तसं म्हटलं तर एव्हाना ’गे’, ’लेसबियन’ हे शब्द अंगवळणी पडलेले शब्द झाले आहेत. समलिंगी विवाह तर कायद्याने मान्य झाला आहे. पण खरंच सर्वत्र आबादीआबाद आहे का? समलिंगत्वाचं वर्गीकरण सामान्य माणसांकडून दोन वर्गात केलं जातं. स्वाभाविक आणि विकृत. सर्वच देशात याबाबत मतभिन्नता आहे. पण आपल्याच घरात समलिंगी माणूस असेल तर? आणि तेही यौवनावस्थेत पदार्पण करीत असलेलं? जिथे व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य आहे अशा अमेरिकेतही समाजाचा, मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा आणि मुख्यत्वे दबाब असतो तो चर्चमधील सहाध्यायींचा. गेल्या काही वर्षात कार्यक्रमातून समलिंगींवर वर होणारे विनोद, त्यांचं राहणीमान दर्शविणार्या मालिका, चित्रपट हे सारं वाढलं आहे. यातून जसा सकारात्मक परिणाम झालेला दिसतो तसाच नकारात्मक. ज्यांना हे मान्य आहे ते ह्या कार्यक्रमांचा आनंद लुटतात पण समलिंगत्वाला विरोध असलेल्यांची मतं ठाम होत जातात, विरोध उघडपणे मांडला जातो, त्यावर उलटसुलट विधानं होत राहतात. घरात वादळं उठतात.
समलिंगी विवाह कायदेशीर झाला त्यामुळे प्रौढ समलिंगी व्यक्तींचं नातं अधिकृत झालं तसंच कर, वारसा हक्क, दत्तक मुलांचा ताबा, निवृत्ती वेतन असे अनेक प्रश्न सुटले. पण यौवनावस्थेत असलेल्या समलिंगी मुलांचं वर्तमान भयानक आहे. आपल्या मुलांचं समलिंगी असणं पालकांना मरणयातनेसारखं वाटतं. त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी ते जिवाचा आटापिटा करतात. समलिंगी असणं हे नैसर्गिक की अनैसर्गिक याबाबत मानसिक गोंधळ उडालेले पालक मुलांनी या ना त्या मार्गे बदलावं यासाठी समलिंगत्वाचं परावर्तन करु अशा दावा करणार्या संस्था, शिबिरांमध्ये पाठवतात. अशा संस्था, शिबिरं पेव फुटल्यासारखी कितीतरी राज्यात आहेत. अनेक ठिकाणी या बदलाचं आश्वासन देणारे उपक्रम राबविले जातात आणि तेही चर्चच्या पाद्रींद्ववारे. तिथे पालकांनी पाठविलेल्या मुलांवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या कथा अंगावर काटा आणणार्या आणि अनाकलीनय आहेत.
ABC वाहिनीने अमेरिकेत याबाबतीत काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला. या वाहिनीने वर्षभर एका संस्थेमध्ये गुप्तपणे चित्रीकरण केलं. चित्रिकरण एकाच ठिकाणी झालं असलं तरी या संस्थेच्या धर्तीवरच इतर संस्थांमधील कार्यपद्धती आहे. अशा संस्थांमध्ये विविध मार्गांचा वापर लैंगिकता बदलण्यासाठी होतो. समलिंगी असणं म्हणजे पाप ही त्यामागची ठाम भूमिका. ते पाप धुऊन काढण्यासाठी कोंडून ठेवणे, पट्ट्याने मारणे, भिन्न लिंगी व्यक्तीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे असे उपाय सुचविले जातात. संमोहन, मेंदूवर शस्त्रक्रिया, हात, पाय, गुप्तांगाला विजेचा धक्का देणं, औषधोपचारांचा मारा करणं हे त्यातले काही मार्ग. काही संस्थांनी तर मुलं पळून जाऊ नयेत म्हणून तारांचं कुंपण घातलेलं आहे. मुलाला मुलाबद्दल आकर्षण वाटण्याचं कारण बालवयात वडिलांचं न मिळालेलं प्रेम हेच गृहीत धरुन वडील आणि मुलगा अशा भूमिका या शिबिरांमध्ये दाखल झालेल्या मुलांनाच दिल्या जातात किंवा त्यांचे प्रशिक्षक वडिलांची भूमिका निभावतात, वडिलांच्या स्पर्शाची ओळख करुन दिली जाते. ज्या अर्थी मुलांना समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटत आहे याचा अर्थ लहानपणी घरातलं वातावरण ठीक नसणार, शारीरिक बळजबरी झाली असणार याच शक्यता पक्क्या धरुन तसं नसलं तरी मुलांच्या मनावर ठसवलं जातं, वदवून घेतलं जातं.
