरविले आहे. मी नको म्हणता सुद्धा मी नणंद म्हणून जबरदस्तीने केला होता माझा मेकप पार्लरवालीने, तसा तो छान होता, पण त्यात मला मी वाटत नव्हते. सो त्याच्या लग्नाच्या दिवशी फक्त लिपस्टिक अन मोकळे केस बास अजून दुसरे काही नाही, त्यात मला मी जास्त आवडले.
मेकप अन पार्लर मध्ये खर्च करण्यापेक्षा accessories, कपडे, पर्स, चप्पल यावर खर्च करणे आवडते.
मी तर स्वतःच्या लग्नात सुद्धा जास्त मेकप न करायचे ठरविले आहे. नाहीतर भविष्यात फोटो बघताना प्रश्न पडायचा ही कोण
मस्त लिहीलंय. आवडलं. लिस्टीक
मस्त लिहीलंय. आवडलं. लिस्टीक तर फारच.
माझ्या मैत्रीणीच्या लग्नातल्या सौदर्यवाढविणीनं तिचा कसा स्पायडरमॅन केला होता तेही आठवलं.
बाकी ते जर्द गुलाबी गालाचे टिळक, गांधी, विरप्पन, झाशीची राणी, गब्बर वगैरे दिसतात मात्र फारच गोड.
आम्ही गुलाबी खडू लावून वर्गातही रुज लावायचो नंतर गालाची आग व्हायची.
नाहीतर भविष्यात फोटो बघताना
नाहीतर भविष्यात फोटो बघताना प्रश्न पडायचा ही कोण<< तो प्रश्न मेकप करा न करा पडतोच.
>> बाकी ते जर्द गुलाबी गालाचे टिळक, गांधी, विरप्पन, झाशीची राणी, गब्बर वगैरे दिसतात मात्र फारच गोड. <<< हो गं. अगदीच गोडुले असतात!
ह्यामुळे चक्क कॅमलिन च्या
ह्यामुळे चक्क कॅमलिन च्या बॉक्स मधले कलर्स वाटतील असे रंग चोपडले जायचे<< अगं काय? कोणाची आयडिया ही?
विक्रम गायकवाड कडे म्हणजे फारच भारी की!<<< होय होय. असतं एखाद्याचं (म्हणजे माझं) नशिब.
>> अगं काय? कोणाची आयडिया ही?
>> अगं काय? कोणाची आयडिया ही?
कोणास ठाऊक! कुठून तरी बाहेरून घेऊन यायचे मेक-अप मॅन. पण तो कॅमलिन सारखा दिसणारा बॉक्स माझ्या मनात कायमचा ठसलेला आहे.
नंतर कदाचित बजेट सुधारलं असावं. थोडं मोठं झाल्यानंतर जो काही मेक-अप होता तो पेलण्याची ताकद तरी आली किंवा मग मेक-अप चं साहित्य तरी सुधारलं असावं.
बाबो, मिपा वर टाकलाय का हा
बाबो, मिपा वर टाकलाय का हा लेख???
अजून विक्रम गायकवाड hynchya कडे उमेदवारी करता का तुम्ही??
सशल, अगं म्हणजे रंगपेटी सारखे
सशल, अगं म्हणजे रंगपेटी सारखे म्हणते आहेस का? हा ती कलरप्लेट मिळायची पूर्वी लायनिंग कलर्सची. जुनी असेल किंवा नीट साफ नसेल केलीली किंवा तुला ऍलर्जी असेल.
अवनी1405, मिपावर टाकलेला नाही. बरेच वर्षात तिथे फिरकले नाहीये. का हो?
हे सगळे किस्से 23-24 वर्ष जुने आहेत. आता मी मेकपमध्ये काम करत नाही.
>> अगं म्हणजे रंगपेटी सारखे
>> अगं म्हणजे रंगपेटी सारखे म्हणते आहेस का?
हो, हो. तसलंच काहितरी. आपण शाळेत चित्रकलेला वापरायचो ना वॉटरकलर्स तशी पेटी असायची.
मलाच अॅलर्जी असेल पण तेव्हाच्या त्या रडारड/चीडचीड प्रकरणांची आई अजूनही आठवण काढते. राधा ना बोले ना बोले ना बोल रे गाण्यासाठी कृष्णावतार केला होता माझा तसल्या मेक-अप ने
दुसर्या वेळी कुठलं तरी नाटक होतं. सगळ्या बायकाच होत्या आणि रंगभूमीवर रामायण किंवा तसलंच काहितरी मायथॉलॉजीकल नाटक सादर करण्यात काय अडचणी येतात त्यावर बेतलेलं विनोदी नाटक होतं. त्यात आम्ही दोन लहान मुली एका नाचाकरता होतो. नॉन-मराठी प्रोड्युसर च्या लाडावलेल्या नाती ज्यांनां स्टेजवर एण्ट्री मिळालीच पाहिजे असा प्रोड्युसर चा हट्ट असतो. "आमी नाय जा, आमी तर फक्त डिस्कोच करेल" असं एक वाक्य बोलून मग डिस्को डान्स असा रोल होता. त्यासाठीही भरपूर डिस्को मेक-अप केला होता; मग रडारड वगैरे
(No subject)
<<नाहीतर भविष्यात फोटो बघताना
<<नाहीतर भविष्यात फोटो बघताना प्रश्न पडायचा ही कोण >>
मेकप असो नसो. पण लग्नाला बरीच वर्षे झाल्यावर लग्नाचे फोटो बघताना बायकोचा फोटो बघून ही कोण असा प्रश्न नवर्यांना बरेचदा पडतो
काल डॉक्टरांच्या वेटिंग
काल डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये मराठी सिरीयल ' माझ्या नवऱ्याची बायको'चा एपिसोड दिसत होता. TV म्युट वर असल्याने त्यातली घरं, ऑफिस, माणसं यांच्याकडे जास्त लक्ष गेलं. सिरीयल मधल्या दोन्ही मुख्य बायकांचा मेकअप इतका भयानक होता की या लेखातल्या शाळेच्या मुलांच्या मेकअपची आठवण आली. गलिच्छ शेडचे लीप कलर्स आणि ते ही ब्लिड होणारे. नायिकेच्या cakey मेकअपची तर हद्द होती. असं वाटत होतं की अलगद सूरी फिरवली तर वड्या निघतील TV सिरियल्सचं बजेट कमी असतं ठीक आहे, पण स्वतःच्या इमेजसाठी तरी या बायका बरे मेकअप का करवून घेत नाहीत?
सिरीयल्स हा प्रांतच अश्या
सिरीयल्स हा प्रांतच अश्या अगम्य आणि अशक्य गोष्टींनी भरलेला आहे. बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी. त्यामुळे माझे मौनच बरे इथे.
Pages