जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १५ (अंतिम). मोहीमेचा समारोप

Submitted by मार्गी on 29 December, 2018 - 11:21

जे सत्य सुंदर सर्वथा....: १५ (अंतिम). मोहीमेचा समारोप

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):९. अहमदपूर ते नांदेड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१०. नांदेड ते कळमनुरी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):११. कळमनुरी ते वाशिम

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१२. वाशिम ते अकोला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१३. अकोला ते रिसोड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१४. रिसोड ते परभणी

एचआयव्ही व आरोग्यावर झालेली सायकल मोहीम माझ्यासाठी फार विशेष ठरली. मला खूप काही बघण्याची व शिकण्याची संधी मिळाली. हा फक्त एक सायकल टूअर नाही तर एक स्टडी टूअरही झाला. ही समस्या किती मोठी आहे व ह्यावर किती मोठं कामही सुरू आहे, हे मला समजून घेता आलं व त्यात थोडा सहभागही घेता आला. अनेक दृष्टींनी हा प्रवास विशेष राहिला. सायकलिंगबद्दल तर खूप काही‌ शिकायला मिळालं. आजपर्यंतची सगळ्यांत मोठी व सतत जास्त दिवसांची सायकल मोहीम झाली. आणि ही थोडी कठीणही होती. शारीरिक कष्टाची सवय तर होत असते, पण मानसिक दृष्टीने इतकी सलग व दूरपर्यंत सायकल चालवता आली ह्याचं समाधान वाटतं आहे. अनेकदा असंही वाटलं की, माझ्या सायकल मोहीमेतून काही जण स्वत:ची प्रसिद्धीही करत आहेत. पण मग विचार केला की, काय हरकत आहे. मला ह्या प्रवासात इतका आनंद मिळतोय, त्यांनाही मिळत असेल. अनेकदा असे परीक्षेचे प्रसंग आले जेव्हा वाटलं की, माझं खरंच सायकलीवर प्रेम आहे? सायकलीच्या प्रेमाच्या कसोटीवर तर मी उत्तीर्ण झालो! त्या अर्थाने तर मी ह्या सायकल मोहीमेत सायकलिंगची एक इयत्ता ओलांडून पुढच्या इयत्तेत गेलो! असे अनेक क्षण आले जेव्हा सायकल चालवणं कठीण झालं. अनेकदा वाटलं की प्रवास पूर्ण करता येणार नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये कठिण गेलं. पंक्चरनेही त्रास दिला. पण ह्या मोहीमेनंतर आता पंक्चरची भिती कधीच वाटणार नाही. अनेक दिवस सतत चालणा-या मोहीमेमध्ये कशा प्रकारे शारीरिक व मानसिक तयारी करायला हवी, हे मला खूप चांगलं बघता आलं.