क्वचित पालक आपल्यापाठीमागे काय घडतं आहे याबाबत अनभिज्ञ असले तरी बहुतेक वेळा पालकांना काय उपचार केले जाणार आहेत याची व्यवस्थित कल्पना असते. ’बायबल आणि बेल्ट’ या दोन गोष्टींनी मुलांच्या मानसिकतेमध्ये बदल घडेल याची ग्वाही पाद्री देतात आणि पालक त्यावर विश्वास ठेवतात. अल्पवयीन मुलांना पालक इथे दाखल करतात. कधी गळ घालून तर कधी जबरदस्तीने. त्यासाठी वीस - वीस हजार डॉलर्स इतका अवाजवी खर्च करायला ते तयार होतात. एकाच आशेवर. आपलं मूल या रोगातून, आजारातून बाहेर पडावं, समलिंगत्व नष्ट होऊन सर्वसाधारण बनावं. प्रत्यक्षात तसं काही होत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे.
ABC वाहिनीने चित्रित केलेल्या कार्यक्रमाचा परिणाम म्हणजे तेथील पाद्रींना सुनावलेली २१ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा. छळणूक झालेल्या मुलांनी साक्ष दिल्यामुळे हे शक्य झालं. या कठोर शिक्षेमुळे असे उपक्रम राबविणार्या संस्था आणि शिबिरं योग्य तो संदेश घेऊन हे उपक्रम बंद करतील अशी न्यायाधीशांची अपेक्षा आहे. या संस्थेतील १६ वर्षाचा ल्यूकस पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याला बोलतं केलं तेव्हा त्याच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या हकिकती पुढे आल्या. ल्यूकसला या संस्थेत पालकांनी पाठवलं ते ३ वर्षापूर्वी. अत्याचारांनी पोळून निघालेल्या ल्यूकसने पळ काढला. सुदैवाने पोलिस अधिकारी केनडी ह्यांची त्याला मदत मिळाली. केनडी एकदा त्या शिबिरात गेले असताना मुलांचे शांत, गंभीर चेहरे त्यांना अस्वस्थ करुन गेले. त्यांनी मुलांशी बोलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तिथून परतल्यावर काही दिवसातच मुलांची मदतीची याचना करणारी पत्र त्यांना आली. केनडी प्रयत्नाला लागले खरे. पण चर्चच्या पाद्रींना विरोध करायला त्यांच्या पोलिस सहकार्यांनी नकार दिला. नानाप्रकारे प्रयत्न करुनही उपयोग झाला नाही. ३ वर्ष ते काहीही बदल ते करु शकले नाहीत. पण केनडींमुळे त्रस्त होऊन हा उपक्रम दुसर्या जवळच्या गावी हलविला गेला. तिथे मात्र पालकांनी केलेल्या तक्रारीने अत्याचाराला वाचा फुटली. केनडींचे प्रयत्न सार्थकी लागले.
