जे सत्य सुंदर सर्वथा....: ५. बार्शी ते बीड
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी
१६ नोव्हेंबर, आज ह्या प्रवासाचा पाचवा दिवस. कालचा दिवस सायकलिंगच्या दृष्टीने फारच मस्त गेला. आता सायकल चालवणं खूप सोपं झालंय. आता किलोमीटरची अंतरं जाणवतच नाही आहेत. काल चर्चाही छान झाली होती. आज बार्शीवरून बीडजवळच्या पाली इथल्या बाल गृहात जायचं आहे. आजचं अंतर जवळपास ९५ किलोमीटर असेल. रोजच्या प्रमाणेच पहाटे बार्शीतून निघालो. बार्शी बरंच मोठं शहर आहे. कँसर रुग्णालयाच्या पुढे आगळगांवचा रस्ता विचारत निघालो. इथून पुढे थोडं अंतर साधारण दर्जाचा रस्ता आहे. आणि अगदीच आतला असल्यामुळे मध्ये मध्ये तुटलेलाही असणार! थोड्याच अंतरानंतर अगदी कालच्या त्या रस्त्यासारखा रस्ता! पण आजूबाजूचे नजारे मस्त आहेत. हळु हळु सोलापूर जिल्हा संपतोय. दूरवर डोंगर दिसत आहेत. पुढे आधी उस्मानाबाद आणि मग बीड जिल्हा सुरू होईल. तुटलेला रस्ता लवकरच संपला व न तुटलेला पण कमी दर्जाचा रस्ता सुरू राहिला.
एका गावात चहा बिस्कीट घेतले व पुढे निघालो. सुमारे ३३ किलोमीटरनंतर तेरखेडपासून मला चांगला सोलापूर- बीड हायवे लागणार आहे. पण त्याआधी रस्ता फार निर्जन भागातून जातोय. भूमकडे जाणा-या रस्त्याचा तिठा गेल्यानंतर तर वाहतुकही विरळ झाली आहे. इथे एक अगदी आडवाटेचं गाव लागलं व गाव ओलांडल्यावर अगदी जंगलासारखा परिसर आला. अर्थात् आता दुष्काळप्रवण क्षेत्र सुरू होणार असल्यामुळे हिरवळ बरीच कमी झालेली आहे. जंगलामधूनच रस्ता वर चढत जातोय! मॅपमध्ये बघितल्यासारखा छोटा घाट आला. तुलनेने कमी दर्जाचा रस्ता असल्यामुळे घाट थोडा अवघड आहे. पण इतक्या दिवसांपासून सायकल चालवतोय, त्यामुळे सहजपणे चढत गेलो. घाटमाथ्यावर पोहचल्यानंतर मस्त दृश्य दिसत आहे! पवनचक्क्याही दिसल्या. पण त्या बंद पडलेल्या आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात जाईन! पण वाटेतला परिसर माझ्यासाठी किती अज्ञात व किती नवीन होता! वा!
थोडं पुढे गेल्यावर सोलापूर- बीड हायवे आला! खरंच हा रस्ता मस्त बनला आहे. काही ठिकाणी अजूनही रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे मला मोकळ्या लेनमधून सायकल चालवता येतेय. मस्तच! पणा आता ह्या वेळी चहा- बिस्कीटाची नितांत गरज आहे. एका धाब्यावर फक्त चहाच होता, त्यामुळे थोडं पुढे जाऊन परत थांबावं लागेल. पण हायवेवर सायकल पळवताना फारच मजा येते आहे! त्यातच थोडा उतारही आहे! बघता बघता पंधरा किलोमीटर पार झाले. एका जागी चहा- बिस्कीट- चिप्स असा भरपेट नाश्ता केला. पन्नास किलोमीटर झाले आहेत आणि अंदाजे पंचेचाळीस बाकी असावेत. पण पुढे हायवे असाच शानदार आहे, त्यामुळे फार त्रास होणार नाही. फक्त ऊन वाढत असल्यामुळे एनर्जाल एकदा घ्यावं लागेल. ह्या हायवेवर तशी गावं कमीच आहेत. दोन दिवस तुलनेने भयाण रस्ते बघितल्यानंतर आज हायवे मस्तच वाटतोय. चढावरही छान वेग मिळतोय.
चौसाळा गावात एनर्जाल घेतलं. आता फक्त पंचवीस किलोमीटर बाकी आहेत. मला बीडच्या १० किलोमीटर अलीकडे पाली गावात डोंगरावर असलेल्या इन्फँट इंडीया बाल गृहात जायचं आहे. त्याच्या आधी घाट लागेल. त्यामुळे आज जरी ९० पेक्षा जास्त किलोमीटर होणार असले तरी रिलॅक्स आहे की, शेवटचे सहा- सात किलोमीटर उतार असणार आहे. मांजरसुंबाचा छोटा पण मस्त घाट लागला! उद्या हाच घाट मला चढायचा आहे. घाटाचा उतार संपता संपता पाली गांव आलं. एका डोंगरावर बाल गृह आहे. आतला कच्चा रस्ता व तीव्र चढ असल्यामुळे पायी पायी गेलो. पण सुंदर परिसर आहे. खाली बिंदूसरा तलाव व डोंगर! चढता चढता मुलं भेटली. त्यांच्यासोबतच बाल गृहात पोहचलो. आज सुमारे ९५ किलोमीटर सायकल चालवली. आणि मधला कमी दर्जाचा रस्ता बघितला तर चांगल्या रस्त्यावरच्या १०० किमी पेक्षा ही राईड मोठी ठरेल. आणि आज बीड जिल्ह्यात म्हणजे माझ्या परभणीच्या बाजूच्या जिल्ह्यात आल्यामुळे एका अर्थाने मानसिक दृष्टीने मोहीम पूर्ण झाल्यासारखीच वाटतेय! मानसिक बर्डन अगदी कमी झालं आहे. पुढे सायकल चालवताना अडचणी येतीलच, कुठे त्रासही होईल, पण मानसिक आव्हान आजच पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. असो.
पोहचल्यानंतर बीड जिल्ह्यात एचआयव्हीवर काम करणारे सरकारी कर्मचारी व आरोग्य कर्मचारी भेटले. ते माझ्यासाठी खूप वेळेपासून थांबले होते. बाल गृहाचा परिसर खरंच सुंदर आहे. एका रमणीय जागी सगळे लोक बसले होते. आधी तिथेच जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. एचआयव्हीवर काम करणारे प्रोजेक्ट अधिकारी, काउंसिलर्स अशांनी आपले अनुभव सांगितले. सरकारी कर्मचारी असूनही त्यांना एचआयव्हीवर काम करताना अडचणी येतात. ह्या चर्चेत दोन अनुभव विशेष पुढे आले. एकाने सांगितलं की, पोलिस सेवेच्या प्रवेश प्रक्रियेत एचआयव्ही टेस्ट असते. एका महिलेची निवड झाली होती. पण ती पॉझिटिव्ह होती. त्यामुळे तिला प्रवेश दिला गेला नाही व सेवेतून दूर ठेवलं गेलं. मग ह्या विषयावर काम करणा-या लोकांनी हा मुद्दा लावून धरला. ती पोलिस पात्रतेसाठी फिट होती. एचआयव्ही असलेल्या व्यक्तीला प्रवेश देऊ नये, असा कोणताही नियम नव्हता. नंतर विषय आणखी पुढे गेला व मानव अधिकाराचा मुद्दा उपस्थित झाला व नंतर तिला सेवेत घेतलं गेलं. आज ती महिला पॉझिटिव्ह असूनही फिट आहे व पोलिस सेवा करत आहे. असाच आणखी एक किस्सा ऐकायला मिळाला. काही जण एकदा आरोग्य शिबिर व एचआयव्ही तपासणी करत होते. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की, ही टेस्टिंग व हे प्रबोधन बँक अधिका-यांसोबत केलं जावं. त्याने मग सांगितलं की, बँकेत प्रोबेशनवर आलेले अधिकारी कसे बारमध्ये जातात, कसे हाय रिस्कमध्ये असतात इ. मग त्यांनी ह्याची पडताळणी केली व हे खरं निघालं. मग खूप प्रयत्न करून बँकेमध्ये ह्या विषयावर कार्यशाळा घेतली गेली. सुरुवातीला सर्वांनी विरोध केला, पण हळु हळु त्यांना जाणीव झाली. नंतर लोक टेस्टिंगलाही आले व जागरूकही झाले.
बराच वेळ ही चर्चा झाली. त्यानंतर मग आंघोळ- जेवण आणि आराम झाला. दुपारचा आराम फारच गरजेचा आहे. जर एक दिवस जरी नीट आराम झाला नाही तर दुस-या दिवशी सायकल चालवणं कठीण होईल! त्यामुळे आराम करण्यात कंजुसी केली नाही. योगायोगाने माझ्या असाईनमेंटसही खूप अनुकूल अशा आल्या व आराम होऊ शकला. हे बाल गृह श्री दत्ता बारगजेंनी उभं केलं आहे. ते स्वत: डीएमएलटी आहेत व भामरागडमध्ये सरकारी सेवेत होते. तिथून ते प्रकाश आमटेंच्या संपर्कात आले; काही वर्षं त्यांनी त्यांच्यासोबत काम केलं. नंतर सरकारी नोकरी सोडून आपलं पूर्ण जीवन ह्या कामासाठी वाहून घेतलं. त्यांची पत्नी प्राध्यापिका होती, त्यांनीही ह्या कामाची जवाबदारी घेतली. एका व्यक्तीचं मोठं योगदान आणि त्यासह समाजाने दिलेल्या योगदानातून हे बाल गृह उभं राहिलं. कोणी ही जमीन दिली, कोणी साहित्य व उपकरणे दिली. असं काम वाढत गेलं. आजही दत्ता बारगजे जी म्हणतात की, काही मागावं लागत नाही. जे इथे गरजेचं असतं, ते इथे आपोआप येतं. हे काम बघताना दोघा उभयतांचं योगदान सतत जाणवतं. दत्ता जी बीडच्या केजचे आहेत. अनाथ व एचआयव्ही असलेल्या मुलांना आधार देत देत हे काम त्यांनी उभं केलं. इथे एचआयव्ही असलेले सर्व प्रकारचे पीडित मुलं व अन्य दिव्यांग मुलंही येतात. दत्ताजींनी सांगितलं की, इथे एक मानसिक दृष्टीने दिव्यांग मुलगा आला आहे. त्याला कुठेच घेतलं जात नव्हतं. सगळीकडून रिजेक्ट होऊन तो आला. चालतो- फिरतो, पण अजिबात शुद्ध नसते. सगळं दुस-यांनाच करावं लागतं. खाऊ घालावं लागतं. शरीर विकलांग आहे. कधी कधी अचानक पळायला लागतो. त्यामुळे काही मुलं त्याच्याकडे लक्ष ठेवून असतात. संध्याकाळी जेव्हा मुलांची भेट झाली तेव्हा त्यालाही भेटलो. खेळताना जेव्हा सगळे नाचत- गात होते, तेव्हा तोही नाचू लागला! त्याला नाचताना बघून सगळे जण चकित झाले! विकलांग असूनही तो नाचतोय, त्यालाही आनंद होतोय! त्याला सगळ्यांत चांगली ट्रीटमेंट हीच असावी- त्याला नॉर्मल सारखं राहू द्यावं. नाचामध्ये त्याचं शरीर व्यक्त होत होतं. दत्ताजींनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वीपर्यंत तर तो बसूही शकत नव्हता. इथल्या वातावरणात तो ठीक होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इथे सर्व एचआयव्ही मुलांच्या योग्य उपचाराकडे लक्ष दिले जाते. त्याबरोबर योग व निसर्गोपचारही अंगिकारला जातो. मुलांना शिक्षणासोबत कौशल्य वृद्धीमध्येही तयार केलं जातं.
मुलांसोबत नाच- गाणं झाल्यानंतर इथल्या टीमसोबत चर्चा झाली. दत्ताजींनी व सर्वांनी बाल गृहाच्या कामाची माहिती दिली. इथे चांगली टीम दिसली. अनेक प्रकारे लोक जोडली गेली आहेत. काही जण एचआयव्ही असलेल्या मुलांचे पालकही आहेत. तेही इथे राहतात व इथे काम करतात. काही मुलं मोठी झाली आहेत, तेही आता व्यवस्थापनात मदत करतात. आणि मुलं तर स्वावलंबी आहेत व अनेक गोष्टींमध्ये सहभाग घेतातच. चर्चेत अजून एक गोष्ट कानावर आली. आता जशी ट्रीटमेंट विकसित होत आहे, त्यानुसार आईकडून बाळाला होणारं एचआयव्ही संक्रमण होण्याची शक्यता कमी होते आहे. पण अर्थात् त्यासाठी बाळाला पहिले अठरा महिने सलग उपचारांची गरज असते. आरोग्य कर्मचारी व संबंधित संस्थेचे लोक ह्यांना मुलाकडे सतत लक्ष द्यावं लागतं. अशा स्थितीत जेव्हा एखाद्या पॉझिटिव्ह आईचं मूल अठरा महिन्यांनंतर निगेटिव्ह येतं, तेव्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावत नाही. संस्थेत असं एक मूल सगळ्यांसोबत खेळताना दिसलं. आशा करूया की, पॉझिटिव्ह आई- वडीलांमधील आणि आरोग्य यंत्रणेतील जागरूकता वाढत गेली तर पुढे जास्त मुलांना जन्मत: एचआयव्ही संसर्ग होणार नाही.
ह्या बाल गृहाचं काम असं बाजूलाच असलेल्या बिंदूसरा सरोवरासारखं आहे. थेंबे थेंबे तळे साचे! अनेकांच्या योगदानातून हे बिंदूपासून बनलेलं सरोवर आहे. बाल गृहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा परिसर फारच रमणीय आहे. पर्यटन केंद्र होऊ शकेल असा. लोक पर्यटनाच्या निमित्ताने येतील आणि ह्या विषयाशी परिचित होतील. दत्ताजीही त्यासाठी सहमत आहेत. हे सगळं काम बघून मलाही त्यात सहभाग घेण्याची इच्छा झाली. डोनेशन केलं, पण दत्ताजींनी ते स्वीकारलं नाही. आज इतकं काम सुरू असूनही समाजात अनेक गैरसमज प्रचलित आहेत. आजूबाजूच्या परिसरातले लोक अजूनही ह्या कामाकडे सकारात्मक नजरेने बघत नाहीत. आजही मृत मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नाही व ह्याच परिसरात 'वेदना' भूमीमध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात... ह्या बाल गृहाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व एखाद्या प्रकारे त्यात सहभाग घेण्यासाठी संपर्क करू शकता-
इन्फँट इंडिया, आनंदवन, बिंदुसरा सरोवरासमोर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११, पाली, बीड, महाराष्ट्र.
दूरध्वनी: (०२४४२) २७६६२१, २७६६२२
मोबाइल: ०९४२२६९३५८५
वेबसाइट: www.infantindia.org
ई-मेल: infantindiapali@gmail.com
पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ६. बीड ते अंबेजोगाई
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
उत्तम लेख
उत्तम लेख
सुरेखच !
सुरेखच !
उत्तम लेख खरोखर. दत्ता
उत्तम लेख खरोखर. दत्ता बारगजे यांना दंडवत.
महाराष्ट्रात आणि भारतात हा
महाराष्ट्रात आणि भारतात हा रोग कसा काय पसरला याचं आश्चर्य वाटते.
>>आजूबाजूच्या परिसरातले लोक अजूनही ह्या कामाकडे सकारात्मक नजरेने बघत नाहीत. >>हा आणखी एक त्रास.
लेखात बरीच माहिती दिली आहे. (हेमलकसा पर्यटन केंद्र झालं आहे तसं हे इन्फन्ट होऊ नये असा विचार आला. कारण त्यात मुलं आहेत आणि त्यांना पाहायला सतत लोक येतात हे त्यांच्या मनावर परिणाम करू शकते. पर्यटन आयोजकांना काय तर एक नवीन जागा मिळते तिकडे सहल न्यायची.)
उत्तम लेख. आधीचे पण वाचते आता
उत्तम लेख. आधीचे पण वाचते आता.