भारत वि. ऑस्ट्रेलिया : २ - १ - उपसंहार

Submitted by रिव्हर्स स्वीप on 7 January, 2019 - 14:39

.... अखेर विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून टेस्ट सिरीज जिंकली.

या सिरीजपूर्वी १९४७ - ४८ सालच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन टूरपासून तब्बल ११ वेळा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज खेळली. यापैकी १९८० - ८१, १९८५ - ८६ आणि २००३ - ०४ या तीन सिरीज ड्रॉ झाल्या तर ८ वेळा भारताच्या नशिबी पराभव आला. या वेळेस मात्र अखेर आपण ऑस्ट्रेलियाला नमवले.

अर्थात ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटीश खेळाडू, प्रेक्षक आणि समीक्षक (आणि काही कुजकट भारतीयही) यांचा 'डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ नव्हते म्हणून भारताने सिरीज जिंकली' असा सूर लागलाच! वॉर्नर - स्मिथ (आणि बॅनक्रॉफ्ट) या सिरीजमध्ये का नव्हते यामागचे त्यांचे 'कर्तृत्व' जगजाहीर आहे. त्यातूनही जर-तरचाच विचार करायचा झाला तर १९७७ - ७८ च्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू कॅरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीजमध्ये खेळायला गेले असताना केवळ ऑस्ट्रेलियन अंपायर्सच्या मेहेरबानीमुळे ऑस्ट्रेलियाने ती सिरीज जिंकली होती हे विसरुन चालणार नाही. २००३ - ०४ च्या स्टीव्ह वॉच्या शेवटच्या सिरीजमध्येही डॅमियन मार्टीनवर स्टीव्ह बकनरने केलेल्या मेहेरबानीमुळे ऑस्ट्रेलिया वाचली होती. पुढे २००७ - ०८ च्या 'मंकीगेट' सिरीजमध्ये स्टीव्ह बकनर - मार्क बेन्सन यांनी काय वाटेल ते करुन ऑस्ट्रेलियाला जिंकवायचेच अशी शंका यावी या हेतूनेच अंपायरींग केले असे मानण्यासही वाव आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियन समिक्षकांनी जरा आत्मपरिक्षण करावे हे उत्तम.

भारताच्या या विजयाच्या श्रेयाचे प्रमुख मानकरी म्हणजे सर्वच बॉलर्स आणि अर्थातच चेतेश्वर पुजारा.

