जे सत्य सुंदर सर्वथा....: १०. नांदेड ते कळमनुरी
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):९. अहमदपूर ते नांदेड
२१ नोव्हेंबर. ह्या प्रवासाचा दहावा दिवस. नांदेडवरून निघता निघता भल्या सकाळी एका योग शिक्षिका ताईंना थोड्या वेळ भेटलो. ह्या पूर्ण प्रवासात ठिकठिकाणी लोकांच्या भेटी होत आहेत. हा क्रम इतका सतत सुरू राहिला की, २५ नोव्हेंबरला प्रवास संपल्यानंतरही अनेक दिवस ह्या प्रवासाची स्वप्न पडत राहिली आणि स्वप्नात वाटेत मी काही जणांना भेटणार आहे, असं वाटत राहिलं! नांदेडच्या भाग्यनगरमधून निघालो व एअरपोर्ट रोडवरून अर्धापूरच्या हायवेला आलो. काही अंतर थोडा उतार मिळाला. सकाळची प्रसन्न हवा आणि थंडी! त्याबरोबर मख्खन हायवे! म्हणजे तुपात साखर! आता तर सायकल चालवणं जवळजवळ जाणवतच नाहीय. आधी प्लॅन करत असताना नांदेडवरून सरळ हिंगोलीला आणि दुस-या दिवशी हिंगोलीवरून वाशिमला जाणार होतो. पण त्यात नांदेड हिंगोली ९२ किमी जास्त झाले असते व दुस-या दिवशी हिंगोली- वाशिम ५१ किमीच झाले असते. म्हणून हिंगोलीच्या १८ किमी अलीकडे कळमनुरीला मुक्काम करेन असं ठरवलं. हिंगोली जिल्ह्याचं केंद्र होतं, पण तिथला कार्यक्रम कळमनुरीला घ्यायला सगळे जण तयार झाले. त्यामुळे आज फक्त ६८ किमी चालवेन व उद्यासुद्धा जवळ जवळ इतकेच म्हणजे ६६ किलोमीटर चालवेन. आणि नंतर जे झालं त्यामुळे हा निर्णय बरोबरच ठरला!
नांदेडच्या पुढे अर्धापूरवरून जाताना वसमत शहराकडे जाणारा रोड लागला. परभणीत माझं घर वसमत रोडवरच असल्यामुळे हा वसमत रोड घर जवळ आल्याची जाणीव करून देतोय! पण अर्धापूरात टिपू सुलतान चौक बघून भिती वाटली की ज्ञानाच्या स्फोटाच्या युगात आपण किती अज्ञानी होत आहोत! पुढे लहानपणी गावाच्या नावांच्या भेंड्या खेळताना नेहमी आठवायचं ते गाव लागलं- डोंगरकडा! तेही आज पहिल्यांदाच बघितलं. ह्या मार्गावरून पहिल्यांदाच जातोय. इथे मस्त निसर्गरम्य परिसर आहे, छोटे डोंगरही आहेत! पुढे वारंगा फाट्यापासून हिंगोली जिल्हा सुरू झाला. म्हणजे पूर्वीचा परभणी जिल्हाच! घर जवळ येत असल्याची भावना व म्हणून उत्तेजना वाढते आहे. पण अजून चार... नव्हे पाच दिवस बाकी आहेत. आज कदाचित मी खूप लवकर पोहचेन, असं वाटत असतानाच टायर पंक्चर झाल्याचं जाणवलं! पण त्याचं काहीच वाटलं नाही. जवळच हॉटेल आहे, मॅकेनिकचं दुकानही आहे. सायकल तिकडे घेतली. मॅकेनिकचं दुकान बंद आहे, पण हॉटेलमधून पाणी व एक मग घेतला. पंक्चर काढता येईल इथे, त्यामुळे ट्युब बदलण्याच्या ऐवजी पंक्चर ठीक केलं. काहीही नाही, फक्त अर्धा तास लागला. तेही सामान उतरवून परत चढवेपर्यंत. ह्या मोहीमेतलं हे तिसरं पंक्चर. पूर्वीच्या परभणी जिल्ह्याने माझं असं खास स्वागत केलं! हायवेवर एक बारीक तारेचा तुकडा होता! पण आता पंक्चर मला अजिबात ताण देत नाही. पंक्चर होणं व ते दुरुस्त करणं नेहमीचंच झालंय. सायकल पंक्चर झाली, सो व्हॉट? ठीक करतो लगेच. फक्त त्यात अडचण ही झाली की, वेळ गेला थोडा आणि मुख्य म्हणजे सायकल चालवण्याची लय तुटली. त्यामुळे पोहचायला जास्त वेळ लागणार. तेव्हा मात्र जाणवलं की, हिंगोलीच्या ऐवजी कळमनुरीला थांबण्याचा माझा निर्णय बरोबर ठरला!
वारंगा फाट्यानंतर रस्ता थोडा छोटा झाला आहे. पण जास्त वाहतुक नसल्यामुळे अडचण नाही आहे. सुंदर डोंगरांची सोबत आहे. एका हॉटेलवर चिप्स व बिस्कीटस घेतले. इथे खूप मुलं होती, त्यांच्याशी गप्पा मारल्या. पुढे आखाडा बाळापूरमध्ये चहा व बिस्कीटही परत घेतले. इथे एनर्जालही घेतलं, कारण आता ऊन वाढतंय. कळमनुरीपर्यंत थोडा चढही लागणार आहे. पुढे घाट नाही, पण चढणारा- उतरणारा रस्ता लागला. छोटा डोंगर ओलांडून रस्ता पुढे जातोय. परभणीपासून हा परिसर खरं तर जवळ आहे, पण कधीच इकडे येणं झालं नव्हतं. ह्या चढावरच एक सशस्त्र सीमा बलाची कॉलनी दिसली. तिथल्या फलकाचा फोटो घेत असताना सैनिकाने चौकशी केली. मग त्याच्याशी थोडा वेळ बोललो. त्यांच्याकडून कौतुकाचे शब्द ऐकून पुढे निघालो. लवकरच कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात पोहचलो.