पण अशा संस्था अमेरिकेत फार पूर्वीपासून आहेत. १९९२ साली निकोलसीच्या संस्थेने या पाशवी अत्याचारांवर मानसोपचार या नावाने शिक्कामोर्तब केलं आणि खुलेआम अशा संस्था अमेरिकेभर सुरु झाल्या.जोसेफ निकोलसी याची संस्था ( NARTH - National Association for Research & Therapy of Homosexuality) वैद्यकीय आणि मानसोपचार या उपायांनी मुलांना या आजारातून बरे करु शकतात अशी जाहिरात करत असे. नुकतंच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर तरी त्यांनी उभारलेल्या संस्थेवरही पडदा पडावा अशी मागणी केली जात आहे. खरंतर कितीतरी वैद्यकीय आणि मानसोपचारतज्ज्ञ संघटनांनी वैद्यकीय उपचार किंवा मानसोपचाराने समलिंगत्व बदललं जात असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचं प्रसिद्ध केलं आहे. पण ना पालकांना त्यामुळे फरक पडला ना अशा संस्थाना. बहुतेक सर्वच संस्था अशाप्रकारच्या उपचारांचं समर्थन करताना दाखला देतात तो सरकारने राबविलेल्या योजनेचा आणि कर्क नावाच्या मुलाचा. समलिंगत्वाबद्दल आकर्षण वाटणार्या मुलांची मानसिकता बदलता येते हे सिद्ध करण्यार्या सरकारच्या योजनेत कर्कला त्याच्या आईने दाखल करायचं ठरवलं. मुलगा बाहुल्यांशी खेळतो, मुलींचे कपडे त्याला आवडतात ह्या लक्षणांबरोबरच दूरदर्शनवर मानसोपचारतज्ज्ञाने उल्लेख केलेली सारी लक्षणं आपल्या मुलात आहेत याची कर्कच्या आईला खात्री पटली आणि कर्कच्या समलिंगत्वाबद्दलही. त्याला बदलता येईल या आश्वासनावर विश्वास बसलेल्या कर्कच्या आईने त्याला योजनेत दाखल केलं. साल होतं १९७० आणि कालावधी १ वर्ष. एक वर्षानंतर हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दाखला मानसोपचारतज्ज्ञाने दिला. किंबहुना कर्कचं उदाहरण वेगवेगळ्या अभ्यासक्रमात, अहवालात, लेखात यशस्वी उदाहरण म्हणून दिलं गेलं. वर्षानुवर्षे. आत्तापर्यंत. इतके वर्ष याबाबत अंधारात असलेल्या कर्कच्या कुटुंबाच्या नजरेला हे आलं आणि त्याच्या घरच्यांनी कर्कची शोकांतिका उघड केली.
वर्षभराच्या उपचारांनी बदललेला कर्क घरी आला तेव्हा घरच्यांना त्याच्याशी कसं वागायचं त्याचे धडे गिरवावे लागले. संस्थेने शिकवल्याप्रमाणे कर्कचं वागणं जेव्हा मुलासारखं असेल तेव्हा त्याला निळ्या रंगाची सोंगटी दिली जाई आणि मुलीसारखं वागला की केशरी. केशरी सोंगट्या मिळाल्या की कर्कला मार खावा लागे. संस्थेतील विपरीत प्रयोगांनी नैराश्याने त्याला ग्रासलं होतंच. त्यातच घरी आल्यावरही चालूच राहिलेल्या उपचारांनी तो कुढा बनत गेला. आई - वडिलांना आवडेल असं वागण्याचा कर्कवरचा ताण वाढत गेला. अखेर तरुणपणी त्याने समलिंगी असल्याचं जाहीरपणे व्यक्त केलं. बहीण भावंडं असूनही त्याच्या वाट्याला एकटेपण आलं. तो सर्वांपासून दुरावत गेला. नंतर नोकरीसाठी भारतात स्थिरावला. वयाच्या अडतिसाव्या वर्षी दिल्लीमध्ये पंख्याला गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण समजून घ्यायला घरातील सर्व असमर्थ ठरल्याचं दु:ख बहिणीच्या बोलण्यातून व्यक्त होतं. पण पाचव्या वर्षी त्याच्यावर झालेल्या प्रयोगाचे विपरीत परिणाम तो आयुष्यभर भोगत राहिला असावा याबाबत तिला शंका वाटत नाही. पण मग एवढ्या वर्षांनी त्याने आत्महत्या का करावी या प्रश्नाचं उत्तर ती शोधते तेव्हा तिला त्याने इतकी वर्ष जिवाचं बरं वाईट कसं केलं नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं, इतका तो या प्रयोगामध्ये पोळला गेला होता आणि नंतर घरातल्या वातावरणात. आणि देशभर मात्र समलिंगत्वाच्या आकर्षणातून मुक्त झालेला मुलगा म्हणून कर्कचं उदाहरण कित्येक वर्ष दिलं जात होतं. त्या भरवशावर अनेक मुलांना त्यांच्या पालकांनी अशा शिबिरांमध्ये दाखल केलं यासारखं दुर्देव ते काय?