२०१३ - १४ च्या ऑस्ट्रेलियन टूरवर पुजाराचा परफॉर्मन्स अगदीच सामान्य होता. त्यातच त्याच्या शांतपणे आणि कोणतीही रिस्क न घेता खेळण्याच्या पद्धतीमुळे या वर्षाच्या सुरवातीला दक्षिण आफ्रीका आणि इंग्लंडच्या टूरवर स्ट्राईक रेट आणि अतिआक्रमकपणाचा पुरस्कार करुन शास्त्री - कोहली या दोघांनी पुजाराला ड्रॉप करण्याचा उद्योग केला होता. तो किती अगोचर महामूर्खपणा होता याचे पुरेपूर माप पुजाराने या सिरीजमध्ये त्यांच्या पदरात घातले. अ‍ॅडलेडच्या पहिल्या टेस्टमध्येच आपली ४० / ४ अशी अवस्था असताना आणि टेस्टमध्ये व्यवस्थित खेळत असताना नको त्या वेळी घात करण्याची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पुजाराच भारताला अडीचशेपर्यंत घेऊन गेला. दुसर्‍या इनिंग्जमध्येही अजिंक्य रहाणेबरोबर पार्टनरशीप करत त्याने मॅच ऑस्ट्रेलियाच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवली. अ‍ॅडलेडच्या त्या विकेटवर जिथे दोन्ही इनिंग्जमध्ये मिळूनही कोहली, रहाणे आणि इतर कोणी शंभर रन्सही काढू शकले नाहीत तिथे पुजाराने तब्बल १९० च्या वर रन्स काढल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिल्याच टेस्टमध्ये नेहमीप्रमाणे भारताची बॅटींग कोसळणार नाही याची त्याने खबरदारी घेतली आणि तिथेच ऑस्ट्रेलियाला पुजारा महागात पडणार हे स्पष्ट झाले. पर्थच्या टेस्टमध्ये तो दोन्ही इनिंग्जमध्ये अपयशी ठरल्यावर कोहलीच्या अप्रतिम सेंच्युरीनंतरही आपण ती टेस्ट गमावली, पण मेलबोर्नला पुन्हा एकदा त्याने ऑस्ट्रेलियाला आपला हात दाखवला आणि सिडनीला ऑस्ट्रेलियन बॉलर्स त्याच्यापुढे अक्षरश: पूर्णपणे अगतिक झालेले दिसून आले. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिल्या दोन टेस्ट्समध्ये तब्बल १६ विकेट्स घेणार्‍या नॅथन लायनच्या बॉलींगला पुजाराने अक्षरश: बोथट करुन टाकले. लायन इतका वैतागला की सिडनीला बॉलिंग मार्कवर परत जाताना 'Are you not bored yet?' असा प्रश्न विचारण्याची त्याच्यावर पाळी आली. लायनच्याच बॉलवर १९३ वर आऊट झाल्याने पुजाराची डबल सेंच्युरी हुकली खरी, पण ऑस्ट्रेलियात सिरीज जिंकण्यासाठी तो एखाद्या डबल सेंच्युरीवर पाणी सोडायला आनंदाने तयार होईल यात शंका नाही. कोहलीलाही पुजाराच्या बॉलर्सना दमवण्याच्या बॅटींग अ‍ॅप्रोच बहुतेक पटला असावा कारण मेलबर्नच्या तिसर्‍या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्स अचूक लाईन आणि लेंग्थवर बॉलिंग करत असताना नेहमीप्रमाणे आक्रमक फटकेबाजीच्या मोहात न पडता कोहलीने पुजाराच्या पावलावर पाऊल टाकत सावध पवित्रा घेतला आणि दोघांनी तब्बल दोनशेच्या जवळपास रन्सची पार्टनरशीप केली. शेवटी-शेवटी पाठदुखीमुळे शॉट्स मारण्याच्या नादात कोहली आऊट झाला असला तरी तब्बल दोन दिवस ऑस्ट्रेलियन बॉलर्सना दोघांनी घाम गाळण्यास भाग पाडले. स्वत: क्रिकेट खेळताना, कॉमेंट्री करताना आणि आपल्या अनेक लेखांमधूनही कायम आक्रमकतेवर भर देणार्‍या आणि Counter attack चा कट्टर पुरकर्ता असलेल्या इयन चॅपललाही चार टेस्टमध्ये तब्बल तीस तासांपेक्षा जास्त बॅटींग करुन आणि १२००+ बॉल्स खेळून काढणार्‍या पुजाराची तारीफ करणारा लेख लिहावासा वाटला यातच सगळे आले.

इयन चॅपलचा लेख - http://www.espncricinfo.com/story/_/id/25693567/cheteshwar-pujara-world-...

पुजारा ५००+ रन्स काढत असताना इतर भारतीय बॅट्समनची कामगिरी कशी होती?

कॅप्टन कोहली बॅट्समन म्हणून त्याच्या स्वत:च्या स्टँडर्डचा विचार करता काहीसा अपयशी ठरला. पर्थच्या टेस्टमधली बॅटींगला कठीण असलेल्या विकेटवरची त्याची सेंच्युरी त्याच्या २५ सेंच्युरीतली कदाचित सर्वश्रेष्ठ इनिंग्ज ठरावी. मेलबर्नला पहिल्या इनिंग्जमध्ये पुजाराच्या जोडीने त्याने ऑस्ट्रेलियाला रडवल्याचा वर उल्लेख आलाच आहे, पण या दोन इनिंग्जचा अपवाद वगळता कोहलीच्या हाती फारसे काही लागले नाही. अर्थात अ‍ॅडलेडला पहिल्या इनिंग्जमध्ये उस्मान ख्वाजाने त्याचा घेतलेला कॅच निव्वळ अफलातून होता. मेलबर्नला दुसर्‍या इनिंग्जमध्ये तो आणि पुजारा दोघांनाही पॅट्रीक कमिन्सने लेग ट्रॅपमध्ये अडकवले, पण आपण ती संपूर्ण इनिंग्जच जवळपास वन-डे मोडमध्ये खेळत होतो! कोहलीप्रमाणेच अजिंक्य रहाणेही अ‍ॅडलेड आणि पर्थच्या हाफ सेंच्युरी वगळता तसा अपयशीच ठरला असेच म्हणावे लागेल. अर्थात अ‍ॅडलेडमधली त्याची ७० रन्सची इनिंग्ज आणि दुसर्‍या इनिंग्जमधली पुजाराबरोबरची पार्टनरशीप लाखमोलाची होती यात शंका नाही. रहाणेच्या दुर्दैवाने मेलबर्नला पहिल्या इनिंजमध्ये लायनच्या लो राहिलेल्या बॉलने तर सिडनीला स्टार्कच्या अनपेक्षितपणे बाऊंस झालेल्या बॉलने त्याला चकवले. मेलबर्नच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये He was part of collective batting failure, पण रहाणेला एका चांगल्या इनिंग्जची आवश्यकता आहे हे मात्र निश्चित! पहिल्या तीन टेस्टमध्ये उतावळेपणे फटकेबाजी करणार्‍या ऋषभ पंतने आपण शांत डोक्याने खेळू शकतो हे सिडनीला सिद्धं करुन दाखवले. बहुतेक तो बॅटींगला आला तेव्हा पुजाराबरोबर खेळण्याचा हा परिणाम असावा. अर्थात अ‍ॅडलेडच्या पहिल्या टेस्टमध्येही दोघांची एक पार्टनरशीप झाली होती, पण दरवेळेस लायन दिसला की उतावळेपणाने त्याला फटकवण्याचा मोह त्याला अ‍ॅडलेड आणि पर्थला नडला होता. मेलबर्नला त्याने डोके शांत ठेवून खेळायला सुरवात केली आणि सिडनीला पुजाराने थकवलेल्या ऑस्ट्रेलियन बॉलर्सची त्याने रविंद्र जाडेजाच्या जोडीने व्यवस्थित उत्तरपूजा बांधली. रोहित शर्माचे टेस्ट करीअर या सिरीजनंतरही जैसे थे असेच म्हणावे लागेल. अ‍ॅडलेडच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याला स्वत:ला एस्टॅब्लिश करण्याची संधी चालून आली होती, पण नेहमीप्रमाणे व्यवस्थित खेळत असताना नको ते उपद्व्याप करण्याची सवय त्याला नडली. मेलबर्नच्या पहिल्या इनिंग्जमधली एकमेव हाफ सेंच्युरी त्याला पुरेशी ठरेल असे वाटत नाही. त्यातच हनुमा विहारीसारखा मिडल ऑर्डर टेक्निक असलेल्या बॅट्समन उपलब्ध असताना रोहित शर्माचे टेस्टमध्ये काही खरे नाही. मेलबर्नला आपण विहारीला मारुनमुटकून ओपनर बनवला खरा, पण कमिन्सने त्याला दोन्हीवेळा Bounce out केला. त्याला मिडल ऑर्डरमध्येच खेळवणे श्रेयस्कर ठरेल. इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही ड्रॉप होण्याची नामुष्की ओढवल्यावर मुरली विजयने आता सन्मानपूर्वक रिटायरमेंट घ्यावी. पस्तिशीत त्याचे मंदावलेले रिफ्लेक्सेस आणि एकेकाळी सर्वात जास्त बॉल सोडणारा बॅट्समन असतानाही ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलवर बॅट घालून आऊट होणे हे त्याची वेळ भरल्याचे निदर्शक आहेत. केएल राहुलची वेगळीच तर्‍हा आहे. गेल्या आयपीएलमधले यश अद्यापही त्याच्या मानगुटीवरुन उतरलेले दिसत नाही. सेहवाग असल्याच्या थाटात आक्रमक शॉट्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न सतत अंगाशी येत असूनही तो सुधारणार नसेल तर त्याला काही दिवस रणजीमध्ये खेळायला लावणे आवश्यक आहे. Sehwag is Sehwag, don't try to imitate him because you simply can not. रविंद्र जाडेजाही पंतच्या जोडीने वाहत्या गंगेत हात धुवून घेत असताना राहुलला पाच इनिंग्जमध्ये मिळूनही त्याच्याइतक्या रन्स काढता येत नसतील तर त्याला नारळ देण्याची वेळ आली आहे.