कळमनुरीतला कार्यक्रम अनेक प्रकारे विशेष झाला. एक तर आठ वर्षांपूर्वी आशा हिंगोलीत कळमनुरीतल्या संस्थेत एचआयव्ही विषयावरच काम करत होती. तेव्हा इथल्या काही जणांशी चांगली ओळख झाली होती. तेही मला भेटायला उत्सुक होते. त्या सगळ्यांशी भेट झाली. काही जण लांबवरून मला भेटायला आले. एक जण तर आता ह्या विषयावर कामही करत नाहीत, पण पूर्वी आशासोबत ह्या विषयावर काम करायचे, म्हणून भेटायला आले. विहान प्रोजेक्ट, लिंक वर्कर प्रोजेक्ट, कयाधू संस्थेचे सदस्य, लेकुरे गुरुजी, डाप्कूचे सदस्य सगळ्यांशी भेट झाली. आता प्रत्येक ठिकाणच्या अशा चर्चांनंतर मला एचआयव्हीवर हे लोक जे काम करतात, ते थोडं थोडं कळतं आहे. कशा प्रकारे एनजीओज किंवा सरकारी लोक रिस्क ग्रूप्ससोबत काम करतात, कशा प्रकारे ते त्यांना एचआयव्ही टेस्टसाठी तयार करतात, कशा प्रकारे त्यांची ट्रीटमेंट सुरू करतात, नंतर काही जण कसे ट्रीटमेंटमधून ड्रॉप आउट होतात, त्यांना परत कसं सांगावं लागतं हे कळत गेलं. आणि हे सर्व करताना येणारा कलंकाचा व सामाजिक विरोधाचा मुद्दा! इथे एक गोष्ट थोडी शॉकिंग वाटली की परभणी- हिंगोली रोडवरचं एक बाजाराचं गाव आहे, तिथे मी अनेकदा सायकलीवरही गेलो आहे! त्या गावात female sex workers चं इतकं मोठं पॉकेट आहे हे कळालं! आणि ते लोक लपून छपून हा उद्योग करतात, त्यामुळे अनेकदा त्यांची भेट घेता येत नाही, त्यांची राहण्याची जागा बदलत असते. सेक्स वर्कर्सचे क्लाएंटस बदलत असतात. इतक्या छोट्या गावात महाराष्ट्राच्या बाहेरून क्लाएंटस येतात, हे मात्र मला शॉकिंग वाटलं! संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, सतत प्रयत्न करून त्यांनी काही सेक्स वर्कर्सना ह्या धंद्यातून सोडवलं व त्यांना रोजगाराचे दुसरे पर्याय देऊन पुनर्वसन केलं, त्यासाठी आवश्यक कौशल्य मिळवण्यासाठी मदत केली. हे कळालं तेव्हा बरं वाटलं.
त्यावरून एक गोष्ट कळते की, आपलं मन जरी नाही म्हणत असलं व आपल्याला जरी वाटत असलं की, हा "रोग" काही जणांमध्येच असेल, काही अपराधी वृत्तीचे किंवा वाईट प्रवृत्तीचे लोकच ह्यात गुरफटले असतील, तर तसं अजिबात खरं नाही आहे. ह्या पूर्ण प्रवासात अशी उदाहरणं समोर येत आहेत जिथे अगदी अनपेक्षित प्रकारे लोकांमध्ये एचआयव्ही आढळला आहे. मग ते ग्रामीण वृद्ध जोडपं असेल, अगदी श्रीमंत किंवा उच्चशिक्षित व तथा कथित समंजस लोक असतील किंवा व्यवसायामुळे सतत प्रवास करणारे किंवा महिलांसोबत जास्त संबंध येणारे लोक असतील. आज जसे तंत्रज्ञानाचे लाभ दूरवर पोहचले आहेत, तसाच हा रोग व मानसिक प्रवृत्तीही पसरली आहे. आपण आपला भ्रम दूर केलेला चांगलं राहील. आपण असा विचार करायला नको की, कोणी अपराधी प्रवृत्तीचा किंवा वाईट माणूसच त्यात अडकतो. उलट आपण असा विचार करायला हवा की, माझ्यासारखीच एखादी व्यक्ती ह्यामध्ये अडकू शकते. त्याबद्दल जागरूक व्हायला पाहिजे. एक गोष्ट आठवते. जेव्हा कुठे अत्याचार होतो, बलात्कार होतो, तेव्हा आपल्याला वाटतं की, कोणी पाशवी नराधमाने किंवा एखाद्या गुंडाने बलात्कार केला. पण असा जो कोणी माणूस असेल, तो माणूसच तर आहे, जवळजवळ तुमच्या किंवा माझ्यासारखाच आहे. आणि कोणाचा तरी मुलगा, कोणाचा भाऊ व पतीही आहे. तो कोणी सैतान असेल असा विचार आपण करायला नको. आपल्याला हा प्रश्न पडायला पाहिजे की, कोणी माझ्यासारखा माणूस हे का व कसं करतोय. तोसुद्धा तर एक "मीच" आहे. असो. पण ह्या कार्यक्रमात ह्या गोष्टीचा नक्कीच आनंद झाला की, अनेक वर्षं एचआयव्ही असूनही लोक आनंदात व सुखात जगत आहेत! जीवन कसंही असो, ते आनंदाने जगता येतंच!
पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ११. कळमनुरी ते वाशिम
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग