सध्या दिवसातले २५-२५ तास काम करत असल्याने, पुढील भाग उशिरा येण्याची शक्यता आहे. ऍडव्हान्स मध्ये माफी असावी....
पाटील v/s पाटील - भाग १०
https://www.maayboli.com/node/68633
वर्षभराने!
"वसंता, अंबा फिरकली नाही रे कधीची."
"आई ते कर्ज फेडताय की नाही?"
"देवाला माहीत. तू तिकडे युक्रेनला असतो, मला मेलीला घर सोडून जाता येत नाही."
"कृष्णा," वसंताने हाक मारली.
"काय दादा?"
"उद्याच आपल्याला पाटीलवाडीला निघायचय! जगन आणि आई घरी थांबेन, तू आणि मी जाऊयात."
"वसंता, तुम्हाला जाऊ नाही द्यायची मी. मीपण येईन!"
"आई एकदा फक्त बघून तर येऊ दे."
"दिनकरराव आणि तुझं किती जमतं, मला माहिती नाही होय? मीच येते तुझ्याबरोबर. कृष्णा, तू आणि जगन घरीच थांब."
सकाळी राधाबाई आणि वसंता निघाले. एसटी थांब्यापासून पाटीलवाडी साधारणतः दहा मिनिटं अंतरावर आत होतं.
"आई, ते बघ!" जाता जाता वसंताने एका दुकानाकडे बोट दाखवलं.
"अंबाचं ना रे हे दुकान?"
"आई पण नाव वेगळंच दिसतंय!"
वसंत दुकानात पोहोचला.
"काय हवंय," मालक म्हणाला.
"अहो, दिनकररावाना बोलवा, त्यांना म्हणा, वसंत आलाय."
"महिनाभरापूर्वीच दुकान विकलं त्यांनी."
वसंताच्या डोक्यावर वज्रघात झाला. तो झरझर पावलं टाकत राधाबाईजवळ पोहोचला.
"आई..."
"काय झालं वसंता?"
"दिनकररावांनी दुकान विकलं!"
"वसंता," राधाबाई सुन्न झाल्या. आणि सावरून म्हणाल्या, "चल पटकन!"
दोन्हीही अंबाच्या घराकडे निघाले.
अंबाच्या घरात आज प्रचंड रेलचेल चालू होती. धान्याने कोठारे भरली होती, आजूबाजूला नवीन बांधकामे चालू होती.
"वसंता, काही वाईट नाही झालंय," राधाबाई समाधानाने हसल्या!
"दिनकरराव, ओळखलं का नाही," वसंता दिनकररावांकडे जाऊन म्हणाला.
क्षणभर दिनकरराव गोंधळले, आणि अचानक भानावर येऊन म्हणाले.
"वसंता, आधी कळवायच की?"
"का टांगा पाठवणार होतात?" वसंता रोखून म्हणाला.
"वसंता, मोठ्यांशी तरी नीट बोलत जा!" घराच्या दारातून अंबा कडाडली.
अंबाचा आवाज ऐकून राधाबाईही थरारल्या...
"अंबे लहान आहे तो अजून," त्या कशाबशा म्हणाल्या.
क्षणभर कुणीच काही बोललं नाही. दिनकरराव मजुरांना सूचना देऊ लागले. अंबा घरात गेली, तशी पुन्हा दिसलीही नाही.
दोघेही, एकमेकांकडे आशाळभूत नजरेने बघत होते.
"दिनकरराव, घरात बोलवाल की नाही?" शांततेचा भंग करत राधाबाई म्हणाल्या.
"अरे हो, या, या..." दिनकरराव लगबगीने घरात पळाले.
आत गेल्यावर अंबाने गूळ पाणी दिलं!
"अंबा, चांगली प्रगती दिसतेय..."
"काय प्रगती राधी, दुकान गेलं,आता आहे त्यात भागवायच!"
राधाबाईंचा घसा कोरडा पडला.
"पण जाऊदे, आता शांतता मिळते. जे करायचं ते शेतीत! तुम्ही आता आराम करा, संध्याकाळी बोलू! जा, हातपाय धुवून जेवण करून घ्या."
संध्याकाळी दिवेलागण झाली. अंबा आणि दिनकरराव दिवाणखोलीत बसले.
"अंबे, एक विचारायचंय," राधाबाई म्हणाल्या
"विचार ना."
"माझ्या शेतीचं गहाणखत सोडवलंस?"
असह्य शांतता पसरली.
"दुकान गेलं, आणि तूझी शेतीही..." अंबा शांतपणे म्हणाली.
सगळीकडे एक सुतकी शांतता पसरली. राधाबाई जागीच थिजल्या. आणि किंचाळी घुमली!
"फसवलं, अंबे तू, फसवलं. तुला दुकान नाही, शेती वाचवायची होती. तुझं धान्याचं कोठार, तुझं भलंथोरल घर, माझ्या शेतीचा घास घेऊन भरलं तू... अंबे, माझ्या तोंडातला घास काढला तू, माझ्या तिन्ही पोरांना रस्त्यावर आणलं तू."
अंबा संतापली
"राधी, भरल्या घरात रडू नको. तोंड सांभाळून बोल. मी बोलली नव्हती, शेती गहाण ठेव म्हणून. आणि माझ्याकडे येऊन राहा, तू एक काय जड नाही मला."
"भिकारीण नाहीये मी अंबे, हा वसंता चार घरं घेऊन देईल मला. मला दागिने दे फक्त, मी जाते परत." राधाबाई संतापाने थरथरत होत्या.
"राधी, दागिनेही गेले."
"अंबे, नीच, अग काय केलं हे? आपल्या सगळ्या पिढ्यांची पुण्याई अशीच वाहिलीस... अंबे मला दागिने परत हवेत."
"मी काय म्हणतो राधाबाई," दिनकरराव मध्येच छद्मी हसत म्हणाले, "तुम्हाला दागिन्यांची गरज काय? म्हणजे जर तुम्ही दागिने घालून मिरवायला लागलात, तर लोक वेगळा संशय घेतील हो..."
आणि पुढच्याच क्षणी दिनकररावांच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या.
वसंता दिनकरच्या छातीवर चढून तोंडावर धडाधड ठोसे लगावू लागला.
दोन तीन गड्यांनी त्याला आवरले..
"महादू, दगडू, रामा, ह्या भिकाऱ्यांना बाहेर फेका..."अंबा कडाडली...
वसंता कुणालाही आवरत नव्हता, शेवटी एकाने वसंताच्या डोक्यावर जोरात काठी मारली...
वसंताच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन तो जागीच बेशुद्ध झाला.
"अंबे, नको मारू त्याला, जाते मी. पण एक लक्षात ठेव, तुला नाही माझ्या पायाशी अश्रू ढाळायला लावले, तर राधा नाव लावणार नाही मी."
गड्यांनी उचलून वसंताला बाहेर टाकलं...
राधाबाई मूकपणे अश्रू ढाळत होत्या, थोड्यावेळाने वसंता शुद्धीवर आला. आणि म्हणाला
"आई, चलायचं?"
"वसंता!!!"
"आई मला काहीच आठवत नाहीये, आणि आठवायचंही नाहीये. चल जाऊयात!"
घरी गेल्यावर चार दिवसात राधाबाई आणि त्यांच्या तीन मुलांनी घर सोडलं,
नव्हे गाव सोडलं!
नव्हे राज्य सोडलं!
...नव्हे देशच सोडला!!!!
आणि ते कायमचे युक्रेनला स्थायिक झाले...
वाह क्या बात है.. टॅगलाईन छान
वाह क्या बात है.. टॅगलाईन छान आहे.
Pages