आपल्या मूल समलिंगी आहे हे स्वीकारणं निश्चितच अवघड आहे. कितीतरी मुलांना घराबाहेर काढलं जातं, मनोरुग्ण समजलं जातं, नियमित चर्चला जाण्याची सक्ती केली जाते, समाजसेवेला जुंपलं जातं. शरम, लाज ह्या भावनेने अख्खं कुटुंबच तोंड लपवतं. काहींना वाटतं की गर्भपात केला असता तर बरं झालं असतं. मुलांनी आपल्या साथीदाराची घरात ओळख करुन दिली तरी खूप पालक त्या साथीदाराकडे मुलांचे ’मित्र’ म्हणूनच पाहतात, तशीच इतरांशी ओळख करुन देतात. काहीजणांना आपल्या मुलांना बाहेरची बाधा झाल्याचीही खात्री असते. या सार्या प्रकारांनी मुलांना नैराश्य येतं, ती वाईट मार्गाला लागतात, आत्महत्या करतात.
मुलगा ’गे’ असल्याचं समजल्यावर त्याला वडिलांनी लिहिलेलं पत्र मध्यंतरी सर्वत्र चर्चिलं जात होतं. वडिलांनी लिहिलं होतं.
माझ्याकडून तुझ्या समलिंगत्वाला पाठिंबा मिळणं अशक्य आहे. मी तुझ्याबरोबर घालवलेले क्षण जपून ठेवेन. माझ्या निधनानंतर तू आला नाहीस तरी मित्र आणि नातेवाईक समजून घेतील. मुलाने आपल्या वडिलांच्या पत्राबद्दल लिहिताना म्हटलं आहे की अतिशय हुशार विद्यार्थी, आज्ञाधारक, इतर मुलांप्रमाणे मी दारु किंवा मादक पदार्थांची चवही चाखली नाही या चांगलं मुल समजल्या जाणार्या सर्व गोष्टी माझ्यात असूनही मी समलिंगी असल्याचं समजल्यावर घरादारातून मिळणारी वागणूक गुन्हा केल्यासारखी आहे.
या अगदी उलट काही पालकांनी आपलं मूल जसं आहे तसं आपल्याला प्रिय आहे हे त्यांच्या वागण्यातून, पत्रातून, त्यांच्याबरोबर समलिंगी व्यक्तीसाठी लढा देणार्या चळवळीत सहभागी होऊन दाखवून दिलं आहे. पण ज्यांच्या वाट्याला आई वडिलांचं हे निरपेक्ष प्रेम येत नाही त्यांचं जीवन भरकटतं. कधी ही मुलं बेवारशी होतात तर कधी पालकच संस्था, शिबिरं, उपक्रमांत पाठवून नकळत त्यांच्या आयुष्याचं नुकसान करतात. जसं समलिंगी विवाहाला कायद्याचं कोंदण मिळाल्याने बर्याच प्रश्नांची उत्तरं सुलभ झाली तशा समलिंगत्व नष्ट करण्याचं आश्वासन देणार्या संस्था, शिबिरं बंद झाली तरच या मुलांना होणार्या शारीरिक, मानसिक छळावर फुंकर मारल्यासारखं होईल.
साधारण ३.८ टक्के म्हणजेच जवळपास ९ मिलियन समलिंगी माणसं अमेरिकेत आहेत. या लेखात मी समलिंगी हा शब्द वापरला आहे पण LBGTQ हे त्याचं विस्तारित स्वरुप आहे. (Lesbian, Bisexual, Gay, Transgender, Queer) आणि या सर्वांनाच वर उल्लेख केलेल्या गोष्टी लागू आहेत.
'बिगुल' २०१८ दिवाळी अंकात प्रसिद्ध
.
.
भयानक वास्तव..
भयानक वास्तव..
चित्रदर्शी लेख
बापरे ! थोडीशी कल्पना होती
बापरे ! थोडीशी कल्पना होती याबाबत पण इतकं भयानक असेल असं नव्हतं वाटलं.
चांगला लेख !
मुलांचा काय दोष आहे यात, वाईट
मुलांचा काय दोष आहे यात, वाईट वाटलं वाचून. आता आता परिस्थिती जरा बदलत चालली आहे, पूर्वी जेव्हा माहित सुद्धा नव्हतं समलैंगिकतेबद्दल तेव्हा किती त्रास होत असेल अशा मुलांना असं वाटतं. अजूनही हे स्वीकारायला पालक तयार नसतात, आपल्या समाजात अशा गोष्टी बोलणं सुद्धा बॅन आहे.
ओह! वाईट वाटलं वाचुन.
ओह! वाईट वाटलं वाचुन.
चांगला लेख.
हे चित्र भारतात असेल असे
हे चित्र भारतात असेल असे वाटले होते, अमेरिकेतही हेच चित्र आहे याचे आश्चर्य वाटले.
<<<हे चित्र भारतात असेल असे
<<<हे चित्र भारतात असेल असे वाटले होते, अमेरिकेतही हेच चित्र आहे याचे आश्चर्य वाटले.>>>
खरे तर माणसे सर्वत्र सारखीच. कुठलाहि बदल मान्य करायला कुणि तयार नसते. एकूण समाजात तो बदल मान्य व्हायला देशकाल परत्वे कमी अधिक वेळ लागतो.
उदाहरणार्थ - घटस्फोट हा अमेरिकेत फार पूर्वीपासून समाजात मान्य करण्यात आला आहे, भारतात नुकतीच या कल्पनेला लोक मान्यता देऊ लागली आहेत.
बिगुलवर वाचला होता लेख.
बिगुलवर वाचला होता लेख.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
साधना, मी नेहमीच भारतातल्या नातेवाईक, मित्रमैत्रीणींकडून हे ऐकलंय. नन्द्या४३ म्हणतात तसं, स्वीकारायला वेळ लागतो सर्वत्रच, वेळ कमी जास्त इतकंच.
पण या लेखानंतर मला भारतातल्याच काहीजणांनी कळवलं त्यावरुन तिकडे परिस्थिती सुधारतेय असं वाटलं. म्हण्जे नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी उपचार उपलब्ध किंवा या मुलांचे, पालकांचे गट.
स्वाभाविक समलैंगिकतेला
स्वाभाविक समलैंगिकतेला कारणीभूत होणा-या जनूकांची माहिती वैज्ञानिकांनी सर्वांना उपलब्ध करून दिली तर अशा समस्या निर्माण होणार नाहीत.
समाजातील स्वाभाविक समलैंगिकतेचा स्विकार वेगाने वाढेल.