आता ह्या सगळ्या विषयावर बोलतो. कोणतीही समस्या किंवा त्यावरील उपायासाठी समाजाच्या मानसिकतेसंदर्भात खोलवर जावं लागतं. हा संपूर्ण विषय अनेक प्रकारे इतर काही विषयांशी जोडला आहे- स्त्री पुरुष संबंध, स्त्री पुरुष समानता व आपल्या समाजाची परिपक्वता. ह्यामुळे त्यावरही थोडा विचार करायला हवा. काही दशकांपूर्वीपर्यंत भारतीय सिनेमामध्ये चुंबनाचं दृश्य दाखवायला सेन्सॉरची बंदी होती. पण हत्या किंवा गोळीने ठार मारण्याच्या दृश्यावर कधीच बंदी नव्हती. हे चुकीचं तर आहेच, पण ते तसं का आहे, हेही समजून घ्यायला पाहिजे. समाजात ज्या गोष्टीच्या फार सुप्त इच्छा असतात, दमन असतं त्या गोष्टींना आपण एक तर औपचारिक किंवा सामाजिक प्रकारे नावं ठेवतो व निंदा करतो. स्वाभाविक प्रेमाच्या अनुभवाबद्दल समाजामध्ये खूप जास्त दमनाची वृत्ती आहे. आणि कदाचित इतक्या जास्त दमनामुळेच काही काळापर्यंत अशा प्रेम- दृश्यांवर बंदी होती आणि आजही समाजाच्या नजरेत अशा दृश्यांवर अलिखित बंदी आहेच. आजही 'प्रेम' हे एक सामाजिक मूल्य म्हणून बघितलं‌ जात नाही. निसर्गाच्या बाजूने बघितलं तर पुरुष व स्त्री एकाच अखंडाचे दोन खंड आहेत आणि त्यांच्यात एकमेकांबद्दल ओढ असते. निसर्गही त्यांना एकत्र आणू इच्छित असतो. पण आपल्या आधुनिक समाजात अनेकदा लहानपणापासून मुलं- मुली एकमेकांसोबत राहात नाहीत. सोबत राहणं म्हणजे फक्त घरी सोबत राहणं नाही, तर एकत्र खेळणं, एकत्र झोपणं व जवळ राहणं. असं नसेल तिथे दोघांमध्ये एक दरी तयार होते. मग नंतर त्यातूनच अनेक गोष्टी घडतात- अफेअर्स होतात, महिलांवर अन्याय होतो; अत्याचार होतो. पण विशेष म्हणजे आजही ज्या समुदायांमध्ये लहानपणी मुलं- मुली सोबत राहतात आणि नंतरही युवती- युवक जवळ असतात; तिथे महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण अतिशय कमी आहे. आजही असे अनेक ग्रामीण व आदिवासी समाज आहेत. निसर्गाला ज्या प्रकारे स्त्री- पुरुष जवळ हवे आहेत; ते सान्निध्य जिथे आहे व ते तोडलं गेलेलं नाहीय, तिथे महिलांवर अत्याचार किंवा महिला पुरुषांपेक्षा मागासलेल्या आहेत, असं कानावर येणार नाही. कारण दोघंही अगदी सोबत आहेत. जर मुलाच्या जवळच मुलगी असेल, तर छेड काढण्याची गरजच पडणार नाही. जिथे सहजपणे हात हातात घेता येत असेल, तिथे छेड अशक्य गोष्ट ठरते. पण आपण इतकं निसर्गाला धरून राहायला विसरलो आहोत. अनेक गोष्टी प्रेमाने; हळुवार पद्धतीने करता येतात- दोन भांडी एकमेकांमध्ये अडकतात. आपण शक्यतो काय करतो? थोडा वेळ त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग लगेच जोर लावून ठोकायला लागतो. पण जर आपल्याला प्रेमाने ते करता आलं, तर जोर लावण्याची गरजच पडणार नाही.


त्यामुळे आधी ह्या सर्व गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. ह्या गोष्टी लहानपणापासूनच सुरू होतात. जर कोणी म्हणालं की, ह्या गोष्टी आज एकदम सुरू कराव्यात, एकदम प्रेमाच्या भावाला आणूयात, तर ते अजूनही हानीकारक ठरेल. ज्या समुदायांमध्ये मुलं- मुली एकत्रच राहतात, सोबत खेळतात, सोबत पोहतात; सोबत भांडतात (मुलं- मुली असे वेगळे गट न पडता), अशा समुदायांमध्ये ह्या संबंधित सामाजिक व शारीरिक विकारही कमी होतात. अशा समाजांमध्ये प्रेम, विवाह, एकमेकांबद्दल आदर ह्याविषयीसुद्धा परिपक्वता दिसते. ह्या विषयाचं मूळ इथे आहे. जर आपण मुळापर्यंत गेलो नाही व फक्त एक एक फांदी छाटली, तर समस्येचा अंत कधीच होणार नाही. आणि एका अर्थाने महिला समानतेसाठीही हे खरं आहे. खरं तर महिला समानता हा शब्दच चुकीचा आहे. कोणाला दुस-याशी समान असण्याची गरज ती का असावी? हां, कोणी कोणापेक्षा कमी किंवा मागे मात्र असू नये. तर आपला स्वभाव व प्रकृतीनुसार मुक्त असलं पाहिजे.