बॅटींगच्या दृष्टीने या सिरीजचं फाइंड म्हणता येईल तो म्हणजे मयंक अग्रवाल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट आणि तीदेखील मेलबर्नच्या ऐतिहासीक एमसीजीवर खेळताना कोणत्याही प्रेशरमध्ये न येता त्याने काढलेल्या ७०+ रन्स जवळपास सेंच्युरीच्या तोडीच्या होत्या. दुसर्‍या इनिंग्जमधल्या कोलॅप्समध्येही त्याच्या ४२ रन्स उठून दिसल्या. सिडनीतही पुन्हा त्याने सत्तरी गाठली पण मेलबर्न आणि सिडनी दोन्ही वेळेस पंतप्रमाणेच त्याला उतावळेपणा नडला आणि लायनला फटकावण्याच्या नादात त्याने आपली विकेट फेकली. अर्थात थोड्या अनुभवाने तो अधिक यशस्वी होईल असे मानण्यास जागा आहे. पृथ्वी शॉ फिट झाल्यावर अगरवाल - शॉ पुढची काही वर्षेतरी ओपनिंगचा प्रश्नं सोडवतील अशी अपेक्षा आहे.

२०१८ च्या सुरवातीला दक्षिण आफ्रीकेच्या सिरीजपासूनच भारताची बॉलिंग, विशेषत: फास्ट बॉलिंग कधी नव्हे इतकी चांगली आहे. या सिरीजमध्येही ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या तुलनेत भारतीय बॉलर्स कितीतरी सरस ठरले. सिडनी टेस्टच्या दुसर्‍या इनिंग्जवर अक्षरश: पाणी पडले, पण त्यापूर्वीच्या ७ इनिंग्जमध्ये आपल्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाच्या सगळ्याच्या सगळ्या ७० विकेट्स उडवल्या. ऑस्ट्रेलियाला एकदाही इनिंग्ज डिक्लेअर करण्याची आपण संधी दिली नाही.

मेलबर्न टेस्टच्या पहिल्या इनिंग्जमध्ये जसप्रित बुमराहने तिसर्‍या दिवशी लंचपूर्वी शेवटच्या बॉलवर शॉन मार्शला टाकलेला स्लोअर वन Ball of the series ठरावा इतका अफलातून होता. मार्शचा चेहरा पाहून २०११ च्या वर्ल्डकपमध्ये मुनाफ पटेलने अशाच स्लोअरवनवर अब्दुल रझाकचा केलेला 'मामा' आणि त्याच्या चेहर्‍यावरचे भाव - संजय मांजरेकरच्या "Shell Shocked" या कॉमेंटसकट आठवले. अ‍ॅडलेड आणि पर्थच्या टेस्टमध्येही सुंदर बॉलिंग करुन बुमराहला फारशा विकेट्स मिळाल्या नाही, पण मेलबर्नला त्याने ऑस्ट्रेलियाचा साफ कचरा केला. सिडनी टेस्टची शेवटची इनिंग्ज पावसात वाहून गेली नसती तर त्याच्या २१ विकेट्समध्ये आणखीन भर पडली असती यात शंकाच नाही.

बुमराहच्या जोडीने महंमद शामीनेही १६ आणि इशांत शर्माने सिरीजमध्ये ११ विकेट्स घेतल्या हे नजरेआड करुन चालणार नाही. शामीचा पर्थ टेस्टमधला स्पेल बुमराहच्या मेलबर्नच्या स्पेलइतकाच अप्रतिम होता. अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनीला त्याला भरपूर विकेट्स मिळाल्या नसल्या तरी मोक्याच्या वेळेस महत्वाच्या विकेट्स काढण्याची - खासकरुन डोकेदुखी ठरलेल्या पॅट कमिन्सला उडवण्याची कामगिरी त्याने चोख पार पाडली. इशांत शर्मानेही कधी नाही इतकी अचूक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियन बॅट्समनना फटकेबाजीची कोणतीही संधी मिळणार नाही याची काळजी घेतली. अ‍ॅडलेडच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने पद्धतशीरपणे सेटअप करुन ट्रेव्हीस हेडला बंपरवर उडवला आणि पर्थलाही थर्डमॅनच्या ट्रॅपमध्ये अडकवला. या तिघांच्या तुलनेत पर्थला संधी मिळालेल्या उमेश यादवने मात्र दुसर्‍या इनिंग्जमध्ये रन्सची खैरात करण्यापलीकडे काही केले नाही.

रविचंद्रन अश्विन अ‍ॅडलेडच्या पहिल्या टेस्टमध्येच खेळला आणि त्याने दोन्ही इनिंग्जमध्ये मिळून ६ विकेट्स घेतल्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे डोकेदुखी ठरु शकणार्‍या ख्वाजा, शॉन मार्श आणि हॅरीस या तिघाही लेफ्ट हँडर्सना त्याने फारसे काही करण्यापूर्वीच गुंडाळले. त्याच्या इंज्युरीमुळे संधी मिळालेल्या जाडेजाने मेलबर्न आणि सिडनीला ऑस्ट्रेलियाला सहजासहजी रन्स मिळणार नाहीत याची खबरदारी घेतली, पण भरपूर विकेट्स मात्र त्याला मिळाल्या नाहीत. अर्थात ऑस्ट्रेलियन विकेट्सवर तशी अपेक्षाही नव्हतीच. कुलदीप यादवने सिडनीला मिळालेल्या संधीचा व्यवस्थित उपयोग करुन घेत ५ विकेट्स पदरात पाडून घेतल्या, परंतु फास्ट बॉलर्सनीच ही सिरीज गाजवली यात शंका नाही.

कॅप्टन म्हणून दक्षिण आफ्रीका आणि इंग्लंडच्या तुलनेत कोहली ऑस्ट्रेलियात निश्चितच सरस ठरला. खासकरुन मेलबर्नला फिंच आणि सिडनीला लबुशेन (लबुस्काने - इति हर्षा भोगले) यांना मिडविकेट - स्क्वेअरलेगच्या ट्रॅपमध्ये अडकवताना आणि ट्रेव्हीस हेडला थर्डमॅनच्या ट्रॅपमध्ये फसवताना कॅप्टन म्हणून तो मॅच्युअर होत असल्याचे जाणवले. अर्थात बॉलर्सनीही त्याच्या प्लॅनप्रमाणे अचूक बॉलिंग केली. त्याचे बॉलिंग चेंजेसही योग्य वेळेस आणि अचूक होते. अर्थात टीम सिलेक्शनमध्ये त्याने केलेली घोडचूक आणि त्याला शास्त्रीबुवांनी दिलेली मान्यता आपल्याला पर्थला भोवलीच, पण तरीही कॅप्टन म्हणून कोहली प्लसमध्येच आहे.

ऋषभ पंतचे विकेटकिपींग आणि त्याचे आणि टिम पेनची So called banter हा खरेतर स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. भारतीय विकेटकिपरसाठी सिरीजमधल्या सर्वात जास्त विकेट्सचा विक्रम त्याच्या नावावर जमा होणे ही आपल्या अचूक बॉलिंगला पावती आहे तशी त्याच्या किपींगलाही. अर्थात विकेटकिपींगचा विचार करता पंत अद्यापही Work in progress आहे हे नक्की, पण त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची त्याच्यात क्षमता आहे हे नक्की. त्याच्या जोडीला अ‍ॅडलेडच्या पहिल्याच टेस्टमध्ये अश्विनच्या ओव्हरमध्ये त्याने कमिन्सला केलेली बडबड निव्वळ धमाल होती. पंतनेच सुरवात केल्यावर ऑस्ट्रेलियन्स त्याला सोडणार नाहीत हे उघड होते आणि त्याप्रमाणे टिम पेनने त्याला बेबीसिटींगबद्दल विचारलेच. अर्थात पंतनेही पुन्हा संधी मिळताच त्याला Temporary Captain म्हणून जिव्हारी लागणारा टोमणा मारलाच. भारतीय संघात 'आरे ला कारे' म्हणण्याची वृत्ती दादा गांगुलीने रुजवली आणि स्लेजिंग कोळून प्यायलेल्या ऑस्ट्रेलियालाच 'टेस्ट ऑफ देअर ओन मेडीसीन' देत उचकवण्यात पंतने एक पाऊल पुढे टाकले.

भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा विचार करता बॅट्समनपैकी मार्कस हॅरीस, ट्रेव्हीस हेड आणि स्वत: टिम पेन आणि काही प्रमाणात पॅट कमिन्स वगळता इतर सर्वजण अपयशीच ठरले. अ‍ॅरन फिंच हा टेस्ट प्लेअर नाही हे त्याने स्वत:च सिद्ध केल्यामुळे सिडनीत त्याला ड्रॉप करण्यात आले. तीच गत मिचेल मार्शची. शॉन मार्शवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे कल्पना नाही पण त्याच्या नावावर आणखीन एका अपयशाची नोंद झाली. उस्मान ख्वाजाकडून बर्‍याच अपेक्षा होत्या, पण पर्थ टेस्टमधल्या ७०+ चा अपवाद वगळता त्याला काहीच करता आले नाही. हॅरीसने मात्र मिळालेल्या संधीचा फायदा उठवत दोन ७०+ इनिंग्ज खेळल्या, पण अगरवालप्रमाणेच त्यालाही उतावळेपणा नडला. फिंच अपयशी ठरल्याने डेव्हीड वॉर्नर परतल्यावर अ‍ॅशेसमध्ये कदाचित वॉर्नर - हॅरीस ओपनिंगला येण्याची शक्यता वाटते. ट्रेव्हीस हेडनेही जवळपास प्रत्येके इनिंग्जमध्ये चांगली सुरवात केली होती, पण त्यालाही फटकेबाजीचा मोह आवरला नाही. त्याने आपल्या टेक्निकमध्ये थोडी सुधारणा केल्यास तो चांगला बॅट्समन ठरु शकेल. पीटर हॅन्ड्सकॉम्बलाही आपले टेक्निक सुधारण्याची आणि जम बसवण्याची चांगली संधी होती, पण ती त्याने दवडली असेच म्हणावे लागेल. त्याच्या तुलनेत बॉलर असूनही पॅट कमिन्सचे बॅटींग टेक्निक आणि खासकरुन त्याचा डिफेन्स चांगला आहे.

ऑस्ट्रेलियन बॉलिंगचा विचार केल्यास कमिन्स आणि लायन या दोघांनीच काय ती बॉलिंग केली असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. कमिन्सने मेलबर्नला दुसर्‍या इनिंग्जमध्ये कोहली, पुजारा, रहाणे यांना लेगट्रॅपमध्ये अडकवल्याची इतर देशांच्या बॉलर्सनी नोंद घेतली असेलच. लायनला अ‍ॅडलेड आणि पर्थला मिळून १६ विकेट्स मिळाल्या, पण मेलबर्न आणि सिडनीला कोहली, पंत आणि अर्थातच पुजाराने त्याची पार दमछाक केली. हेजलवूडला पीचकडून मदत न मिळाल्यास तो निष्प्रभ ठरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि मिचेल स्टार्कचे नेमके काय बिघडले होते हे त्यालाच माहीत. त्याने रहाणेला मेलबर्नला आणि विजयला पर्थला अनप्लेयेबल बॉल टाकले, पण एरवी त्याला (आणि हेजलवूडलाही) मिळालेल्या विकेट्सपैकी जास्तकरुन बॅट्समनच्या चुकीने मिळाल्या होत्या.

And last but not the least, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी पीटर हॅन्ड्सकॉम्ब कणभरही सुधारलेला नाही हे त्याने कोहलीचा कॅच ढापला त्यावरुन दिसून आलेले आहे. हाच हॅन्ड्सकॉम्ब केप टाऊनला कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला सॅन्डपेपर लपवण्याची सूचना देण्यासाठी मैदानात आला होता आणि स्टीव्ह स्मिथला डीआरएससाठी ड्रेसिंग रुमची मदत घेण्याचे सुचवणारा हाच महाभाग होता. मेलबर्नचे प्रेक्षकही वर्णद्वेषी आहेत हे प्रकर्षाने दिसून आले आणि बे १३ मधल्या प्रेक्षकांना बाहेर काढण्याची पोलीसांवर वेळ आली.
http://www.espncricinfo.com/story/_/id/25629483/mcg-spectators-evicted-r...

भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याचा आनंद असला तरी भविष्याच्या दृष्टीने विचार करता अद्यापही आपली बॅटींग आवश्यक तेवढी कन्सिस्टंट नाही हे दिसून आले आहे. तेवढेच नाही तर मुख्य बॅट्समन आऊट झाल्यावर बॉलर्स आपली दमछाक करतात हे देखिल चालण्यासारखे नाही. अ‍ॅडलेड टेस्टमध्ये त्यामुळे पराभव होण्याची शक्यता होती. तेवढी उणीव दूर झाल्यावर कोहलीचा भारतीय संघ जगभरात अव्वल ठरु शकतो.

- रिव्हर्स स्वीप

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नीट उपसंहार लिहिलाय. "अगोचर महामूर्खपणा" हे भारीच आवडले.

त्यातच हनुमा विहारीसारखा मिडल ऑर्डर टेक्निक असलेल्या बॅट्समन उपलब्ध असताना रोहित शर्माचे टेस्टमध्ये काही खरे नाही. >> दुर्दैवाने हे होइल ह्याची खात्री वाटत नाही. उप्पर्निर्दिष्ट अगोचरपणा होत असतानाही शर्माचे खाई खरे नाही वाटणे हा निव्वळ आशादायक द्रुष्टीकोन आहे पण शास्त्री-कोहली ह्यांच्या राहुल् नि रोहित प्रेमाला कधी भरती येईल हे सांगता येत नाही.

राहता राहिला एक मह्त्वाचा घटक, तो म्हणजे ह्या दौर्‍यामधे कोहलीने अचूक वेळी नाणेफेक जिंकली. पहिल्या डावात पुरेशा धावा काढल्यावर त्याचे ओझे विरुद्ध संघाला अचूक गोलंदाजीपुढे किती जाणवू शकते ह्याचे हि सिरीज परफेक्ट उदाहरण आहे. home field advantage पेक्षा सध्या toss advantage मह्त्वाचा ठरतो आहे. इंग्लंडमधेही असे झाले असते तर काहि सामने आपल्या बाजूने येउ शकले होते एव्हढे काठावर आल होते.

ह्यातून अजून एक जाणवलेला उपघटक म्हणजे, आफ्रिका किंवा इंग्लंड मधे पहिल्या कसोटींमधे कोहली शास्त्री ने प्रॉपर सहावा फलंदाज न घेण्याची चूक केली होती. ह्या अती आत्म विश्वासाचे फळ म्हणजे दोन्ही सिरीज मधे आपण कॅच अप करत राहिलो. ह्यावेळी सहा प्रॉपर फलंदाज घेतल्यामूळे 'कमीत कमी पहिला सामना हरणार नाही' ह्याची काळजी घेतली गेली. रोहितच्या पहिल्या सामन्यातल्या पहिल्या डावतल्या धावा कामी आल्या.

मस्त झाली सिरीज. एकदम मज्जा आली. टेस्ट क्रिकेट हेच खरे क्रिकेट याची पुन्हा जाणीव करून देणारी सिरीज असे म्हणता येईल.

इस सिरीज मे बॅटींग थी, बोलींग थी, फिल्डींग थी हे अगदी ड्रामा था, अ‍ॅक्शन था, इमोशन था च्या चालीवर म्हणावे लागेल !!

छान लिहिलाय उपसंहार Happy
बरेचसे ऑसीज माजोरडे आहेत (प्लेयर्स तर आहेतच, पण इथले क्रिकेटफॅन्स सुद्धा), त्यामुळे ह्या सिरीजनंतर (आणि सिरीजदरम्यानही) त्यांना "जैसे को तैसा" मिळालंच असेल... अर्थात, जेन्युईन आणि गूडहार्टेड लोकांनी भारतीय संघाची, प्लेअर्सचीसुद्धा तारीफ केल्याचे ऐकले, सो ओव्हरऑल अ गूड क्रिकेट वॉज प्लेड इन्डीड... Happy

छान लिहिलंय...