ह्या सगळ्या विषयाकडे डोळे उघडून बघितलं तर अनेक गोष्टी समोर येतात. एचआयव्ही मुख्यत: असुरक्षित संबंधांमुळे होतो. एकापेक्षा जास्त पार्टनरकडे जाणं, हा प्रकार खूप वेगळा आहे. प्रेमात जो भाव असतो; जी अनुभूती असते; जे समर्पण असतं; ते सगळं सोडून कोणी कसं फक्त सेक्ससाठी दुस-याकडे जाऊ शकतं, हे लक्षात घ्यायला हवं. हे जवळजवळ असंच आहे जेव्हा आपल्याला जीवंत माणसापेक्षा टिव्हीवरची माणसं जास्त चांगली वाटायला लागतात. किंवा आपण मनात व भावनेमध्ये कधी इतकं खोलवर गेलो नसू तर फक्त शरीराच्या स्तरावरचा अनुभवच सर्व काही मानू शकतो. प्रेमाचा अनुभव व त्यातल्या भावना ज्यांना समजल्या असतील; ज्यांनी ती अनुभूती घेतली असेल; त्यांना हे सर्व प्रकार अतिशय उथळ आणि कृत्रिम वाटतील. इथेही आपल्या समाजाच्या परिपक्वतेचा मुद्दा येतो. ज्या समाजात प्रेम, भावना, समर्पण अशा गोष्टी खोलात जाऊन अनुभवल्या जात असतील; समजल्या जात असतील; तिथे अशा चुकीच्या रिती फार कमी आढळतील. कारण जेव्हा आपल्याजवळ चांगली अनुभूती असेल, तर आपण बी ग्रेड अनुभवाकडे जाऊच कशाला? वेगळ्या शब्दांत सांगायचं तर ह्यातून हेच दिसतं की, आपल्या समाजात प्रेमाची नाती व विवाहासारखे खोलवर जाणारे संबंध किती उथळ होऊन राहिले आहेत. जेव्हा भारतात एचआयव्ही नवीन होता, तेव्हा ऐंशी व नव्वदच्या दशकात अनेकांना वाटायचं की, भारताला एचआयव्हीपासून काहीच धोका नाही, कारण आपली संस्कृती तर आदर्श आहे. आपण तर मूल्य व संस्कारांवरच वाढलेले आहोत. पण भारतातही एचआयव्हीचा मोठा प्रसार झाला. आणि अशी मूल्य व संस्कार असूनही आपली लोकसंख्या जगातल्या दुस-या क्रमांकापर्यंत वाढलेली आहे. असो.

अशा गोष्टी सतत आपल्या सामाजिक समजबुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आजही आपण शाळेत लैंगिक शिक्षण योग्य प्रकारे देण्यास असमर्थ आहोत. आणि जेव्हा आपल्याला गोष्टी प्रेमाने, सॉफ्ट हँडसनी करता येत नाहीत, तेव्हा आपल्याला जोर लावून ठोकून ठोकून कराव्या लागतात. तेव्हा मग सुरक्षिततेमुळे मुलींना मुलांपासून दूर ठेवावं लागतं. त्यामुळे तणाव अजून वाढतो, अनेक प्रकारे दमन वाढतं. शरीर आणि मन ह्या अर्थाने दोन नाहीतच. जसं मनात खूप क्रोध असेल, संताप असेल, दु:ख असेल तर तो शरीरामध्ये दिसतोच. शरीरात तो ताण येतो. आपण ज्या नकारात्मक गोष्टी मनात घेऊन चालतो, त्याचा त्रास शरीराला होतो. समाजात आज जो तणाव आहे, क्रोध आहे, संघर्ष आहे, तो मनातच दबून राहतो. पण कोणतीही ऊर्जा अशी दाबता येत नाही. कारण मोकळी झाली नाही तर ती‌ तिथे राहू शकत नाही. त्यामुळे आज मानसिक तणावांमुळे शरीरातही तणाव येतात. कदाचित आज कँसरसारखे जे रोग वाढत आहेत, त्याचं हेही कारण असू शकतं. कारण जेव्हा मनात तीव्र राग किंवा दु:ख असतं, तेव्हा मन त्यावर प्रतिक्रिया करू इच्छितं. पण तेव्हा आपण अशी प्रतिक्रिया दाबून टाकतो. थोडाच राग असेल तर तो मनात असतो. पण जास्त राग आला तर डोळे लाल होतात, दात ओठ चावले जातात. अनेकदा आपल्याला दुस-यांना किंवा स्वत:ला नुकसान पोहचवण्याची इच्छा होते. पण आपण ते सप्रेस करतो. मग हे सप्रेशन शरीरात जातं. शक्य आहे की, अशा प्रकारच्या प्रतिक्रियेमुळे शरीर स्वत:लाच हानी पोहचवणारे कँसरसारख्या रोगांच्या दिशेने जात असेल.