<<<<त्याच्या जोडीला अ‍ॅडलेडच्या पहिल्याच टेस्टमध्ये अश्विनच्या ओव्हरमध्ये त्याने कमिन्सला केलेली बडबड निव्वळ धमाल होती. पंतनेच सुरवात केल्यावर ऑस्ट्रेलियन्स त्याला सोडणार नाहीत हे उघड होते आणि त्याप्रमाणे टिम पेनने त्याला बेबीसिटींगबद्दल विचारलेच. अर्थात पंतनेही पुन्हा संधी मिळताच त्याला Temporary Captain म्हणून जिव्हारी लागणारा टोमणा मारलाच. भारतीय संघात 'आरे ला कारे' म्हणण्याची वृत्ती दादा गांगुलीने रुजवली आणि स्लेजिंग कोळून प्यायलेल्या ऑस्ट्रेलियालाच 'टेस्ट ऑफ देअर ओन मेडीसीन' देत उचकवण्यात पंतने एक पाऊल पुढे टाकले.>>>

यातल्या काॅमेंट्सवर (उभयपक्षी) एखादा स्वतंत्र लेख किंवा निदान एखादा मोठा, तपशीलवार प्रतिसाद लिहिणार का प्लीज..?

छान उपसंहार. रिव्हर्स स्वीप. चार धावा. अभिनंदन

अर्थात ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटीश खेळाडू, प्रेक्षक आणि समीक्षक (आणि काही कुजकट भारतीयही) यांचा 'डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ नव्हते म्हणून भारताने सिरीज जिंकली' असा सूर लागलाच! वॉर्नर - स्मिथ (आणि बॅनक्रॉफ्ट) या सिरीजमध्ये का नव्हते यामागचे त्यांचे 'कर्तृत्व' जगजाहीर आहे.>> त्यांच्या बॅटींगच्या गुणांपेक्षा त्यांचे इतर कर्तृत्व ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध नव्हते म्हणून त्यांचे असे मत असावे. २०१६ नंतर त्यादोघांचीही ऑस्ट्रेलियातील फलंदाजीतील कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्यामुळे ते नव्हते म्हणून हरलो म्हणणे हे केवळ त्यांची स्वतःची समजूत काढण्यासाठी आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.

राहूलच्या ऐवजी चौथ्या सामन्यात पार्थीवला घेता आले असते. मयांक अगरवाल छानच खेळला. आता बाहेर फार टेस्ट नाहीत लवकर. भारतात कोणीही चालेल. अगदी राहूल सुद्धा.

आपण ऑस्ट्रेलियात जिंकल्याचा आनंद आहेच पण इंग्लंड व आफ्रिकेत सुद्धा जिंकण्याची संधी मात्र आपण घालवली याचे दु:ख आहे. COA ने काही मूर्खपणा न केल्यास यापुढेही भारताच्या सध्याच्या क्रिकेट सिस्टीम मधून नवीन नवीन वेगवान गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज निर्माण होतील व पुढच्या सिरीजमधे आपण इंग्लंड व आफ्रिकेत नक्क्कीच जिंकू याची मला तरी खात्री आहे. एका अष्टपैलूची मात्र खरी उणीव सध्या आपल्या संघात आहे.

Well done and Well played team India. Happy

टॉसच्या महत्वाबद्दल अचूक लिहिले आहे. आपला बॉलिंग अ‍ॅटॅक महान झाला आहे, टीम सिलेक्शनच्या घोडचूका टाळल्यातर अजून असे बरेच विजय मिळतील. टेस्ट आणि इतर फॉरमॅट्साठी वेगवेगळे संघ करण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत.
अ‍ॅग्रेसिव्ह इंटेन्शन वगैरे भंपकपणा फक्त प्रेस कॉन्फरन्समध्येच बरा, प्रत्यक्ष मैदानावर त्याची सुरळी करुन ती.....खिशात ठेवावी एवढा धडा जरी पुजाराकडून घेतला तरी खूप आहे.