आपण जर बाकीच्या देशांकडे बघितलं तर काही गोष्टी चांगल्या जाणवतात. आपण पश्चिमेतील विकसित देश किंवा जगातील अन्य भागांमधील प्रगतीशील देश बघितले तर अनेक गोष्टी दिसतात. आपल्याकडे प्रेम किंवा सेक्सचं दमन जितकं‌ मोठं (लपून परंतु तरीही मोठं) असतं व हा जितका मोठा मुद्दा असतो; तितका तो त्या देशांमध्ये नसतो. आज आपण शाळेत लैंगिक शिक्षण कसं द्यावं, ह्यावर विचार करतोय. पण त्या देशांमध्ये सेक्सच्या सुरक्षित मार्गांची माहिती शाळा- महाविद्यालयांमध्ये दिली जाते. आणि सेक्सचे सुरक्षित मार्ग फक्त रिस्कमध्ये असलेल्या ग्रूप्ससाठीच नाही, तर सगळ्यांसाठी असतात. अशा देशांमध्ये मास्टरबेशनही शिकवलं जातं- एक सुरक्षित व रिलीव्ह करणारा उपाय म्हणून. आपण आपल्याकडे त्याचं नावही घ्यायला घाबरतो. सेक्सचा तणाव दूर करण्याचा तोही एक सुरक्षित मार्ग आहे. पण आपले संस्कार व आपली मूल्य मध्ये येतात. पण जर आपण दमनच करत राहिलो, तर त्या दुष्टचक्रात अडकून राहू. आपले चित्रपट आणि आपले युवकही मग फक्त प्यार ईश्क़ मोहब्बत इथेच अडकून पडतील. त्याउलट बाकी देशांमधील चित्रपट व तिथले युवा जीवनाच्या इतर दिशांनी व इतर मार्गांनीही पुढे जाताना दिसतात. फक्त प्यार- मोहब्बत व घर- संसाराच्या पुढच्या जीवनाचा शोध घेतात, ते जीवन जगतातही. त्यामुळे आपल्याला अशा अनेक अप्रिय व त्रासदायक वाटणा-या विषयांचाही सामना करायला हवा. आपल्या संस्कृतीतील मूल्य चुकीचे आहेत, असंही नाही. आपल्याकडे म्हंटलं‌ गेलं आहे- तेन त्यक्तेन भुञ्जीथा| म्हणजे ज्याने भोगलं असेल, तो भोगूनच त्यातून मुक्त होतो. तिथले युवक एक प्रकारच्या वासना व आसक्तीपासून दूर होऊन एखाद्या विषयवर खूप मेहनत करतो; एखाद्या विषयासाठी जीवन वाहून घेतो. आणि आपल्याकडे तर वृद्धही एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळतात. आणि आपले युवाही प्यार- मोहब्बत- सेक्स व घर- संसारामध्ये अडकलेले असतात. सामाजिक व्यवस्थेसाठी आपण दमन करतो; पण त्यामुळे आपली दृष्टी खूप कमकुवत व अंधुक होते. असो.

शेवटी हेच म्हणेन की, आपण किमान व्यक्तिगत पातळीवर तरी ह्या सगळ्या गोष्टींविषयी जागरूक व्हायला हवं. जर एखाद्या व्यक्तीमध्ये समज व दृष्टी असेल, तर हळु हळु समाजाची दृष्टीही परिपक्व होईल. आणि आजच्या व्यवस्थेत ज्या समस्या आहेत, त्यासंदर्भात आपल्याला काही अप्रिय असलेले उपायही करावे लागतील. आदर्श समाजात बाल गृह असणारच नाहीत. पण जोपर्यंत आपण तसा समाज बनत नाही, तोपर्यंत आपल्याला बाल गृहे गरजेची आहेत. जोपर्यंत आपल्या समाजात एचआयव्हीबद्दल गैरसमज आहेत; तोपर्यंत आपल्याला त्यावर काम करावे लागेल. अनेक जण असंही म्हणतात की, आपण एकट्याने करून काय होणार आहे? खरं आहे तसं. पण कोणतंही काम असंच तर पुढे जात असतं. थेंब थेंब मिळून तळं साचतं. आता माझ्या लेखणीला विराम देतो. ह्या पूर्ण प्रवासात ज्यांनी सहभाग घेतला, सर्व प्रकारे मदत केली, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. माझ्या चार वर्षांच्या अदूचाही उल्लेख करतो, कारण तिने मला अडवलं नाही! घरातील सर्वांनाही धन्यवाद देतो. अनेक लोक ह्या सगळ्या प्रक्रियेत वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेले होते, त्यांनाही धन्यवाद! आपण हा लेख वाचल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद!

ह्या विषयाबद्दल हे सुंदर गाणं सतत आठवतं-

तू बुद्धी दे तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे…
हरवले आभाळ ज्यांचे
हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना
हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे
नित्य तव सहवास दे…
जाणवाया दुर्बलांचे
दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा
रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरासया
खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस
आणि अर्थ या जगण्यास दे…
सन्मार्ग आणि सन्मती
लाभो सदा सत्संगती
नीती नाही भ्रष्ट हो
जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे
झेपावण्या आकाश दे…

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults